हा फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदींचा पहिला १५ ऑगस्ट नाही. त्या सर्व पिढ्यांच्या लोकांचा प्रतीक्षेचा दिवस आहे, जे अनेक दशकांपासून आणि शतकांपासून भारताला पुन्हा वैभवाच्या शिखरावर पाहण्यासाठी तळमळत होते, त्या राष्ट्रीय दिवसाच्या प्रतीक्षेत जगले आणि मेले, ज्या दिवशी कुणी सिंहासारखा शूर शासक भारतीय जनतेला सुरक्षा आणि समृद्धी देण्याचे कार्य करेल.
या देशाने खूप दु:ख सोसले आहे. फक्त आम्ही आपला धर्म, आपली संस्कृती, आपल्या अपार वैभवामुळे क्रूर आक्रमणाचे बळी ठरलो. शहरे जळाली, मंदिरे तोडण्यात आली, जनसामान्यांची कत्तल झाली, (एकट्या दिल्लीतच आठ वेळा कत्तल झाली) जगात अनिंद्य, सौंदर्यवान राजपूत स्त्रियांचे जोहार झाले, साहेबजादे जिवंतपणे भिंतीत चिणले गेले, गुरूंचे बलिदान झाले, बंदा बैरागी, भाई मतिदास, भाई सतीदास जिवंतपणे कढईत जळले, सिंधूचे विभाजन झाले, देशाची फाळणी झाली (मोठा भूभाग आमच्या हातून गेला), १९४७ नंतर चीन आणि पाकिस्तानने आमचा १.२५ लाख चौरस किलोमीटर भूभाग हडप केला. आपल्याच देशात लक्षावधी भारतीय विस्थापित बनले, ६७ वर्षे लोटल्यावरही भाषा आणि भारतीयता इंग्रजी आणि इंग्रजांची गुलाम राहिली. एवढे सगळे झाले तेव्हा नरेंद्र मोदी आले.
एकदा मागे वळून पाहा तर खरे. तिबेट गेले, अक्साई चीनही हातचा गेला, १९६२, १९६५ आणि १९७१ च्या युद्धानंतर कारगिल झाले. या दरम्यान, जयप्रकाश नारायण यांचे आंदोलन, आणिबाणी, जनता पार्टीची स्थापना आणि पक्षात पडलेली फूट (कोकाकोलावर बंदी आणि त्याच्याजागी ७७ चा कोला), समाजवादाची सुट्टी, उदारीकरणाचे आगमन.
ही सर्व वर्षे भारतातील प्रत्येक युवकाच्या मनात आकांक्षा जागविणारी, प्रगतीचा मार्ग दाखविणारी आणि जगात भारताचा गौरव वाढविण्याची हिंमतही निर्माण करून गेली. त्यांनी राजकारणाचे सर्वच रंग बदलवून टाकले. अहंमन्य आणि श्रेष्ठत्वाचा गंड असलेल्या वरिष्ठ जातीतील लोकांकडून सत्ता हिसकावून घेऊन त्यांच्या हातात दिली, जे त्यांच्या शेतात राबत होते, मेहनत करीत होते, फटके खात होते, अस्पृष्य ठरविले जात होते. अशा प्रकारे कात टाकलेल्या या देशाने ब्राह्मण शिरोमणी त्यांच्या पायावर नतमस्तक होताना पाहिले, ज्यांच्या हाताचा स्पर्श झालेले पाणीही ते कालपर्यंत घेत नव्हते. बा पूर्वाश्रमीच्या अस्पृश्यांनो! तुम्ही धन्य आहात. तुमच्यासमोर पंडितजीही नतमस्तक झाले.
पण, याबरोबरच देशाचा पहिला शत्रू चीन किंवा पाकिस्तान नाही, अंतर्गत भ्रष्टाचार बनला. भ्रष्ट नेते आणि अधिकार्यांनी देशाच्या सुरक्षेचा खेळखंडोबा केला. फायली अडवून ठेवल्या, हजारो निरपराध नागरिक (आणि जे भारतीयच होते) भ्याड, डरपोक, जिहादी, कम्युनिस्ट माओवादी, चर्च संरक्षित ईशान्येकडील बंडखोरांच्या हातून मारले जात असतानाही ते पाहत राहिले, पण देशाला कुठलेही अभेद्य सुरक्षा कवच त्यांनी दिले नाही.
