जॉर्ज, बडोदा डायनामाईट, सुरेश वैद्य आणि दै. देशदूत...
जॉर्ज गेले. आणीबाणी विरोधी आंदोलनाचे एक धगधगते पर्व अस्तंगत झाले. आणीबाणीविरोधात भूमीगत राहून प्रदीर्घकाळ त्यांनी आपल्या साथींसह लढा सुरु ठेवला होता. 'राइट टू रिबेल' संकल्पनेनुसार बडोदा डायनामाईट योजनेची आखणी करीत आणीबाणीला विरोध म्हणून प्रतीकात्मक स्फोट घडविण्याची त्यांची योजना आणि त्यावेळचा हातातील साखळदंड क्रांतीआभूषणासमान मानणारा त्यांचा फोटो अजरामर झाला आहे. या स्फोट कटात जे साथीदार पकडले गेले व ज्यांनी तिहार तुरुंगात त्यांचे समवेत कारावास भोगला त्या यादीवर आपण बारकाईने नजर टाका. नाशिकचे श्री.सुरेश वैद्य हे नाव त्या यादीत दिसेल.
नाशिकच्या पोलीस अधीक्षक कार्यालयात आस्थापना विभागात वरिष्ठ लिपिक पदावर ते कार्यरत होते. मधली होळी, नाशिक परिसरात भाडयाच्या घरात संसार. समाजवादी कार्यकर्ते असल्याने जॉर्ज फर्नांडिस यांचा त्यांच्यावर प्रभाव होता. बडोदा डायनामाइट प्रकरणात जॉर्ज यांचेबरोबर तेही ओढले गेले. अटक, कारावास, सेवेतून बडतर्फी, आर्थिक ओढाताण नंतर दै. देशदूत मध्ये उपसंपादकाची नोकरी असा श्री. सुरेश वैद्य यांचा जीवनप्रवास. दै. देशदूतमध्ये मी त्यांचेबरोबर रात्रपाळीत ३ वर्षे काम केले. रात्री पान १ चे काम आटोपल्यावर ते, सुरेश भटेवरा (महाराष्ट्र टाईम्स), गुरुमित बग्गा, मधुसूदन धुमाळ, आदमभाई, बर्डे, बद्रुद्दिन शेख अशा साऱ्यांचा गप्पांचा फड रंगायचा. जॉर्ज यांचा विषय निघाल्यावर सुरेश वैद्य तिहार तुरुंगातील त्यांचे
समवेतच्या आठवणींचा उजाळा द्यायचे. जॉर्ज यांनी तुरुंगात एक मांजर पाळले होते. सकाळी सर्व राजबंद्यांना दूध वाटप व्हायचे त्यावेळी हे गुबगुबीत मांजर बरोबर जॉर्ज यांच्या मांडीवर येऊन बसायचे. अगोदर जॉर्ज यांचेकडून थोपटून लाड करुन घेतल्यानंतरच ते जॉर्ज यांनी दिलेले दूध प्यायचे. दिवसभर भटकंती करुन बरोबर संध्याकाळच्या जेवणाप्रसंगी हे मांजर जॉर्ज यांच्यासोबत भोजनबैठकीला ही हजर असायचे ! आणीबाणी विरोधातील हा क्रांतीयोध्दा आणि मुंबई बंदचा अनभिषिक्त सम्राट एखादा दिवस मांजर चुकून आलं नाही तर मात्र अस्वस्थ व्हायचा... आणीबाणी उठल्यावर जॉर्जसह कटातील सर्वआरोपी यांचेवरील खटला मागे घेण्यात आला. सर्वांना मुक्त करण्यात आले. त्यावेळी नाशिकच्या वेशीवर श्री. सुरेश वैद्य यांचे जोरदार स्वागत करण्यात आले... कटातील सर्व आरोपींचं वकिलपत्र घेऊन तो खटला कोणतीही फी न घेता लढविणाऱ्या श्रीमती सुषमा स्वराज आणि त्यांच्या वकील पतीराजांबद्दलही श्री.सुरेश वैद्य आदराने भरभरुन बोलायचे...
आणीबाणीनंतरच्या काँग्रेसपराभवानंतर पंतप्रधान मोरारजी देसाई यांचे जनता पक्षाचे सरकार सत्तेवर आले. गृहमंत्रीपदी चौधरी चरणसिंग. न्यायालयाने मुक्त करुनही केंद्रीय गृह विभागाने आवश्यक ती कार्यवाही न केल्याने श्री. सुरेश वैद्य पोलीससेवेत पुन्हा परतू शकले नाहीत... ज्या विचारांचं सरकार सत्तेवर यावं यासाठी हाडाचीकाडं करणाऱ्यांना त्या विचारांचं सरकार सत्तेवर आल्यावर न्याय मिळतोच असं नाही !
