Total Pageviews

Tuesday 14 June 2011

KILLING JOURNALIST BY UNDER WORLD EDITORIAL IN SAMANA

काळा दिवस!आता तरी लेखण्यांचे शस्त्र होऊ द्या!
ज्येष्ठ पत्रकारजे. डे’ यांच्या निर्घृण हत्येने राज्यात काळाकुट्ट दिवस उगवला. हा काळा रंगच सरकारच्या थोबाडास फासून त्यांची धिंड काढायला हवी. मुंबईतील गुन्हेगारीविरुद्ध धाडसाने लेखन करणार्‍याजे. डे’ या प्रख्यात पत्रकाराची दिवसाढवळ्या हत्या झाली. मारेकरी हे पसार होण्यासाठीच असल्याने मुसळधार पावसात जणू ते वाहूनच गेले. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी जाहीर केले, ‘सखोल चौकशी करू.’ म्हणजे नेमके काय करणार? सखोल? म्हणजे ती काय आटलेली विहीर आहे काय? आतापर्यंत मुंबईत जे भयंकर गुन्हे घडले ते सखोल चौकशीचे नव्हते काय? गृहमंत्री आर.आर. अर्थात आबा पाटलांनीही त्यांची गुटख्यांनी भरलेली जीभ उचलून टाळूला लावली आहे. नेहमीचीच पिचकारी त्यांनी मारली, ‘कडक कारवाई करू आणि कुणालाही सोडणार नाही!’ अहो आबा, तुमच्या गृहखात्याची नाडीजे. डें’च्या हत्येने सुटली आहे, ती सांभाळा. दबंग चित्रपटाच्या मुन्नीच्या हातातील झंडू बाम काढून आता गृहमंत्री आणि मुंबई पोलीस आयुक्त पटनायक यांच्या पार्श्‍वभागावर चोळायला हवा हे काम पत्रकारांनीच करायला हवे. सुजलेल्या थोबाडांनी त्याच त्याच कारवाईची भाषा करणारे मुख्यमंत्री गृहमंत्री म्हणजे महाराष्ट्राच्या नशिबी आलेले दुर्भाग्य आहे. आतापर्यंत पत्रकारांवर आणि वृत्तपत्रांवर राजकीय पक्षांनी हल्ले केले आहेत. तो राजकीय संतापाचा एक भाग असावा. सूडाने लेखण्या परजणार्‍या बेताल बकबक करणार्‍यांच्या कानफटात राजकीय कार्यकर्त्यांनी हाणल्या असतीलही, पण डे यांच्यावरील हल्ला हा त्याप्रकारचा नाही. त्यांची भयंकर पद्धतीने हत्या केली. त्यासाठी मारेकरी सुपारी घेऊन आले कायदा-सुव्यवस्थेचा मुडदा
पाडून निघून गेले. २४ तासांपूर्वीच मुंबईत राष्ट्रवादी कॉंग्रेसचा १२ वा वर्धापनदिन सरकारी मस्तीत साजरा झाला. व्यासपीठावरून राष्ट्रवादीच्या सर्वच बेताल नेत्यांनी शिवशक्ती-भीमशक्तीवर चिखलफेक केली. उद्धव ठाकरे यांच्यावरही दुगाण्या झाडल्या. आर. आर. पाटील अजित पवार कधी विरोधकांना बघून घेण्याची भाषा करतात, तर कधीईट का जबाब पत्थर से’ देण्याची वल्गना करतात. त्याच ईट आणि पत्थरवाल्यांसमोर गुंड टोळ्यांनी पत्रकारांवर गोळ्या झाडून त्यांच्या कारभाराची लक्तरे काढली, कायदा-सुव्यवस्थेचे धिंडवडे काढले. पत्रकारांवरील हल्ल्यांचा आम्ही कायमच धिक्कारच केला आहे, पण डे यांच्या हत्येचा नुसता धिक्कार करून चालणार नाही. मुंबईसारख्या शहरात कोणीही सुरक्षित नाही हेच डे यांच्या हत्येने दाखवून दिले. सामान्य माणूस या शहरात सुरक्षित नाही आता देवाच्या भरवशावरही जगता येत नाही. कारण देवांनाही अतिरेकी माफिया टोळ्यांपासून धोका निर्माण झाला आहे. आमच्या देशातील मंदिरांवर अतिरेकी हल्ले होतात, बॉम्बस्फोट घडवून आणले जातात. देव जेथे असुरक्षित तेथे सामान्य माणूस किंवा पत्रकारांच्या सुरक्षिततेचे काय? पत्रकार जे. डे यांनी नुसते रक्त सांडले नाही तर स्वत:चे प्राण गमावले आहेत. कर्तव्य बजावत असताना त्यांना मरण आले. अतिरेकी लिहिण्या-बोलण्याबद्दल दोन मुस्कटात खाणारे पत्रकार जिवंतपणी शहीद म्हणून मिरवतात, पण जे. डे खरोखरच शहीद झाले. त्यांचे लिखाण धारदार होते मुंबईतील माफियागिरीचा पर्दाफाश करणारे होते. त्यांनी कुणालाही सोडले नाही कुणाचीही पर्वा केली नाही. त्याची किंमत जिवाचे मोल देऊन त्यांना चुकवावी लागली. या मुंबईत कसाब अबू सालेमसारखे लोक जिवंत राहतात जे. डेंसारखे झुंजार पत्रकार मारले जातात ही सत्ताधार्‍यांची नामुष्की आहे. आर. आर. पाटील म्हणाले, हल्लेखोरांना शोधू धडा शिकवू. त्यांनी ही नेहमीचीच पिचकारी मारली आहे. गेल्या दहा वर्षांत मारलेल्या अशा पिचकार्‍यांनी मुंबई विद्रूप झाली आहे. मुंबईवर आज सरकार म्हणून कुणाचेच नियंत्रण राहिले नाही. अक्राळविक्राळ वाढलेल्या मुंबईत लोकसंख्येचा स्फोट झाला आहे. अंडरवर्ल्ड आणि जमीनमाफियांनी हैदोस घातला आहे. आर. आर. पाटील यांनी गृहमंत्री म्हणून हे सर्व रोखण्यासाठी काय केले? आर. आर. आणि त्यांच्या सरकारने पोलीस खात्यात राजकारण आणि वशिलेबाजी आणली. अनेक झुंजार पोलीस अधिकार्‍यांचे पंख कापले. अनेक पोलीस अधिकार्‍यांचे शौर्य डोळ्यांत खुपल्याने सरकारने त्यांना खोट्या गुन्ह्यांत अडकवून तुरुंगात पाठविले. न्यायालयाने पोलिसांच्या गळ्याभोवती फास आवळला तेव्हा अशा पोलिसांना संरक्षण देण्याची मर्दानगी गृहखात्याने दाखवायला हवी होती, पण एरव्ही वल्गना ठोकणार्‍या गृहमंत्र्यांनी चांगल्या पोलीस अधिकार्‍यांना वार्‍यावर सोडले. त्यामुळे मुंबईत माफिया टोळीवाल्यांचे राज्य पुन्हा आले. जे. डेंचा बळी याच टोळीवाल्यांनी घेतला. आता श्रद्धांजल्या कसल्या वाहताय? पत्रकारांनी आपल्या बांधवाचे सांडलेले रक्त पाहून तरी पेटून उठावे. लेखण्या मोडून हाती बंदुका घ्या असे आम्ही सांगणार नाही, पण लेखण्यांचे शस्त्र करून या जुलमी सरकारला सळो की पळो करून सोडावे. तीच खरीजे. डें’ना श्रद्धांजली ठरेल

No comments:

Post a Comment