इशरत जहाँवर
जेव्हा गुजरात पोलिसांनी कारवाई केली, त्यावेळीही
ठाणे-मुंब्रा वगैरे परिसरातील नेत्यांना भयंकर दुःख झाले होते. त्यांनी तिच्या
कुटुंबीयांना मदत वगैरे केली होती. हे सगळं आठवण्याचं कारण माओवादी समर्थक म्हणून
ठाण्याच्या अरुण परेराला पोलिसांनी घरातच स्थानबद्ध केल्यानंतर, जितेंद्र आव्हाड परेराला भेटण्यासाठी इतक्या उतावीळपणे गेले की, जणू परेराने स्वातंत्र्यलढा देत देश आणि समाजासाठी मोठा त्याग केला आहे. पण
परेरावर कोणत्या गुन्ह्यासाठी कारवाई झाली हे आव्हाडांनी नेता म्हणून सोडा भारतीय
नागरिक म्हणून तरी लक्षात घ्यायला हवे होते. परेरांना गुन्हेगार न्यायसंस्था
ठरवणार, तुम्ही निष्कर्ष काढणारे कोण? तर
मुद्दा असा आहे की, परेरावर २००७ आणि २०११ सालीही अशीच
कारवाई झाली होती. पोलिसांनी तब्बल ११ गुन्हे त्याच्या नावावर नोंदवले होते. सबळ
पुराव्यांअभावी त्याला दोषी ठरवता आले नाही, ही गोष्ट वेगळी.
दोन वेळा कायदेशीर शिक्षा होण्यापासून वाचलेल्या परेरांच्या या पार्श्वभूमीविषयी
आव्हाड अनभिज्ञ आहेत का? कारण परेरावर जी काही कारवाई होत
आहे किंवा होईल ती संवैधानिकच असेल. या संवैधानिकतेवर आव्हाडांचा विश्वास नाही काय?
संविधानानुसार असलेल्या लोकशाहीला, कायदा-सुव्यवस्थेला,
देशाच्या सार्वभौमत्वाला खिळखिळे करण्याच्या कारवायांमध्ये माओवादी
गुंतले आहेत. अशा संविधानविरोधी, देशविरोधी कारावाया करणाऱ्या
माओवादी समर्थकांबद्दल आव्हाडांना इतकी सहानुभूती, आपलेपणा
का?
“भारत तेरे
तुकडे होंगे हजार” म्हणणारे थोडे का होईना पण या देशातच
राहणारे आणि सर्व सुविधा उपभोगणारे विद्यार्थी, अफजल गुरू
किंवा याकूब मेमन यांना देशाच्या संवैधानिक कारवाईमध्ये दिल्या गेलेल्या सजेला
नाकारणारे किंबहुना या दोघांच्या देशविघातक कृत्याला कळत नकळत समर्थन करत खऱ्या
अर्थाने अराजकता माजवणारे विद्यार्थी. हे विद्यार्थी कुठून येतात? त्यांच्यात अशी फुटीरतावादी भूमिका कुठून निर्माण होते? मुळात त्यांच्या रक्तात आणि जन्मातही भारतीयत्व असूनही देशाबद्दल, समाजाबद्दल त्यांच्यात इतकी अनास्था दुरावा का निर्माण होतो? याचे उत्तर ३१ ऑगस्ट रोजी मिळाले. अतिरिक्त पोलीस महासंचालक परमवीर सिंग यांनी
माओवादी समर्थकांवर झालेल्या कारवाईबद्दल ३१ ऑगस्ट रोजी पत्रकार परिषद घेतली.
त्यामध्ये अनेक खुलासे झाले. त्यापैकी एक कॉ. प्रकाशने कॉ. सुरेंद्रला ई-मेल
पाठवला होता. या ई-मेलमध्ये म्हटले होते की, “तुम्हाला २ लाख
रुपये देण्यात आले होते. या पैशांचा वापर देशभरात सरकारविरोधी आंदोलनासाठी करावा.
या आंदोलनात विद्यार्थी संघटनांची मदत घ्यावी. पोलीस विद्यार्थ्यांवर बळाचा वापर
करू शकणार नाहीत.” या विषयावर प्रसारमाध्यमांत चर्चा रंगल्या
आणि रंगतील. मात्र, ही सगळी रंगवारंगवी सुरू असताना माओवादी
हिंस्त्र कारवायांत बळी पडलेले निष्पाप लोक, माओवाद्यांच्या
क्रूर हल्ल्यात बेचिराख झालेली गावेच्या गावे विसरून चालणार नाही? सर्वात मुख्य तर एकवेळ उपाशी राहू पण पोटच्या पोरांना शिकवू, अशी जिवापाड इच्छा असणाऱ्या कोट्यवधी कष्टकरी आईबापांचे आणि त्यांच्या
विद्यार्थी पाल्यांबाबत या माओवादी समर्थकांचे विचार किती वस्तूवादी आणि स्वार्थी
आहेत हे विसरूनही चालणारच नाही. विद्यार्थ्यांचा वापर पद्धतशीरपणे गिनीपिग म्हणून
करताना माओवादी किंवा माओवादी समर्थक सहजपणे पुरोगामित्व, मानव
हक्काचे कार्यकर्ते, वंचित शोषितांचे रक्षणकर्ते असे मुखवटे
वापरत आहेत, हेही उघड होत आहे. डॉ. बाबासाहेब
आंबेडकरांसारख्या द्रष्ट्या राष्ट्रपुरुषाने या लाल मुखवट्यामागचा खरा विघातक
चेहरा ओळखला होता. त्यांनी नाकारलेल्या या विचारधारेला समाजाने कणभरही स्वीकारू
नये, यातच देशाचे आणि समाजाचे हित आहे.
No comments:
Post a Comment