भारतरत्न हा देशातील सर्वोच्च मानाचा किताब. तेव्हा त्याबाबतची चर्चा राजकीय वा अन्य पातळ्यांवर जाऊ नये, असा आजवरचा समज होता. परंतु मोदी सरकारने संभाव्य भारतरत्नांबाबत चर्चा सुरू केल्याबरोबर अनेक छुप्या रत्नांची नावे अनेकांनी ज्या पद्धतीने पुढे करण्यास सुरुवात केली ती पाहता अशा चर्चेचे महत्त्व कळून येईल आणि आजवर कुठकुठले माजी पंतप्रधान भारतरत्न झाले, कोणकोणते प्रादेशिक नेतेही या किताबाचे मानकरी ठरले हे पाहता ही चर्चा याच (आड)वळणाला जाणे क्रमप्राप्त आहे, हेही मान्य होईल..
भारतरत्न कोणाकोणाला द्यावे आणि म्हणावे यासाठी सध्या नव्याने जी चर्चा सुरू झाली आहे, त्याचे आम्ही मनापासून स्वागत करतो. या चर्चेची गरज होतीच आणि तीमुळे अनेक हेतू साध्य होतील. दगडांच्या खाणीत जसे एखादेच रत्न निघते तसेच सव्वाशे कोटींच्या देशातून पंतप्रधानपदी आरूढ होण्याच्या लायकीची एखादीच व्यक्ती असू शकते. त्यामुळे जो किंवा जी कोणी पंतप्रधान होईल, ते आपोआप भारतरत्न किताबासाठी निवडले जावेत असा निर्णय भाजप सरकारने घेण्याची गरज आहे. त्यामुळे अनेक माजी पंतप्रधानांचा दुवा भाजपला मिळू शकेल. माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांना भारतरत्न देण्याबाबत या सरकारने हालचाली सुरू केल्याचे कळते. देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू, दुसरे लालबहादूर शास्त्री, मधले गुलझारीलाल नंदा, नंतरच्या इंदिरा गांधी, त्यांचे चिरंजीव राजीव गांधी (संजय गांधी यांना पंतप्रधानपदाची संधी मिळाली नाही, अन्यथा तेदेखील नक्कीच भारतरत्न झालेच असते.) मूळचे काँग्रेसचे पण तरीही काँग्रेसेतर सरकारचे पहिले पंतप्रधान मोरारजी देसाई आदी माजी पंतप्रधान भारतरत्नाने गौरवले गेलेच आहेत. तेव्हा वाजपेयी यांचे नाव या यादीत का नको, या प्रश्नाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना खेद होत असेल तर ते त्यांच्या कोमल स्वभावास साजेसेच झाले, असे म्हणावे लागेल. तेव्हा वाजपेयी यांना या सरकारने भारतरत्न करावेच. परंतु त्याचबरोबर प्रत्येक पंतप्रधान माजी झाला रे झाला की आपोआप आजी भारतरत्न होईल अशीही व्यवस्था सरकारने करावी. याचे कारण या अशा व्यवस्थेच्या अभावी अनेक मान्यवर या भारतरत्नपासून वंचित राहिले आहेत. उदाहरणार्थ विश्वनाथ प्रताप सिंग. भारताची दुसरी फाळणी ज्याने करून दाखवली अशा व्यक्तीस असा सन्मान न मिळणे हे अन्यायकारक आहे. झालेच तर हरदनहळ्ळी दोड्डेगौडा देवेगौडा यांनी या भारतरत्नाचे काय घोडे मारले आहे? देशात आर्थिक सुधारणांचा रुतलेला गाडा त्यांच्या काळात पेंगत का होईना हलू लागला, ही त्यांची मोठी कामगिरी त्यांना नक्कीच भारतरत्नास पात्र ठरवते. त्यांच्याहीपेक्षा जास्त लायक ठरतात ते चंद्रशेखर. ज्या प्रदेशात एके काळी सोन्याचा धूर निघत असे कविमंडळी सांगतात त्या देशाच्या सरकारचा