July 12, 2017015
Share on Facebook Tweet on Twitter
माझे मत
चीन, पाकिस्तान ही आपली शेजारी राष्ट्रे. शेजार्यांशी नेहमीच चांगले संबंध असावेत ही भारतीयांची मानसिकता नव्हे, तो आहे एक संस्कार. स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू भारत स्वतंत्र झाल्यावर चीन दौर्यावर गेले तेव्हा हिंदी-चिनी भाई भाई हा नारा घेऊनच परत आले. परंतु; राजीव गांधी पंतप्रधान असताना चीन दौर्यावर गेले तेव्हा त्यांना अपमानास्पद वागणूक देण्यात आली होती हे विसरता येणार नाही. त्याचे कारण चीन कधीच कुणाचा झाला नाही.
सिक्कीमच्या डोकलांग प्रदेशावर आणि दक्षिण चीन समुद्रात चीन आपला मालकी हक्क दाखवीत आहे. भारत आणि भूतानचा भाग येथे एकत्र येतो. तिथे रस्ता बांधण्याचा चीनचा प्रयत्न आहे. येत्या ४५ दिवसांत २४० वेळा चीनने सीमोल्लंघन केले आहे. वारंवार १९६२ च्या युद्धाची आठवण करून देत भारताला टोमणे मारणार्या चीनला हे माहिती नाही की, भारताची संरक्षण क्षमता, सैनिकी सामर्थ्य आता कितीतरी पटीने वाढलेले आहे.
सिल्क रूटच्या माध्यमातून चीनला युरोपपर्यंत पोहोचायचे आहे त्यासाठी त्याचा हा प्रयत्न आहे. दलाई लामांना इथे पाठवा, तिथे पाठवू नका असे सांगणारा चीन आहे तरी कोण? चीनची आर्थिक प्रगती भारतापेक्षा जास्त असल्यामुळे आपली सैनिकी शक्तीही भारतापेक्षा जास्त आहे अशी गुर्मी चीनला आहे. १९५० पासून चीनची हीच भूमिका आहे. शत्रूचा शत्रू तो आपला मित्र या उक्तीप्रमाणे सध्या पाकिस्तानला कुरवाळणे, त्यांना आर्थिक, सैनिकी मदत करणे अशी कामे चीन गत कित्येक वर्षांपासून करत आहे. परंतु, हेतू मात्र पाकिस्तानला आपल्या अधिपत्याखाली, टाचेखाली दाबून ठेवणे हाच आहे. १९५० मध्ये तिबेट चीनने गिळंकृत केला. नेहरू चूप बसले. चीन कोणत्याही कराराचे पालन करीत नाही हा पूर्वेतिहास आहे. जर चीनला आरंभीच खडसावलं असतं तर त्याची दादागिरी करण्याची हिंमत वाढली नसती.
२०१४ मध्ये भाजपाचे शासन आल्यापासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची प्रतिमा उंचावली आहे. आतापर्यंत लहान- मोठ्या ६० देशांना नरेंद्र मोदी यांनी भेटी दिल्यात. भारताला हितावह ठरतील असे करारही केलेत. तशीच एक भेट भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व डोनाल्ड ट्रम्प यांची झाली. मोदींचे अमेरिकेत जंगी स्वागत झाले. अमेरिकन जनताही मोदींचा जयजयकार करीत होती. दोन्ही देशांचे संबंध मैत्रीपूर्ण, सौहार्दाचे पाहून चीनच्या पोटात कळ उठली. त्यामुळे भारताला तो ऐरणीवर धरू पाहतो आहे.
