Total Pageviews

Saturday, 11 April 2020

आज आपण कठीण काळातून जात आहोत. या काळात सर्वाचे मनोधैर्य उंचावण्यासाठी जे जे करता येईल ते आपण सर्वानी केले पाहिजे.-LOKSATTA - MADHAV BHANDARI

मनोबल वाढवणारी सकारात्मकता
या संकटकाळात त्यांच्यातील सकारात्मक विचारशक्तीला साद घालणे अनिवार्य आणि अपरिहार्य आहे..
लोकसत्ता टीम | April 7,
माधव भांडारी

मुख्य प्रवक्ता, महाराष्ट्र भाजप

करोना संकटकाळात अनेक पातळ्यांवर केंद्र सरकार सक्रिय असताना, जनतेच्या आरोग्यासाठी काम करणाऱ्यांचे आभार मानणे आणि गेल्या रविवारचे ‘दीप प्रज्वलन’ असे दोन कार्यक्रम पंतप्रधानांनी दिले. १३० कोटी जनतेला टाळेबंदीत घरी बसावे लागते आणि घरात बसून राहण्याचा हा काळ किती असेल हे कोणीच सांगू शकत नाही, तेव्हा या संकटकाळात त्यांच्यातील सकारात्मक विचारशक्तीला साद घालणे अनिवार्य आणि अपरिहार्य आहे..

करोना विषाणू आणि आजाराच्या आक्रमणाने सर्व जग एका अर्थाने हीनदीन झाले आहे. अमेरिकेसारखे सर्वार्थाने बलाढय़ राष्ट्रसुद्धा या आक्रमणामुळे पार गोंधळून गेलेले दिसत आहे. जगातली सर्व प्रगत राष्ट्रे या रोगाच्या प्रादुर्भावामुळे हतबल झालेली दिसत आहेत. या रोगाची लागण आणि वेगाने होणारा प्रसार कसा रोखायचा, हा प्रश्न सर्वच राष्ट्रांना भेडसावत आहे. या करोना संकटापासून कोणताच देश सुटलेला नाही. स्वाभाविकपणे आपणही गेले काही आठवडे या संकटाचा सामना करीत आहोत. आपल्या देशाचा भौगोलिक विस्तार, प्रचंड लोकसंख्या आणि त्यातील गरिबी रेषेच्या आसपास रेंगाळणाऱ्या किंवा गरिबी रेषेच्या खालील लोकसंख्येचे प्रमाण, साधन सामुग्रीवरील मर्यादा, गेल्या ७० वर्षांमध्ये सार्वजनिक आरोग्यसेवेची झालेली हेळसांड आणि याच्या जोडीला समाजातील स्वयंशिस्तीचा अभाव.. अशा सर्व अडचणींमधून मार्ग काढत आपल्याला हा सामना करावा लागत आहे.

या काळात सरकारने- केंद्र अथवा राज्य- केलेल्या आणि न केलेल्या उपाययोजनांची चर्चा होणे स्वाभाविक आहे. विशेषत: जर्मनीचे उदाहरण देऊन अशी चर्चा केली जात आहे. जर्मनीने या साथीच्या आक्रमणात मृत्युदर कमी राखण्यात लक्षणीय यश मिळवले आहे. त्याची कारणे अनेक असतील; त्यांचा अभ्यास केला जात आहे, पुढेही होत राहील. त्यातून आपण काही चांगले शिकूदेखील! पण ही चर्चा करताना एक मुद्दा कायम लक्षात ठेवायला हवा; तो मुद्दा म्हणजे जर्मनी हा कमालीचा शिस्तप्रिय देश आहे. आपल्याकडे शिस्त न पाळणे हा राष्ट्रीय स्वभाव आहे. त्याचबरोबर अशी शिस्त न पाळणे म्हणजेच व्यक्तिस्वातंत्र्य व मानवी मूल्यांचे संवर्धन असे भासवून ती शिस्त मोडून काढणे एवढा एककलमी कार्यक्रम चालवणारा तथाकथित बुद्धिवंतांचा एक विशिष्ट वर्गसुद्धा आपल्या देशात आहे. जर्मनीने गेले काही महिने देशात बाहेरून येणाऱ्यांची कसून वैद्यकीय तपासणी चालवली होती. पण त्या वैद्यकीय तपासणीला ‘छळ आणि मूलभूत अधिकारांचा भंग’ असे संबोधून थयथयाट करणारी सोनी राझदानसारखी कोणी ‘सेलीब्रिटी’ जर्मनीत उभी राहिल्याचे माझ्या तरी वाचण्यात, ऐकण्यात आले नाही.

