Total Pageviews

Wednesday, 15 April 2020

सप्तपदीचे पालन करा..https://www.tarunbharat.net//Encyc/2020/4/15/article-of-agralekh.html

घरी बसा. स्वत: सुरक्षित राहा आणि इतरांनाही सुरक्षित ठेवा, असे सरकार घसा कोरडा करून सांगतेय्‌. प्रशासन लोकांना घरी बसविण्यासाठी प्रयत्नांची शर्थ करते आहे. पोलिस 16-16 तास रस्त्यांवर उभे राहून आपले कर्तव्य बजावत आहेत. डॉक्टर्स आणि परिचारिका आपला जीव धोक्यात घालून रुग्णालयांमध्ये अहोरात्र काम करीत आहेत. संपूर्ण जगात कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढते आहे. आजमितीला जगात 19 लाखांपेक्षा जास्त लोक कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. मृत्यूचा आकडाही भयावह आहे. जगातील प्रगत देशांच्या तुलनेत भारतात लागण झालेल्यांची संख्या आणि मृत्यूचा आकडा कमी असला, तरी नागरिकांनी सतर्कता बाळगणे अतिशय गरजेचे आहे. मात्र, अजूनही नागरिकांना कोरोनाच्या संकटाचे गांभीर्य पुरेसे कळलेले नाही, हे दुर्दैवाने नमूद करावे लागते.


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल, मंगळवारी देशाला उद्देशून केलेल्या संबोधनात 3 मेपर्यंत देशात लॉकडाऊन वाढवत असल्याची घोषणा केली आहे. तसे तर देशात 24 मार्चपासूनच लॉकडाऊन सुरू आहे. पण, अनेक शहरांमध्ये, अनेक गावांमध्ये लोक याबाबत गंभीर नसल्याचे आढळून आले आहे. देश एका विचित्र संकटात सापडला आहे आणि या संकटातून देशाला बाहेर काढण्यासाठी पंतप्रधान, केंद्र सरकार, राज्यांची सरकारं, पोलिस-प्रशासन, रुग्णालये, डॉक्टर्स, नर्सेस, पत्रकार हे सगळे आपापल्या परीने प्रयत्न करीत असताना देशवासीयांनी त्यात सक्रिय सहभाग नोंदविणे गरजेचे आहे. कोरोनाच्या साथरोगाची तीव्रता, त्यापासून असलेला प्राणांतिक धोका सगळ्यांना माहिती करून दिला असतानाही असंख्य लोक लॉकडाऊन तोडून विनाकारण रस्त्यांवर फिरताहेत, ही बाब असंस्कृतपणाची लक्षणं दाखविणारी आहे. लोक सुशिक्षित झालेत, लोकांनी पैसा कमावला, स्वत:च्या पैशांनी गाड्या विकत घेतल्या‘ हे सगळे खरे असले तरी शिक्षणासोबत जो सुसंस्कृतपणा अंगी यायला हवा होता, तो अनेकांच्या ठायी आलेला दिसत नाही, हे या देशाचे मोठे दुर्दैव होय.




प्रत्येक गोष्टीसाठी कठोर शिक्षाच करणे अपेक्षित असेल, तर सरकारची त्यासाठीही तयारी आहे. आज राज्यातले पोलिस रस्त्यांवर उभे राहून नागरिकांना समजावून सांगत आहेत. पोलिसांनी आतापर्यंत तरी संयमच दाखविल्याचे निदर्शनास आले आहे. उलट, पोलिसांमधील संवेदनशील माणूस समाजाने गेल्या काही दिवसांत पाहिला आहे. स्वत: तासन्‌तास रस्त्यांवर उपाशी राहून कर्तव्य चोख बजावणारे पोलिस गोरगरीब, उपाशी नागरिकांना जेवू घालत असल्याच्या सुवार्ता कानी पडत आहेत, ही केवढी मोठी गोष्ट आहे. पोलिसांचा दररोज नागरिकांशी संबंध येतो, नागरिकांच्या अडीअडचणी त्यांना माहिती आहेत. त्यामुळे ते समजूतदारीची भूमिका घेत परिस्थिती हाताळत आहेत. उद्या जर लष्कराच्या जवानांना रस्त्यांवर उतरविले गेले आणि त्यांना लॉकडाऊन कठोरतेने हाताळण्याचा आदेश दिला गेला, तर काय होईल, याचा विचार नागरिकांनी आताच करून ठेवावा. लॉकडाऊन हे जनतेच्या हिताचे आहे. सरकार आणि सरकारातले मंत्री यांना कोरोनापासून धोका नाही असे नाही. त्यामुळे तेही कामाशिवाय घराबाहेर निघत नाहीत. मंत्रिमंडळाच्या बैठकाही व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे होत आहेत. मंत्री, नेते घरी राहात आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वत: मास्क घालून असतात. असे सगळे असताना आपण नागरिकांनी आपले कर्तव्य चोखपणे बजावायला नको का?




