प्रत्येक संकटात एक संधी दडलेली असते असे म्हटले जाते, त्याची 'याचि देही याचि डोळा' प्रचिती हवापाण्याच्या शुद्धतेमुळे सध्या येत आहे. करोना विषाणूच्या संकटामुळे संपूर्ण जगच ठप्प झाले. भारतातही गेल्या दहा दिवसांपासून लॉकडाउन आहे. उद्योगधंदे बंद आहेत. कारखान्यांची धडधड थांबली आहे. रस्त्यावरून वाहनांनी रजा घेतलेली आहे. लोक घरात बसून आहेत. या सर्वांचा एकत्रित परिणाम म्हणून देशभरातील हवेची गुणवत्ता कमालीची सुधारली आहे. सागरी व नदी प्रदूषण तर एवढे कमी झाले आहे, की त्यात चक्क डॉल्फिन मासे विहार करू लागले आहेत. मुंबईतील अभूतपूर्व शांततेच्या पार्श्वभूमीवर मोरांचे थवे रस्त्यावर पिसारे फुलवून आनंद घेत आहेत. पक्ष्यांचा किलबिलाट कानांना तृप्त करीत आहे. नवी दिल्लीच्या उपनगरांत नीलगायींचे दर्शन होत आहे. थोड्या फार फरकाने हा अनुभव सर्वत्रच येत आहे. ही कमाल केली आहे ती लॉकडाउनने. तब्बल ९० टक्के वाहने पार्किंगमध्येच आहेत. त्यामुळे इंधनाची तर बचत होत आहेच; शिवाय वाहनांद्वारे हवेत जाणाऱ्या कार्बन मोनॉक्साइडचे प्रमाण प्रचंड घटले आहे. हवेतील धूलिकण कमी झाले आहेत. सल्फर डायऑक्साइड, नायट्रोजन ऑक्साइड आदी हानिकारक वायूंचे प्रमाण घटल्याने, हवेची गुणवत्ता कमालीची सुधारली आहे. सर्वाधिक प्रदूषित म्हणून गणले गेलेले नवी मुंबई किंवा प्रदूषणामुळे आरोग्य आणीबाणीची परिस्थिती ओढावलेले राजधानी दिल्लीसारखे शहरही शुद्ध हवेमुळे खुलले आहे. बंद कारखान्यांमुळे औद्योगिक कचरा, सांडपाणी नद्यांच्या प्रवाहात येत नसल्याने, पाण्याचे आरोग्यही सुधारले आहे. देशभरातील तब्बल ९१ मोठी शहरे गेल्या काही दिवसांत या दोन्ही प्रदूषणाच्या विळख्यातून तात्पुरती का होईना; पण बाहेर पडली आहेत. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळानेच हा दिलासादायक अहवाल प्रसिद्ध केल्याने, करोनाच्या आपत्तीतील ही इष्टापत्ती समजायला हरकत नाही. दळणवळण, उद्योग, ऊर्जा, बांधकाम आदी बहुसंख्य क्षेत्रांचे कामच थांबल्याने, प्रदूषणाचा मुख्य स्रोतच बंद झाला, हे त्याचे महत्त्वाचे कारण आहे. लॉकडाउन संपल्यानंतर प्रदूषणाचे पुन्हा 'येरे माझ्या मागल्या' सुरू होईल. करोनाच्या निमित्ताने नियतीनेच ही साफसफाई केली असली, तरी त्यापासून योग्य तो बोध घेतला नाही, तर 'सारे मुसळ केरात' याचा अनुभव यायचा.
No comments:
Post a Comment