बलुचिस्तानला एका कठोर पोलीस कारवाईने युक्त असा प्रांत करण्यामागे पाकिस्तानचा हा ‘एनर्जी डेफिशियन्सी सिन्ड्रोम’ प्रामुख्याने जबाबदार आहे. आपल्या नैसर्गिक वायूच्या पूर्ततेसाठी पाकिस्तानला बलुचिस्तानमधील प्रत्येक प्रकारच्या विरोधाला संपवायचे आहे आणि हेच त्या देशाच्या बलुचिस्तानविषयक नीतीचे प्रमुख केंद्र आहे.
बलुचिस्तानमध्ये कोळसा, पेट्रोलियम पदार्थ आणि नैसर्गिक वायूंचे प्रचंड साठे आहेत आणि बलुचिस्तानचाच एक मोठा भाग असाही आहे,जिथे खनिजसंपत्तीचे अजूनही सर्वेक्षणच झालेले नाही. अशा परिस्थितीत निरीक्षकांचे म्हणणे आहे की, इथे आगामी काळात पेट्रोलियम पदार्थांचे मोठे साठे शोधले गेले, तर त्यात आश्चर्य वाटण्यासारखे काहीही नसेल. दुसरीकडे सद्यस्थितीतही बलुचिस्तान नैसर्गिक वायू साठे आणि उत्पादनांद्वारे पाकिस्तानच्या ऊर्जाविषयक गरजांमध्ये विशेष महत्त्व राखून आहे. याची तीन प्रमुख कारणे आहेत. त्यातले पहिले कारण म्हणजे नैसर्गिक वायू. पाकिस्तानच्या एकूण ऊर्जावापराच्या जवळपास ५० टक्के वापर हा नैसर्गिक वायूवर आधारित आहे. परिणामी, वर्तमानकाळात नैसर्गिक वायू पाकिस्तानच्या ऊर्जास्त्रोतात महत्त्वाची भूमिका बजावतो. खरे म्हणजे, पाकिस्तानची अर्थव्यवस्था जगातील नैसर्गिक वायूवर अवलंबून असलेल्या सर्वात मोठ्या अर्थव्यवस्थांपैकी एक आहे. आज पाकिस्तानमध्ये विजेचे जवळपास ५० टक्के उत्पादन वायूआधारित संयंत्र व केंद्रांद्वारे होते.
दुसरे कारण म्हणजे, २००६ च्या आकडेवारीनुसार पाकिस्तानकडील नैसर्गिक वायूंचे साठे २८ ट्रिलियन क्युबिक फीट (टीसीएफ) इतके आहेत.ज्यातील सुमारे १९ खर्व घनफूट म्हणजे तब्बल ६८ टक्के साठे केवळ बलुचिस्तानमध्ये एकवटले आहेत. परिणामी, पाकिस्तानच्या ऊर्जास्त्रोत व गरजांच्या परिप्रेक्ष्यात हे एक चिंताजनक तथ्य ठरते. तिसरे कारण म्हणजे, बलुचिस्तान पाकिस्तानच्या नैसर्गिक वायू उत्पादनात २० ते २५ टक्के इतके योगदान देतो. परंतु, त्यापैकी १० ते १५ टक्के नैसर्गिक वायूच फक्त बलुचिस्तानात वापरला जातो आणि त्यामध्येही जवळपास ७०-८० टक्के नैसर्गिक वायू निर्मित ऊर्जा ही बलुचिस्तानातील सिंचन व्यवस्थेसाठीच वापरली जाते. त्यामुळे घरगुती आणि व्यापारी उपयोगासाठीच्या विजेचा खप बलुचिस्तानमध्ये नगण्यच आहे.
पाकिस्तानच्या नैसर्गिक वायूचे उत्पादन सर्वाधिक बलुचिस्तानच्या वायू क्षेत्रातून होते. सुई गॅस फील्ड हे बलुचिस्तान आणि पाकिस्तानमधीलही सर्वात मोठे वायू उत्पादन क्षेत्र आहे. सुई गॅस फील्ड बलुचिस्तानच्या एका अतिसंवेदनशील क्षेत्रात वसलेले आहे, जिथे बुगती जनजातीचा प्रभाव आहे. हे क्षेत्र पाकिस्तान सरकारने घोषित केलेल्या बलुची दहशतवाद प्रभावित क्षेत्राच्या बरोबर मध्ये वसलेले आहे. यावरून हे स्पष्टच होते की, बलुची राष्ट्रवादी शक्ती आपल्या सामरिक स्थितीमुळे नैसर्गिक वायू उद्योगाच्या संचलनात बाधा, अडीअडचणी आणण्यात सर्वथा समर्थ आणि सशक्त असतात. याचे एक उदाहरण पाहूया - राज्याच्या मालकीच्या सुई सदर्न गॅस कंपनीचे एक २७ हजार, ५४२ किलोमीटर लांब पाईपलाईन नेटवर्क आहे, जे सिंध आणि बलुचिस्तानमध्ये पसरलेले आहे. इतक्या मोठ्या क्षेत्रात सातत्याने टेहळणी करणे एक अतिशय कठीण काम आहे. पण, त्याचवेळी बलुची संघटनांना या पाईपलाईन व अन्य उपक्रम-गतिविधींना नुकसान पोहोचणे अधिक सुलभ ठरते.
