कळकट-मळकट चेहऱ्याच्या, फाटके कपडे घातलेल्या, दाढी-केस वाढविलेल्या, स्वत:शीच बडबडत असलेल्या अनेक व्यक्ती रस्त्यांच्या आजूबाजूला
अथवा कचऱ्याच्या ढिगाऱ्यात असलेल्या आपण पाहत असतो. 'वेडा माणूस'
असे म्हणून
आपण त्याच्याकडे कानाडोळा करतो आणि आपल्या कामाला निघून जातो. पण अशी एक 'वेडी' व्यक्ती आहे, जिने डॉ. बाबा आमटे यांच्याकडून प्रेरणा घेऊन रस्त्यांवर
भटकणाऱ्या या मनोरुग्णांना आपले मानले, त्यांच्यावर उपचार केले आणि त्यांना स्वघरी पाठविले.
हा
ध्येयवेडा माणूस म्हणजेच रेमन-मॅगसेसे पुरस्कार जाहीर झालेले डॉ. भरत वटवानी. डॉ.
वटवानी हे मूळचे कोलकत्याचे. वडिलांसोबत ते मुंबईत आले आणि एमबीबीएस होऊन त्यांनी
मनोविकार शास्त्रातील पदव्युत्तर शिक्षण घेतले. समाजाने नाकारलेल्या या
मनोरुग्णांना त्यांनी आपले मानले. पेशाने मानसोपचारतज्ज्ञ आणि समाजसेवेची आवड
असल्याने त्यांनी आजघडीला जवळपास 4084 मनोरुग्णांना बरे केले आहे.
त्यासाठी त्यांनी मनोरुग्णांच्या
पुनर्वसनासाठी कर्जत स्थानकापासून दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या वेनगाव येथे 2004
साली 'श्रध्दा पुनर्वसन केंद्राची' उभारणीदेखील केली. डॉ. प्रकाश आमटे यांच्या हस्ते या केंद्राचे
उद्घाटन करण्यात आले.
1989मध्ये डॉ. भरत वटवानी आणि त्यांच्या
पत्नी डॉ. स्मिता वटवानी यांना एक माणूस रस्त्यावर गटारातील पाणी पीत असल्याचे
दिसले. हे दृश्य पाहून आपल्यासारख्या 'सुशिक्षित' माणसाला नक्कीच किळस वाटली असती.
मात्र हे दांपत्य स्वत: मानसोपचारतज्ज्ञ असल्याने त्यांच्या लक्षात आले की हा
स्किझोफ्रेनियाचा रुग्ण आहे. त्यामुळे ते त्याच्या जवळ गेले आणि त्याला आपल्या
रुग्णालयात घेऊन आले. त्याच्यावर दोन महिने उपचार केले आणि त्याला त्याच्या घरी पोहोचविले.
स्किझोफ्रेनियाचा रुग्ण म्हणजे काय? तर वैद्यकीय भाषेत मनोरुग्णाला स्किोझोफ्रेनियो पेशंट असे
संबोधले जाते. ज्या रोगामध्ये विचार, भावना व कृती यामध्ये फरक पडत जातो, असा हा मानसिक रोग आहे.
हल्लीच्या धावपळीच्या जगात चांगल्या
माणसांशी बोलायला आपल्याकडे वेळ नसतो, त्यात अशा मनोरुग्णांशी कोण संवाद साधेल? पण डॉ. वटवानी दांपत्याने आपल्यातील माणुसकी जिवंत ठेवून
त्यांच्याशी संवाद साधला आणि त्यांच्या पुनर्वसनाचा विडा उचलला.
मुंबई, आंध्र प्रदेश,
बिहार, झारखंड, गुजरात, आसाम, काश्मीर, पश्चिम बंगाल,
उत्तर प्रदेश, हरियाणा, छत्तीसगड, पंजाब, केरळ, तामिळनाडू, ओरिसा, राजस्थान, कर्नाटक अशा देशातील सर्व भागांतून आलेल्या मनोरुग्णांवर
श्रध्दा पुनर्वसन केंद्रात उपचार करण्यात आले आहेत. वटवानी दांपत्यांची ही
समाजसेवा केवळ देशापुरतीच मर्यादित राहिली नाही, तर सातासमुद्रापारही ते पोहोचले आहेत. त्यांनी इराणच्या एका
मनोरुग्णावर उपचार करून त्याला सुखरूप घरी पाठविले आहे. ''ही आमची पहिली आंतरराष्ट्रीय केस'' असे डॉ. स्मिता वटवानी अभिमानाने सांगतात.