चीनच्या वस्तू अतिशय निम्न दर्जाच्या व स्वस्त असल्यामुळे भारतासह अनेक देशात त्याने बाजारपेठेचा मोठा विस्तार केला आहे. त्यामुळे आपला सर्वाधिक पैसा चीनकडे जातो. असे असतानाही चीन आपल्यावरच कुरघोडी करीत आहे. त्याचे मनसुबे ओळखून भारताला अंतर्गत अर्थव्यवस्था आणि स्वसंरक्षण सामर्थ्य (डिफेन्स पॉवर) वाढविणे गरजेचे आहे. चीनला भारताने आपले सामर्थ्य आता दाखविलेच पाहिजे. परंतु, युद्ध हा पर्याय नाही. आपल्या देशात येऊन वस्तू वितरण करण्याच्या, भारताच्या भरवशावर ऐश करायची आणि वरून डोळे वटारायचे हे चालणार नाही. भारतानेही वस्तुस्थितीची जाणीव करून देण्यासाठी नागरिकांमध्ये काही अंतर्गत तंत्राचा वापर केला पाहिजे. ‘मेड इन चायना’ वस्तूंवर निर्बंध घातले पाहिजे. शासनाला जर काही करारानुसार हे शक्य होत नसेल तर भारतात लोकशाही आहे. भारत तरुणांचा देश आहे. सुज्ञ आहे तेव्हा देशाच्या हितासाठी आपण चायनानिर्मित वस्तूंवर बहिष्कार टाकला पाहिजे. मुलांच्या खेळण्यांपासून, सौंदर्यप्रसाधने, कपडे, स्वयंपाकघरातील लहानसहान वस्तूंपर्यंत त्यांनी बाजारपेठ काबीज केली आहे. चीनमधला प्रत्येक व्यक्ती उद्योगी आहे. आम्ही भारतीय स्वदेशी वस्तूला आऊट ऑफ फॅशन म्हणतो आणि अभिमानाने सांगतो की, हे इम्पोर्टेड आहे. आम्हाला देशभक्ती नाही, स्वत्वाची जाणीव नाही, आमच्याच बांधवांचा विचार नाही. राष्ट्र जगले तर आम्ही जगू आणि राष्ट्र जगण्यासाठी राष्ट्रातील अर्थव्यवस्था मजबूत होणे आवश्यक आहे. जे शासन करू शकत नाही ते जनता करू शकते, हे पतंजली उत्पादनाने दाखवून दिले आहे. त्यामुळे जनतेने चायना मेड वस्तूंवर बहिष्कार घातला, त्यांची खरेदी बंद केली तर चीनला आपला गाशा भारतातून गुंडाळावा लागेल. याचा त्यांच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम होऊन, अर्थव्यवस्थेला धक्का बसून त्याला स्वत:चा विचार करावा लागेल. चिनी वस्तूंची ओळख होऊ नये म्हणून वस्तूवर ‘मेड इन चायना’ न लिहिता काही विशिष्ट अंक चीन अंकित करतो आहे. त्याची ओळख नागरिकांना होणे आवश्यक आहे. डिजिटल इंडिया, मेक इन इंडिया या पंतप्रधानांच्या राष्ट्रभावनेला यशस्वी करण्यासाठी भारतीय जनतेचे सहकार्य आवश्यक आहे. ‘सबका साथ सबका विकास’ या ध्येयपूर्तीसाठी चीनला भारतीय नागरिकांनी हिसका दाखविणे काळाची गरज आहे. लाल चिनी बोक्याला भारतीयांनी धडा शिकविला पाहिजे. त्याला वठणीवर आणण्याचा हाच एक मार्ग आहे. असे झाल्यास घुसखोरीच काय तर भारताकडे वळून पाहणेही चीनला विसरावे लागेल आणि त्याला नेहरूंच्या वेळचा भारत आणि आताचा भारत (मोदींच्या काळातील) यातील फरक समजून आता आपले काही खरे नाही हे जाणून तोच खर्या मैत्रीपूर्ण व्यवहारावर येईल. चीन वठणीवर येताच पाकिस्तानच्या हृदयाची स्पंदने वाढलीच म्हणून समजा. सासूच्या जिवावर जावई उदार!
–
No comments:
Post a Comment