Total Pageviews

Thursday, 7 August 2014

AZAD MAIDAN GUILTY NOT PUNISHED AFTER TWO YEAR

दोन वर्षांपूर्वी ऑगस्टला मुंबईतील आझाद मैदानावर रझा अकादमीने मुस्लिम मेळाव्यानिमित्त शक्तिप्रदर्शन करून जो धुडगूस घातला त्याचे नंतर नेमके काय झाले? त्यात जे पोलिस जखमी झाले, ज्या महिला पोलिसांवर हात टाकण्याचे दु:साहस करण्यात आले त्यांचे काय झाले? ज्यांनी हे सर्व केले त्यांना कोणती शिक्षा झाली? दंगलीत भाग घेणारे सर्व पकडले गेले का? त्यांना शिक्षा झाली का? हे आणि असे अनेक प्रश्‍न अद्याप अनुत्तरितच आहेत... जनतेची स्मरणशक्ती अशक्त असते असे म्हणतात, पण सर्वांचीच अशक्त असते असे नव्हे... गोधरा विसरून जे केवळ गुजरात दंगलींचे अद्याप भांडवल करीत राहात आहेत, ते बुद्धिजीवी विचारवंत कोठे आहेत? जी प्रसारमाध्यमे भगवा आतंकवाद म्हणून कंठशोष करीत असतात, ती या हिरव्या आतंकवादावर तोंडात मिठाची गुळणी धरून गप्प का बसली आहेत? गेल्या दोन वर्षांत यांच्या शोध-पत्रकारितेला रझा अकादमीची सविस्तर माहिती मिळविता आली नाही की मिळवायची नव्हती? या दंगलीपूर्वी काही दिवस आधी तत्कालीन गृहमंत्री आर. आर. पाटील हे त्या अकादमीमध्ये का गेले होते? जाण्यापूर्वी त्यांना काही वर्षापूर्वी भिवंडी दंगलीत गांगुर्डे आणि जगताप या दोन पोलिसांचा अत्यंत निर्घृण पद्धतीने खून करणारी हीच ती अकादमी होय, अशी माहिती मिळाली नव्हती काय? की ती मिळूनही ते गेले होते? पोलिसांवर हात टाकणे, त्यांना मारून टाकणे व स्त्री पोलिसांची विटम्बना करणे यातून कायद्याच्या रक्षणकर्त्यांवर आपण हल्ला केला तरी आपले काहीच बिघडत नाही, हा संदेश पोहोचत नाही काय? खलनिग्रहणाय असे बिरुद मिरविणार्‍या पोलिस दलातील लोकांवर या सर्व गोष्टींचा काय परिणाम होत असेल? अमर जवान स्मारक तोडणार्‍या तरुणांच्या मुद्रेवरील आसुरी आनंद आजही आठवत असेल. ते स्मारक म्हणजे कोण्या एका धर्मीयांचे धार्मिक स्थळ नव्हते, तरी ते घाव आणि लाथा घालून तोडण्यात आले. यामागची मानसिकता लक्षात घ्या. जवानांचे स्मारक हा राष्ट्रीय मानबिंदू असतो. तो तोडणे म्हणजे राष्ट्राच्या स्वाभिमानावर हल्ला केल्यासारखे आहे... राष्ट्राच्या सार्वभौमत्वाला आव्हान देणे आहे... असे करायला धजावणे हाच देशद्रोह आहे... अशा या देशद्रोह्यांना लगोलग शिक्षा व्हायला हवी... मतांचे राजकारण करू पाहाणार्‍यांना त्याचे काय...? अमर जवान स्मारकाच्या नासधुसीनंतर एका तरी मुस्लिम संस्थेने निषेध व्यक्त केला का? कोणतीही मुस्लिम संस्था ते स्मारक पूर्ववत करण्यासाठी पुढे का आली नाही? यात कोण्या धर्माचा प्रश्‍न नव्हता, तर देशाच्या अस्मितेला ठोकर मारणार्‍यांचा प्रश्‍न होता... या धुडगुसानंतर रझा अकादमीकडून नुकसानभरपाई वसूल करून त्यांच्यावर बंदी लादली का? बजरंग दल, सनातन संस्था, विश्‍व हिंदू परिषद आदींचा जातीयवादी संस्था म्हणून सतत उल्लेख करणार्‍या प्रसार माध्यमांचा रझा अकादमीला जातीयवादी असे म्हणताना घसा का बसतो? पोलिसांची वाहने जाळली जातात, प्रसार माध्यमांच्या ओ बी व्हॅनला आग लावली जाते, सामान्य जनतेला मारहाण होते, तरीही प्रशासन सुस्त राहते. याला काय म्हणावे? दंगेखोर विशिष्ट समाजाचे म्हणून त्यांना अटक करण्यात येणार नसेल, तर कायदा आणि सुव्यवस्थेचे कठीण आहे. त्यातून रमझानचा महिना म्हणून सबुरीने घ्या, असे सांगणार्‍यांना एकच विचारावेसे वाटते की, कांचीच्या शंकराचार्यांना ऐन दिवाळीत लक्ष्मीपूजनाच्या