अनेक वर्ष सातत्याने जिहादी इस्लामचा समाजात प्रसार केल्याने पाकिस्तानी जनतेचा एक मोठा हिस्सा कट्टरतावादी झाला आहे. त्यामुळे कोरोनाचा प्रसार वाढू लागल्यावर मशिदीत नमाजसाठी एकत्र येण्यावर बंदी घालणे पाकिस्तानला जमेना. जर एखाद्या आजाराच्या भीतीपोटी अल्लाने सांगितलेली एक गोष्ट सोडली तर भविष्यात अनेक गोष्टी सोडाव्या लागतील, असे तेथील श्रद्धाळूंचे मत आहे.
मार्च महिन्याच्या मध्यावर मरकाझ निझामुद्दीन या दिल्लीतील तबलिगी जमातच्या जागतिक मुख्यालयातील एका कार्यक्रमाला विविध देशांतून सुमारे दोन हजार लोक उपस्थित होते. आज त्यांच्यापैकी २४ जणांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे आढळून आले असून सात जणांचा मृत्यू झालेला. यापैकी सहा तेलंगण राज्याचे असून एक जम्मू-काश्मीरचा आहे. यातील काही लोकांमुळे अंदमान-निकोबारमध्येही कोरोनाची साथ पसरली आहे. या घटनेमुळे संपूर्ण भारत देश हादरून गेला असून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा धार्मिक गट एवढा निष्काळजीपणा कसा काय दाखवू शकतो, असा प्रश्न विचारला जाऊ लागला आहे. जर दोन हजार लोकांच्या एकत्र येण्याने एवढा गहजब होत असेल, तर विचार करा, दोन लाख लोकांच्या एकत्र येण्याने किती मोठा धोका निर्माण होऊ शकतो? होय, हे घडले आहे पाकिस्तानात. आणि तिथेही वादाच्या केंद्रस्थानी आहे तबलिगी जमात याच संस्थेचा ‘इजतेमा’ किंवा वार्षिक मेळावा.
कोरोनाचा धोका असूनही या मेळाव्याला ९० देशांतून तबलिगचे दोन ते अडीच लाख कार्यकर्ते एकत्र आले होते. ११ ते १५ मार्च दरम्यान लाहोरजवळील रायविंड येथे हा मेळावा आयोजित करण्यात आला होता. पाकिस्तान सरकारने १२ मार्च रोजी तो गुंडाळण्याचा निर्णय घेतला असला तरी लोक एकत्र आले, त्यांनी एकमेकांच्या गळाभेटी घेतल्या, एकाच परिसरात राहिले आणि त्यातून कोरोनाचा सर्वत्र प्रसार झाला. जर जगभरातील लोक कोरोनाच्या फैलावासाठी चीनला दोष देत असतील, तर अनेक मुस्लीम देशांत यासाठी चीनसोबत त्याचा जीवलग मित्र असलेल्या पाकिस्तानलाही दोष दिला जात आहे. कारण गाझा पट्टीपासून, किरगिझस्तान, मलेशिया, फिलिपाईन्स, थायलंड अशा अनेक देशांत या इजतेमाला आलेल्या लोकांमुळे कोरोनाचा प्रसार वाढला.
