Total Pageviews

Saturday 16 August 2014

NARENDRA MODI SPEECH FROM RED FORT

नव्या भारताच्या दिशेने... (अग्रलेख) - - शनिवार, 16 ऑगस्ट 2014 - 08:44 AM IST Tags: editorial, Narendra Modi, Independence Day, Red Fort स्वातंत्र्य दिनानिमित्त पंतप्रधानांनी देशाला उद्देशून भाषण वाचून दाखवण्याचा उपचार मध्यंतरीच्या काळात उरकला जाई. यंदा मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अपेक्षेप्रमाणे हा पायंडा मोडला. अगदी उत्स्फूर्त भाषण करण्यापासून अवास्तव सुरक्षेचे अवडंबर न माजवता ते देशवासीयांना सामोरे गेले. सोहळ्यानंतर मुलांमध्ये मिसळण्यापासूनचा कार्यक्रम आखीव-रेखीव असला तरी त्यातील सहजताही दीर्घ काळानंतर पाहायला मिळाली. नियोजन आयोगाच्या बरखास्तीची घोषणा, परदेशी भारतीयांना घातलेली स्वदेशाची हाक, स्वच्छ भारताचा नारा, मुली-महिलांच्या सक्षमीकरणावर भर यासारखे मनाला भिडणारे मुद्दे आणि ‘मेड इन इंडिया’चा माल जगभर पोचवण्यापासून ‘मेक इन इंडिया’च्या नाऱ्यातून गुंतवणुकीच्या आवाहनापर्यंत सारे काही अपेक्षा वाढविणारे आहे. पाकिस्तानला इशारे, घराणेशाहीवरील टीका, आधीच्या सरकारांनी काय केले, असे प्रश्‍न उपस्थित करीत पारंपरिक वळणाने भाषणाचा रोख न ठेवता मोदींनी त्यांच्यापुढील आव्हानेच एकप्रकारे देशापुढे मांडली. भ्रूणहत्येपासून वाढते बलात्कार, महिला सक्षमीकरण, रोजगारनिर्मितीसारखा युवकांना अस्वस्थ करणारा मुद्दा, परकी गुंतवणूक वाढवण्यासाठी आश्‍वासक वातावरण निर्माण करण्यावर दिलेला भर आणि गरिबी निर्मूलनासारख्या मुद्द्यांवर सार्क देशांना एकत्र येण्याची हाक देत परराष्ट्र धोरणातील विधायक बदलांनाही त्यांनी स्पर्श केला. एकप्रकारे देशवासीयांशी खुला संवाद साधताना त्यांनी विकासाच्या केंद्रस्थानी केवळ शहरेच नसतील; तर गावागावात विकास पोचवण्यासाठी गावे दत्तक घेण्याची योजना जशी मांडली, तसाच डिजिटायजेशनचा फायदा प्रत्येक खेड्याला कशा पद्धतीने करून देता येईल, याची रूपरेषाही सादर केली. दिल्लीत एकाच सरकारमध्ये दिसणारी अनेक सरकारे, फोफावलेला भ्रष्टाचार आणि नोकरशाहीतील उदासीनता झटकण्याचे मोठे आव्हान त्यांच्यापुढे आहे. ते दूर करण्यासाठी नेमके काय केले आणि काय करतोय हे सांगतानाच त्यांनी नोकरशाहीला मानसिकता बदलण्याचा इशाराही दिला. