लोकसंख्येच्या बाबतीत आधीच जगात क्रमांक एकवर असलेल्या चीनमध्ये जवळपास १ दशलक्ष इतकी मुस्लिमांची लोकसंख्या असल्याचे म्हटले जाते. त्यामुळे आगामी काळात ही लोकसंख्या डोईजड ठरू नये म्हणून चीन अतिशय हुशारीने विविध मार्ग अवलंबताना दिसतो.
अगदी प्रारंभीपासूनच चीनच्या बंद दाराआड काय सुरू असते, याचा सहजासहजी कोणालाही सुगावा लागत नाही. म्हणजे, तांत्रिकदृष्ट्या प्रगत अशा चीनमध्ये ना कोणतीही संवदेनशील माहिती बाहेर जाते आणि ना आत येते. गुगलवर तर गेल्या कित्येक वर्षांपासून चीनमध्ये पूर्णत: बंदी. चीनमधील माध्यमेही अशीच बंदिस्त. एका मर्यादित चौकटीत वावरणारी, सरकारविरोधी वृत्तांकनाचा विचारही न करणारी... ‘झिंक्वा’ या एकमेव अधिकृत सरकारी वृत्तसंस्थेच्या माध्यमातून बहुतांशी जगाला चीनमधील घडामोडींचा काय तो कानोसा घेता येतो तेवढेच. पण, सध्या चीनमध्ये कामानिमित्ताने गेलेल्या पाकिस्तानी नागरिकाच्या एका दाव्यामुळे पुरती खळबळ उडाली आहे. आपल्या व्हिसासंबंधीच्या कामासाठी दाखल झालेल्या एका पाकिस्तानी व्यावसायिकाची पत्नी चीनमधून एकाएकी गायब झाली. ‘गायब झाली’ म्हणण्यापेक्षा तिला ‘गायब केले’ गेले. धक्कादायक बाब म्हणजे, यामध्ये कोणत्याही दहशतवादी किंवा चीनमधील गुंडांच्या टोळीचा सहभाग नसून चिनी सरकारचाच हात असल्याचे समोर आले. आता एका पाकिस्तानी नागरिकाच्या चिनी वंशाच्या मुस्लीम पत्नीचा म्हणा चीनला काय धोका... पण, खरी गोम तिथेच आहे. कारण, केवळ त्या एका पाकिस्तानी नागरिकाची पत्नी नाही, तर अशाच २०० मुस्लीम महिलांना चिनी सरकारने ताब्यात घेतल्याची बाब कालांतराने उघडकीस आली आणि एकच गहजब उडाला. याविषयी चिनी सरकारकडे विचारणा केली असता, त्यांनी चक्क या मुस्लीम महिलांना शैक्षणिक केंद्रात हलविण्यात आल्याची सरकारी माहिती दिली. पण, चिनी सरकारने असे नेमके का केले, ते मात्र स्पष्ट करण्यास नकार दिला.
पण, गेल्या काही वर्षांतील चीनमधील शिनजियांग प्रांतातील घटनांवर प्रकाश टाकल्यास चीनच्या करामती स्पष्टपणे अधोरेखित होतात.चीनला मुस्लीम देशांशी व्यापार वाढवायचा असला, त्या देशांमधून बक्कळ पैसे कमवायचे असले तरी मुस्लीमधर्मीय लोकसंख्या आपल्या देशात त्यांना अजूनही खुपते. मग कधी कडक कायदे करून, कधी त्यांच्या मशिदींवर हातोडा चालवून, तर काही वेळेला अशा उघूर मुसलमानांना रातोरात गायब करून चिनी सरकार आपल्या चाली खेळत असते. लोकसंख्येच्या बाबतीत आधीच जगात क्रमांक एकवर असलेल्या चीनमध्ये जवळपास १ दशलक्ष इतकी मुस्लिमांची लोकसंख्या असल्याचे म्हटले जाते. त्यामुळे आगामी काळात ही लोकसंख्या डोईजड ठरू नये म्हणून चीन अतिशय हुशारीने विविध मार्ग अवलंबताना दिसतो. त्यापैकीच एक मार्ग म्हणजे मुस्लीम महिलांना इस्लामपासून परावृत्त करणे. त्यांची इस्लामवरील श्रद्धा संपुष्टात आणून त्यांना निधर्मी बनवण्याकडे चीनचा कल दिसतो आणि अशाच महिलांना शाळेत अथवा शैक्षणिक केंद्राच्या नावाखाली जणू एका तुरुंगातच कैद केले जाते, जिथे त्या जगूच शकणार नाहीत, अशी माहितीही त्या पाकिस्तानी व्यावसायिकाने दिली. एवढेच नाही, दुसऱ्या एका अशाच प्रकरणामध्ये मुस्लीम महिलांना चीनच्या कम्युनिस्ट पक्षाच्या कार्याची माहिती देणारी, त्यांच्या नेत्यांचे गुणगान गाणारी पुस्तकंही वाचनासाठी देण्यात आली. अशा एक-दोन नव्हे, तर शे-दोनशे प्रकरणांनंतर या पाकिस्तानी पुरुषांनी आपल्या पत्नींशी संपर्क साधण्याचे भरपूर प्रयत्नही केले. पण, त्यांना यश आले नाही. पाकिस्तानी सरकार आणि चीनमधील पाकिस्तानी उच्चाधिकारी, दूतावासापर्यंतही हे प्रकरण पोहोचले, पण त्याचा काहीएक उपयोग झाला नाही. कारण, पाकिस्तान-चीनचे संबंध अगदी घनिष्ट मैत्रीचे वगैरे वरकरणी वाटत असले तरी त्याला फक्त आणि फक्त व्यापारी किनार आहे, हे विसरून चालणार नाही. इतकेच काय, तर चीन दौऱ्यानंतरही इमरान खान यांना रिकाम्या हातानेच परतावे लागले होते, यावरून काय तो पाकिस्तानने बोध घ्यावा.
त्यामुळे एरवी जगभरात काहीही मुस्लीमविरोधी कृती झाल्यावर कंठशोष करणारे पाकिस्तान मात्र त्यांच्याच नागरिकांवर इस्लामच्या आधारे होण्याऱ्या या अन्याय-अत्याचाराबाबत मूग गिळून बसले आहे. तेव्हा, इस्लामिक राष्ट्र, पाक भूमी म्हणून जगभर मिरवण्यात धन्यता मानणाऱ्या पाकिस्तानला चीनला या घटनेचा साधा जाब विचारण्याचे तरी भविष्यात धैर्य होईल की नाही, यात शंका आहेच. एकूणच काय तर, हिरव्या झेंड्यापेक्षा लाल झेंडाच मोठा, हाच संदेश चीनने वारंवार आपल्या कृतीतून दिलेला दिसतो.
No comments:
Post a Comment