आजघडीला पाकिस्तानमध्ये कोरोनाग्रस्तांची संख्या १९००च्या जवळपास पोहोचली असून मृतांचा आकडा २५ पर्यंत गेला आहे. सिंध आणि पंजाब या राज्यांमध्ये हा प्रादुर्भाव सर्वाधिक असून अनेक ठिकाणी हा संसर्ग ‘स्टेज तीन’ला म्हणजे सामाजिक प्रसारापर्यंत गेला आहे. त्यासाठी समाजातील कर्मठपणा मोठ्या प्रमाणावर कारणीभूत आहे. पाकिस्तान काही श्रीमंत देश नाही की, जेथून दर महिन्याला पर्यटन किंवा व्यवसायासाठी हजारो लोक युरोपातील स्पेन आणि इटलीला जातील आणि येताना सोबत कोरोना घेऊन येतील. वुहानमध्ये जेव्हा कोरोनाचा संसर्ग झाला, तेव्हा विविध देशांनी तेथे अडकलेल्या आपल्या नागरिकांना सोडवून परत आणले होते. याला अपवाद होता पाकिस्तानचा. सुमारे ८०० पाकिस्तानी वुहान आणि ह्युबै भागात शिकत आहेत. विमानसेवा बंद झाल्यामुळे आपल्याला विशेष विमानाने परत आणावे, यासाठी त्यांनी पाकिस्तानच्या सरकारकडे कळकळीची विनंती केली. पण आर्थिक चणचणीमुळे विशेष विमान धाडणे परवडेना आणि ते धाडल्यास चीनच्या प्रतिमेवर डाग पडून भविष्यात चीनचा रोष पत्करायची भीती, यामुळे पाकिस्तानने आपल्या विद्यार्थ्यांना वार्यावर सोडले.
पाकिस्तानात कोरोनाचा प्रसार झाला तो उमराहसाठी सौदी अरेबियातील मक्केला तसेच इराणमधील मशाद आणि कोमसारख्या ठिकाणी तीर्थयात्रांना जाऊन परत आलेल्या लोकांमुळे. पाकिस्तानमधील कोरोनाचे पहिले बळी ठरलेले ५० वर्षीय सादत खान ९ मार्च रोजी जेव्हा मक्केला जाऊन पेशावरला परत आले, तेव्हा त्यांच्या स्वागतासाठी दोन हजार लोकसंख्येचे पूर्ण गाव एकत्र जमले होते. या कार्यक्रमात मोठ्या प्रमाणावर कोरोना विषाणूचा फैलाव झाला. इराण आणि पाकिस्तानमध्ये सुमारे ९५९ किमीची सीमा असून दरवर्षी एक लाखांहून अधिक पाकिस्तानी तीर्थयात्रेसाठी इराणला जातात. इराणमध्ये कोरोनाचा फैलाव मोठ्या प्रमाणावर सुरू झाल्यानंतर पाकिस्तानने आंतरराष्ट्रीय सीमा बंद केली. इराणहून परत आलेल्या एका जथ्याला क्वारंटाईनच्या नावावर बलुचिस्तानमधील ताफ्तान या गावी किमान सोयीसुविधा नसलेल्या छावणीत एकत्र ठेवण्यात आले होते. त्यात कोरोना संशयित आणि रुग्ण सर्वांची व्यवस्था एकाच ठिकाणी करण्यात आली होती. या लोकांना शेजारच्या गावात जाऊन सामान खरेदी करून देण्यात आले.
नंतर सर्वांची चाचणी न करताच त्यांना जाऊ देण्यात आले. यातूनही कोरोनाचा मोठ्या प्रमाणावर प्रसार झाला. अनेक वर्ष सातत्याने जिहादी इस्लामचा समाजात प्रसार केल्याने पाकिस्तानी जनतेचा एक मोठा हिस्सा कट्टरतावादी झाला आहे. त्यामुळे कोरोनाचा प्रसार वाढू लागल्यावर मशिदीत नमाजसाठी एकत्र येण्यावर बंदी घालणे पाकिस्तानला जमेना. राष्ट्राध्यक्ष डॉ. आरिफ अलवी यांनी इजिप्तच्या ‘अल-अझर’ या जगप्रसिद्ध इस्लामिक विद्यापीठाला एकत्र नमाज न पढण्याबद्दल फतवा काढायची विनंती केली. तसा फतवा त्यांनी काढलादेखील. पण, त्याचे पालन करायला पाकिस्तानातील श्रद्धाळू जनता तयार होईना.
