खासगी वाहतूक सेवादार प्रवासी दरात मनमानी पद्धतीने भाडेवाढ करून प्रवाशांची लूट करतात तेव्हा बहुसंख्य प्रवासी हक्काने ‘लाल डब्या’कडेच वळतात. ज्येष्ठ नागरिकांना प्रवासी भाड्यात सवलत असल्याने ती मंडळी आतुरतेने याच सेवेचा लाभ घेणे पसंत करत असतात. सार्वजनिक वाहतूक सेवेत मोलाची सेवा देणार्या एसटीची नासधूस करणे खटकणारे आहे.
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ म्हणजेच ‘एसटी’ महाराष्ट्रात सर्वांच्याच जिव्हाळ्याची आहे. राज्याच्या ग्रामीण, दुर्गम भागांतील नागरिकांना या सार्वजनिक परिवहन सेवेचा कायमच विशेष आधार वाटत आला आहे. जेथे खासगी वाहतूकदार जाण्यास टाळाटाळ करतात तेथे एसटीची सेवा पोहचत असते. किंबहुना पोहोचण्याचा प्रयत्न असतोच असतो अशी ही सार्वजनिक परिवहन सेवा विशेषतः ग्रामीण भागातील परिवहन क्षेत्राचा कणाच आहे. मात्र जेव्हा राज्यात हिंसक मार्गाने आंदोलने होतात, बंद पुकारले जातात, मोर्चे निघतात तेव्हा सामान्य नागरिकांचा आधारवड असलेल्या या सार्वजनिक सेवेला हमखास लक्ष केले जाते.
सार्वजनिक वाहतूक सेवेत मोलाची सेवा देणार्या एसटीची नासधूस करणे खटकणारे आहे. हिंदुस्थान हा प्रगत देशांप्रमाणे श्रीमंत देश नाही. त्या देशांत बहुतांश नागरिकांकडे चारचाकी असते आणि त्याचा उपयोग ते प्रतिदिन करत असतात. येथे मात्र असे चित्र लोकसंख्या, आर्थिक असमतोल यांमुळे त्यांच्या तुलनेत नगण्य आहे. त्यामुळे प्रवासी सेवा देण्याचा अधिक भार आपसूकच सार्वजनिक वाहतूक सेवेवरच येतो. ज्या गोष्टीवर सर्वाधिक भार आहे त्याचीच हानी होत आहे. हे वास्तव राज्याच्या सार्वजनिक वाहतूक सेवेची चिंता वाढवणारे आहे. विशेष म्हणजे हिंसक घटनांत सहभागी असलेलेही परिस्थिती सामान्य झाल्यावर एसटीच्या सेवेचाच उपयोग करतात. मात्र सार्वजनिक सेवा देणार्या महत्त्वपूर्ण साधनाची हानी झाल्याने प्रवाशांची वाहतूकविषयक कुचंबणा होतेच. तसेच भविष्यात तिकीट दरवाढीचा भारही सोसावा लागतो. इंधन दरवाढ, कर्मचार्यांचे वेतन आदी गोष्टींमुळेही तिकीट दरवाढ अनिवार्य होते. मात्र हिंसक घटनांतून होणारी हानी भरून बाहेर काढणे अशक्य झाले आहे. या सेवेचे तिकीट जेवढे कमी असेल तेवढे चांगले असे प्रवासी कायम म्हणत असतात, मात्र त्यांची ही अपेक्षापूर्ती वास्तवात उतरणे अशक्यप्राय झाले आहे.
