जिहादला मिळत आहे धार्मिक बौद्धिक संरक्षण -बलबीर पुंज
संयुक्त राष्ट्र आणि जगभरातील देशांचे आवाहन पायदळी तुडवून ‘हमास’ या पॅलेस्टाईनच्या दहशतवादी सुन्नी संघटनेने ईदच्या पवित्र दिवशीही निरपराध लोकांची हत्या केली. दुसरीकडे आपले सार्वभौमत्व आणि अस्तित्व अबाधित राखण्यासाठी इस्रायललाही ‘ऑपरेशन प्रोटेक्टिव्ह एज’ सुरूच ठेवणे भाग आहे. दुसरीकडे इराक आणि सीरियात सक्रिय सुन्नी दहशतवादी संघटना ‘इस्लामिक स्टेट इन इराक ऍण्ड द लेव्हेंट’ (आयएसआयएल) च्या नेतृत्वात तथाकथित इस्लामी साम्राज्याची पुनर्स्थापना करण्यासाठी जगभरातील देशातील मुस्लिम युवक सहभागी होत आहेत. मे महिन्यात भारतातील कल्याण शहरातून इराकच्या मोसूल शहरात गेलेल्या चार मुस्लिम युवकांपैकी आरिफ माजिद आणि सलीम टांकी या दोघांनी आपल्या कुटुंबीयांशी संपर्क साधून ‘उम्मा’च्या स्थापनेसाठी जिहाद केल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. त्यांनी धर्माच्या नावाखाली आपल्या बलिदानाच्या बदल्यात संपूर्ण परिवाराला जन्नत (स्वर्ग) मिळण्याचा विश्वास दिला आहे. मूठभर भरकटलेल्या युवकांचीच अशी मानसिकता आहे, असा युक्तिवाद करून त्याकडे दुर्लक्ष करणे सुसंस्कृत समाजाला संकटाच्या खाईत लोटण्यासारखे आहे. धार्मिक उन्माद, विखाराचे हे विष वेगाने संपूर्ण जगात पसरत आहे, हे कटु सत्य आहे आणि त्याचा आधार घेऊन स्वत:ला बुद्धिजीवी आणि पुरोगामी म्हणविणारे मुसलमानही आहेत.
अगदी इतक्यातच इस्लामी विज्ञानाचे अभ्यासक आणि लखनौच्या दर उल नदवातुल येथील डीन सैयद सलमान अल हुसैनी अल नदवी यांनी सौदी अरेबियाचे शासक अमिरुल मोमिनीन यांना खुले पत्र लिहून पाच लाख सुन्नी भारतीयांची फौज तयार करण्यास सांगितले आहे, जी इराक आणि अन्य ठिकाणी इस्लामचे रक्षण करण्यासाठी सर्वदा सुसज्ज आणि तत्पर असेल. नदवीने १९७६ मध्ये हदीसमध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. त्यांचे इंग्रजी, उर्दू, फारसी आणि अरबी भाषेवर प्रभुत्व आहे आणि त्यांना इस्लामच्या प्रचार व प्रसारासाठी जगभरातील देशात भाषण करण्यास आमंत्रित करण्यात येते. नदवीने उम्माच्या स्थापनेसाठी सौदी अरेबियाला पुढाकार घेण्याचेही आवाहन केले आहे.
यापूर्वी जेव्हा आयएसआयएलने इराक आणि सीरियात आपल्या ताब्यात असलेले क्षेत्र खिलाफत अर्थात इस्लामिक स्टेट घोषित करून आपला प्रमुख अबू बकर अल बगदादीला खलीफा असल्याचे सांगून त्याला जगभरातील मुसलमानांचा नेता घोषित केले होते, तर नदवी कदाचित आशियातील पहिलेच इस्लामी विद्वान असावेत की ज्यांनी केवळ याचे स्वागतच केले, असे नव्हे तर बगदादीच्या ‘पवित्र’ नेतृत्वाविषयी निष्ठा प्रकट करून इस्लामी साम्राज्यवादाच्या पुनर्स्थापनेवरही विश्वास व्यक्त केला आहे. अरबी भाषेत लिहिलेल्या आपल्या उपरोक्त पत्रात नदवीने लिहिले आहे, ‘‘आम्हाला कादियान आणि शियांना घाबरण्याची आवश्यकता नाही आणि अमेरिका, इस्रायलच्या तोंडाकडेही बघण्याची गरज नाही. यासाठी (इस्लामी साम्राज्याच्या पुनर्स्थापनेसाठी) भारतीय उपमहाद्वीपातून पाच लाख सुन्नी युवकांच्या मुस्लिम जगताची शक्तिशाली मुस्लिम सेना उभी करण्याची आवश्यकता आहे. जर आपण आपले दीन, ईमान, सुन्ना आणि इस्लामने दाखविलेल्या खर्याखुर्या मार्गाप्रति निष्ठावंत असाल तर केवळ एकदाच आवाहन करा, भारतीय उपमहाद्वीपातील पाच लाख सुन्नी भारतीय आपल्यासाठी सदैव सज्ज राहतील.’’
