बांगलादेशी घुसखोरीचे नवीन मार्ग ईशान्य हिंदुस्थानी राज्ये आणि हिंदुस्तानला जोडणारा भाग केवळ २२ ते ४४ किलोमीटर एवढ्या अंतराचा. त्याला ‘चिकननेक’ असे म्हणतात. या एवढ्या अंतराची चिंचोळी पट्टी जर कुणी बाह्यशक्तीने बंद करून टाकली तर संपूर्ण ईशान्य हिंदुस्थानचा हिंदुस्थानशी असलेला संबंधच तुटून जाईल. सध्या येथे ९०टक्के बांगलादेशी लोकसंख्या आहे. हिंदुस्थानातून येणारा एकुलता एक रेल्वेमार्ग येथून जातो. आसाममधील कोक्राझार हिंसाचाराच्या वेळेस हिंदुस्तानचा ३ दिवस ईशान्य हिंदुस्थानींशी संबंध तुटला होता. पण कोणाला आहे त्याची पर्वा? या सीमारेषांना लागून असलेल्या भागातूनच बांगलादेशी घुसखोरी प्रचंड होत असते. ‘चिकननेक’ या चिंचोळ्या पट्टयातूनच पश्चिम बंगाल, बिहार, उत्तर प्रदेशसह संपूर्ण हिंदुस्थानातही पसरते.महाराष्ट्रात तब्बल ५ लाखांहून अधिक बांगलादेशी वास्तव्यास असावेत. २००८ मध्ये हिंदुस्थानच्या केंद्रीय गृहमंत्रालयातूनच ही आकडेवारी प्रसारित करण्यात आली आहे. मुंबई, नवी मुंबई व वसई-विरार या ठिकाणी होणार्या बांधकामांसाठी कमी पैशांत हे बांगलादेशी उपलब्ध होतात. त्यांच्यातील एक नागरिक आधी येतो. तो कामाच्या ठिकाणच्या आऊटहाऊसवर कब्जा करत अन्य सहकार्यांंना येथे आणतो. या बांगलादेशींचे हिंदुस्थानच्या सीमांवर काही एजंट आहेत. ते मुंबईसह हिंदुस्थानात नेमकी कुठे-कुठे मजुरांची आवश्यकता आहे याची माहिती ठेवतात. त्यानुसार मागणी तसा पुरवठा केला जातो.आसाममध्ये झाली तशाच प्रकारची घुसखोरी नागालँड, मेघालय आणि त्रिपुरामध्येही सुरू आहे आणि त्यावर सरकारचे आणि माध्यमांचे फारसे लक्ष नाही. घुसखोरी तीन प्रकारची आहे. पहिले असे घुसखोर जे आपली नावे मतदार यादीत घालण्यात यशस्वी झाले आहेत. दुसर्या प्रकारचे घुसखोर सध्या अनेक भागांत पसरले आहेत व काही वर्षांत ते मतदार बनतील. तिसर्या प्रकारचे घुसखोर जे काम करायला सकाळी हिंदुस्थानात येतात, पण रात्री परत जातात.त्रिपुराची राजधानी आगरतळा. विमानतळाला लागूनच हिंदुस्थानात-बांगलादेश आंतरराष्ट्रीय सीमारेषा. नाही म्हणायला तारांचं कुंपण आहे; पण त्यालाही अनेक ठिकाणी ‘भगदाडं’ पडलेली. त्यापलीकडे जवळूनच एक बांगलादेशी रेल्वेलाईन जाते आणि तिला लागून या बॉर्डर जवळच दिसतो एक भलामोठा सायकल स्टॅण्ड. बांगलादेशी नागरिक रोजीरोटीसाठी पलीकडून येतात. सायकल लावतात. दिवसभर काम करतात. जी काय रोजंदारी रुपयात मिळते, ती ‘टका’या बांगलादेशी चलनात कन्व्हर्ट करतात आणि घरी परत जातात. बांगलादेशी टका-रुपया यांचा आंतरराष्ट्रीय चलनदर काही का असेना, ते चलन बदलून देण्याचा लोकल रेटच इथे चालतो, समोरचा किती अडलेला आहे, यावर देणारा किती दर देणार हे ठरते.