गणेशोत्सव, आषाढी एकादशी, विभागीय जत्रा आदी वेळेस महामंडळाकडून जादा बसगाड्या प्रवाशांच्या सेवेत रुजू करण्यात येत असतात. त्यासाठी राज्याच्या विविध आगारांतून बसगाड्या त्या त्या ठिकाणी दाखल होऊन सेवा देत असतात. अर्थातच हे नियोजन व्यापक स्तरावर होत असते. हिंसक घटनांतून बसगाड्यांची हानी होत राहिल्यास प्रवाशांना अतिरिक्त बससेवा देण्यासाठी बसेस कुठून आणायच्या? खासगी वाहतूक सेवादार प्रवासी दरात मनमानी पद्धतीने भाडेवाढ करून प्रवाशांची लूट करतात तेव्हा बहुसंख्य प्रवासी हक्काने ‘लाल डब्या’कडेच वळतात. ज्येष्ठ नागरिकांना प्रवासी भाड्यात सवलत असल्याने ती मंडळी आतुरतेने याच सेवेचा लाभ घेणे पसंत करत असतात. प्रवासास निघाल्यावर ज्या मार्गाने एसटीची बस जाते तोच मार्ग निवडण्याकडे त्यांचा कल असतो. यासाठी त्या प्रवासी मार्गावर ती मंडळी एसटी बस केव्हा येणार याकडे डोळे लावून बसलेली असतात. एसटीची बससेवा ज्येष्ठ नागरिकांसाठी ‘प्रवासातील काठी’च आहे. त्या काठीचीच नासधूस करण्यास धजावले तरी कसे जाते? उतारवयात दुचाकीला किक मारून दूरचा प्रवास करणे शक्य नसते. दुचाकीला किक मारण्याचेही त्राण कित्येक ज्येष्ठ मंडळींत नसते. अशा स्थितीत हक्काच्या ‘ज्येष्ठ नागरिक’ आसनावर बसून चालकाच्या खांद्यावर इच्छित थांब्यावर उतरण्याची जबाबदारी सोपवून निर्धास्तपणे प्रवास केला जातो. एसटी बसने प्रवास होत असल्याने त्यांच्या घरची मंडळीही निर्धास्त असतात. कारण सुखरूपपणे प्रवास होणार याची निश्चिती असते. एसटी या घटकाशी किती अव्यक्त बारकावे जोडले गेले आहेत हे लक्षात येते.
राज्यातील मोठ्या शहरांत मेट्रोचे वारे वाहात आहेत. सदर प्रकल्प कार्यान्वित झाल्यावर तेथील नागरिक त्या सार्वजनिक प्रवासी सेवेचा लाभ घेतीलच. मात्र अन्य शहरे, ग्रामीण भागासाठी एसटी हीच मेट्रोसारखी आहे.
एसटीच्या बसगाड्या ग्रामीण महाराष्ट्रातील वाहतूक सेवेसाठी आशेचे स्थान आहेत. यासाठी ग्रामीण भाग म्हणजे काय आणि तेथील दैनंदिन जीवनशैली आदी सर्व मुद्दे मनापासून अभ्यासणे आवश्यक आहे. वाहतुकीची सुविधा उपलब्ध न झाल्यावर रणरणत्या उन्हात हातात गाठोडी (सामान) घेऊन पायपीट कशी करावी लागते, याची कळ काय असते, हे आठवडा बाजारात जाण्यासाठी आणि तिथून घरी परतण्यासाठी एसटीच्या बसची प्रतीक्षा करणार्या छोटय़ा विक्रेत्यांना कधी विचारले आहे का? आपल्याकडून कोणाचे हित साधले जाणार नसेल तर कोणाचे अहित करण्याचे दुष्कर्म तरी करू नये.
एसटीची हानी करण्यासाठी आंदोलन, बंद आणि मोर्चा यांच्या वेळी बहुसंख्येने जमाव असतो. मात्र हानी झालेल्या बसगाड्यांची दुरुस्ती करण्यासाठी यांपैकी कुणीही नसते. दुरुस्तीतील सहभाग वाढवण्यासाठी आणि आपण तोडफोड, जाळपोळ केलेल्या गोष्टी जोडणे किती कठीण आहे हे समजण्यासाठी हानीकर्त्यांकडूनच महामंडळाच्या वर्कशॉपमधून शिक्षा म्हणून विनामूल्यपणे काम का करून घेऊ नये? त्यांच्यावरील गुन्हे मागे घेऊन एसटी बसगाड्यांच्या हानीचा प्रश्न सुटणार नाही.
No comments:
Post a Comment