Total Pageviews

Saturday, 16 August 2014

OUTSTANDING NARENDRA MODI SPEECH

कम, मेक इन इंडिया! - लाल किल्ल्यावरुन मोदींचे ऐतिहासिक दमदार भाषण - ना छापील कागद, ना बुलेटप्रूफ बॉक्स देशवासीयांनो, माझ्या शब्दावर विश्‍वास ठेवा. आजवर केलेल्या सगळ्या चुका विसरून जा. चुकीचा मार्ग सोडा. चांगुलपणा आणि बंधुभावाची कास धरा. एकच निश्‍चय करा, सगळे मिळून देशाला पुढे नेण्याचा. मला ठाम विश्‍वास आहे, मी हे करू शकतो. मी तुम्हाला स्वातंत्र्यदिनी खात्री देतो. नवी दिल्ली, दि. १५ (वृत्तसंस्था) - दिल्लीच्या लाल किल्ल्यावरून हिंदुस्थानच्या तेजतर्रार पंतप्रधानांचे दर्शन उभ्या जगाला आज घडले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ६८ व्या स्वातंत्र्यदिनी बुलेटप्रूफ काचेचे कवच न घेता आणि कागदाचा चिटोराही हाती न ठेवता हिंदीतून उत्स्फूर्तपणे तब्बल ६५ मिनिटे दमदार भाषण केले. ‘आयात करणारा देश’ अशी ख्याती झालेल्या हिंदुस्थानला ‘निर्यात करणारा देश’ अशी नवी ओळख प्राप्त करून देण्याची गरज आहे असे सांगत मोदी यांनी ‘कम, मेक इन इंडिया’ हा नारा दिला. आमच्याकडे कौशल्य आणि गुणवत्ता आहे. हिंदुस्थानात या, इथे उत्पादन करा आणि तुमच्या वस्तू जगात कुठेही विका, असे आवाहन मी अख्ख्या जगाला करीत आहे, असे त्यांनी सांगितले. नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणात सरकार, प्रशासन, शेतकरी, मजूर, विद्यार्थी, तरुण, बालिका-महिला, नक्षलवादी अशा अनेक घटकांचा ठोस उल्लेख केला, तसेच सरकारची धोरणे काय असतील याचा सकारात्मक लेखाजोखाच पंतप्रधानांनी दमदारपणे मांडला. लाल फेटा घालून ‘मानवंदना’ स्वीकारल्यानंतर नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावर तिरंगा फडकवला आणि राष्ट्राला उद्देशून भाषण केले. त्यांनी आपल्या भाषणाची सुरुवातच ‘‘मी देशाचा ‘पंतप्रधान’ म्हणून नव्हे, तर ‘प्रधान सेवक’ या नात्याने इथे उभा आहे’’ या वाक्याने केली. त्यावर टाळ्यांचा एकच कडकडाट झाला. माझ्यासारखा अत्यंत गरीब कुटुंबात आणि छोट्याशा शहरात जन्म घेतलेला मुलगा आज या लाल किल्ल्यावर तिरंग्यासमोर नतमस्तक होतोय. मला लाभलेले हे भाग्य हीच लोकशाहीची ताकद आहे असे सांगून पंतप्रधान म्हणाले की, लोकशाही ही संविधानाच्या निर्मात्यांनी देशाला दिलेली मोठी देण आहे. या लोकशाहीच्या माध्यमातून आपल्याला गरीबांचा उद्धार करायचा आहे.कोणत्याही शस्त्राशिवाय, मदतीशिवाय आम्ही स्वातंत्र्य मिळवू शकतो, मग देशातली गरिबी का हटवू शकणार नाही? नक्कीच हटवू शकतो. त्यासाठी या, आपण सारे एकजुटीने गरिबीविरोधात लढा देऊया, अशी हाक पंतप्रधानांनी दिली. देश घडवण्यासाठी गावांच्या विकासावर अधिक भर देण्याची नितांत गरज आहे असे सांगतानाच जयप्रकाश नारायण यांच्या येत्या जयंतीला ११ ऑक्टोबर रोजी आदर्श ग्रामयोजनेची ब्ल्यू प्रिंट सादर करण्यात येईल, अशी घोषणाही मोदी यांनी केली. आगामी योजनेद्वारे प्रत्येक खासदाराने आपापल्या मतदारसंघात पाच आदर्श गावांच्या निर्मितीसाठी झटायचे आहे असे त्यांनी यावेळी सांगितले. मुलींना ओझे समजू नका! राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांमध्ये