आता देशाची परिस्थिती बदलण्याची वेळ आली आहे. जे अश्मयुगीन मानसिकतेत आजही याच्यावर वादविवाद करतात की, देशाला हिंदुस्थान नाही, इंडिया म्हणण्यात यावे, त्यांची येथे दखलही घेण्याची आवश्यकता नाही. जे हिंदू शब्दाचीच घृणा करतात, त्यांच्याविषयी दया बाळगून त्यांना आहे त्याच स्थितीत सोडून पुढे वाटचाल करणे चांगले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी सरसंघचालक प्रा. राजेंद्रसिंह म्हणत असत, प्रदीर्घ यात्रेचा पांथस्थ मार्गात भांडण ओढवून घेत नाही. त्याच्यावर भांडण लादले तरीही तो स्वत:ला वाचवून त्यातून बाहेर पडतो, कारण त्याच्या डोळ्यात ध्येय गाठण्याची जिद्द असते. भारतातही ही पुढे जाण्याची, प्रगती करण्याची जिद्द निर्माण झाली, तर जात, पंथ, भाषा, प्रांताचे भेद आपोआपच नष्ट होतील. लहानलहान गोष्टीच फार परिणामकारक ठरतात. स्वच्छ रेल्वेस्थानक, केवळ वैध प्रवाशांनाच तेथे प्रवेश, तिकीट विक्री सहज आणि आनंदाचा अनुभव देणारी, प्लॅटफॉर्मवर जनावरांप्रमाणे लेटलेल्या, झोपलेल्या प्रवाशांसाठी सन्मानपूर्वक प्रतीक्षालयाची (वेटिंग रूम) व्यवस्था का होऊ शकत नाही? दिल्लीत विमानाने या अथवा रेल्वेने किंवा बसने, बाहेर पडल्यापडल्याच संघर्ष सुरू होतो. ना ऑटो, ना रिक्षा, ना टॅक्सीचे नियमाप्रमाणे भाडे आकारण्यात येते. हे का? शाळा ओस पडल्या, इस्पितळात घाण आणि बेजबाबदार डॉक्टर. कुठलाही सरकारी अधिकारी किंवा राजकीय नेता सरकारी इस्पितळाऐवजी खाजगी इस्पितळात उपचार का करवून घेतो? सरकारी इस्पितळे सुधारू शकत नाहीत काय? लहान मुलांच्या प्रश्नांविषयी, समस्यांविषयी संसदेत उत्तम भाषणे होतात, पण भारतातील मुलांची अतिशय दुर्दशा झाली आहे. कुपोषण, वाईट अवस्थेतील शाळा, धड खेळायला मैदान नाही, शौचालये नाहीत, ना प्रतिभेचा, सृजनाचा विकास करण्याची खुली संधी. जगात कुपोषण तथा विशेष साहाय्यावर अवलंबून असणार्या मुलांची सर्वांत जास्त संख्या भारतात आहे. कुटुंबांवर नोकरी आणि कामाचा एवढा प्रचंड ताण आहे की, आईवडील इच्छा असूनसुद्धा लहान मुलांना वेळ देऊ शकत नाहीत आणि मुले कधी मोठी झाली, हे त्यांचे त्यांनाच कळत नाही! भिकारी, उष्टे अन्न वेचून खाणारे, कचरा विकून पोळी घेणारी मुले या देशात असतील, तर आम्ही भारताला महासत्ता बनवू शकतो काय?
कोर्टाची अथवा पोलिस स्टेशनची पायरी चढण्याची वेळ देवाने कुणावरही आणू नये. न्यायव्यवस्था ज्या कुणाच्याही हिताची असेल, वादीच्या हिताची तर कधीच नाहीये. घाण माश्यांनी घोंघावणारे न्यायालयाचे क्षेत्र, दलालांचा सुळसुळाट, विलंब, तारखा, न्याय मागणार्याला मरणासन्न करून त्याचे रक्त शोषणे आणि त्याला आत्महत्या करण्यास भाग पाडणारा अण्डर ट्रायल म्हणजे आरोप निश्चित होण्याच्या प्रतीक्षेत कारावास भोगणारे लाखो लोक आणि सडविणारा कोर्टाचा न्याय. हा भारत आहे काय, ज्याचे नागरिक असल्याचा आम्ही अभिमान बाळगतो?
विज्ञान, तंत्रज्ञान, वैद्यकशास्त्र, अभियांत्रिकी, बायो-टेक्नॉलॉजी, अंतराळ विज्ञान हे सर्व आम्हा भारतीयांच्या मुठीत आहे. जगात सर्वत्र ज्ञान-विज्ञानात अत्युच्च शिखर गाठलेल्या भारतीयांचा दबदबा आहे. शौर्य, साहस आणि पराक्रमाच्या क्षेत्रात आम्ही विश्वविक्रम केले आहेत. या सगळ्यांचा उपयोग एक नवीन भारत घडविण्यासाठी होऊ शकत नाही काय? जे भारतीय नागरिक लडाख ते अंदमान आणि तवांग ते ओखापर्यंत एका जननायकाला मतदान करून भाजपाला अतुलनीय बहुमत देऊ शकतात, ते देशातील घाण, दुरवस्था बदलण्याचे सर्वश्रेष्ठ साधन बनू शकत नाहीत काय?
प्रचंड घाण आणि दुर्गंधीच्या सान्निध्यात देवतांचे पूजन का? गंगा, यमुना कुणा मोगल, अरब अथवा तुर्काने थोडीच घाण केली. हे काम तर उच्च जातीचा अहंकार बाळगणार्यांनी मोठ्या तन्मयतेने केले आहे. गायींना वाचविण्याच्या गोष्टी करणारे कितीही मोठ्याने गळे काढोत, गोमांसाचा व्यापार मोठ्या प्रमाणात हिंदूंच्याच हातात आहे- अल् कबीर एक लहानसे उदाहरण आहे.
या ढोंगावर आणि जातीच्या नावावर मरणार्या व मारणार्या अश्मयुगीन समाजावर कोण आघात करेल? जो देशातील युवकांना स्वप्ने दाखविल, त्या स्वप्नांना विजेचे पंख आणि ती प्रत्यक्षात उतरविण्याची शक्ती प्रदान करील तोच भारतभाग्य विधाता बनेल. आपल्या माणसांच्या वेदनेत स्वत:ची वेदना अनुभवणे आणि भारतासाठी मरण्याचा नव्हे, तर जगण्याचा संकल्प घेणे या १५ ऑगस्टचे मर्म असायला हवे.
- तरुण विजय
No comments:
Post a Comment