टुटेंगे भाई टुटेंगे
जेल के ताले टुटेंगे...
छुटेंगे भाई छुटेंगे
राजबंदी छुटेंगे...
ही त्यावेळची, मी वयवर्ष ५ असतांनाची घोषणा माझ्या आजही स्मरणात आहे कारण आईचा त्यावेळच्या सभा, मोर्चांमधील सहभाग. श्री. कुमार केतकर, म.टा. चे संपादक असतांना त्यांनी 'आणीबाणीची पंचविशी-ढोल, ताशे, नगारे' असा लेख लिहून आणीबाणी अपरिहार्य होती असा आपला आवडता सिध्दांत मांडला होता. त्याचे खंडन करणारे पत्र दै. देशदूत मधून मी जरा त्वेषानेच लिहित म.टा.ला पाठविले. त्यांनी ते जसेच्या तसे छापले. हा बहुधा या वातावरणाचाच प्रभाव.
नाशिक आणि जॉर्ज यांचं नातं फार जवळचं होत. आणीबाणीनंतर १९७८ च्या विधानसभा निवडणुकीत श्री. बापू उपाध्ये जनता पक्षाचे उमेदवार म्हणून निवडून आले. बापूंनाच तिकिट दिले जावे यासाठी जॉर्ज यांनी आपले पूर्ण वजन वापरले होते असे तेव्हा पत्रकारिकेत सक्रिय असलेले श्री. मधुसूदन धुमाळ यांनी मला जॉर्ज यांच्या आठवणी जागवतांना सांगितले. ज्येष्ठ पत्रकार श्री. माधवराव लिमये, कुसुमताई पटवर्धन, बापू व कुसुमताई उपाध्ये, मधुकर तोष्णीवाल, शांताराम चव्हाण (हिंद मजदूर किसान पंचायत), ॲड. दत्ताजी कृष्णाजी कातकाडे, बा.य.परीट गुरुजी अशा नाशिकमधील अनेकांशी जॉर्ज यांचा थेट संपर्क होता. शेतकरी संघटनेच्या आंदोलनांना नाशिक जिल्ह्याने खरी ताकद दिली. पिंपळगाव बसवंत जवळ रेल्वेरुळावर ठिय्या मांडण्यात आला होता. ऊस आणि कांद्याला भाव मिळावा यासाठी हे आंदोलन शेतकरी संघटनेने सुरु केले होते. अंतुले त्यावेळी मुख्यमंत्री होते. रेल्वे वाहतूक ठप्प झाली होती. जे.एफ.रिबेरो रेल्वेचे पोलीस महानिरीक्षक होते. आंदोलन फार उग्र होते. रुळावरुन आंदोलक हटत नव्हते. मी तीन वेळा रेल्वे रुळ मोकळा करण्याचे आवाहन करणारी घोषणा करतो... जर ती ऐकूनही आपण रेल्वेरुळ मोकळा केला नाही तर मात्र मला गोळीबार करावा लागेल असा निर्वाणीचा इशारा त्यांनी दिला. शेतकरी हलले नाहीत. अखेर गोळीबार झाला. जॉर्ज तेव्हा अधिवेशनानिमित्त दिल्लीत होते. ही घटना कळताच ते विमानाने मुंबईत येत दुसऱ्यादिवशी घटनास्थळी हजर झाले. पोलीसांनी अटकाव करताच निफाड जवळ एका पारावर त्यांनी जाहीर सभा घेतलीच ! आंदोलनाला समर्थन देत शेतकऱ्यांवर गोळया चालविणारे हे सरकार म्हणजे ब्रिटिशांचा नवा अवतार आहे का? असा सवाल उपस्थित केल्याचे श्री. मधुसूदन धुमाळ सांगतात.
दोन वर्षापूर्वी सुरेश वैद्य यांचे निधन झाल्याचे वृत्त कानी आले. आज जॉर्ज गेले. आपण गेलात तरी "राइट टू रिबेल" ची आपली प्रेरणागाथा येणाऱ्या पिढयांना दुसऱ्या स्वातंत्र्यलढयाची म्हणजेच आणीबाणी विरोधी आंदोलनाची आठवण देत राहिल.
RIP जॉर्ज... जॉर्ज फर्नांडिस यांना विनम्र श्रध्दांजली...
निलेश मदाने
दिनांक २९ जानेवारी, २०१९
No comments:
Post a Comment