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारापासूनच मोदींनी त्यांना अपेक्षित असलेल्या भारताचे चित्र मांडले होते. त्याला अनुसरूनच त्यांचे भाषण होते. प्रत्येक प्रश्‍नात सरकार काय करतेय, हा प्रश्‍न न विचारता मी काय करू शकतो, असा प्रश्‍न विचारत लोकसहभागाचे सरकार ही संकल्पना प्रत्यक्षात आणण्याचा त्यांचा प्रयत्नही यातून दिसतो. परकी गुंतवणुकीचा मुद्दा जरी काढला तरी आपल्याकडे अनेकांचे पित्त खवळते. स्वदेशीचा नारा दिला जातो. अशा स्थितीत एकीकडे युवकांना कौशल्ये शिकवण्याचा आणि अशी कौशल्ये आत्मसात केलेल्या हातांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी उत्पादकतेवर आधारित उद्योगांना प्रोत्साहन देण्याचा मुद्दाही त्यांनी मांडला. त्यासाठी भारतात या आणि गुंतवणूक करून रोजगारनिर्मिती करा, असे ‘कम, मेक इन इंडिया’चे आवाहन करतानाच त्या गुंतवणुकीचे दडपण न घेता ‘मेड इन इंडिया’चा माल जगभर जावा, अशी अपेक्षा व्यक्त करीत देशांतर्गत उद्योगांनीही जगाची बाजारपेठ काबीज करावी, यासाठी प्रोत्साहन देण्याचाच सरकारचा प्रयत्न राहील, हेही त्यांनी स्पष्ट केले. स्वच्छतेसारखा महत्त्वाचा मुद्दा त्यांनी अनेक अंगांनी मांडला. शाळेत मुलींसाठी स्वच्छतागृहे असोत की देशभर शौचालये उभारण्याचा प्रयत्न असो, त्यासाठी त्यांनी खासगी क्षेत्रालाही त्यात सहभागी होण्याचे आवाहन तर केलेच; पण गांधीजींच्या १५० व्या जयंतीपर्यंत म्हणजे येत्या पाच वर्षांत प्रत्येक शाळेत स्वच्छतागृह आणि खासदारांपासून प्रत्येक लोकप्रतिनिधीने एकेक गाव दत्तक घेऊन, त्याचा विकास करण्याचे वरवर छोटे वाटणारे; पण व्यवस्था आमूलाग्र बदलणारे पाऊलही टाकले. ‘गरिबी हटाव’चा नारा भारताला काही नवा नाही; पण प्रत्येक गरिबाचे बॅंकेत खाते, त्याचा लाखाचा विमा, अशी ठोस योजना त्यांनी सादर केली. खरे तर मोदींनी मांडलेले अनेक मुद्दे अपेक्षा उंचावणारे, वाढविणारे आहेत. प्रत्येक मुद्दा वेगवेगळा हाती घेतला, तर त्याची चिकित्सा करीत यातून काय साध्य होणार, असा प्रश्‍नही उपस्थित करता येईल. पण, सत्तेवर येऊन दोन-अडीच महिने झालेल्या सरकारपुढील आव्हाने पाहिली; तर त्यांना बदलांसाठी, ते प्रत्यक्षात आणण्यासाठी पुरेसा वेळ द्यायला हवा हेही मान्य करावे लागेल. दीर्घकाळापासून खोळंबलेले प्रश्‍न, बदलांच्या अपेक्षांचे ओझे त्यांच्या खांद्यावर आहे. बदल घडवायचाय खरा; तो जितका सर्वव्यापी असावा, तितकाच तो आश्‍वासक हवा ही जबाबदारीही त्यात आहे. अगदी नियोजन आयोग मोडीत काढण्यापासून अर्थव्यवस्थेच्या नव्या आखणीपर्यंत अनेक बदल त्यांना करायचे आहेत. ते करताना नवी व्यवस्था ही सध्याच्या व्यवस्थेपेक्षा अधिक चांगली-निर्दोष कशी असेल याचे भान सतत ठेवावे लागणार आहे. विकासाचे नवे मॉडेल लागू करण्याचा प्रयत्न त्यातून करायचा आहे. समाजातील प्रत्येक घटकासाठी ‘अच्छे दिन’ आणायचे आहेत. हे आव्हान सोपे नाही; पण त्याची सुरुवात झाली आहे, हेही नसे थोडके.

No comments:

Post a Comment