हिंदुस्थानला पदके मिळवून देणार्‍या खेळाडूंमध्ये २९ मुली आहेत याचा खास उल्लेख करून नरेंद्र मोदी म्हणाले की, आपल्या मुलींची गर्भात असतानाच हत्या करू नका. डॉक्टरांनी पैशांसाठी हे पाप करू नये आणि आईबापांनी हा गुन्हा करू नये. अविवाहित राहून आपल्या स्वप्नांचा बळी देत आईवडिलांच्या सेवेला वाहून घेतलेल्या मुली अनेकदा पाहायला मिळतात. मुलगा आणि मुलगी यांच्यात कसलाही भेदभाव करू नका. मुलींना ओझे समजू नका. महिलांसाठी शौचालये महिलांना टॉयलेटसाठी घराबाहेर जावे लागते. तसेच अंधार पडेपर्यंत त्यासाठी वाट पाहावी लागते ही लाजिरवाणी गोष्ट आहे. याचा उल्लेख करणे देशासाठी अपमानासपद आहे. त्यावरून टीकाही होऊ शकते. पण त्याची पर्वा मला नाही. मी गरीब कुटुंबातला आहे. गरीबांविषयी बोलणारच असे ते म्हणाले. महिलांची प्रतिष्ठा राखण्याच्या दृष्टीने त्यांच्यासाठी शौचालये बांधण्यावर भर देण्याची गरज आहे. तसेच वर्षभराच्या कालावधीत प्रत्येक शाळेत शौचालयाची उभारणी करताना मुलींसाठी स्वतंत्र शौचालये बांधण्यात येतील, अशी घोषणा पंतप्रधानांनी केली. नजर मुलांवरही ठेवा! बलात्काराची बातमी कानी पडली की तळपायाची आग मस्तकात जाऊन भिडते असे सांगून नरेंद्र मोदी म्हणाले की, मुलगी १० वर्षांची झाली की आईवडिलांची चिंता वाढते. तिला कुठे चाललीस, उशीर का झाला, असे प्रश्‍न ऊठसूट घरात विचारले जातात. पण मुलांच्या बाबतीत तसे घडत नाही. बलात्काराच्या वाढत्या घटना लक्षात घेता आईवडिलांनी मुलांच्या वर्तणुकीवरही नजर ठेवण्याची गरज आहे. मुलांनाही जाब विचारत चला. गुन्हा घडल्यानंतर कायदा आपले काम करतोच, पण जो गुन्हेगार असतो, तोही कोणाचा तरी मुलगा असतो त्यामुळे पालकांनीही दक्ष राहण्याची जबाबदारी पार पाडली पाहिजे. मी आणि माझे हा आत्मकेंद्री विचार सोडून द्या. माझे काय होणार, मला काय मिळणार, ही वृत्ती जोपासू नका. देशाच्या प्रति कृतज्ञता आणि कर्तव्यभावनेतून प्रत्येकाने काही तरी न चुकता करा. सरकारमधल्या भिंती पाडणार काही दिवसांपूर्वी मी दिल्लीत उपरा होतो, पण इथे आलो आणि आतल्या गोष्टी पाहून चकित झालो. केंद्रातील एकाच सरकारमध्ये अनेक सरकारे असल्याचे मला कळून चुकले. प्रत्येकजण स्वत:चे संस्थान असल्यासारखे काम करत होता. एक विभाग दुसर्‍या विभागाशी भांडत होता. ही भांडणे अनेकदा न्यायालयातही पोहोचली होती. अशा पद्धतीच्या कामकाजाने देशाला पुढे कसे नेणार, असा सवाल मोदी यांनी विचारला. ते पुढे म्हणाले की, सरकार म्हणजे काही एक-एक तुकडा जोडून बनवलेली वस्तू नव्हे. ते एकजीव रसायन आहे. त्यामुळे एकाच सरकारमध्ये निर्माण झालेल्या वेगवेगळ्या भिंती मला उद्ध्वस्त करायच्या आहेत. प्रशासनातील लोकांमध्ये प्रचंड गुणवत्ता आहे. त्या गुणवत्तेला एकत्र आणून दिशा देण्यासाठी मी प्रयत्नशील आहे. भाषणातील ठळक मुद्दे - मला शासकीय कर्मचार्‍यांना सांगायचे आहे की, ते केवळ नोकरी करीत नाहीत तर देशाच्या लोकांना सेवा देत आहेत. देशाच्या विकासात भरीव कामगिरी बजावत आहेत. - वेगवेगळ्या प्रांतातील शेतकरी आत्महत्या करीत आहेत. त्यांना त्यांच्या उत्पन्नाचा पुरेसा मोबदला मिळत