सई येथे मानवी तस्करी करणाऱ्या बांगलादेशी नागरिकाला अटक झाली आहे. बांगलादेशातील ५०० मुलींना नोकरीचे आमिष दाखवून त्याने इथे भारतात विकले आहे. हो, गुराढोरांसारखे विकले आहे. ५०० मुली वेश्याव्यवसायात ढकलल्या गेल्या. उफ्.. या मुली, त्यांचे मन, त्यांच्या भावना त्यांनी पाहिलेले उज्ज्वल भविष्याचे स्वप्न, सारे सारे कुस्करले गेले असेल त्यांच्या देहासारखे क्षणोक्षणी बळजबरीने. गरिबी आणि त्यातून आलेली लाचारी, जगण्याचा संघर्ष नव्हे पोटाची खळगी भरण्यासाठी केलेली तडजोड.. पण या गोष्टीला तडजोड तरी कसे म्हणावे?बांगलादेशातून बाहेर पडणाऱ्या या मुलींना कुठे माहिती होते की, त्यांना या दलदलीत जायचे आहे. त्यांना वाटले असेल नोकरी मिळेल,पगार मिळेल, पैसे मिळतील. जगणे त्यातल्या त्यात सोपे होईल पण त्यांच्या या इच्छेसाठी त्यांना भयंकर किंमत मोजावी लागली. या मुलींच्या आयुष्याचा नरक बनविणाऱ्या नराधमाला वसई येथून अटक झाली आहे. तो म्हणे, वसई, डोंबिवली-कल्याण वगैरे भागांतल्या उच्चभ्रू वस्तीत राहत असे. इतके समाजद्रोहीच नव्हे तर मानवतेला कलंक लावणारे कृत्य करणारा हा नीच माणूस राजरोसपणे चांगल्या पांढरपेशा वस्तीत राहायचा, पण तो कोण आहे? तो काय करतो, याची माहिती कुणाला नव्हती. मी भले, माझे घर भले. माझे जग घराच्या बंद दाराआडचे, ही मानसिकता समाजात वसलेली. त्यामुळेच तो आपले काळे कृत्य आरामात करत राहिला. असो तो पकडला गेला हे पण काही कमी नाही. या अनुषंगाने मुस्लीम राष्ट्र म्हणून घोषित केलेल्या बांगलादेशाचे सामाजिक वास्तव आणि तिथल्या मुलीबाळींचे जगणे डोळ्यासमोर आल्याशिवाय राहत नाही. अर्थात हे फक्त बांगलादेशातच आहे असे नाही. आपल्या मुंबईतल्या देहविक्रीसाठी प्रसिद्ध असलेल्या भागात एक चक्कर टाकली तर तिथेही यापेक्षा वेगळे दृश्य नाही. इथेही फसवून, बळजबरीने किंवा स्वतः आईबापाने, नवऱ्याने विकलेल्या मुली बाजारात उभ्या असतात. पण खरे पाहिले तर तिथे त्या स्त्रिया विकायला उभ्या नसतात तर विकायला उभी असते नागरी समाजाची संवेदनशीलता, संस्कृतीच्या सभ्यतेची माणुसकी. स्त्रीला विकणारे आणि विकत घेणारे लोक. ते त्या विकल्या गेलेल्या स्त्रीचेच गुन्हेगार नाहीत तर संपूर्ण समाजाचे गुन्हेगार आहेत. मानवतेचे शत्रू आहेत.
No comments:
Post a Comment