आपल्या शेजारचे दोन मोठे देश-पाकिस्तान आणि चीन- भारताविरुद्ध मोठे कारस्थान करीत आहेत. या दोन देशांमध्ये झालेली युती ही अभद्र आहे. सर्व दिशांनी भारताला घेरण्यासाठी या दोन्ही देशांचे प्रयत्न सुरू आहेत. आशियात भारताचे वर्चस्व स्थापित होऊ नये, यासाठी हे दोन देश परस्परांना सहकार्य करीत आहेत. पाकिस्तानने काश्मीरचा भाग बळकावला आहे, तर चीनने अरुणाचल प्रदेशचा. या दोन्ही देशांचे कारस्थान मोडून काढण्यासाठी भारताला झपाट्याने पावलं उचलावी लागणार आहेत. स्वत:ची राष्ट्रीय सुरक्षा आणि ऊर्जेसंबंधीची स्थिती मजबूत केल्याशिवाय भारत विश्वशक्तीही बनू शकणार नाही आणि दक्षिण आशियात शांतता प्रस्थापित करण्यातही यशस्वी होऊ शकणार नाही. भारताच्या सुरक्षेला चीन आणि पाकिस्तान या दोन्ही देशांपासून धोका आहे. चीनने तर नेपाळलाही आपल्या बाजूने वळविण्याचे प्रयत्न चालविले आहेत.
चीन-पाकिस्तानने केवळ भारताचा भूभागच बळकावला आहे असे नव्हे, तर बळकावलेल्या भागांचे आदानप्रदानही त्यांनी सुरू केले आहे. शिवाय, भारत सुरक्षेच्या दृष्टीने आज ज्या आव्हानांचा मुकाबला करीत आहे, ते लक्षात घेता चीन आणि पाकिस्तान यांच्यातील अभद्र युतीकडे दुर्लक्ष करूनही चालणार नाही. चीनमध्ये आज हुकूमशाही असल्यासारखीच आहे. तिथे लोकशाही नाही. त्यामुळे चीनमध्ये जोपर्यंत लोकशाहीमूल्यांची स्थापना होत नाही आणि मूलभूत हक्कांपासून वंचित ठेवणार्या हुकूमशाहीला मुळासकट उखडून फेकले जात नाही, तोपर्यंत दक्षिण आशियात शांतता नांदू शकणार नाही. पाकिस्तानने अण्वस्त्रप्रसार चालविला आहे आणि चीन साम्राज्यवादी वृत्तीचा असल्याने समस्या अधिकच गंभीर बनत चालली आहे. पाकिस्तानी सैन्याची वर्तणूक लक्षात घेतली, तर ‘अतिरेक्यांचा एक मोठा गट’ असेच वर्णन करावे लागेल! आपली अमर्याद सत्ता कायम राखण्यासाठी पाकिस्तानी सैन्य कोणत्याही थराला जायला तयार असते. पाकिस्तानी सैन्याने अफगाणिस्तानात जे अत्याचार केलेत ते जगजाहीर आहेत. शिवाय, 70 च्या दशकात पाकिस्तानी सैन्याने बंगाल्यांवर जे अनन्वित अत्याचार केलेत ते क्रूर या प्रकारात मोडणारेच होते.
सध्या कथित चीन-पाकिस्तान आर्थिक कॉरिडॉरच्या नावाखाली बलुचिस्तानमधील लोकांवरही पाकिस्तानकडून अत्याचार केले जात आहेत. बलुचिस्तानमधील सोने, तेल आणि गॅसवर डल्ला मारण्यासाठी पाकिस्तानकडून ग्वादर प्रांतात बंदर उभारले जात आहे आणि तिथल्या भूभागावर रस्ते तयार केले जात आहेत, रेल्वेमार्ग तयार केला जात आहे, तसेच पाईपलाईन टाकल्या जात आहेत. या कथित ग्वादर मेगा प्रोजेक्टच्या नावावर बलुचिस्तानमध्ये दोन देशांमधील 10 कोटी लोकांना वसविण्याचा पाकिस्तान-चीनचा कट आहे. पाकिस्तानने कब्जा केलेल्या बलुचिस्तानात मूळ बलुची लोकांची संख्या फक्त दोन कोटी आहे. त्यांचाच प्रांत असलेल्या बलुचिस्तानातून मूळ बलुची लोकांना हुसकावून लावण्याची पाकिस्तानी सैन्याची योजना आहे. अतिशय सुनियोजित पद्धतीने पाकिस्तानी सैन्य बलुचींना हुसकावून लावत आहे. असेच सुरू राहिले तर आपल्या काश्मीरमधून जसे सगळे पंडित विस्थापित झाले, तसेच सगळे बलुची लोक बलुचिस्तानातून लवकरच विस्थापित होतील, अशी भीती आहे. चीनची मर्जी सांभाळण्यासाठी पाकिस्तान चीनला बंदर तयार करू देत आहे आणि बळकावलेला बलुचिस्तान प्रांतही देण्याची योजना आहे. आपले हे कृत्य बिनबोभाट करता यावे, यासाठी पाकिस्तानी सैन्याकडून जी कारवाई केली जात आहे, त्यात आतापर्यंत लाखो बलुची लोकांवर अत्याचार झाले आहेत. काहींची हत्या झाली, काही महिलांवर बलात्कार झाले, काहींचे अपहरण झाले. पाकिस्तानी सैन्याकडून होत असलेल्या अनन्वित अत्याचाराला बलुची लोक बळी पडत आहेत. तसे पाहता बलुची लोक 1947 पासूनच पाकिस्तानी सैन्याच्या अत्याचाराचा मुकाबला करीत आहेत.