दिवशी अटक करण्यात आली होती. त्याचे काय? मुळात रझा अकादमी आणि अन्य मुस्लिम संघटनांना आझाद मैदानावर निदर्शने व मेळावा घेणे याला अनुमती कशी देण्यात आली, हा प्रश्‍न आहे. अण्णा हजारेंना उपोषणासाठी अनुमती नाकारली जाते आणि आसाम व म्यानमारमध्ये मुसलमानांची गळचेपी होत असल्याच्या निषेधार्थ मुंबईत शक्तिप्रदर्शन करण्यास अनुमती दिली जाते, हे अनाकलनीय आहे... याच संघटनांनी यापूर्वी इराकवर अमेरिकेने हल्ला केला त्याच्या निषेधार्थ निदर्शने करून महापालिकेच्या मुख्यालयावर आणि छत्रपती शिवाजी रेल्वे स्थानकावर दगडफेक केली होती, हा पूर्वेतिहास विसरला गेला की दृष्टिआड करण्यात आला. आझाद मैदानावरील सभेत प्रक्षोभक भाषणे करून आसाम व म्यानमारमधील मुसलमानांच्या खोट्या करुण कहाण्या सांगून ‘इस्लाम खतरे में’ चा आव आणला गेला. यामुळे समूह चिथावला गेला. केवळ निदर्शने असती, तर जमावातील तरुणांकडे हॉकी स्टिक्स, धारदार लोखंडी भाले लावलेल्या लाठ्या, लोखंडी रॉड व दगड हे सर्व साहित्य कोठून आले? जमाव हिंसक का झाला? चिथावणीखोर भाषणे कोणी केली? याची उत्तरे कशी मिळणार...आणि कोण देणार? या हिंसक जमावाने अमर जवान स्मारक तोडले. तसे करणे म्हणजे देशाचा अपमान असतो हे त्यांना कोणी सांगितले नाही का? की ते माहिती असल्यामुळे जाणीवपूर्वक तसे करण्यात आले? आपले काय बिघडणार आहे, ही गुर्मी यामागे होती का? पोलिसांना मारहाण ही सुद्धा ठरवून व त्यांचे मानसिक धैर्य खच्चीकरणासाठीच झाली का? कारण वरिष्ठ पोलिस निरीक्षकासह अनेक पोलिस जखमी झाले. महिला पोलिसांच्या अंगावर हात टाकण्याइतके धारिष्ट्य कसे झाले? वानगीदाखल जखमींची माहिती- हनुमान दरेकर (इन्स्पेक्टर)- हे सर्वात पहिले लक्ष्य बनले. जमावाला सुव्यवस्था राखा अशी विनंती करीत असतानाच डोक्यात हॉकीचा फटका बसला, त्यांचे पिस्तुल व काडतुसे पळविण्यात आली. बाळासाहेब जगताप (असि. इन्स्पेक्टर) जमावाला आवरत होते, विनंती करीत होते. इतक्यात डोक्यात डावीकडून रॉडचा प्रहार झाला. प्रकाश पाटील (कॉन्स्टेबल) जमावाकडून होणार्‍या दगडफेकीत जखमी. अरुण साठे (कॉन्स्टेबल) डोक्यावर रॉडचा फटका बसून जबर जखमी. हणमंत माने (कॉन्स्टेबल) हे रेल्वे स्थानकावर कर्तव्य बजावत होते, तिथे लोखंडी भाले लावलेल्या लाठीने फटका मारण्यात आला. रक्तबंबाळ झाले. तेजश्री आठवले (कॉन्स्टेबल) जमाव अनावर झालेला पाहून यांना अन्य तीन स्त्री सहकार्‍यांसह रॉयट कंट्रोल पोलिस वाहनात बसविण्यात आले. जमावातील लोकांनी बाहेरून वाहनावर फटके मारले, वाहन गदगदा हलवले. मोठ्या शिताफीने त्यांना बाहेर काढण्यात आले. दगडफेकीत डावा घोटा जायबंदी... पोलिसांच्या गाड्या जाळण्यात आल्या. बेस्ट बसेसची मोडतोड करण्यात आली. वृत्तवाहिन्यांच्या ओ.बी.व्हॅन जाळल्या गेल्या. अनेक वाहने पेटवून देण्यात आली. सर्वसामान्य जनता भयभीत झाली होती. सर्वत्र हैदोस चालू होता...विविध वाहिन्यांवरून पोपटपंची करणारे मानवाधिकारवाले कोठे तोंड घालून बसले होते नकळे...!! या सर्व हैदोसाचा निषेध एकाही मुस्लिम संघटनेने का केला नाही... सर्वधर्मसमभाव हा एकमार्गी असतो काय...? एवढे होऊन धुडगूस घालणार्‍या संघटनांविरुद्ध सरकारने काय कारवाई केली...? याचे उत्तर कधी मिळेल...? अमर जवान स्मारक तोडून देशाच्या अस्मितेवर घाला घालणार्‍या व त्यांना तसे करायला उद्युक्त करणार्‍या देशद्रोह्यांना शिक्षा कधी होणार...?? - डॉ. सच्चिदानंद शेवडे

No comments:

Post a Comment