कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर सध्या देशभरात चिंतेचा विषय ठरला आहे तो दिल्लीतील निजामुद्दीन येथील ‘तबलिगी जमात’चा पार पाडलेला धार्मिक कार्यक्रम. तेव्हा, ‘तबलिगी जमात’ आणि त्याच्या स्थापनेचा हेतू, त्यांचे मुस्लीम धर्मप्रसाराचे कार्य यांचा आढावा घेणारा हा लेख...
गेल्या दोन दिवसांत निजामुद्दीन, दिल्लीहून आलेल्या दृश्यांनी देशातील जनतेची झोप उडवली आहे. दिल्लीच्या सुप्रसिद्ध निजामुद्दीन दर्ग्याच्या अगदी समोर असलेल्या तबलिगी जमातच्या टोलेजंग इमारतीतून दि. ३१ मार्चपर्यंत तीन दिवसांत दोन हजारांपेक्षा अधिक लोकांना बाहेर काढण्यात आले. त्यात शेकडो विदेशी नागरिकांचा समावेश आहे. हे होत असताना दुसरीकडे तेलंगणमध्ये तबलिगी जमातच्या ‘इज्तेमा’त (विशाल धर्मसंमेलनात) भाग घेऊन परतलेल्या सहा लोकांचा कोरोना विषाणूच्या बाधेमुळे मृत्यू झाल्याचे समोर आले. त्यानंतर पोलिसांनी त्यांच्या तपासाच्या कक्षा देशभरात वाढविल्या. ठिकठिकाणी छापे टाकले. कारण, तबलिगी इज्तेमा संमेलनात भाग घेतलेले शेकडो लोक आपापल्या प्रांतात जेव्हा परतत होते, तेव्हा ते त्यांच्याबरोबर कोरोनाचा प्रसाद घेऊन परतत होते आणि ही दावत-मेजवानी- हा प्रसाद त्यांना कोणी दिला होता? तो देणारा मौलाना तबलिगी जमातचा प्रमुख मोहम्मद साद कंधालगी हा आहे. आजच्या घटकेला त्याच्यावर फौजदारी गुन्हा नोंदविला गेला असून तो पोलिसांचा ससेमिरा चुकविण्यासाठी दडून बसलेला आहे.
सत्तर वर्षांचा इतिहास
‘तबलिगी जमात’ हा म्हटला तर वेगळा पंथ. अगदी ७० वर्षांपूर्वी भारतात स्थापन झाला. त्याची स्थापना करणारा मुल्ला, मोहम्मद इल्यास कंधालगी हा भारतात जन्मलेला मुसलमान होता. त्याने १९२७-२८च्या दरम्यान या पंथाची स्थापना केली. या वेगळ्या पंथाच्या स्थापनेची निकड त्याला आणि त्याच्या सहकार्यांना जाणविण्याचे कारण त्यावेळच्या भारतातील परिस्थितीत होते. म. गांधीजींनी १९२०च्या दशकात ‘खिलाफत’ वाचविण्याची जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर घेऊन हिंदी (हिंदू नव्हे)-मुस्लीम ऐक्याची हाळी देऊन दोघांनाही इंग्रजांविरोधात एक करण्याचा प्रयत्न चालविला होता. पण, त्याने जोर पकडण्यापूर्वीच तिकडे तुर्कस्तानमध्ये त्यांचा ‘राष्ट्रपुरुष’ ठरलेल्या केमाल पाशाने मार्च १९२४ मध्ये ‘खिलाफत’च समाप्त केली. भारतातील ‘खिलाफत’ आंदोलन एका झटक्यात कोसळले. त्याचे अनेक दूरगामी परिणाम भारतावर झाले. एकीकडे इंग्रजांविरोधात असफल राहिलेल्या मोपला मुसलमानांनी केरळमध्ये हिंदूंची कत्तल आरंभली, बळजबरीने धर्मांतरे केली, महिलांवरील अत्याचारांना सीमाच उरली नाही, तर दुसरीकडे पुढे जाऊन स्वातंत्र्य मिळाल्यास हिंदूंच्या जोखडाखाली राहावे लागेल, अशा