Total Pageviews

Tuesday, 14 June 2011

INVESTIGATIVE JOURNALISM HOW MUCH RISK

शोधपत्रकाराचा बळी मुंबईतील गुन्हेगारी जगताची खडान्‌खडा माहिती असलेले ज्येष्ठ पत्रकार ज्योतिर्मय ऊर्फ जे डे यांची हत्या लोकशाहीच्या या चौथ्या स्तंभाला अक्षय्य ठेवण्यासाठी झटणार्‍या तमाम पत्रकारांच्या सुरक्षिततेबाबत प्रश्‍नचिन्ह निर्माण करणारी आहे. डे हे गेली अनेक दशके मुंबईतल्या गुन्हेगारी जगताच्या काळ्या कारवायांचा निधडेपणाने पर्दाफाश करीत आले होते. त्यांच्या नावानिशी अनेक वेगळ्या बातम्या वाचकांना वाचायला मिळत असत. कधीहीटेबल स्टोरी’ मध्ये रमता गुन्हेगारी जगताची खरीखुरी बित्तंबातमी आपल्या वाचकाला देण्याचा ध्यास त्यांच्या बातम्यांना वेगळेपण देऊन जात असे. त्यामुळे गुन्हेगारी जगताच्या अशा बित्तंबातम्या मिळवण्यासाठी पोलीस दलातील शिपायापासून साहेबापर्यंत आणि गुप्तहेरांपासून गुन्हेगारांपर्यंत सर्वांशी संपर्क ठेवणे त्यांच्यासाठी आवश्यक ठरले होते. या संपर्कातून अनेक गोष्टींची खडान्‌खडा माहिती त्यांना मिळत असे. अर्थात, मुंबईचे गुन्हेगारी जगत म्हणजे काही पोरखेळ नव्हे. मारामारी, अपहरण, खंडणी आणि खून सरेआमपणे होत असताना आणि विविध टोळ्यांमधील वैमनस्य शिगेला पोहोचलेले असताना त्याच्या खोलात शिरणे म्हणजे साक्षात मृत्यूच्या जबड्यात शिरण्यासारखेच होते. परंतु डे यांनी त्याची कधी भीती बाळगली नाही. अलीकडे मुंबईतील संघटित गुन्हेगारीवर बरेच नियंत्रण आलेले आहे, परंतु काही दशकांपूर्वी मुंबईमध्ये टोळीयुद्ध हा नेहमीचा खेळ बनला होता. अशा काळामध्ये गुन्हेगारी वार्तांकनाचे आव्हान डे यांनी पेलले होते. त्यांच्या वेगळ्या बातम्या त्यांना कुठून मिळतात याविषयी सहकारी पत्रकारांना नेहमीच कुतूहल असे. असे औत्सुक्य दर्शविणार्‍या एका सहकार्‍याला ‘‘मी क्राईम ब्रँचच्या मुख्यालयासमोरच्या झाडाखाली उभा राहतो. डोळे आणि कान उघडे ठेवतो. मग मला आपोआप अशा बातम्या मिळतात’’ असे मिस्कील उत्तर एकदा डे यांनी दिले होते. जनसंपर्क हा चांगल्या बातमीदारीचा प्राण असतो. वरपासून खालपर्यंत व्यापक जनसंपर्क असलेली व्यक्तीच चांगली बातमीदारी करू शकते. दुसर्‍यांच्यापॉइंट्‌स’ वर आपल्या बातम्या बेतणारी मंडळी स्वतःविषयी कितीही भ्रम बाळगोत, ती पत्रकार म्हणून कधीच स्वतःचे नाव प्रस्थापित करू शकत नाहीत, नावारूपाला येत नाहीत. जे डे यांचे मुंबईच्या गुन्हेगारी वार्ताविश्वात प्रस्थ निर्माण झाले त्यामागे त्यांचेफर्स्ट हँड’ बातमी मिळवण्याचे परिश्रम होते. पत्रकारिता ही विविध क्षेत्रांतील व्यक्तींना तुमच्या संपर्कात आणते, परंतु हे संपर्क कोणत्या मर्यादेपर्यंत ठेवायचे याचे भानही पत्रकारितेमध्ये वावरणार्‍या प्रत्येकाने ठेवणे अपेक्षित असते. डे यांनी गुन्हेगारी विश्‍वातील आपल्यास्त्रोतां’संदर्भात ही मर्यादा पाळली होती का या प्रश्‍नाचे उत्तर अद्याप मिळायचे आहे. डे यांची हत्या नेमकी कोणी केली याविषयी अद्याप संभ्रम आहे. काही अधिकार्‍यांच्या मते हे कृत्य तेल माफियांचे आहे, तर काहींना वाटते की, असे सराईत कृत्य छोटा शकीलसारख्या एखाद्या टोळीखेरीज दुसरे कोणी करणे संभवत नाही. मुंबईत एखाद्याचे प्राण घेण्यासाठी भाडोत्री गुंड हजार - दोन हजार रुपयांत तयार होतात. कॅसेट किंग गुलशनकुमार यांची हत्या करणार्‍या मारेकर्‍यांना फक्त अडीच हजार रुपये मोबदला दिला गेला होता. ‘दाऊद’साठी, ‘शकील’ साठी आपण काम करतो ही शेखी मिरवण्यासाठी फुकटातदेखील एखाद्या निष्पापाच्या जिवावर उठायला माणसे मिळाल्याशिवाय राहणार नाहीत. अशा परिस्थितीत डे यांच्या हत्येची सुपारी देणारा तेल माफिया होता, बिल्डर माफिया होता की एखादा कुख्यात टोळीप्रमुख होता हे गूढ अद्याप उकलायचे आहे. हा संभ्रम येत्या काही दिवसांत दूर होईल आणि खरे गुन्हेगार गजाआड होतील अशी आशा करूया. येथे प्रश्‍न आहे तो पत्रकारांच्या सुरक्षिततेचा. केवळ लेखणी हे शस्त्र असलेल्या आणि सत्य उजेडात आणण्यासाठी आपला जीव जोखमीत टाकणार्‍या पत्रकारांना कायद्याने संरक्षण मिळण्याची आज खरोखर गरज भासते आहे. भ्रष्ट, गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांना प्रामाणिक पत्रकारितेचा काटा नेहमी सलत असतो. तो उपटून काढण्यासाठी हे लोक धडपडत असतात. जे डे यांची हत्या त्यातूनच झाली आहे. अशा घटनेची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी पत्रकारितेला कायद्याचे संरक्षक कवच मिळाले पाहिजे

No comments:

Post a Comment