काही महिन्यांतला फरक-By pudhari | Publish Date: Jul 08 2017
अलीकडल्या काही महिन्यांत काश्मीर सतत पेटलेला असल्याच्या बातम्या येत असतात. कधी भारतीय सेनादलाच्या जवानांवर जिहादींनी हल्ला केल्याने कोणी जखमी झाला, तर कोणाचा मृत्यू झाल्याच्या बातम्या असतात. मग त्या हल्लेखोरांचा शोध घेण्याची मोहीम सुरू होते आणि वेढा दिल्याने झालेल्या चकमकीत दोन-तीन तरी जिहादी मारले जात असतात. त्यात कोणी ‘हिजबुल’चा कमांडर असतो वा ‘तोयबा’चा कोणी म्होरक्या असल्याचे उघड होत असते; पण अनेकदा तर प्रत्यक्षात मारल्या जाणार्याक जिहादीची तपशीलवार माहिती सेनादलाच्या हाती आलेली असते. कोण दडी मारून सेनादलावर गोळीबार करतोय, त्याचाही तपशील वाहिन्यांच्या बातमीत समोर येत असतो. याचा अर्थ उलगडून सांगण्याचा प्रयत्न बातमीतून सहसा होत नाही; पण अशा बातम्या संगतवार मांडल्या, तर मागल्या वर्षी बुरहान वानी मारला गेल्यापासून हे सत्र चालू झालेले आहे. त्यात एकामागून एक खतरनाक दहशतवादी मातीस मिळालेले आहेत. काही जवानांनाही शहीद व्हावे लागलेले आहे; पण आजवर जी एकतर्फी लढाई चालू होती, ती मोठ्या प्रमाणात कमी झाली असून आमने-सामने लढाई छेडली गेलेली आहे. म्हणून तर नागरी वेशातल्या अशा जिहादींचे पुरस्कर्ते व पाठीराखेही त्यांना वाचवायला पुढे येऊन सेनादलावर दगडफेक करताना दिसत आहेत. यातली आणखी एक बाजू अशी, की याच कालखंडामध्ये पाकिस्तानी हद्दीतून इथे भारतात घुसण्याच्या कुरापतीला मोठ्या प्रमाणात आळा घातला गेला आहे. तरीही मारल्या जाणार्याग जिहादींची संख्या लक्षणीय आहे. याचा अर्थ असा, की दीर्घकाळ असे घुसखोरी केलेले जिहादी मोठ्या संख्येने सामान्य लोकांमध्ये मिसळून राहिलेले होते आणि त्यांना इथे चांगल्या पद्धतीने आश्रय मिळालेला होता. त्यासाठी अर्थातच हुर्रियत वा तत्सम पाकप्रेमी दलालांनी मदत केलेली असणार, हे वेगळे सांगण्याची गरज नाही. नोटाबंदीच्या नंतरच्या काळात या गोष्टींना काहीसा आळा घातला गेला होता; पण पुन्हा हळूहळू त्याचे प्रमाण वाढत गेले आणि आता हाती आलेल्या माहितीनुसार गेल्या अवघ्या सहा महिन्यांत यावर्षी 92 जिहादी दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात यश आले आहे. ही बाब इतकी सोपी व सहजशक्य झालेली नाही. त्यामागे पक्के नियोजन व साधनांसह अधिकार सेनादलाला देण्यामुळे असे परिणाम मिळालेले आहेत. ज्या पद्धतीने सेनादलप्रमुख आपल्या अधिकारी जवानांच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले व केंद्र सरकारनेही सेनादलाला मोकळीक दिली; त्याचे फायदे मिळत आहेत. पाकिस्तानने जिहादींना आश्रय देऊ नये ही आपली मागणी आहे; पण आपल्याच भूमीत त्यांना आश्रय मिळतोय, तो कधी संपणार? त्याचे उत्तर यातून मिळते आहे. भारतीय काश्मिरात आता अशा जिहादींना अभय उरले नाही, हा त्याचा अर्थ आहे.