मानसिकतेतून भारतात फुटीरतावादी चळवळींना ऊत आला. मुस्लीम लीगचा जोर चढला. प्रत्येक समाजात एक असा वर्ग असतो, ज्याला त्या-त्या वेळच्या सामाजिक अधोगतीचे मूळ त्यावेळी अस्तित्वात असलेल्या अधःपतित समाजव्यवस्थेत दिसते. त्या प्रकारची मनोधारणा असणारा फार मोठा वर्ग मुस्लीम समाजात अगदी सुरुवातीपासून राहिला आहे. अशीच अध:पतनाची मानसिकता असलेल्या लोकांनी एकत्र येऊन भारतात ‘तबलिगी जमात’ या वेगळ्या संस्थेचा, हवे तर ‘पंथा’ची म्हणता येईल सुरुवात केली. सुप्रसिद्ध इस्लाम अभ्यासक शेषराव मोरे देतात, त्याप्रमाणे काही काँग्रेसी नेत्यांनी त्याला हातभार लावला. त्यात अगदी परवापरवापर्यंत शंभर टक्के राष्ट्रवादी असलेल्या डॉ. सैफुद्दीन किचलू या मुखंडाचा समावेश होता. त्या सर्वांनी दोनप्रकारे नवी चळवळ सुरू केली. ‘खिलाफत’ खलास केली गेल्यावर मुस्लीम समाजातील नेत्यांनी एकीकडे तनझिम- मुस्लीम संघटन करण्यास सुरुवात केली, तर दुसरीकडे इस्लाम प्रसार-तबलिगी-धर्मांतर करण्यासाठी प्रयत्न सुरू केला (मोरे, काँग्रेसने अखंड भारत का नाकारला? पृ. २२४). इंग्रजांचे अनेक देशांमधून एकतर राज्य अथवा वर्चस्व निर्माण होण्यापूर्वी इस्लामचा प्रसार तलवारीच्या बळावर होत असे. इंग्रजांमुळे ते शक्य न राहिल्याने ‘तबलिगी जमात’ या चळवळीच्या माध्यमातून तो करण्याचे धोरण आखण्यात आले. पूर्वी एका हातात पवित्र कुराण, तर दुसर्या हातात तलवार घेऊन गाझींच्या झुंडी निघत असत. तबलिगी जमातीने त्याला कलाटणी दिली. आता तसे न करता आता एका हातात कुराण आणि दुसर्या हातात धर्मप्रसारासाठी उपयुक्त ठरतील, अशा हदीस पैगंबर महंमदाच्या आठवणींची संकलने घेऊन ते प्रचारक गावोगावी जाऊ लागले. त्यांनी गावोगावी जाऊन लीगसाठी आणि हिंदूंच्या विरोधात लढा उभारण्यासाठी पैसा गोळा करण्यास सुरुवात केली. ‘तबलिगी जमात’चे कार्यकर्ते जेव्हा कोणत्याही गावी जात, तेथे स्थानिक मशिदीत मुक्काम करत. त्यांनी साधी वागणूक ठेवावी, यावर कटाक्ष होता. असा कार्यकर्ता समोरच्या मुस्लिमाला अथवा गैरमुस्लिमाला इस्लाम धर्माविषयी खात्री पटवून देण्याइतपत तयार व्हावा, यासाठी त्यांचे प्रशिक्षण करण्याची आवश्यकता होती. ती लक्षात घेऊन ‘तबलिगी जमात’ने प्रथम एका विशिष्ट प्रकारचे धार्मिक प्रशिक्षण देणे सुरू केले. प्रशिक्षित मुल्लांना ठिकठिकाणी पाठविण्यास सुरुवात केली. त्या वेळी त्यांच्यासमोर दोन पर्याय होते. बहुतेकांना बरेलवींपेक्षा देवबंदीचा कडवेपणा अधिक भावणारा असल्याने या दोन्ही संस्था एकत्रित येऊन सुमारे साठ वर्षे काम करत होत्या. त्यांच्यात काही वर्षांपूर्वी वितुष्ट आल्याने आणि अनेक ठिकाणी बरेलवींचे बस्तान व्यवस्थित बसल्याने सध्या त्यांच्यात दुरावा निर्माण झाला आहे.