प्रमुख म्हणून सोने गहाण ठेवण्याचा निर्णय घेण्यास वाघाची छाती लागते. ती चंद्रशेखर यांनी दाखवली. त्यामुळे तेही भारतरत्नच्या यादीत असणे ही भोडशी येथील आo्रमाची गरज आहे. या पदावर असताना काहीही देदीप्यमान न करता राहणे हेदेखील देदीप्यमानच आहे. तेव्हा या निकषावर इंदरकुमार गुजराल हे देखील भारतरत्नच ठरतात. आणि नरसिंह राव यांचे काय? त्यांना विसरून कसे चालेल. या देशास मनमोहन सिंग यांसारखा हिरा गवसला तो राव यांच्यामुळेच. तेव्हा बाकी काही नाही तरी मनमोहन सिंग यांना पुढे आणले या एकाच मुद्दय़ावर राव हेदेखील भारतरत्न ठरतातच ठरतात. शिवाय त्यांना भारतरत्न जाहीर करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना काँग्रेसश्रेष्ठींची पंचाईत करता येईल, हा आणखी एक फायदा. राहता राहिले मनमोहन सिंग. करून न केल्यासारखा कारभार, असून नसल्यासारखे अस्तित्व या सर्व बाबी मानपत्रात लिहिण्याजोग्याच आहेत. मोदी यांच्या पक्षाने सत्तेवर येण्यासाठी मनमोहन सिंग यांच्यावर बरीच राळ उडवली होती. भारतरत्नची चादर त्यावर घालता आल्यास त्या पापाचे क्षालनदेखील मोदी यांना करता येईल. असे केल्याने आणखी एक होईल. ते म्हणजे कधी काळी पदावरून उतरायची वेळ मोदी यांच्यावर आलीच तर तेदेखील आपोआपच भारतरत्नसाठी पात्र ठरतील.
मोदी सरकारने संभाव्य भारतरत्नांबाबत चर्चा सुरू केल्याबरोबर अनेक छुप्या रत्नांची नावे अनेकांनी ज्या पद्धतीने पुढे करण्यास सुरुवात केली ती पाहता अशा चर्चेचे महत्त्व कळून येईल. काँग्रेसने कांशीराम आणि अलीगड मुस्लीम विद्यापीठाचे संस्थापक सर सय्यद अहमद खान यांचे नाव यासाठी सुचवले आहे. मात्र फक्त कांशीराम यांच्यावरच काँग्रेसने थांबू नये. उत्तर प्रदेशात कैक उद्याने आणि पुतळे उभारणाऱ्या, ताज महामार्ग आणि अन्य भ्रष्ट प्रकरणांतून कोटय़वधींची माया करणाऱ्या गरीब की बेटी मायावती यांनाही ते देण्याची व्यवस्था करावी. उत्तर प्रदेशातील पुरुषप्रधान संस्कृतीस तोंड देऊन सत्ता मिळवणे हे काही लहान काम नक्कीच नाही. त्यांच्यानंतर सत्तासंतुलनाप्रमाणे रत्नसंतुलनासाठी काँग्रेसने वा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने मुलायमसिंग यांचेही नाव यासाठी पुढे करावे. त्याच्या बदल्यात समाजवादी पक्षाने या पक्षाचे दिवंगत चाणक्य हरकिशनसिंग सुरजित यांनाही हा पुरस्कार देण्याचा आग्रह धरावा. या मालिकेत ठाकुरांची सत्ता आणि मत्ता त्यांच्याकडून हिरावून घेण्याचे ऐतिहासिक कार्य एकहाती करणारे लालुप्रसाद यादव हेदेखील भारतरत्न नामांकनासाठी सुयोग्य ठरतात. गाई-म्हशींना पुरवल्या जाणाऱ्या चाऱ्याच्या माध्यमातून संपत्ती निर्मिती करण्यास प्रतिभा आणि प्रतिमेस महत्त्व न देण्याची वृत्ती दोन्ही लागते. या दोन्हींचा समुच्चय लालुप्रसादांच्या ठायी असल्याने ते नक्कीच पात्र ठरतील. बनारस हिंदू विद्यापीठाचे