मेघालयाची राजधानी शिलॉंगपासून जेमतेम ७० किलोमीटर अंतरावर असलेलं हे ‘डावकी’ नावाचं गाव. आसामची राजधानी गुवाहाटीपासून शिलॉंग १०० किलोमीटर त्यापुढे हे ७० किलोमीटर. म्हणजे सहा-सात तासांचा प्रवास.‘डावकी’त पोहोचले तर समोर दिसते एक नदी. हिंदुस्थान-बांगलादेश सीमा म्हणजे ही नदीच. हिंदुस्थानची शेवटची पोस्ट म्हणून तिथे एक टपरीवजा चौकी व तिथेही दोन-तीनच जवान पहार्यावर. समोर बोटींची रांगच रांग लागलेली. लोक त्या बोटीत बसून अलीकडे-पलीकडे येतात-जातात. नदीपार समोर बांगलादेश. हा किनारा हिंदुस्थान, तो बांगलादेश. सर्रास वाहतूक होत असते. माणसे, सामानसुमान वाहून नेले जाते. हा रोजचा शिरस्ता. देशाच्या सीमा त्यांना रोखत नाहीत. या वाटेनं परत न जाण्यासाठी किती जण हिंदुस्थानात येत असतील, असा आपल्याला प्रश्न पडतो. कारण समोर जी माणसे ये-जा करताना दिसतात त्यांच्याकडे तरी कुठे असतात व्हिसा नि पासपोर्ट.? हिंदुस्थानात पकडलेल्या घुसखोरांना परत घ्यायला बांगलादेश तयार नाही. नागालँडचे माजी मुख्यमंत्री जमीर (महाराष्ट्राचे माजी राज्यपाल), मेघालयाचे राज्यपाल मुशेरी यांनी घुसखोरी हा एक मोठा धोका आहे, हे मान्य केले आहे. अर्थात आसामच्या विधानसभेवर बांगलादेशी घुसखोरांनाच पाठीशी घालणार्या आमदारांची पकड एवढी मजबूत आहे की, घुसखोरांना परत पाठवणे जवळपास अशक्य आहे.दीडशे रुपयांत एण्ट्री
आसामचे माजी राज्यपाल जनरल अजय सिंग यांनी क्रेंद्रीय गृहमंत्रालयाला २००५ मध्ये एक अहवाल दिला होता. त्या अहवालानुसार रोज ६,००० बांगलादेशी नागरिक आसामात बेकायदा घुसखोरी करतात. मात्र, पुढे केंद्राचा दबाव वाढला आणि हे स्टेटमेण्ट बदलण्यात आले. सुधारित स्टेटमेण्टनुसार रोज ६,००० बांगलादेशी आसामात नव्हे तर हिंदुस्थानात प्रवेश करतात. एका बांगलादेशी घुसखोराला यापेक्षा जवळपास निम्म्या पैशांत म्हणजे केवळ दीडशे रुपयांत हिंदुस्थानात एण्ट्री मिळते. हजार-दीड हजाराचे ‘पॅकेज’ दिले, की त्याला बांगलादेशातून उचलून मुंबईत ‘सेट’ करेपर्यंत सारेच काम केले जाते. गेल्या दीड वर्षामध्ये मुंबई शहरात हिंदुस्थानी म्हणून स्थायिक होऊ पाहणार्या दीड हजार बांगलादेशी घुसखोरांना विशेष शाखेने अटक केली. त्यापैकी सुमारे पाचशे घुसखोरांना मायदेशी पोहोचविण्यात आले. मात्र अधिकारी मुंबईत पोहोचण्याआधी हे घुसखोर परतलेले असतात! बांगलादेशींना हिंदुस्थानात घुसविण्यासाठी एजंटांच्या टोळ्या बीएसएफ आणि बांगलादेश रायफल्स जवानांशी संधान साधून आहेत. मुंबईतून बांगलादेश आणि पुन्हा मुंबईत आणून सोडण्यासाठी अवघे दीड ते दोन हजार रुपये आकारले जातात. त्यात तो एजंट रेल्वेचे तिकीटही काढतो. विनासायास सीमापार नेतो आणि पुन्हा हिंदुस्थानात आणूनही सोडतो