सन २००२ पासून बलुचिस्तानमध्ये पाकिस्तानविरोधात आंदोलन व चळवळीतून असंतोषाला वाट मोकळी करून देण्यास सुरुवात झाली आणि दहशतवादी घटनांत तीव्रतेने वाढ होताना पाहायला मिळाली. सोबतच दहशतवादी घटनांमध्ये नैसर्गिक वायूविषयक संस्था आणि विशेषत्वाने पाईपलाईन्सच्या विरोधातील हल्ल्यांतही वाढ झाली. बलूच राष्ट्रवादींच्या मते, बलुचिस्तानात चालविण्यात येणारा पाकिस्तानचा घरगुती नैसर्गिक वायू उद्योग भयानक शोषण आणि साधनसंपत्तीच्या लुटीचे प्रतीक आहे. इथे १९५२ मध्ये वायुसाठ्यांचा शोध लागल्यापासून आतापर्यंत त्याचा उपयोग पाकिस्तानच्या वसाहतवादी शासनाच्या हितार्थच केला गेला, तर बलुचिस्तान आणि तिथल्या रहिवाशांच्या हिताकडे पाकिस्तान नेहमीच डोळेझाक करत आला आहे. इथे भरमसाट वेतन दिल्या जाणाऱ्या व्यवस्थापकीय कार्यापासून बलुच नागरिकांना तर संपूर्णपणे दूरच ठेवण्यात आले. याबरोबरच बलुच कामगारांना रोजगार देण्यातही भेदभाव करण्यात आला. प्रबंधकीय आणि तांत्रिक कौशल्य असलेल्या कामगारांबरोबरच साधारण कामगारांनाही बाहेरूनच मागविण्यात आले, तसेच स्थानिक बलुचींकडे सदैव संशयाच्या नजरेने पाहिले गेले. बलुची नागरिक तांत्रिक ज्ञानात मागासलेले आहेत, असा बहाणा नेहमीच केला गेला. पण, सरकारने तांत्रिकदृष्ट्या कुशल बलुची नागरिकांच्या कमतरतेला दूर करण्यासाठी ठोसपणे बलुचिस्तानमध्ये तांत्रिक प्रशिक्षण संस्थांची स्थापना आणि संचालन करण्यात कसलेही गांभीर्य दाखवले नाही.
याव्यतिरिक्त बलुच राष्ट्रवाद्यांच्या असंतोषाचे सर्वात मोठे कारण म्हणजे, वायू उद्योगामुळे होणाऱ्या कमाईत बलुचिस्तानला न्याय्य अधिकार न देणे, हेदेखील आहे. बलुचिस्तान हा पाकिस्तानातील पहिला असा प्रांत आहे, जिथे वायुसाठ्यांचा शोध लावण्यात आला आणि नंतर उत्पादनही घेतले गेले. परंतु, सरकारद्वारे वायुच्या किमतीमध्ये हेराफेरीही करण्यात आली. बाजारभावाच्या निम्म्या दरात वायूची किंमत दाखवून त्याची रॉयल्टी देण्यात त्याच तुलनेत कपातही केली जाते. उल्लेखनीय म्हणजे, बलुचिस्तान, पंजाब आणि सिंधसारख्या वायू उत्पादकांच्या तुलनेत केवळ २० टक्के रॉयल्टी मिळवतो. सोबतच साधनसंपत्तीच्या उपलब्धतेच्या दृष्टीने बलुचिस्तान संपन्न असूनही नेहमीच संसाधनांच्या कमतरेशी झगडतही असतो. नैसर्गिक वायूचा पाकिस्तानातील वार्षिक खप सध्या जवळपास १ ट्रिलियन क्युबिक फीट आहे आणि त्याची मागणीही दिवसेंदिवस वाढत आहे, तर त्याचे साठे मात्र कमी कमी होत आहेत. त्यामुळे जर ही मागणी आयातीद्वारे भागवली गेली, तर खर्च वाढेल. म्हणजेच आयातीतून पुरवठा वाढला तरी पाकिस्तानच्या राजकोषाला-तिजोरीला मोठा हानी पोहोचू शकते.
बलुचिस्तानला एका कठोर पोलीस कारवाईने युक्त असा प्रांत करण्यामागे पाकिस्तानचा हा ‘एनर्जी डेफिशियन्सी सिन्ड्रोम’ प्रामुख्याने जबाबदार आहे. आपल्या नैसर्गिक वायूच्या पूर्ततेसाठी पाकिस्तानला बलुचिस्तानमधील प्रत्येक प्रकारच्या विरोधाला संपवायचे आहे आणि हेच त्या देशाच्या बलुचिस्तानविषयक नीतीचे प्रमुख केंद्र आहे. यासाठीच पाकिस्तान इथे बलुच राष्ट्रवाद्यांच्या आंदोलनाला तुडवून वा त्यांच्याबरोबर एखादा राजकीय सौदा करून आपला मार्ग प्रशस्त करण्याची मनिषा बाळगतो. पाकिस्तान चीनबरोबर ‘सीपेक’ प्रकल्पाद्वारे सर्वाधिक गुंतवणूक ऊर्जेच्या उत्पादनातच करत आहे, सोबतच ग्वादरमध्ये चीनचा नाविक तळ उभारला गेल्याने चीन आणि पाकिस्तानच्या संयुक्त लष्करी प्रयत्नांनी बलुची विद्रोह आणि उपद्रवाला सुलभतेने शांत केले जाऊ शकते, अशी पाकिस्तानला ‘सीपेक’ प्रकल्पामधून आशा आहे. सध्या या लष्करी दहशतीचे मुख्यालय क्वेटामध्ये पाकिस्तानी लष्कराच्या १२ व्या कोअरद्वारे संचालित केले जाते. हे स्पष्टच दिसते की, जोपर्यंत बलुचिस्तान पाकिस्तानमधून फुटून निघत नाही किंवा बलुचिस्तानमधील नैसर्गिक वायूंचे साठे संपत नाहीत, तोपर्यंत हा प्रांत इस्लामाबाद आणि बलुच राष्ट्रवाद्यांमधील वादाचा केंद्रबिंदू बनून राहीलच.
-
No comments:
Post a Comment