आपण
कुठून आलो आहोत, कुठे जायचे होते, आपले नाव, पत्ता या रुग्णांना काहीच आठवत
नसते. महिनोनमहिने रस्त्यावरच राहत असल्याने, आंघोळ नसल्याने संपूर्ण शरीराला दुर्गंधी येत असते. मिळेल ते
खात असल्याने पोट खपाटीला गेलेले असते. अशा मनोरुग्णांना उचलून, गाडीत घालून श्रध्दा पुनर्वसन केंद्रात आणले जाते. त्यांना
आंघोळ घातली जाते. केसांच्या जटा कापल्या जातात, त्यांना पोटभर खायला दिले जाते आणि मग त्यांच्यावर समुपदेशन
करून उपचार केले जातात. यांची माहिती काढणे सहजासहजी सोपे काम नसते. कधीकधी काही
रुग्ण रागाच्याभरात कार्यकर्त्यांवर हल्लाही करतात, पण नंतर हळूहळू स्वत:ची माहिती सांगू लागतात. हे सर्व वाचायला
किंवा ऐकायला खूप चांगले वाटते,
पण
प्रत्यक्ष कृतीत आणण्यासाठी 'हे काही येऱ्यागबाळयाचे काम नव्हे'. त्यासाठी मानवतेविषयी प्रचंड आस्था असावी लागते. वटवानी
दांपत्यांकडे ती ओतप्रोत भरलेली आहे.
आंध्र
प्रदेशची रेवलम्मा नावाची 35 वर्षांची मुलगी. मोठमोठयाने हसायची, स्वत:शीच काहीतरी पुटपुटायची. अंगात मळकट कपडे, केस वाढलेल्या अवस्थेत तिला मुंबईच्या रस्त्यावरून श्रध्दा
पुनर्वसन केंद्रात आणले गेले. तिथे सहा आठवडे तिच्यावर उपचार केले गेले. त्यानंतर
हैदराबादपासून 200 किलोमीटर अंतरावर असलेल्या एका गावात ती राहत असल्याचे तिने डॉक्टरांना
सांगितले. डॉ. वटवानी आणि डॉ. स्मिता वटवानी यांनी तिला तिच्या घरी नेले. चार
वर्षांनंतर आपली मुलगी परत सुखरूप आल्याचे पाहून तिच्या आई-वडिलांना आणि गावातील
लोकांनाही अश्रू अनावर झाले.
डॉ.
भरत वटवानी यांनी रेवलम्मासारख्या अनेकांचे पुनर्वसन केले आहे. मात्र पुरुषांच्या
तुलनेत महिलांना परिवारातील एक घटक म्हणून पुन्हा स्वीकार करण्याचे प्रमाण नगण्य
असल्याचे डॉ. वटवानी सांगतात. अशा महिलांना सामाजिक संस्थांचा आधार घ्यावा लागतो, तर काही महिला येथे इतर मनोरुग्णांच्या सेवेत आपले आयुष्य खर्च
करतात.
येथे मनोरुग्णांना सामान्य माणसांप्रमाणे
जीवन जगता यावे यासाठी कुक्कुटपालन, शेती व दुग्धव्यवसाय आदींचे प्रशिक्षण दिले जाते. तसेच पंधरा
ऑगस्ट, गणेशोत्सव, गोपाळकाला, होळी हे सर्व उत्सव आनंदाने साजरे
केले जातात. विविध प्रांतांतील रुग्णांची भाषा समजून घेण्यासाठी या केंद्रावर
वेगवेगळया भाषांतील समाजसेवक कार्यरत आहेत. रुग्ण बरा झाला की त्यांना त्यांच्या
घरी घेऊन जाण्याचे कामही त्यांच्या माध्यमातूनच केले जाते. डॉ. वटवानी सांगतात, ''या आजाराने ग्रासलेल्या रुग्णांची संख्या मोठी आहे, त्या मानाने डॉक्टरांची संख्या कमी आहे, ती वाढली पाहिजे.''
शहरी भागातील लोकांचा मनोरुग्णांकडे
बघण्याचा दृष्टीकोन बदलला पाहिजे. तोदेखील एक माणूस आहे, हे लक्षात घेतले पाहिजे. मधुमेह, कर्करोग हे जसे आजार आहेत तसाच स्किझोफ्रेनिया हादेखील एक आजार
आहे, आणि योग्य उपचाराअंती तो बरा होऊ
शकतो. याविषयी मोठया प्रमाणावर जनजागृती झाली पाहिजे.मुलाखतीचा समारोप करताना डॉ.
वटवानी म्हणाले, ''अशा मनोरुग्णांविषयी नुसता कळवळा
उपयोगाचा नसतो, तर त्यांच्या मदतीसाठी समाजातील
लाखो हात पुढे सरसावले पाहिजेत. हे कोण्या एकटयाचे काम नाही, तर समाजातील प्रत्येकाची ही जबाबदारी आहे. समाजसेवा ही काही
जबरदस्तीने होणारी नसते, ती मनापासूनच व्हावी लागते. ज्या
दिवशी समाजात हा बदल जाणवेल, त्या दिवशी या पुरस्काराचे खऱ्या
अर्थाने सार्थक होईल.''
No comments:
Post a Comment