Total Pageviews

Sunday 27 January 2019

ड्रॅगनच्या आर्थिक चमत्काराला घरघर.. गेल्या आठवडय़ाच्या पहिल्या दिवशी एक बातमी धडकली. लोकसत्ता टीम | January 28


ल्या आठवडय़ाच्या पहिल्या दिवशी एक बातमी धडकली. तिने जागतिक अर्थव्यवस्थेला हादरा दिला. जागतिक शेअर बाजारही कंप पावला. बातमी होती चीनची. त्या देशाचा आर्थिक विकासदर गेल्या तीन दशकांत नीचांकी पातळीवर गेल्याची. चीनचा विकासदर ६.६ इतका घसरल्याचे तेथील नॅशनल ब्यूरो ऑफ स्टॅटिस्टिक्स (एनबीएस) या सरकारी संस्थेने जाहीर केले असले तरी गेले वर्षभर तेथील औद्योगिक अवकाशात मंदीचे ढग तळ ठोकून आहेत.
एनबीएसचे आयुक्त निंग जिझे यांनी चीनचा विकासदर घसरल्याचे जाहीर करण्यापूर्वी म्हणजे वीसेक दिवस आधीच घसरणीची ही गोष्ट अमेरिकेतील वॉल स्ट्रीट जर्नलने सांगितली होती. त्यासाठी एक व्यक्तिरेखा वापरली होती. तिचं नाव लू विंग. कपडय़ांच्या कारखान्यांचा व्यवस्थापक. मुक्काम यांगचेंग हे औद्योगिक शहर.  वॉल स्ट्रीट जर्नलला दिलेल्या मुलाखतीत तो म्हणाला होता, गेलेले वर्ष भयानक होते. कपडय़ांची विक्री ३० टक्क्यांनी घसरली. यंदाचेही काही खरे नाही. मी खर्च कमी केला आहे. कारण रोजच्या गरजांसाठी आर्थिक ओढाताण करावी लागत आहे.
गेले वर्षभर चिनी माणसाची आर्थिक घडी  विस्कटलेली आहे. नोकऱ्यांची निर्मितीही रोडावली आहे. वेतनवाढीही थंडावल्यात. नोकऱ्यांवरही गदा आली आहे. चीनच्या या ढासळत्या आर्थिक प्रकृतीचे वास्तव चित्र जगातल्या तिसऱ्या क्रमांकाच्या अर्थव्यवस्थेतील म्हणजे जपानमधील वर्तमानपत्रांनी रेखाटले आहे.
जपानची चीनला होणारी निर्यात ३.८ टक्क्यांनी घसरल्याचे सांगताना.. असाही शिम्बुन या वर्तमानपत्राने चिनी ग्राहकांचा क्रयशक्तिपात सुरू असल्याकडे लक्ष वेधले आहे. गुंतवणूक आणि किरकोळ विक्रीदराची घसरगुंडी सुरू आहे. बेरोजगारीचा दरही वाढत आहे. गुआंगडोंग या निर्यात केंद्रातील काही कारखान्यांनी व्यवसाय नसल्याने चिनी नववर्षांच्या सुट्टीआधीच कामगार कर्मचाऱ्यांना रजा देऊन उत्पादन थांबविले आहे, असे निरीक्षणही या वृत्तपत्राच्या बातमीत नोंदवले आहे. सरकारी आकडय़ांपेक्षाही चीनच्या आर्थिक विकासाची पडझड अधिक असू शकते, असा अंदाज व्यक्त करण्याबरोबरच ही परिस्थिती गंभीर होऊन यंदा विकासदर ६.३ टक्क्यांवर घसरण्याची भीतीही या विश्लेषणात व्यक्त केली आहे.
जगातल्या दुसऱ्या क्रमांकाच्या बलाढय़ अर्थव्यवस्थेच्या गती- घसरणीची बातमी सांगताना, अमरिकेविरुद्धच्या व्यापारयुद्धामुळे चीनची अशी गत झाल्याची टिप्पणी अमेरिकेच्या वॉल स्ट्रीट जर्नलने केली आहे. त्याचबरोबर.. चायना रिस्क्स रियल हार्ड लँडिंग धिस टाइम.. अशा मथळ्याच्या लेखात, चीनची घसरण नोकऱ्यांवर गदा आणू शकते, चलन बाजार आणि जागतिक कर्जावरही परिणाम करू शकते, असा इशारा दिला आहे.
आर्थिक आणि लष्करी मदतीसाठी अमेरिकेपेक्षा चीनवर भिस्त ठेवू लागलेल्या पाकिस्तानातील डॉन या वृत्तपत्रानेही जागतिक बँकेचे माजी अर्थतज्ज्ञ लुईस कुईझ यांच्या हवाल्याने चीनमधील मंदी आणखी काही काळ सुरू राहील, असा अंदाज वर्तवला आहे. शिवाय, चीनच्या धोरणकर्त्यांनी विकासदर वाढीच्या योजना आखण्यापेक्षा विकासघसरण थांबवण्याचे लक्ष्य ठेवावे, असा सल्लाही कुईज यांनी दिला आहे. डॉनने ऑनलाइन आवृत्तीत चीन सरकारची ही अधिकृत आकडेवारी एक गुलाबी चित्र रंगवू शकते, असे भाष्य करून आकडय़ांच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह लावले आहे. त्याच्या पुष्टय़र्थ एएनझेड बँकेचे अर्थतज्ज्ञ रेमंड युंग यांचे, चीनचे देशांतर्गत स्थूल उत्पन्नाचे आकडे त्यांची आर्थिक वाढ मोजण्याचे अचूक परिमाण नाही, हे अवतरण उद्धृत केले आहे.
इज चायनाज फॉर्टी इअर बुम कमिंग टू अ‍ॅन एण्ड? असा प्रश्न इन्व्हेस्टर्स डेलीने  संपादकीयामध्ये उपस्थित केला आहे. चीनच्या आर्थिक चमत्काराची अखेर समीप आली आहे का? असा आकर्षक प्रश्न विचारून नक्कीच तसे दिसते आहे, असे उत्तरही लगेच दिले आहे. चीनच्या निर्यातीत झालेली घट, स्थूल देशांतर्गत उत्पन्नातील (जीडीपी) घसरण यामुळे चीनची अशी अवस्था झाल्याचे निरीक्षणही नोंदवले आहे. शिवाय, चीन अमेरिकेला मागे टाकून पहिल्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनेल, हे आंतरराष्ट्रीय नाणे निधीचे भाकीत केवळ भाकीतच राहील, अशा यापूर्वीच्या टिप्पणीचा दाखलाही त्यात देण्यात आला आहे.
निर्यात हे चीनच्या विकासाच्या गाडीचे इंजिन आहे, असे म्हटले जाते. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनच्या वस्तूंवरील आयात शुक्ल वाढवून इंजिनाच्या वेगाला वेसण घातली. त्याचे दुष्परिणाम जगाला भोगावे लागण्याची शक्यता आंतरराष्ट्रीय नाणे निधीने दावोस येथील जागतिक आर्थिक विकास परिषदेत व्यक्त केली होती. या पाश्र्वभूमीवर महिनाअखेरीस अमेरिका आणि चीनमध्ये त्या दृष्टीने चर्चा होईल आणि काही मार्ग निघेल, असा अर्थतज्ज्ञांचा कयास आहे.
https://www.youtube.com/watch?v=FVJIgUeqkt0&t=161s
https://www.youtube.com/watch?v=FVJIgUeqkt0&t=161s

No comments:

Post a Comment