हिंदुस्थानमुळे स्वातंत्र्य मिळालेल्या बांगलादेशकडे आपण अधिक मैत्रीच्या अपेक्षेने पाहणे साहजिकच आहे. मात्र, हिंदुस्थानचे उपकार विसरून पाकधार्जिणे धोरण अवलंबणारे बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी, जमाते इस्लामीसारखे काही कृतघ्न पक्ष बांगलादेशमध्ये आहेत. त्यांना हरवून शेख हसीना वाजेद यांच्या अवामी लीगने पुन्हा एकदा तिथे प्रचंड बहुमताने सत्ता मिळवली आहे. कट्टरपंथीयांना दूर ठेवून अवामी लीगचे सरकार आले हे हिंदुस्थानच्या हिताचे आहे. अवामी लीगला प्रचंड बहुमत मिळाले असल्याने ते उभय देशांच्या संबंधांसाठीही अनुकूल ठरणार आहे.
पाकिस्तान, श्रीलंका, म्यानमार, भूतान, नेपाळसारख्या शेजारच्या राष्ट्रांमधील निवडणुका, सत्तांतर परस्पर संबंधांवर परिणाम करणार्या असल्याने आपल्या देशाला त्याकडे लक्ष ठेवावेच लागते. दक्षिण आशियाई देशांचे राज्यकर्ते हिंदुस्थानमित्र असणे हे हिंदुस्थानचे दक्षिण आशियातील स्थान – आणि सुरक्षादेखील – टिकविणारे ठरते. आपल्या सहाही शेजार्यांना चीन कहय़ात ठेवू पाहत असताना मालदीव, श्रीलंका व भूतान येथील सत्तापालट आपल्या दृष्टीने विशेष स्वागतार्ह ठरतात.
बांगलादेशात खालिदा झिया आणि शेख हसीना या दोघींना ‘बॅटलिंग बेगम’ म्हणून ओळखलं जातं. देशातल्या सार्याच विरोधकांनी शेख हसीना यांना खाली खेचायचे या निर्धाराने सध्याच्या निवडणुकीत आघाडी केली होती. त्यांच्या प्रचाराचा एकच मुद्दा होता आणि तो म्हणजे शेख हसीना यांची दमनशाही. त्या हुकूमशहा आहेत. ‘जातिया औक्य फ्रंट’ या नावाने विरोधकांच्या आघाडीत तब्बल 20 पक्ष होते. तरीही शेख हसीना निवडून आल्या. पाकधार्जिण्या व कट्टरपंथीयांचा पाठिंबा असलेल्या बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी आणि तिच्या नेत्या खालिदा झिया यांना सत्तेपासून दूर राखण्यात शेख हसीना यांना मोठेच यश मिळाले आहे. अवामी लीगने 300 पैकी 260 जागांवर विजय मिळवला. तसेच अवामी लीगची मुख्य सहयोगी जातिया पार्टीला 21 जागा मिळाल्या. प्रमुख विरोधी ‘नॅशनल युनिटी फ्रंट’ला तसेच तिची सहयोगी बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टीला अवघ्या सातच जागा मिळाल्या आहेत. शेख हसीना यांनी निवडणूक जिंकल्यापासून बीएनपीच्या नेत्यांची शिकार सुरू केली आहे आणि बीएनपीसोबत असणार्या जमात-ए-इस्लामी संघटनेवर बंदी आणली आहे. सध्या हवामान बदल, दारिदय़, भ्रष्टाचार, म्यानमारमधून स्थलांतरित झालेल्या रोहिंग्या मुसलमानांचा प्रश्नही बांगलादेशला भेडसावत आहे.
शेख हसीनांची गेल्या दशकभर बांगलादेशात राजवट आहे. त्यांच्या आधीच्या बेगम खालिदा झिया यांच्या बांगलादेश नॅशनल पार्टीची दशकभर राजवट होती. त्यांच्याकडून देशाची सूत्रे स्वीकारताना शेख हसीनांच्या हातात काय आले? अत्यंत बजबजपुरी, अनागोंदीने गैरव्यवस्थांचा बाजार झालेला अन् दारिद्र्याच्या छायेतच म्हणावे लागेल अशी स्थिती असलेला देश. जगातील दरिद्री देशांमध्ये पहिल्या पाचात बांगलादेशचा क्रमांक होता. शासकीय स्तरावर काम करण्याची पद्धत म्हणजे भ्रष्टाचार हीच झाली होती. खालिदा झिया यांचे चिरंजीव तारिक रेहमान यांच्या हाती वजन पडल्याशिवाय सरकारी पातळीवरची कुठलीही कामे होतच नव्हती. भ्रष्टाचाराचेही असे केंद्रीकरण करण्यात आले होते. अमेरिकेच्या विकिलिक्स अहवालातही तारिक रेहमान यांच्या या कारनाम्यांचा ठसठशीत उल्लेख आहे.