या संकटाच्या काळात भारत सरकारने केलेल्या कामगिरीची दखल जागतिक पातळीवर घेतली जात आहे. जगातील बहुसंख्य प्रगत आणि श्रीमंत देशांच्या तुलनेत आपण आज खूपच बऱ्या परिस्थितीत आहोत. त्यामागे प्रामुख्याने केंद्र सरकारने राबवलेली उपाययोजना आहे, ही वस्तुस्थिती मान्य करायला खरे तर अडचण वाटायला नको. केंद्र सरकारने या काळात अनेक निर्णय घेतले. मुख्यत: ‘संपूर्ण टाळेबंदी’ करण्याचा निर्णय घेण्यात सरकारने काहीही चालढकल केली नाही अथवा वेळकाढूपणाही केला नाही. एका बाजूला सर्व व्यवहार बंद करत असतानाच, करोनाशी सामना करण्यासाठी लागणाऱ्या यंत्रसामुग्रीचे उत्पादन करणे आणि औषधे व उपचार यात संशोधन करणे याकरिता स्वतंत्र निधी उपलब्ध करून देऊन नवे संशोधक, उद्योजक पुढे यावेत यासाठी मोहीम चालू करणे, त्याचवेळेला देशातील गरजू जनतेसाठी- ८० कोटी लोकांना अन्नधान्य पुरवण्याचा कार्यक्रम हाती घेणे, हातावर पोट असलेले, अल्पभूधारक शेतकरी, शेतमजूर, शहरी कामगार, ज्यांना सामाजिक निवृत्तिवेतन दिले जात आहे, असे सर्व ज्येष्ठ नागरिक या सर्वाच्या खात्यात काही ना काही रोख रक्कम जमा करणे.. अशा अनेक पातळ्यांवर केंद्र सरकार अत्यंत सक्रियतेने व शांतपणे, गाजावाजा न करता काम करत आहे.

जगातले चित्र काय आहे? अमेरिकेचे अध्यक्ष संभाव्य मृत्यूंचा आकडा सांगून आधीच हबकलेल्या जनतेला आणखी हादरवून सोडत आहेत. इंग्लंडचे राष्ट्रप्रमुख स्वत:च रोगाच्या तडाख्यात सापडून विलगवासात आहेत आणि भारतीय वंशाचे दोन मंत्री देश चालवत आहेत. स्पेनच्या राजघराण्यातील व्यक्तीचा बळी गेला. इटलीच्या अवस्थेबद्दल तर न बोलणे बरे! शेजारच्या पाकिस्तानने ‘रोगावरील उपाययोजना’ म्हणून मोठे भूखंड खरेदी करून दफनभूमी वाढवायला सुरुवात केली आहे. चीनची अवस्था तर आणखी भीषण आहे असे म्हटले जात आहे, कारण तेथील खरे चित्र अद्याप जगासमोर आलेले नाही, असे अमेरिकेच्या सीआयएचे म्हणणे आहे. या पार्श्वभूमीवर आपल्या पंतप्रधानांनी दिलेले नेतृत्व आणि कार्यक्रम बघितले पाहिजेत.

जनतेच्या आरोग्यासाठी काम करणाऱ्यांचे आभार मानणे आणि गेल्या रविवारचे ‘दीप प्रज्वलन’ असे दोन कार्यक्रम या काळात पंतप्रधानांनी जनतेला दिले. जनतेने या दोन्ही कार्यक्रमांना भरघोस प्रतिसाद दिला. विरोधकांनी आणि ‘आदत से मजबूर’ टीकाकारांनी टीकाही केली. पण त्यातील काही महत्त्वाचे मुद्दे नजरेआड करता येणार नाहीत. एक तर हे दोन्ही कार्यक्रम सकारात्मक होते, विधायक होते. जनतेचे सामुदायिक मानस (मास सायकोलॉजी) लक्षात घेऊन दिलेले होते.

स्वातंत्र्यपूर्व काळात महात्मा गांधी असे कार्यक्रम देत असत. प्रभातफेऱ्या काढणे, सार्वजनिक सफाई करणे, प्रार्थनासभा घेणे, सूतकताई करणे असे अनेक कार्यक्रम महात्मा गांधींनी वेळोवेळी दिले. आणीबाणीतही जयप्रकाश नारायण यांनी असे अनेक कार्यक्रम दिले होते. त्यावेळेला मृत्यूशी झुंज देत असलेल्या जयप्रकाशजींसाठी घराघरांत प्रार्थना करण्याचा कार्यक्रम दुर्गाबाई भागवतांनी दिला होता. या सर्व कार्यक्रमांवर त्या-त्या काळात टीकाही झाली. पण जनतेने हे कार्यक्रम उचलून धरले. अर्थात, ती प्रत्येक वेळ वेगळी होती. गांधीजींनी दाखवलेला मार्ग नंतरच्या काळात आपापल्या पद्धतीने वापरण्याचा प्रयत्न दुर्गाबाईंनी तसेच आजच्या कठीण प्रसंगात पंतप्रधानांनी केला. जनतेच्या मनातील सकारात्मक ऊर्जेला साद घालून ती जागी करण्याचा प्रयत्न गांधीजींनी सतत केला. आजच्या अवघड काळात त्याचीच गरज आहे. कारण १३० कोटी जनतेला जेव्हा सर्व कामधंदा, उद्योग सोडून घरात बसवावे लागते आणि घरात बसून राहण्याचा हा काळ किती असेल हे कोणीच सांगू शकत नाही, तेव्हा याच सकारात्मक विचारशक्तीला साद घालणे अनिवार्य, अपरिहार्य आहे. अशा साध्या साध्या कार्यक्रमांतून करोडो नागरिक एका पद्धतीने, एका दिशेने विचार व कृती करत आहेत हे सर्वाना बघायला मिळते आणि हे दृश्य सर्वाचेच मनोबल वाढवणारे असते. हे कार्यक्रम प्रतीकात्मकच असतात. त्याचबरोबर सामाजिक मानसशास्त्रीय परिणाम करणारे असतात. असे कार्यक्रम देत राहणे आणि ते यशस्वी करणे ही काळाची गरज असते.

आज आपण कठीण काळातून जात आहोत. या काळात सर्वाचे मनोधैर्य उंचावण्यासाठी जे जे करता येईल ते आपण सर्वानी केले पाहिजे.

No comments:

Post a Comment