लाखो बलुची लोक त्यात मारले गेले आहेत. आता जे दोन कोटी उरले आहेत, त्यांना लवकरच संपविण्याचा कट पाकी सैन्य अंमलात आणत आहे. अशी परिस्थिती असतानाही बलुचिस्तानमधील जनता ‘आझादी’साठी कोणत्याही आंतरराष्ट्रीय मदतीशिवाय पाकिस्तानी सैन्याशी लढत आहे. पण, पाकिस्तानच्या ताकदीपुढे बलुची लोकांची ताकद कमी पडते, हे वास्तव आहे. दक्षिण आशियातील बहुतांश देशांवर जेव्हा इंग्रजांची राजवट होती, तेव्हाही बलुचिस्तान हा एक स्वतंत्र देश होता. बलुचिस्तानला एक निर्धारित अशी सीमा होती, घटना होती, संसदही होती आणि तिथे कायद्याचे राज्य होते. पण, भारताची फाळणी झाल्यानंतरच्या काळात पाकिस्तानने बलुचिस्तानवर हल्ला केला आणि तो प्रदेश बळकावला. पाकने हल्ला करण्यापूर्वी बलुचिस्तानने पंडित नेहरूंना हस्तक्षेप करण्याची विनंती केली होती. पण, नेहरूंनी ती फेटाळून लावल्याने पाकिस्तानचा हल्ला यशस्वी झाला आणि बलुचिस्तानवर पाकिस्तानला कब्जा करता आला. आता पाकिस्तान स्वत:च्या स्वार्थासाठी आणि भारताला घाबरवण्यासाठी हाच बलुची प्रांत चीनला आंदणात द्यायला निघाला आहे! चीनला खूश करून आपल्या बाजूने वळवायचे आणि भारताला डिवचायचे, हाच एकमेव उद्योग पाकिस्तानने चालविला आहे. त्या वेळी भारताने हस्तक्षेप केला असता अन् ठोस पावलं उचलली असती, तर कदाचित बलुचिस्तान आजही स्वतंत्र देश राहिला असता! बलुचिस्तानशिवाय पाकिस्तान जगूच शकत नाही. बलुचिस्तान जर पाकिस्तानच्या ताब्यात नसते तर पाकिस्तानची आर्थिक स्थिती आणखी बिकट झाली असती.
अजूनही बलुचिस्तानला स्वतंत्र केले तर पाकिस्तान एक भिकारी देश बनेल, यात शंका नाही! आपल्याकडे नैसर्गिक साधनसंपत्ती मोठ्या प्रमाणात आहे, असा दावा पाकिस्तान केवळ बलुचिस्तानच्या भरवशावरच करत आहे. त्यामुळे बलुचिस्तानला पाकिस्तानच्या तावडीतून मुक्त करणे, हा प्राधान्यक्रम असला पाहिजे. 1940 साली मुस्लिम लीगने जेव्हा स्वतंत्र पाकिस्तानची कल्पना मांडली होती, तेव्हा असा मुद्दा उपस्थित करण्यात आला होता की, पाकिस्तान आर्थिकदृष्ट्या कमजोर राहील. पण, त्यावर मुस्लिम लीगच्या नेत्यांनी अतिशय निर्लज्ज युक्तिवाद केला होता. स्वतंत्र पाकिस्तान बलुचिस्तानवर आक्रमण करून ताबा मिळवेल अन् स्वत:ला साधनसंपन्न करेल. तो युक्तिवाद पाकिस्तानने खराही करून दाखविला. यावरून हेच स्पष्ट होते की, निर्मितीच्या आधीपासूनच पाकिस्तानचा बलुचिस्तानवर डोळा होता. बलुचिस्तानातील लोक आजही ‘आझादी’ची लढाई लढत आहेत आणि त्यांना भारताकडून अपेक्षा आहेत. पण, आंतरराष्ट्रीय समुदायाच्या दडपणामुळे भारत बलुचला मदत करू शकेल का, हा प्रश्नच आहे. बलुचिस्तान हे एक धर्मनिरपेक्ष राष्ट्र होते आणि आता स्वतंत्र झाल्यावरही ते तसेच राहील, यात शंका नाही! बलुचिस्तानला स्वतंत्र करण्यासाठी अमेरिकेने पुढाकार घेतला, तर भारतालाही मदत करणे शक्य होऊ शकते. दहशतवादाविरुद्धची लढाई यशस्वी करण्याची अमेरिकेची प्रामाणिक इच्छा असेल, तर अमेरिकेने बलुचिस्तानवर झालेला अन्याय दूर करण्यासाठी पाकिस्तानवर दबाव आणला पाहिजे. अन्यथा, अमेरिका दहशतवादाच्या बाबतीत दुटप्पीच भूमिका घेते आहे, हेच अधोरेखित होईल!
#Pakistan become the fifth #largestnuclearpower in the
world part 2
No comments:
Post a Comment