यावर्षी घुसखोरीची प्रकरणे जवळपास निम्म्याहून कमी झाली आहेत आणि त्यातही मोठ्या प्रमाणात अशा घुसखोरांना सीमेवरच संपवण्यात आलेले आहे, तरीही इतक्या म्हणजे 92 लोकांचा खात्मा करावा लागला, म्हणजे बाहेरून येणार्यांचपेक्षाही इथेच येऊन बस्तान बसवलेल्यांची संख्या नगण्य नाही. ते विविध घरात कुटुंबात आश्रय घेऊन राहिलेले आहेत आणि त्यांना मदत करणार्यां ची संख्याही लहानसहान नाही. जेव्हा अशा चकमकीच्या वेळी दगडफेक करण्याचे प्रकार वाढले, तेव्हा दगडफेक्यांचा बंदोबस्त करण्यासाठी वेगळी कुमक ठेवण्याची योजना आखली गेली आहे. साहजिकच, चकमकीत भाग घेणार्या जवानांना दंगेखोरांचा व्यत्यय कमी झाला आहे. अधिक आपला जीव धोक्यात घालून चकमकी करण्यापेक्षा लपलेल्यांना दमवून वेढा देऊन खात्मा करण्याची रणनीती अंमलात आणली गेलेली आहे. ‘सर्जिकल स्ट्राईक’मुळे घुसू बघणार्या जिहादींच्या संख्येलाही पायबंद घातला गेला आहे. त्याचवेळी परदेशी पैसा घेऊन इथे जिहादींना मदत उभी करणार्यांळच्या नाड्याही आवळल्या गेल्या आहेत. काश्मीर विषयात काम करणार्यास विविध संस्था, संघटना व प्रशासनाची सांगड घालण्यात आली असून, खबर्यां्चेही मोठे नेटवर्क उभे करण्यात आले आहे. त्यात स्थानिक पोलिस व नागरिकही मदत करत असल्याने हे शक्य झालेले आहे. म्हणून तर प्रथमच काश्मिरी पोलिस वा सेनादलातील काश्मिरींच्या जीवावर जिहादी उठले आहेत. शोधून काढून वा बेसावध असताना काश्मिरी सैनिक वा पोलिसांचे खून पाडले जात आहेत. एका बाजूला राजकीय लढाई चालू असतानाच सैनिकी लढाईत संपूर्ण स्वातंत्र्य सेनादलाला दिल्याचा हा लाभ आहे. सीमेची नाकेबंदी व आत लपून बसलेल्यांचा खात्मा, जितका सफल होईल तितके काश्मीरचे समाधान आवाक्यात येणार आहे. आजवर तितका व्यापक व सर्वांगीण विचार झाला नव्हता आणि धरसोड वृत्तीने धोरणात फेरफार होत राहिल्याने, अधिक नुकसान झालेले आहे. ते भरून काढताना अधिक जीवितहानी सहन करावी लागत आहे; पण हळूहळू काश्मिरी जनतेमध्येही हुर्रियत व पाकप्रेमी नेत्यांविषयी प्रक्षोभ वाढतो आहे. सेनाधिकारी फय्याज व पोलिस अधिकारी महंमद आयुब, याच्या हत्याकांडानंतर पाकप्रेमी नेत्यांच्या विरोधातल्या प्रतिक्रिया बोलक्या होत्या. त्यांच्या अंत्ययात्रेला लोटलेला जनसमूह बदलत्या भावनांचे प्रतीक होते. मेजर गोगोई याच्या धाडसी कृतीला देशभरातून मिळालेल्या उत्स्फूर्त पाठिंब्यानेही सेनादलाचे मनोधैर्य उंचावलेले आहे. म्हणूनच हा अवघ्या सहा महिन्यांत मोठा पल्ला गाठता आलेला आहे. जिहादींचे पेकाटच काश्मिरात मोडले जात आहे. यापुढे कुठल्याही राजकीय दडपणाला सरकारने बळी पडू नये, इतकीच अपेक्षा! राजकीय सत्ता ठाम उभी राहिली तर भारतीय सेनेचा पुरुषार्थ जगालाही जिंकू शकेल
No comments:
Post a Comment