पुढे नदवीने लिहिले आहे, ‘काबा समस्त मुस्लिम समुदायाचा श्वास आहे आणि हे इस्लामी जगताचे केंद्र आहे’, यामुळेच पैगंबर साहेबांनी म्हटले होते, ‘‘अरबस्थानातून ख्रिश्चन आणि यहुदींना हाकलून द्या. ज्याप्रमाणे व्हॅटिकनमध्ये मुसलमानांना काहीही स्थान नाही, त्याचप्रमाणे या पवित्र भूमीत ख्रिश्चन आणि यहुदींना कुठलेही स्थान नाही.’’ याबरोबरच अरब देशांना ख्रिश्चन आणि यहुदींपासून मुक्त करणे सौदी अरेबियाच्या सरकारचे कर्तव्य असल्याचेही त्यांनी नमूद केले आहे. त्यांनी जगभरातील इस्लामी दहशतवादी संघटनांचे समर्थन करून त्यांना एकाच मंचावर येण्याचे आणि संघटित होऊन इस्लामसाठी जिहाद पुकारण्याचे आवाहन केले आहे.
सौदी अरेबिया सरकारला लिहिलेल्या उपरोक्त पत्रात व्यक्त झालेल्या नदवीच्या मानसिकतेमुळे जेथे एकीकडे मुस्लिम समाजातील तथाकथित पुरोगामी आणि उदारमतवादी चेहर्यांवरील मुखवटे गळून पडले आहेत, तेथेच दुसरीकडे सेक्युलॅरिस्ट आणि मीडियातील एका मोठ्या वर्गाचा मुखवटाही गळून पडला आहे, जो वेळीअवेळी सहिष्णू हिंदू समाजाला पंथनिरपेक्षता आणि लोकशाही मूल्यांचे डोस पाजण्याची कुठलीही संधी सोडत नाही. अगदी एवढ्यातच शिवसेनेचे एक खासदार आणि दिल्लीस्थित महाराष्ट्र सदनातील एका मुस्लिम कर्मचार्यात झालेल्या भांडणाला सेक्युलॅरिस्टांनी धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न केला होता. मीडियातील एका बड्या वर्गानेही हा मुद्दा अनेक दिवस धगधगत ठेवला होता. मात्र, नदवी प्रकरणात या सार्या मंडळींनी आपले तोंड बंद ठेवले आहे. का?
अरब आणि मध्यपूर्वतील देशात सुरू असलेला हिंसाचार वस्तुत: जगात इस्लामचे साम्राज्य स्थापन करण्याच्या धार्मिक उन्मादाने प्रेरित आहे. पाकिस्तान, अफगाणिस्तान, बांगलादेश, सौदी अरेबिया, इराण, इराक इत्यादी इस्लामी देशांत मानवाधिकारांचे घोर उल्लंघन होते आणि तेथे अल्पसंख्यकांच्या धार्मिक अधिकारांवर कठोर निर्बंध असतात आणि बहुसंख्यक समाजालाही निरंकुश बाहुबळाच्या आधारावर शरियतनुसार जीवन जगण्यास भाग पाडले जाते, हे कटु सत्य आहे. एखाद्या गोष्टीबाबत असहमत असल्यास प्राण संकटात येऊ शकतात. इराकमध्ये खलिफाची नियुक्ती आणि भारतासह पाश्चिमात्य देशातील मुस्लिम युवकांचा जिहादमध्ये सहभाग या धोक्याचे गांभीर्यच अधोरेखित करतो. इजिप्त, सीरिया, तुर्की, पाकिस्तान, इराक, इराण, नायजेरिया इत्यादी देशांत जो रक्तपात सुरू आहे, तो जगातील सुसंस्कृत समाजाबरोबरच स्वधर्मी मुसलमानांसाठीसुद्धा एक संदेश आहे. जिहादी कट्टरपंथी ज्या इस्लामला खराखुरा इस्लाम समजतात, ‘त्या’ इस्लामलाच माना अन्यथा मरण्यास तयार रहा. यापासून भारतही सुटलेला नाही. नदवीच्या पत्राकडे दुर्लक्ष करणे म्हणजे देशाची शांती, सौहार्द्र आणि सहअस्तित्वाला संकटात टाकणे होय.
इस्लामी देशात सुरू हिंसाचार सभ्य समाजासाठी एक धडाच आहे. वास्तविकपणे या सगळ्या स्थानी लोकशाहीच्या नावाने चाललेल्या संघर्षाच्या आडून दुसर्या प्रकारच्या हुकूमशाहीसाठी युद्ध सुरू आहे. तेथील जनमानसात ही तडफ त्या व्यवस्थेसाठी आहे, जेथे इस्लामी परंपरा, मान्यता आणि शरियत सर्वोच्च स्थानी आहे.
लिबियात सरकार आणि जिहादी संघटनांमध्ये संघर्ष सुरू आहे, तर कतारमध्ये सरकार मध्ययुगीन श्रद्धांवर आस्था ठेवणार्या जहालवादी संघटनांसमोर मान झुकवायला तयार आहे. कट्टरपंथी संघटना शरियतवर आधारित राज्यव्यवस्था लागू करू इच्छितात. अशा व्यवस्थेत महिलांवर प्रचंड निर्बंध असतात. त्यांना बुरख्यातच राहणे भाग पडते. त्या बाहेर एकट्या जाऊ शकत नाहीत, सोबतीला कुणीतरी असणे आवश्यक असते, अन्यथा अनाचाराच्या नावाखाली मृत्यूची शिक्षा निश्चित आहे. या तुलनेत तुर्कीला उदारमतवादी देश म्हणून ओळखले जाते. मात्र, काही दिवसांपूर्वी तेथेही महिलांवर जोराने, मनमोकळेपणाने हसण्यावर बंदी घालण्यात आली आहे. अशा प्रतिगामी समाजाच्या निर्मितीसाठी जेव्हा नदवीसारखे इस्लामचे विद्वान ‘जिहाद’ ची वकिली करतात, तेव्हा सुसंस्कृत समाजाला चिंता वाटणे स्वाभाविकच आहे.
-
No comments:
Post a Comment