सुंभ जळाला तरी पीळ सुटत नाही’ अशी मराठीत एक म्हण आहे. याचीच प्रचिती तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या खासदार कन्येने उधळलेल्या कथित मुक्ताफळांमुळे आली आहे. काश्मीर आणि निजामाच्या हैदराबाद संस्थानाचा भारतीय संघराज्यात समावेश होऊन तब्बल साडेसहा दशकांचा काळ लोटला तरी काही महाभागांची अलगतावादी मानसिकता अद्याप ओसरताना दिसत नाही. जम्मू-काश्मीरमधील फुटीरवादी संघटनांच्या कारवायांमुळे त्या प्रदेशाचा विकास खुंटतो आहे. काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग आहे हे साऱया जगाने मान्य केले असताना काश्मीरातील काही फुटीरवादी गट अद्याप हे मान्य करण्याच्या मानसिकतेत नाहीत. काश्मीरप्रश्नी तेथील जनतेचे मत आजमावून पहावे अशी मागणी अधून मधून तेथील काही स्थानिक पाकिस्तानवादी तथाकथित नेते करत असतात. त्यावर काही काळासाठी वाद उत्पन्न होतो पण त्यानंतर काही घडलेच नाही अशी परिस्थिती होते. वास्तविक काश्मीरचा प्रश्न आणि तेलंगणाचा प्रश्न यांची गल्लत करण्याचा प्रयत्न कोणी करू नये. मात्र के. चंद्रशेखर राव यांची कन्या आणि नवनिर्वाचित खासदार के. कविता यांनी तसा प्रयत्न केला आहे. जम्मू-काश्मीर आणि तेलंगणाचा भारतात झालेला समावेश हा बळजोरीने करण्यात आल्याचे कथित विधान करण्यामागे त्यांचा नेमका उद्देश कोणता हे अद्याप समजलेले नसले तरी तेलंगणाला स्वतंत्र राज्याचा दर्जा मिळाला आहे, एवढय़ावर त्या समाधानी नाहीत एवढे मात्र त्यातून स्पष्ट होण्यासारखे आहे. जम्मू-काश्मीर आणि तेलंगणाचा समावेश भारतात बळजोरीने करण्यात आला एवढेच सांगून त्या थांबल्या नाहीत तर त्याही पुढे जाऊन त्या म्हणतात की, ही संस्थाने स्वेच्छेने भारतात विलीन झाली नसल्याने आता पुन्हा एकदा आंतराष्ट्रीय सीमारेषा निश्चित करण्याची गरज आहे. खासदार कविता राव यांना तेलंगणाच्या इतिहासाची कितपत जाण आहे, असा प्रश्न इथे निश्चितच उपस्थित होतो. आज नव्याने स्थापन झालेल्या तेलंगण राज्याचा बहुतांशी प्रदेश हा पूर्वी निजामशाहीत खितपत पडलेल्या हैदराबाद संस्थानच्या ताब्यात होता. 1947 साली ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून सारा भारत मुक्त झाला. त्यावेळी भारतात अस्तित्वात असलेली सुमारे साडेचारशे संस्थाने भारतात विलीन झाली. तत्कालीन गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांनी या संस्थानांच्या विलीनीकरणासाठी यशस्वी प्रयत्न केले आणि बहुसंख्य संस्थानिकांनी कोणतीही खळखळ न करता त्यांच्या प्रयत्नांना स्वखुशीने प्रतिसाद दिला. आपली संस्थाने वेगवेगळी असली तरी आपले सर्वांचे भारत हेच राष्ट्र आहे आणि आम्ही सारे भारतीय आहोत हीच भावना त्यामागे होती. जम्मू-काश्मीर संस्थानचे तत्कालीन महाराजा हरिसिंह यांनीही आपल्या संस्थानाच्या भारतातील विलीनीकरणास मान्यता दिली होती. काश्मीर हा प्रदेश पुरातन काळापासून संस्कृतीने, परंपरेने आणि भावनात्मकतेने