Total Pageviews

Sunday, 10 August 2014

SACHIN TENDULKAR THE CELEBRATY MP

आमच्या देशात जणू काय देशभक्तांचा, देशाचे हित जोपासणार्‍यांचा, देशाच्या हितासाठी स्वत:ला वाहून घेणार्‍यांचा, समाज व देशाच्या उद्धारासाठी तन-मन-धनाने झटणार्‍यांचा व विद्वानांचा खूप मोठा दुष्काळ पडला म्हणून की काय आमच्या देशात, ज्यांना राजकारणाचा गंध नाही, जनतेच्या समस्येशी ज्यांना काही घेणं-देणं नाही, ज्यांनी कधी गरिबी पाहिली नाही; ज्यांना खासदार कशासाठी असतो, त्याची कर्तव्ये काय याचे ज्ञान नाही, ज्यांच्यासाठी पैसा आणि प्रसिद्धी हेच सर्व काही आहे, अशा खोर्‍याने पैसा ओढणार्‍या सेलिब्रिटींना राज्यसभेचे सदस्यत्व बहाल करून लोकशाहीच्या पवित्र मंदिरात नेऊन बसवले जाते, याला मूर्खपणा नाही तर काय म्हणावे? सध्या भारतरत्न सचिन तेंडुलकर आणि अभिनेत्री रेखा यांच्या सदस्यत्वाचा मुद्दा काही सदस्यांनी राज्यसभेत उपस्थित केल्यामुळे या दोन्ही सदस्यांना आपली जागा तर कळलीच, पण कॉंग्रेसचेही हसे झाले. सचिन गेल्या दोन वर्षात फक्त तीन दिवस सभागृहात हजर होता. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाल्यानंतर आजवर तो केवळ एकच दिवस संसदेत उपस्थित राहिला. डिसेंबर २०१३ ते जुलै २०१४ पर्यंत संसदेची तीन अधिवेशने झाली आणि राज्यसभेचे कामकाज ३५ दिवस चालले. या ३५ दिवसांत सचिनने फक्त एक दिवस हजेरी लावली. केंद्रात नरेंद्र मोदीचे सरकार आल्यानंतर, त्याला शपथविधीचे निमंत्रण पाठवूनही कॉंग्रेसच्या सांगण्यावरून तो उपस्थित राहिला नाही. यामुळे तर सचिनबद्दल देशातच नव्हे तर विदेशातील भारतीयांमध्ये असणारा सचिनबद्दलच्या सन्मानाला तडा गेला. त्याची जगभरात नालस्ती झाली. ‘कॉंग्रेसवासी झालेला भारतरत्न सचिन’ इथपर्यंत त्याच्यावर टीका झाली. आपण भारतरत्न आहोत, कुणाचेही गुलाम नाही, याचाही विसर सचिनला कसा काय पडला? खेळ, चित्रपट, जाहिराती आणि अन्य विविध मार्गांनी खोर्‍याने पैसा ओढून आधीच सुखात लोळणारे हे सेलिब्रिटी खासदार जनतेच्या कष्टाच्या पैशातून दरमहा वेतन व भत्ते घेऊन व सामान्य जनतेला स्वप्नवत वाटणार्‍या सुविधा व सवलती लाटून चैन करीत असतात. जनतेची कोणतीही कामे न करता निष्क्रिय राहून हे सेलिब्रिटी दर महिन्याला राज्यसभेचा पगार उचलतात. शिवाय भत्ते आणि त्यांना मिळणार्‍या उच्च श्रेणीच्या सुविधा आणि सवलती वेगळ्या. आश्‍चर्य एका गोष्टीचे वाटते की, सरकार आपल्या कर्मचार्‍यांना त्यांच्या कामाचे वेतन देते. कर्मचार्‍यांच्या खात्यात जमा असलेल्या सुट्यांव्यतिरिक्त ते कामावर गैरहजर राहिल्यास त्यांच्या वेतनातून त्या दिवसाच्या पगाराची कपात केल्या जाते. कार्यालयातील त्यांच्या कामावरच्या अनुपस्थितीबाबत त्यांच्या विरोधात शिस्तभंगाची कारवाई केली जाते. परंतु आमच्या देशात जनतेचे सेवक असलेल्या खासदारांवर कशाचेच बंधन नाही. त्यांनी संसदेच्या कामकाजात आपली उपस्थिती दाखवली काय, नाही दाखवली काय, संसदेत आले काय, नाही आले काय, जनतेची कामे केली काय, नाही केली काय, त्यांच्या वेतनात व त्यांना मिळणार्‍या भत्त्यात व खर्चात काहीच कपात केल्या जात नाही. त्यांना मिळणार्‍या सुविधा आणि सवलतींमध्येही कपात केल्या जात नाही. घरी बसून आरामात लोळत बसले तरी त्यांची खासदारकी कायम राहते. त्यांच्यावर एकदा का खासदारकीचा शिक्का लागला की मग ते निष्क्रिय राहूनही चैन करायला मोकळे असतात. जनतेच्या पैशावर चैन करून संसदेला पाठ दाखविणार्‍या निष्क्रिय सेलिब्रिटी खासदारांत सचिन एकटाच नाही. असे अनेक लोक आहेत. पण, सचिनसोबत राज्यसभा सदस्यत्वाची शपथ घेणारी सिने नटी रेखा देखील राज्यसभेच्या कामकाजात आजवर केवळ सात वेळाच सहभागी झाली. देशात नरेंद्र मोदी सरकार आल्यापासून तर सचिन आणि रेखा हे संसदेत फिरकले देखील नाहीत. गानसम्राज्ञी लता मंगेशकर व दिवंगत चित्रकार एम. एफ. हुसैन यांच्यावरही नावापुरतेच खासदार असा शिक्का लागला. आपल्या क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणार्‍यांच्या विद्वत्तेचा, अनुभवांचा, विचारांचा, मार्गदर्शनाचा देशाला लाभ व्हावा यासाठी त्यांना राज्यसभेत मनोनित करणे व त्यांना देशाची सेवा करण्याची संधी देणे, हे एकवेळ समजू शकते. परंतु ज्यांची ती पात्रताच नाही अशांना कशाला राज्यसभेवर पाठवून अन्य तज्ञ लोकांच्या जागा अडवायच्या? केवळ सत्ताधारी पक्षाने आपला उदोउदो करण्यासाठी? आता दस्तुरखुद्द राष्ट्रपती महोदयांनीच या कामी हस्तक्षेप करण्याची गरज निर्माण झाली आहे. कारण, हे सर्व सदस्य राष्ट्रपती नामनियुक्त असतात. सचिन, रेखा यासारखे लोक जर असे निष्क्रिय वागले की, टीकेची झळ राष्ट्रपती भवनालाही बसते. कारण, अशा खासदारांचे वेतन, भत्ते, सोयीसवलती या जनतेच्या पैशातून दिल्या जात असतात, ज्यांचा अपव्यव होतो. त्यामुळे अशा सर्व राज्यसभा सदस्यांचे पगार बंद करायला हवेत, दिले गेले असतील तर ते परत घ्यायला हवेत, भत्ते व अन्य सवलतींचीही रक्कम परत मागायला हवी आणि या दोन्ही खासदारांचे सदस्यत्व तत्काळ रद्द करायला हवे. कारण, जनतेच्या पैशाची उधळपट्टी हा अपराध आहे. - रणजित देशमुख

No comments:

Post a Comment