संस्थापक कै. मदनमोहन मालवीय आणि अलिगड मुस्लीम विद्यापीठाचे मरहूम सय्यद अहमद खान या दोघांची नावे दोन प्रमुख राजकीय पक्षांकडून आल्यामुळे आपोआपच संतुलन साधले गेले आहे. परंतु हा मान या दोनच विद्यापीठांना का? त्याबाबत आमची सूचना अशी की ज्याप्रमाणे मंत्रिमंडळात कॅबिनेटमंत्री, राज्यमंत्री, उपमंत्री असे टप्पे असतात त्याप्रमाणे मुख्य भारतरत्न, उपमुख्य भारतरत्न आणि कनिष्ठ भारतरत्न अशी वर्गवारी करून सर्व माजी कुलगुरू, विविध पक्षांचे संस्थापक वगैरेंची सोय तीत लावून टाकावी. हे बिचारे कुलगुरू एका अर्थाने त्यांना नेमणाऱ्यांच्या ऋ णाची परतफेड करण्याचे बहुमोल कार्य करीत असतातच. तेव्हा त्यांच्याही कार्याचा गौरव होणे गरजेचे आहे. या यादीत सर्वोच्च न्यायालयाचे सर्व निवृत्त न्यायाधीश, सर्व उच्च न्यायालयांचे मुख्य न्यायाधीश यांचाही संभाव्य भारतरत्नांच्या यादीत आपोआप समावेश केला जावा. अन्यथा मरकडेय काटजू यांच्यासारख्या हिऱ्यास योग्य ते कोंदण कसे मिळणार? आतापर्यंत एकाच उपपंतप्रधानास भारतरत्न किताबाने गौरवण्यात आले आहे. ते म्हणजे गुलझारीलाल नंदा. हा अन्याय आहे. तो दूर करण्यासाठी माजी उपपंतप्रधान आणि अखंड संभाव्य पंतप्रधान लालकृष्ण अडवाणी यांचा भारतरत्न देऊन गौरव होणे ही काळाची गरज आहे. मोदी सरकारने अनेक ज्येष्ठांना किमान राज्यपालपदे तरी देऊन सन्मानिले आहे. अपवाद फक्त अडवाणी यांचा. ते बिचारे अजूनही मुझे याद है उन्नीसौ बावन में.. म्हणत राजकारणात तग धरून आहेत. भारतरत्न दिल्यास त्यांच्या उपस्थितीचा गौरव होईल. सध्या भारतरत्नच्या यादीत सर्वपल्ली राधाकृष्णन, बाबू राजेंद्र प्रसाद, झाकीर हुसेन, एपीजे अब्दुल कलाम याच माजी राष्ट्रपतींचा समावेश आहे. मोदी सरकारने सर्व पंतप्रधानांप्रमाणे सर्व माजी राष्ट्रपतीही आपोआपच भारतरत्न ठरतील अशी व्यवस्था करावी. ग्यानी झैलसिंग, नीलम संजीव रेड्डी, झाल्याच तर प्रतिभाताई पाटील आदी मान्यवरांना त्यामुळे संधी मिळेल.
याच्या जोडीला आमच्या आणखी एका सूचनेचा सरकारने विचार करावाच करावा. ती म्हणजे माजी पंतप्रधान, माजी राष्ट्रपती यांच्याप्रमाणे सर्व राजकीय पक्षांच्या संस्थापकांना रत्नपद द्यावे. तूर्त हा मान फक्त कामराज आणि एम जी रामकृष्णन यांनाच देण्यात आला आहे. प्रादेशिक समतोलासाठी हे योग्य नव्हे. त्यामुळे सर्वच पक्षांचे संस्थापक.. मग यात शिवसेनाकार बाळासाहेब ठाकरे वा देवीलाल वा करुणानिधी हेदेखील आले.. हे मरणोत्तर का होईना भारतरत्नच ठरावयास हवेत. गायक, कलाकार, संशोधक, वैज्ञानिक यांची या साऱ्यांपुढे काय मातब्बरी? त्यांना भारतरत्न करून काय मिळणार? तेव्हा आमच्या सूचनेचा जरूर विचार सरकारने करावा. त्याखेरीज भारत ही किती आणि केवढय़ा मोठय़ा रत्नांची खाण आहे, हे सर्व जगास कळून त्या तेजाने जगाचे डोळे दिपणार नाहीत.
No comments:
Post a Comment