Total Pageviews

Tuesday 28 June 2011

SELFLESS WORK IN NORTHEAST INDIA

एकात्मतेचे शिवधनुष्य....आणि सर्वांचा गोवर्धन!

आपल्याला शाप आहे तो भेदांचा. भाषिक भेद, जातीय भेद, प्रांतिक भेद, उपजाती भेद अशा भेदाभेदांच्या भिंती उभ्या राहिल्यात. त्या पाडण्याचा प्रयत्न करणे म्हणजेच राष्ट्रीय एकात्मता जपण्याचा प्रयत्न करणे. या काही भौतिक भिंती नव्हेत. त्या अदृश्य आहेत , पण पक्क्या आहेत. त्यामुळे व्यवहारातून, वागणुकीतून या भेदांचा नाश करण्याचे काम करावे लागेल.

विविधतेने नटलेल्या आपल्या देशात 'पूर्वांचल' म्हणून एक प्रदेश आहे. ज्याला आपण सर्वजण 'North-East India' म्हणून अधिक ओळखतो. या 'ईशान्य' भारतात ७ राज्यांचा समावेश होतो आणि त्यावर चीनचा पहिल्यापासून डोळा आहे. आसाम, मणिपूर, अरुणाचल प्रदेश, मिझोराम, नागाभूमी, त्रिपुरा आणि मेघालय या निसर्गसुंदर ७ राज्यांनी हे सीमावर्ती क्षेत्र तयार होते. या सर्व प्रदेशाची व तेथील रहिवाश्यांची वैशिष्ट्ये अन्य भारतापासून वेगळी आहेत. उदा. तेथील लोकांचे डोळे हे बारीक असतात, त्वचेचा रंग, चण, बांधा वेगळे असतात. त्यांना अन्य भारतात फिरत असताना चीनी, जपानी आले म्हणून संबोधले जाते. याचा त्यांच्यावर विपरीत परिणाम होतो. एकतर आपले ६० वर्षीय सरकार तिथला विकास करण्यात संपूर्णतया अपयशी ठरले आहे. त्यातून शिवाय शिक्षणाची वाईट परिस्थिती आणि उच्च शिक्षणाला भारताच्या अन्य भागात गेल्यावर येणारे हे असे अनुभव. त्यातून कुटील चीन त्यांच्या मनात ह्या भावाचे बीजारोपण करतच असतो की 'नाहीतरी भारत तुम्हाला त्यांचे कुठे समजतो, तुम्ही वेगळे आहात'. ह्यामुळे पृथकतावादाची भूमिका वाढीस लागून भारताच्या एकात्मतेला गंभीर धोका निर्माण झाला आहे.

ह्या सर्व प्रदेशातही हजारो भाषा आहेत. आणि शेकडो विभिन्न जमाती आहेत. त्यांचे रीतीरिवाज वेगळे आहेत आणि त्यांच्यात जमातयुद्ध सुद्धा होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने ही परिस्थिती, हे आव्हान जाणले आणि भारताच्या अन्य भागातून तेथे संघाचे प्रचारक जाणे सुरु झाले. ऐन तारुण्यात तेथे जाऊन संपूर्ण जीवन त्या लोकांना राष्ट्रीय प्रवाहात आणण्यासाठी, त्यांच्यातलेच एक बनून व्यतीत करणारे वृद्ध झालेले प्रचारक पाहिले की डोळे पाणावल्याशिवाय रहात नाहीत. संघ प्रेरणेतून आज हजारो सेवाप्रकल्प पूर्वांचलात चालू आहेत. कित्येक प्रचारकांच्या नृशंस हत्याही झाल्या. प्रमोद दीक्षित, शुभंकर डे अशांनी बलिदान दिलं ते केवळ एकच ध्येय डोळ्यासमोर ठेऊन- - 'परंवैभवं नेतुमेतत् स्वराष्ट्रं'! आजही ही मालिका, हा यज्ञ चालूच आहे. आहुत्या पडतच आहेत. पण इंचभरही मागे न सरकता अडिग राहून काम चालू आहे.

