आशियामधील कोरियन आणि तत्सम इतर कंपन्यांच्या समोर या कंपन्याही गाडय़ांच्या किमती नियंत्रणात ठेवू शकल्यामुळे ताठ उभ्या राहू शकल्या, परंतु आता अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सुरू केलेल्या व्यापारयुद्धामुळे या विविध अमेरिकन कंपन्यांपुढे ‘इकडे आड व तिकडे विहीर’ अशी परिस्थिती उद्भवली आहे असे म्हटल्यास वावगे होणार नाही. डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर या व्यापारयुद्धातून माघार घेण्यासाठी अमेरिकेतूनच दबाव येण्यास सुरुवात झाली आहे. तो दबाव ट्रम्प किती प्रमाणात घेतात की संपूर्णपणे दबाव झुगारून लावतात हे बघावे लागेल.
अमेरिकेचे चीन, युरोपीय महासंघ आणि कॅनडा वगैरे देशांबरोबर व्यापारयुद्ध सुरू होऊन महिना उलटला असून त्याचे दृश्य परिणाम जाणवू लागले आहेत हे निःसंशय. ऑटोमोबाईल (दुचाकी आणि चारचाकी उत्पादक), अमेरिकेतील निर्यातप्रधान असे सोयाबीन, सफरचंद, बदाम उत्पादक हे प्राथमिक फेरीतच या युद्धात होरपळणारे उद्योग असतील असे दिसू लागले आहे. अमेरिकेने जाहीर केलेले विविध उत्पादनांवरील नवीन आयात कर 6 जुलैपासून लागूही झाले आहेत. यातील जो माल ‘ट्रान्झिट’मध्ये होता तोही वेळेत संबंधित बंदरात पोहोचवण्यासाठी आयात – निर्यातदारांची तारांबळ उडाल्याचे सांगितले गेले.
जागतिकीकरणाच्या काळात अमेरिकेतून अनेक यंत्र उत्पादनांचे आणि त्यांचे सुटे भाग बनविणारे कारखाने अमेरिकेबाहेर युरोप, चीन व आशियामधील अनेक देशांमध्ये स्थलांतरित झाले. अमेरिकन ‘ब्रँण्डेड’ शूज, तयार कपडे उत्पादने बाहेरील देशांमध्ये बनविली जाऊन परत अमेरिकेत विक्रीसाठी येऊ लागली. फोर्ड, जनरल मोटर्ससारख्या अमेरिकन ऑटोमोबाईल कंपन्यांनी त्यांचे कारखाने युरोप, हिंदुस्थान, चीनमध्ये थाटले. या देशांमधील अमेरिकन कामगारांच्या तुलनेत खूप स्वस्तात मिळणारे कामगार आणि गाडय़ा बनविण्यासाठी लागणारा कच्चा माल खूप कमी किमतीत मिळत असल्याने या कंपन्या खूप स्पर्धात्मक किमतीमध्ये आपल्या गाडय़ा अमेरिकेतील बाजारात आणून विकत होत्या.
आशियामधील कोरियन आणि तत्सम इतर कंपन्यांच्या समोर या कंपन्याही गाडय़ांच्या किमती नियंत्रणात ठेवू शकल्यामुळे ताठ उभ्या राहू शकल्या, परंतु आता अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सुरू केलेल्या व्यापारयुद्धामुळे या विविध अमेरिकन कंपन्यांपुढे ‘इकडे आड व तिकडे विहीर’ अशी परिस्थिती उद्भवली आहे असे म्हटल्यास वावगे होणार नाही. अमेरिकेत आयात होणाऱ्या स्टीलवर 25 टक्के आयात शुल्क लादल्याने स्टीलच्या अमेरिकेतील किमतीत (लॅण्डेड कॉस्ट ) तेवढीच वाढ झाली आहे. कच्च्या मालाच्या या वाढीव किमतीमुळे या कंपन्यांना आपल्या गाडय़ांची विक्री किंमतही वाढवावी लागेल. ती वाढीव किंमत शेवटी ग्राहकांच्याच माथ्यावर मारावी लागेल, परंतु ही वाढीव किंमत किती प्रमाणात वाढतेय याचे विविध कंपन्यांनी दिलेले काही आकडे बघून ग्राहक ही किंमत स्वीकारणारच नाहीत हे निश्चित. अर्थात या कंपन्यांनी या वाढीव किमतीतील किती भाग ग्राहकाच्या गळ्यात बांधायचा विचार केला आहे हे स्पष्ट नाही.