‘तबलिगी’चे कार्यकर्ते आजही स्थानिक मशिदीमध्ये राहतात. अशाच एका कार्यकर्त्याची व माझी भेट गोव्यात २०१३ साली झाली होती. तो गुजरातमधून आला होता आणि दोन महिन्यांपासून स्थानिक मुलांना धार्मिक शिक्षण देत होता. त्यानंतर तो दक्षिणेत जाणार होता. जे मला गोव्यात पाहायला मिळाले, तेच निझामुद्दीनमध्ये बाहेर आले. निझामुद्दीन ‘तबलिगी जमाती’च्या टोलेजंग इमारतीत प्रशिक्षणासाठी येणारे लोक केवळ भारतातूनच नव्हे, तर अनेक देशांमधून आले होते आणि शिरस्त्याप्रमाणे ते १३ ते १५ मार्च दरम्यान झालेल्या ‘इज्तेमा’नंतर धर्मप्रसार करण्यासाठी प्रांताप्रांतातून गावोगावी पसरले. एकीकडे मक्का-मदिनामधील सर्वोच्च असणार्या मशिदीसुद्धा बंद केलेल्या असताना भारतात मात्र सर्व कायदा-सुव्यवस्था धाब्यावर बसवून हजारोंचा सहभाग असलेला ‘इज्तेमा’ आयोजित केला जातो, कोरोनासंदर्भात सर्व काही माहिती असताना, ‘इज्तेमा’ आयोजित करणारा साद कंधालवी समोरच्या प्रशिक्षणार्थींना त्यांनी मशिदीत मरायला तयार असावे, असे सांगण्यास धजावतो, समोरचे लोक खोकत असताना तिकडे सरसकट दुर्लक्ष करतो, हे अश्लाघ्य आहे. त्याचे अनुयायी बसमधून तपासणीसाठी नेले जात असताना त्यांना नेणार्या कर्मचार्यांवर, रस्त्यांवर थुंकतात, अनेक ठिकाणी तबलिगी प्रचारकांना ताब्यात घेण्यासाठी गेलेल्या लोकांवर हल्ले करतात, यातून आपल्याबरोबर इतरांनीही मरावे, अशी त्यांची विकृत मनोवृत्ती प्रकट झाली. पण, त्यांना हे लक्षात आले नाही की, त्या प्रचारकांच्या संपर्कात येणारे बहुतांशी लोक हे सुन्नी मुसलमानच असणार आहेत. कोरोनाचे पहिले बळी तेच असतील. हा सारासार विचार त्यांना करता आला नाही, हे त्यांचे तसेच त्यांना आसरा देणारे, विदेशी नागरिक आहेत, हे दिसत असतानाही त्यांना लपण्यास मदत करणार्यांचे दुर्दैव आहे. गेल्या दोन दिवसांत कोरोनाबाधितांची एकाएकी वाढलेली संख्या या ठिकठिकाणी गेलेल्या संक्रमित लोकांमुळे आहे. त्यांनी केवळ एका मुखंडाच्या आग्रहाला बळी पडून महत्त्वाची, विलगीकरणाची साधी बाब न पाळल्याने आज देशासमोर कोरोनाचा भस्मासुर उभा ठाकला आहे. त्या भस्मासुराने प्रथम स्वतःच्या डोक्यावर हात ठेवला. आता मुस्लिमांबरोबरच तुमच्या आमच्यासारखे काफिरही बळी पडणार आहोत. कोणाच्या खांद्यावर कोणाचे ओझे?
No comments:
Post a Comment