January 5, 2019, सारंग दर्शने
अमेरिकेचे आजवरच्या इतिहासातील सर्वांत क्रांतिकारी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आता अफगाणिस्तानातून सैन्यमाघारीचा निर्णय घेतल्यामुळे एकाचवेळी भारतात निराशा व संताप, पाकिस्तानात आनंद, चीन आणि रशियात छुपी खुशी आणि खुद्द अफगाणिस्तानात दहशतवाद्यांमध्ये जल्लोष तर सामान्य अफगाणी नागरिकांमध्ये कमालीचा संशय आणि भविष्याची भीती अशा विविध भावनांचा जागतिक कल्लोळ उठला आहे. एकाच निर्णयाने इतकी वादळे निर्माण करण्याचे डोनाल्ड ट्रम्प यांचे कौशल्य वादातीतच म्हणावे लागेल.
अमेरिकेच्या लष्कराने अफगाणिस्तानमध्ये अर्धे सैनिक तातडीने मागे घेण्याचे नियोजन करण्यास याआधीच सुरवात केली आहे, असे अमेरिकेच्याच एका वरिष्ठ सुरक्षा अधिकाऱ्याने आता मान्य केले आहे.
तेथे अमेरिकेचे एकूण चौदा हजार सैनिक आहेत. आणि ते परत जाण्यास काही महिने लागू शकतात. अफगाणिस्तानातून सैन्य माघारी घेण्याचे ट्रम्प यांनी आपल्या मनाशी आधीच ठरवले होते आणि याबाबत त्यांनी आपल्या संरक्षण मंत्र्यांचेही काहीएक ऐकले नाही. त्याचीच परिणती त्यांच्या राजीनाम्यात झाल्याचे जगजाहीरच आहे.
अफगाणिस्तानात नाटो आणि अमेरिकेच्या सैन्यातील माजी जनरल कमांडर जनरल जॉन अॅलन यांनी सांगितले की यापुढे अफगाणिस्तानात एक प्रचंड मोठी पोकळी निर्माण होणार आहे. ही भीती काही व्यर्थ नाही. ती काही काळांतच खरी ठरणार आहे. आधी अफगाणिस्तान रशियाच्या वरवंट्याखाली चिरडला गेला. त्यानंतर, दहशतवाद्यांच्या. त्यानंतर, नाटो फौजांच्या आणि आता पुन्हा एकदा दहशतवाद्यांच्या अमलाखाली सारा देश जाण्याचा धोका दिसतो आहे. आणि याचा परिणाम भारतावरही झाल्यावाचून राहणार नाही.
अमेरिकेचे अफगाणिस्तानात आज सुमारे १४ हजार सैनिक आहेत. यापैकी बहुतेक अफगाणिस्तान सैन्याला प्रशिक्षित करण्यासाठी नाटो मिशनचा भाग म्हणून उपस्थित आहेत..हे सारे कामही यापुढे विस्कळित होणार आहे. आणि त्याची प्रामुख्याने जबाबदारी ट्रम्प यांचीच आहे.
अफगाणिस्तानमधील अमेरिकेच्या उपस्थितीची ट्रम्प यांना फार काळजी वाटते. पण ११ सप्टेंबर २००१ रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यांनंतर ही परिस्थिती आली, हे ते विसरत आहेत. तेव्हा अमेरिकेवर झालेल्या हल्ल्यानंतरच अफगाणिस्तान व पाकिस्तान यांच्यातील सीमावर्ती भागात अमेरिकेचे प्राबल्य वाढले. त्यातूनच पुढे ओसामा बिन लादेन यांचा खात्मा करण्यात आला होता.
खरेतर अमेरिकन सैन्याने आजवर साडेपाच हजारांवर अधिक तालिबान्यांचा तसेच इतर दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. अमेरिकी सैन्याचे जॉइंट चीफ ऑफ स्टाफचे अध्यक्ष जोसेफ डनफोर्ड यांनी सांगितले होते की सैन्य मागे घेण्याचा सल्ला आम्ही दिला नाही, तरीही असा निर्णय घेण्यात आला आहे. असा निर्णय घेतला जाऊ नये, म्हणून सैन्याने काही गुप्त अहवाल दिले. त्यात कडव्या धर्मगुरूंची नवे लढे उभारण्याची तयारी तसेच इतरही धोके नमूद केले होते. पण ट्रम्प यांनी या साऱ्याची काहीच फिकीर केली नाही.
ट्रम्प म्हणतात की अफगाणिस्तानची फेरउभारणी करण्यासाठी आम्ही का खर्च करू? आधी आम्हाला आमचा देश उभा करूदे. पण अफगाणिस्तान प्रश्न हा शीतयुद्धाचा परिपाक आहे, हे ते विसरतात…
थोडक्यात, अफगाणिस्तान भारताला स्वातंत्र्य मिळण्याच्या आधीपासूनच टोळीयुद्धांनी ग्रस्त होता. आणि आज एकविसाव्या शतकाची दोन दशके संपत आली तरी या देशाचे नशीब बदललेले नाही. भारत आणि अफगाणिस्तान यांची आज तुलना करताना दोन्ही देशांचा इतिहास, संस्कृती आणि परंपरा यांचाही तुलनात्मक अभ्यास करण्यासारखा आहे.
त्यातून बरेच काही शिकता येईल…
No comments:
Post a Comment