हे सारे पराकोटीला गेल्यावर अन् खालिदांना विरोध करणाराच कुणी नाही असे वाटत असताना शेख हसीना यांनी त्यांच्या विरोधात मैदान गाठले. एकतर बांगलादेशची जनता खालिदांच्या या भ्रष्टाचारी राजवटीला कंटाळली होती. पर्याय नव्हता, पण तो शेख हसीनांनी दिला. शेख हसीना यांनी ताकदीने अर्थव्यवहारास गती दिली, गुंतवणूक वाढेल असे प्रयत्न केले आणि जागतिक स्तरावर आपल्या देशाच्या प्रतिमा संवर्धनासाठी ठाशीव पावले उचलली. त्याचे फळ म्हणजे बांगलादेशने दरिद्री देशांच्या वर्गवारीतून मध्यम उत्पन्न देशांच्या गटाकडे सुरू केलेला दमदार प्रवास. त्यांचे हे यश नेत्रदीपक आहे.
हसीना यांच्या कार्यकाळात बांगलादेशची प्रगती झाली, मानवी विकास निर्देशांक कसा वाढला हा जगभर कौतुकाचा ठरलेला विषयही मतदारांवर परिणाम घडविणारा होता. मानव्य विकास निर्देशांकात डोळे विस्फारून पाहावे अशी प्रगती बांगलादेशने केली आहे. तीही सतत पाच वर्षे. बांगलादेश हा गरीबांचा म्हणूनच ओळखला जातो. आता तिथे निम्नमध्यमवर्गीय आणि मध्यमवर्गीयांची संख्या लक्षणीय आहे. रोजगार वाढला आहे. कृषी क्षेत्रात प्रगती झाली आहे. त्यामुळे शेतीचे उत्पादन वाढले आहे. वस्त्रनिर्मितीत बांगलादेश आज आघाडीवर आहे. हिंदुस्थानातील अनेक बड्या वस्त्र कंपन्यांना अन् जगातल्या रेडिमेड ब्रॅण्ड्सना बांगलादेशातूनच मदत होते. एकतर स्वस्त आणि कुशल मजूर आणि इतर संसाधनांची उपलब्धता, शेख हसीनांनी केलेली ‘मेक इन बांगला’ची चळवळ यामुळे उद्योग अन् रोजगार वाढला. महिला सक्षमीकरणातही त्या आघाडीवर राहिल्या. कट्टरवाद्यांचे दमन झुगारले अन् बचत गटांच्या माध्यमातून महिला आर्थिक स्वावलंबीदेखील झाल्या.
‘वन बेल्ट वन रोड’ प्रकल्पासाठी बांगलादेशातील चिनी गुंतवणूक 30 अब्ज डॉलर असेल. हिंदुस्थानने साडेचार अब्ज डॉलरची कर्जरूपी मदत बांगलादेशला देऊ केली आहे. मात्र चीनच्या आहारी न जाण्यासाठी हिंदुस्थानशी सख्य टिकवायचे आणि मुस्लिम देश म्हणून सौदी अरेबियाकडूनही मदत घ्यायची असे शेख हसीना यांचे धोरण आहे. चीनकडून दोन पाणबुड्या घेऊ, पण नौदलाचा संयुक्त सराव हिंदुस्थानबरोबर करू असे बांगलादेशचे धोरण आहे. त्यामुळे बांगलादेशात राजकीय स्थैर्य हिंदुस्थानच्या हिताचे आहे.
सरकारी माहितीनुसार हिंदुस्थानात दोन कोटींहून जास्त अवैध बांगलादेशी असावेत. मात्र हा आकडा कमीत कमी चार ते पाच कोटी एवढा मोठा आहे. रजिस्टर ऑफ सिटिझन्सप्रमाणे 40 लाखांहून जास्त बांगलादेशी आसाममध्ये आह्ते. अशाच प्रकारचा शोध ईशान्य हिंदुस्थानच्या इतर राज्यांमध्ये आणि पश्चिम बंगालमध्येसुद्धा केला जावा अशी मागणी आहे. हिंदुस्थानच्या दृष्टीने असे करणे महत्त्वाचे आहे. या व नंतर पकडल्या जाणार्या अवैध बांगलादेशींना बांगलादेशने परत घेतले पाहिजे, एवढेच नव्हे तर यानंतर नवीन घुसखोरी हिंदुस्थानमध्ये होऊ नये. याशिवाय बांगलादेशमध्ये असलेल्या हिंदू नागरिकांच्या जमिनीची चोरी मोठय़ा प्रमाणामध्ये होत आहे. ती थांबली पाहिजे. बांगलादेशमधील हिंदूंवर अत्याचार केले जातात, ते पण थांबले पाहिजेत अशा हिंदुस्थानच्या अनेक मागण्या आहेत. आशा करूया की, बांगलादेशचे नवीन सरकार या मागण्या पूर्ण करून हिंदुस्थान आणि बांगलादेश मैत्री जास्त वाढवील
No comments:
Post a Comment