कोरोना हा एकदम नवा व्हायरस आहे. संपूर्ण जग त्यापुढे हतबल झाले आहे. त्याच्याशी लढाई कशी करायची, हे कुणालाच उमगलेले नाही. अमेरिकादी प्रगत देश असहायपणे भारताकडे बघत असताना, आम्ही किमान स्वयंशिस्तीचे दर्शन तरी घडवायला नको का? का म्हणून आम्ही लॉकडाऊनमध्येही बाहेर पडतो? आठवड्यातून एकदा कुटुंबातील एकाने घराबाहेर पडत जीवनावश्यक वस्तूंची खरेदी करून आणत, आठवडाभर घराबाहेर पडलेच नाही तर काय आभाळ कोसळणार आहे काय? घरी करमत नाही, आता खूप कंटाळा आला आहे, किती वाचन करायचे, टीव्ही तरी किती बघायचा... असे प्रश्न स्वत:ला आणि इतरांना विचारत नागरिक लॉकडाऊनचे नियम तोडून देशाला संकटाच्या खाईत लोटत आहेत, हे कुणीच लक्षात घ्यायला तयार नाही. ज्या अक्षयकुमारने स्वत:च्या कमाईतील 25 कोटी रुपये कोरोनाची लढाई लढणार्‍या पंतप्रधान निधीसाठी दिलेत, तोसुद्धा दररोज नागरिकांना आवाहन करतो आहे की घरी थांबा, सुरक्षित राहा. आपण कुणाचेच ऐकायचे नाही असे ठरवलेच असेल, तर ईश्वरही आपल्याला वाचवू शकणार नाही, हे कटाक्षाने ध्यानात ठेवा. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे तर मनुष्य आहेत. त्यांच्या मर्यादा आहेत. शासन-प्रशासनाच्याही मर्यादा आहेत. पोलिस तरी कुठवर पुरणार? माणसांना दंडुके मारताना त्यांना कुठे आनंद होतो. त्यांचाही नाईलाज असतो म्हणून ते दंडुके मारतात. तरीही नागरिक म्हणून आम्हाला कसलीच लाज वाटणार नसेल, तर विश्वगुरू होण्याच्या दिशेने पुढे सरकलेल्या भारताला आपण मागे ढकलत आहोत, हे अधोरेखित करून ठेवा.




पंतप्रधान मोदी काल देशाला उद्देशून संबोधन करत होते, तेव्हा त्यांच्या चेहर्‍यावरील चिंता स्पष्ट दिसत होती. देशातील एकाही नागरिकाचा जीव जाता कामा नये, ही त्यांची भाषा त्यांच्या मनातले भाव स्पष्ट करणारी होती. संकटाचा काळ आहे, अनेकांना उपाशी राहावे लागत आहे, अनेक जण कुटुंबापासून दूर एकटे आहेत, अनेकांना अनेक प्रकारचा त्रास सहन करावा लागत आहे, याची पूर्ण जाणीव पंतप्रधानांना असल्याचे त्यांच्या भाषणातून संपूर्ण देशवासीयांना जाणवले. जनतेप्रती असलेली कळकळ, जिव्हाळा, देशाप्रती असलेली निस्सीम श्रद्धा मोदींच्या भाषणातून पदोपदी जाणवत होती. लॉकडाऊन वाढवण्यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेवर गंभीर परिणाम होणार आहेत, याची जाण असतानाही पंतप्रधानांनी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी बोलणी करून, त्यांची मतं विचारात घेऊन लॉकडाऊनची मुदत 3 मेपर्यंत वाढविण्याचा निर्णय घेतला, त्यामागची भावना लोकांनी लक्षात घेतली पाहिजे.


हा देश स्वतंत्र करण्यासाठी हजारो क्रांतिकारक हसत हसत फासावर चढले, स्वातंत्र्यवीर सावरकरांसारख्या क्रांतिकारकांनी काळ्या पाण्याची शिक्षा भोगली, स्वातंत्र्याच्या आंदोलनात अनेकांच्या कुटुंबांची राखरांगोळी झाली, अनेकांना अनेक वर्षे काळकोठडीत राहावे लागले. त्या तुलनेत आजचे लॉकडाऊन आणि त्यामुळे आपल्याला घरात राहावे लागणे, फार कठीण आहे काय? या प्रश्नाचे उत्तर आपणच शोधण्याची गरज आहे. घरी राहायला सांगितले आहे, सर्व प्रकारच्या सुविधा उपलब्ध आहेत. भाजी मिळते आहे, किराणा मिळतो आहे, औषधे मिळताहेत, पिण्याचे शुद्ध पाणी मिळते आहे. वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध आहे. घरचे टीव्ही सुरू आहेत. सगळं काही सुरळीत सुरू आहे. फक्त घराबाहेर निघण्यावर निर्बंध आहेत. एवढी एक सोपी गोष्टही आम्ही करू शकणार नसू, तर आपले राष्ट्रप्रेम बेगडी आहे, असेच मानायला पाहिजे. प्रत्येक गोष्ट दंडुके मारून साध्य केली जाऊ शकत नाही. प्रत्येक नागरिकाला आवरण्यासाठी पोलिस दल कामाला लावता येऊ शकत नाही. आपल्या आवडत्या ‘तरुण भारत’च्या पहिल्या पानावर पंतप्रधानांनी सांगितलेली सप्तपदी प्रकाशित केली आहे. तिचे पालन केले तर कोरोनावर विजय निश्चित आहे. सरकार, शासन-प्रशासन आपल्या परीने झटतेच आहे. आता चेंडू आपल्या कोर्टात आहे. काय करायचे हे जनतेने ठरवायचे आहे. तेव्हा एकच सांगणे आहे- घरी राहा, सुरक्षित राहा!



No comments:

Post a Comment