नाही. नैसर्गिक संकटांमुळे शेतकरी बेजार झाला आहे. त्यांच्यासाठी आम्हाला ‘प्रधानमंत्री जन धन योजना’ आणायची आहे. त्यांच्यासाठी डेबिट कार्ड आणि १ लाखाचा विमा अशा सुविधाही पुरविण्यात येणार आहेत. - देशाला पुढे घेऊन जाण्यासाठी आपल्याला उत्पादन क्षेत्रावर भर द्यावा लागेल. हिंदुस्थानीयांमध्ये क्षमता आहे. मी जगाला येथे येण्याचे आवाहन करतो. हिंदुस्थानात तुम्हाला स्कील आणि टॅलेंट दिसून येईल. - लालबहादूर शास्त्री यांनी ‘जय जवान, जय किसान’ असा नारा दिला होता. त्याला उजाळा देण्याची गरज आहे. - हिंदुस्थानात काळी जादू आणि अंधश्रद्धा असलेल्या लोकांचा देश आहे असा यापूर्वी समज होता, पण आयटी क्षेत्राने जगाचा हा समज दूर केला आहे. - हिंदुस्थान आता डिजिटल इंडिया झाला आहे. इंटरनेट केवळ श्रीमंतांसाठीचे राहिले नाही. इंटरनेटचा वापर आता ग्रामीण भागात शिक्षणाच्या सोयी उपलब्ध करून देण्यासाठी झाला पाहिजे. - आपल्या देशात जागतिक दर्जाचे पर्यटन आपण घडवू शकतो, पण हिंदुस्थानात असलेली अस्वच्छता पर्यटकांना येथे येण्यास रोखते. पंतप्रधानांच्या नात्याने मला पहिले स्वच्छता अभियान हाती घ्यायचे आहे. - जर आपण शक्तिमान विदेशी शत्रूला पराभूत करू शकतो तर गरिबीवर सहज मात करू शकतो. लाल किल्ल्यावरील भाषण संपल्यानंतर कारकडे जाण्याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सुरक्षा कवच सोडून स्वातंत्र्यदिन सोहळ्यात सहभागी झालेल्या शाळकरी मुलांमध्ये मिसळले. त्यांच्याशी हस्तांदोलन केले. बच्चे कंपनीची आवर्जून भेट घेणारे पंतप्रधान म्हणूनही मोदीच पहिले ठरले आहेत. त्यांच्या अनपेक्षित भेटीने निळ्या गणवेषातील ती सारी मुले हरखून गेली होती. - नियोजन आयोग मोडीत ‘गरिबी’ची हास्यास्पद व्याख्या केल्याने यूपीए सरकारच्या काळात टीकेचा आणि चेष्टेचा विषय बनलेला नियोजन आयोग मोदी सरकार मोडीत काढणार आहे. त्या जागी नवी संस्था लवकरच स्थापन करण्यात येईल, अशी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली. नियोजन आयोग हा गेली ६४ वर्षे कार्यरत होता. जोसेफ स्टॅलिन यांनी सोव्हिएत युनियनमध्ये स्थापन केलेल्या नियोजन आयोगानंतर त्यांचे अनुकरण करत जवाहरलाल नेहरू यांनी नियोजन आयोगाची स्थापना केली होती. पहिले मोदीच! - लष्कराची मानवंदना स्वीकारताना ‘लाल फेटा’ घालणारे नरेंद्र मोदी हे पहिलेच पंतप्रधान. - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणाचा समारोप झाल्यानंतर ‘वंदे मातरम्’चे बुलंद नारे दिले. सर्वोच्च सरकारी व्यासपीठावर ‘वंदे मातरम्’चे नारे घुमण्याची ही पहिलीच वेळ आहे. - लाल किल्ल्यावरून एक तासाहून अधिक वेळ भाषण देणारे नरेंद्र मोदी हे जवाहरलाल नेहरू यांच्यानंतरचे पहिले पंतप्रधान. - भाषण संपल्यानंतर कारकडे जाण्यासाठी नरेंद्र मोदी हे सुरक्षा कवच सोडून स्वातंत्र्यदिन सोहळ्यात सहभागी झालेल्या शाळकरी मुलांमध्ये मिसळले. त्यांच्याशी हस्तांदोलन केले. त्यांच्या अनपेक्षित भेटीने निळ्या गणवेषातील ती सारी मुले हरखून गेली होती. बच्चे कंपनीची आवर्जून भेट घेणारे पंतप्रधान म्हणूनही मोदीच पहिले ठरले आहेत.

No comments:

Post a Comment