भारताशी एकरूप असलेला प्रदेश भारतापासून अलग राहूच शकत नव्हता. काही मूठभर फुटीरवादी आणि पाकिस्तान धार्जिण्यांनी या विलीनीकरणात खो घालण्याचा प्रयत्न केला, मात्र काश्मिरी जनतेने त्या प्रयत्नांना भीक घातली नाही. अशाप्रकारे जम्मू-काश्मीरसह सर्व संस्थाने भारतात विलीन झालेली असतानाही हैदराबाद संस्थानचे वेगळे अस्तित्व निर्माण करण्याचा प्रयत्न तेथील निजामशाहीने केला. संपूर्ण देश स्वातंत्र्याची फळे चाखत असताना हैदराबाद संस्थानातील जनतेवर निजामशाही लादलेली राहावी, हे तेथील राष्ट्रप्रेमी जनतेला सहन होणारे नव्हते म्हणून तेथील जनतेनेच स्वातंत्र्यासाठी उठाव केला तरीही निजामशाहीच्या वृत्तीत फरक पडला नाही. त्यामुळे अखेर भारताचे तत्कालीन गृहमंत्री वल्लभभाई पटेल यांना तेथील जनतेची स्वातंत्र्याभिलाषा पूर्ण करण्यासाठी कठोर पावले उचलावी लागली. हैदराबाद संस्थानमधील जनतेला भारतात विलीनीकरण हवे होते. उर्वरित भारतातील जनतेप्रमाणेच स्वातंत्र्याची फळे चाखणे हा त्या जनतेचाही जन्मसिद्ध हक्क होता. तेथील जनता भारताशी एकरूप होण्यास आसुसलेली होती. या संस्थानचे भारतात झालेले विलीनीकरण हा तेथील जनतेच्या प्रबळ इच्छाशक्तीचा विजय होता, असे असताना ते विलीनीकरण बळजोरीने लादले गेल्याचे कविता राव म्हणत असतील तर तो साऱया देशप्रेमी तेलंगणवासियांचा अवमानच ठरू शकतो. आता पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय सीमारेषा निश्चित करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन करणाऱया कविता यांची मानसिकताच तपासावी लागणार आहे. जम्मू-काश्मीर आणि तेलंगणाचा समावेश भारतात करण्यात आल्यापासून या प्रदेशात संकटांची मालिकाच सुरू झाली असल्याचे त्यांचे विधान तर अधिक आक्षेपार्ह ठरते. कविता राव या भारतीय संसदेच्या एक सन्माननीय सदस्य आहेत. आपण काय बोलत आहोत आणि त्यातून लोकांना कोणता संदेश देत आहोत याची जाणीव त्यांना नसेल असे वाटत नाही. त्या भागातील लोकांना ज्या समस्या भेडसावत आहेत त्या सोडविण्यासाठी त्या एक खासदार या नात्याने प्रयत्न करू शकतात. तेलंगण राज्यात सध्या त्यांच्याच पक्षाचे सरकार आहे. त्या सरकारच्या माध्यमातून त्यांना त्या समस्यांचे निराकारण करून घेता येईल. समस्या या केवळ जम्मू-काश्मीर किंवा तेलंगणातच नाहीत. देशभरात अनेक समस्या आहेत आणि त्याबद्दल तेथील जनतेत नाराजीही असू शकते. मात्र समस्या आहेत म्हणून त्याचे खापर देशाच्या स्वातंत्र्यावर फोडण्याचा अश्लाघ्य प्रयत्न कोणीही करू नये. हैदराबाद किंवा जम्मू-काश्मीरच्या जनतेने संपूर्ण स्वेच्छेने भारताशी एकरूपता स्वीकारली आहे. मूठभर फुटीर मंडळींना ती लादलेली वाटत असेल तर खासदार कविता यांनी त्यांच्या या म्हणण्याचा बाऊ करण्याचे कारण नाही. आपल्या या विधानामुळे पाकिस्तानच्या हातात आयते कोलीत मिळाल्यासारखे होईल का, याचाही विचार त्यांनी करायला हवा होता.
No comments:
Post a Comment