यातीलच एक काम म्हणजे तेथे दुर्गम भागात राष्ट्रीय शिक्षण देणारे, भारतीय संस्कार रुजवणारे आणि राष्ट्रप्रेमी नागरिक घडविणारे शैक्षणिक केंद्र उभे करणे. ही शाळा कै. शंकर काणे यांनी १९७१ ला मणिपूर मध्ये सुरु केली. भगीरथाचे काम होते ते. त्यांनी जे बी रोवलं त्याची फळं आपल्याला ४० वर्षांनी दिसली. शंकरजी म्हणजे त्या लोकांसाठी प्रिय भैय्याजी! भैय्याजींना आदरांजली वाहण्यासाठी एक बस निघाली....ज्यात नागा, कुकी, तान्खुल, मैतेयी, कोन्याक, हराक्का अशा जमातींचे लोक होते. हे सर्वजण एकत्र येऊन भैय्याजींच्या स्मृतीला अभिवादन करणार होते. ही राष्ट्रीय एकात्मता सध्या करण्याची किमया एका 'मराठी' माणसाने करून दाखवली. या गोष्टीचा आपल्या सर्वांना खचितच अभिमान आहे, परंतु त्याहीपेक्षा अधिक जबाबदारीही ओघाने आली आहे....

भैय्याजींचे काम पुढे नेण्यासाठी 'पूर्व सीमा विकास प्रतिष्ठान' ही संस्था कार्यरत आहे. पूर्वांचलाचा विकास हेच एकमेव ध्येय ठेऊन वाटचाल सुरु आहे. ईशान्य भारत जर भारताचे अभिन्न अंग राखायचे असेल, तर आपल्याला या राष्ट्रीय एकात्मतेच्या कामात आपले योगदान द्यावे लागेल. मणिपूर मधल्या उखरुल जिल्ह्यात खारासोम या ठिकाणी जशी शाळा आहे तशीच 'पूर्व सीमा विकास प्रतिष्ठान' तामेंग्लोंग' आणि 'चुराचंद्रपूर' या ठिकाणी बांधत आहे. पण याला हजारो हातांची गरज आहे. आत्तापर्यंत ६ वर्ग खोल्या बांधून झाल्या आहेत. या भक्कम कामासाठी सहकार्य आवश्यक आहे. ३२.५ लाख रुपयांचा निधी आवश्यक आहे. त्यातील २२ लाखांचा निधी हा २८ फेब्रुवारी पर्यंत जेमतेम १५ दिवसांत पाठवायचा आहे. अन्यथा काम ठप्प होण्याची तर चिंता आहेच. पण १ मार्चपासून सुरु होत असलेल्या शैक्षणिक वर्षाला ही मुले मुकतील. तोंडाशी आलेला घास हिरावून घेतल्यासारखे होईल. त्यामुळे २८ फेब्रुवारीपर्यंत आपण २२ लाखांचा हा निधी उभा करण्याचा गोवर्धन उचलूया. मग शाळेचे शिवधनुष्य कठीण नाही!
या लेखाद्वारे हेच विनम्र आवाहन सर्व वाचकांना आणि राष्ट्रप्रेमी नागरिकांना. आपण हे आवाहन अधिकाधिक जणांपर्यंत पोहोचवूया. आणि या राष्ट्रकार्यात सहभागी होऊया.
संपर्क:- श्री. देवेंद्र देवस्थळे, (mrudulad@yahoo.com)
पूर्व सीमा विकास प्रतिष्ठान,
१ , रमा निवास, विष्णूनगर,
नौपाडा, ठाणे (पश्चिम) ४००६०२.
भ्रमणध्वनी- ९८६९२ ६३०५६.
चेक 'पूर्व सीमा विकास प्रतिष्ठान' च्या नावाने काढावा.
80-G खाली आयकरात सूट हवी असल्यास धनादेश 'रा.स्व.संघ जनकल्याण समिती' च्या नावाने काढावा

No comments:

Post a Comment