1857 च्या स्वातंत्र्य लढ्यातील प्रमुख सेनानी तात्या टोपे यांचे आज पुण्यस्मरण.त्यांचा जन्म वर्ष 1814 मध्ये नाशिक जिल्ह्यातील येवला (पैठणीचे येवला) येथे झाला. त्यांच्या जन्माची नक्की तारीख उपलब्ध नाही. त्यांचे मूळ नाव रघुनाथ तसेच रामचंद्र असेही त्यांना संबोधले जायचे. पांडुरंग टोपे यांच्या आठ अपत्यांपैकी तात्या हे दुसरे अपत्य. वर्ष 1818 मध्ये त्यांचे वडील पेशवेदरबारी महत्त्वाची व्यक्ती होती. त्यांनी आपल्या कुटुंबाला बिठूरला हलवले. त्यांचेबरोबर रघुनाथ तथा तात्या उत्तर हिंदुस्थानात गेले. त्यांचे बालपण तेथेच गेले.
तेथे तात्या हे पेशव्यांचे दत्तक पुत्र नानासाहेब (धोंडू पंत) यांचे मित्र बनले. मनूताई उर्फ लक्ष्मीबाई (झाशीची राणी) त्यावेळी तेथेच होत्या. त्यांचेही बालपण तेथेच गेले. तात्या मोठे झाल्यावर पुढे बरीच वर्षे पेशव्यांच्या दरबारात कारकुनी कामात गुंतलेले होते. वर्ष 1851 मध्ये दुसरे बाजीरावांचे निधनानंतर ब्रिटिश सरकारने नाना साहेबांना त्यांचा उत्तराधिकारी मानण्यास नकार दिला. याच सुमारास सातारचे छत्रपतींसह उत्तर हिंदुस्थानातील अनेक राजे व संस्थानिकांची संस्थाने खालसा केली होती. या संस्थानिकांनी एकत्र येऊन ब्रिटिशांविरुद्ध लढा उभारण्याचे ठरविले. बुंदेलखंड, दिल्ली, मीरत व मध्य उत्तर हिंदुस्थानातच त्याचा उद्रेक झाला.नानासाहेबांनी ग्वाल्हेरहून तात्यांनी आणलेल्या सैन्यावर मुख्य सेनापती म्हणून त्यांचीच निवड केली. दिल्ली, लखनौ, जगदीशपूर व कानपूर या ठिकाणी झालेल्या उठावांचे सूत्रधार तात्या टोपेच होते. त्यांनी नानासाहेबांना ग्वाल्हेरवर सत्ता मिळवून दिली; पण ती फक्त महिन्यापुरतीच ठरली. कानपूरवर चढाई करण्यासाठी तात्या सज्ज झाले. सर ह्यू रोझच्या नेतृत्वाखाली इंग्रजसैन्याने झाशीला 22 मार्च 1858 रोजी वेढा दिला. तेथून राणी लक्ष्मीबाईंना माघार घ्यावी लागली. तात्या, लक्ष्मीबाई व रावसाहेब यांनी एकत्र होऊन ग्वाल्हेरवर हल्ला केला. ग्वाल्हेर काबीज केले, पण हा विजय क्षणभंगुर ठरला या युद्धात लक्ष्मीबाई मरण पावल्या. तात्यांनी 21 जून 1858 ते 9 ऑक्टोबर 1858पर्यंत जावरा, अलीपूर, राजगढ, इसागढ, चंदेरी, मंग्रौली इ. ठिकाणी लढाया जिंकल्या.ऑगस्ट 1858 मध्ये नानासाहेब पेशवे भूमिगत झाले ते त्यानंतर कोणासही कधीच दिसले नाहीत. त्यानंतर तात्याही भूमिगत झाले. इंग्रज त्यांच्या पाठलागावर असताना त्यांनी महाराष्ट्रात शिरण्याचा प्रयत्न केला.तेथून नागपूर, मंदसोर, झिरापूरवरून ते कोटा संस्थानात गेले. इंद्रगढला त्यांनी 13 जानेवारी 1859 रोजी फिरोजशाहाची भेट घेतली. फिरोजशाह व तात्या देवास येथे आले तेथे इंग्रजांनी छापा घातला.फिरोजशाहाने तात्यांची साथ सोडल्यामुळे, ते शिंद्यांचे सरदार मानसिंग याच्या आश्रयास गेले परंतु जनरल मीडने तात्यांना कैद केले. त्यांना प्रथम सीप्री येथे नेण्यात आले. 18 एप्रिल 1859 रोजी तात्यांना शिवपुरी येथे फाशी देण्यात आले.
No comments:
Post a Comment