अखेरीस पाकिस्तान सरकारने शुक्रवारच्या नमाजवर मर्यादा आणणारा आदेश काढला. त्यात सरसकट बंदी घालण्याऐवजी मर्यादित संख्येने ५० वर्षांखालील आजारी नसलेले लोक नमाजसाठी एकत्र येऊ शकतात, अशा अटी घातल्याने गेल्या शुक्रवारीही नमाजसाठी गर्दी उसळली. जर एखाद्या आजाराच्या भीतीपोटी अल्लाने सांगितलेली एक गोष्ट सोडली तर भविष्यात अनेक गोष्टी सोडाव्या लागतील, असे तेथील श्रद्धाळूंचे मत आहे. एकमेकांना भेटणे, हात मिळवणे, गळाभेट घेणे या सर्व परंपरा असल्याने त्या सोडण्यास समाजात विरोध आहे.
कोरोनामुळे पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेचे तसेच आरोग्यव्यवस्थेचे तीन तेरा वाजले आहेत. पंतप्रधान इमरान खान यांनी टेलिव्हिजनवरील राष्ट्राला उद्देशून केलेल्या आपल्या भाषणात चीनप्रमाणे कर्फ्यू लावण्याचा पाकिस्तान विचारदेखील करू शकत नाही, याची कबुली दिली. देशातील २५ टक्क्यांहून जास्त जनता दारिद्य्ररेषेखाली असून त्यांना आर्थिक मदत पुरवणे पाकिस्तानसाठी अवघड आहे. त्यामुळे ‘सोशल डिस्टन्सिंग’ची जबाबदारी इमरानने जनतेच्याच गळ्यात मारली. पाकिस्तानात मास्क, व्हेंटिलेटर्स आणि अन्य सुरक्षा उपकरणांचाही प्रचंड तुटवडा निर्माण झाला आहे. संपूर्ण देशात जेमतेम २२०० व्हेंटिलेटर्स असून त्यात दीड कोटी लोकसंख्येच्या बलुचिस्तानमध्ये अवघे ४९ व्हेंटिलेटर्स आहेत. जर मुसलमानांमध्येच प्रांत आणि पंथानुसार भेदभाव असेल तर अल्पसंख्याक हिंदूंची काय कथा? कोरोनाचे गांभीर्य ओळखून हिंदू तसेच ख्रिस्ती अल्पसंख्याकांनी स्वतःहून मंदिरे आणि चर्च बंद ठेवण्याचा निर्णय घेतला.
असे असले तरी कराचीमध्ये गरिबांना रेशन वाटणार्या एका धर्मादाय संस्थेने हिंदूंना रांगेतून बाहेर काढल्याची घटना समोर आली आहे. संयुक्त राष्ट्रांच्या व्यापारविषयक संस्थेच्या अहवालानुसार कोरोनाचा सर्वाधिक मोठा आर्थिक फटका बसणार्या देशांच्या यादीत अर्जेंटिना आणि सहारा वाळवंटातील देशांसोबत पाकिस्तानचाही समावेश आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद देत सर्व सार्क देशांनी संयुक्त फंडासाठी योगदान दिले आहे. अपवाद आहे तो पाकिस्तानचा. या फंडासाठी पाकिस्तान सरकारने अजूनही एक नवा पैसा दिलेला नाही. चीनकडून पाकिस्तानला मदत केली जात असली तरी ती पुरेशी नाही, कारण खुद्द चीनची अर्थव्यवस्थाही अडचणीत आली आहे. अशा परिस्थितीत तातडीच्या उपाययोजना न केल्यास पाकिस्तानमधील कोरोनाचे संकट मानवीय संकट ठरू शकेल आणि ज्या प्रकारे भारतात लाखो लोक एका ठिकाणाहून दुसरीकडे जात आहेत, त्याच प्रकारे पाकिस्तानी लोक स्थलांतर करू शकतात आणि त्याकडे मानवतावादी दृष्टिकोनातून बघण्यासाठी भारतीय पुरोगामी मंडळ आग्रही असेल
No comments:
Post a Comment