‘आम’ या अमेरिकन ऑटोमोबाईल संघटनेने या व्यापारयुद्धामुळे अमेरिकेतील गाडय़ांची सरासरी विक्री किंमत 5000 ते 6000 डॉलर्सने वाढू शकेल अशी भीती व्यक्त केली आहे. एवढी वाढ कोणत्याही देशाचा नागरिक स्वीकारणार नाही.
तर लक्झरी श्रेणीतील मर्सिडीज एस क्लास, लेक्सस या गाडय़ांच्या विक्री किमतीत 10 हजार डॉलर्सने वाढ होईल असे सांगितले जाते. या आकडय़ांमुळे या व्यापारयुद्धाचा काय परिणाम होणार आहे याचा अंदाज येऊ शकतो. या व्यापारयुद्धामुळे व्यापारातील प्रत्येक सहभागी देश अक्षरशः ‘अर्थबंबाळ ’ होणार आहेत. सुरुवातीला काही कंपन्या कामगार कपात करून खर्च कमी करावयाचा प्रयत्न करू शकतात. ज्याला कोलॅटरल डेमेज म्हणतात ते सहभागी देशांच्या अर्थव्यवस्था व अंतिम ग्राहक यांचे होईल. जागतिक चलनांच्या विनिमय किमतीतही खूप ‘उछाल’ दिसण्याची शक्यता वाटते. चीन त्यांचे चलन युआनचे डॉलरशी विनिमय मूल्य घटवू शकतो असेही बोलले जाते.
एल.एम.सी. ऑटोमोटिव्ह ही अमेरिकेतील ऑटोमोबाईल गाडय़ांचे उत्पादन, विक्री याबद्दलचा तपशील गोळा करणारी संस्था आहे. या संस्थेच्या दाव्यानुसार या नवीन आयात शुल्कामुळे अमेरिकेतील गाडय़ांच्या विक्रीला जोरदार फटका बसून त्यामुळे अमेरिकेत पुढील एका वर्षात सुमारे 10 लाख कमी गाडय़ा विकल्या जातील. जपान सरकारच्या मते या आयात शुल्कवाढीमुळे या विविध कारखाने, त्याची अनेक ठिकाणी पसरलेली विक्री केंद्रे आणि या सर्वांशी संलग्न उद्योगधंदे हे सर्वजण लक्षात घेता अमेरिकेत सुमारे 2 लाख अमेरिकन कामगारांच्या नोकरीवर गंडांतर येऊ शकते, तर ‘असोसिएशन ऑफ ग्लोबल ऑटोमेकर्स’ या अमेरिकेतील वॉशिंग्टनस्थित संस्थेनुसार हजारो अमेरिकन लोकांना त्यामुळे रोजगार गमवावा लागू शकतो. अमेरिकेत ऑटोमोबाईल कंपन्यांचा सर्वसाधारणपणे जपानी आणि कोरियन ऑटोमोबाईल उत्पादकांवर विशेष राग आहे. या कंपन्या आपली उत्पादने फार स्पर्धात्मक कमी किमतीत अमेरिकेत विकतात. त्यामुळे अमेरिकन ऑटोमोबाईल कंपन्यांच्या विक्रीला जोरदार फटका बसतो. हिंदुस्थानात अमेरिकेतून हार्ले डेव्हिडसनच्या दुचाकींची आयात होते. याशिवाय कॅलिफोर्नियामधून बदाम, सफरचंदे आयात होतात. तसेच आता संरक्षण साहित्यही अमेरिकेतून यापुढे आयात केले जाईल.
डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर या व्यापारयुद्धातून माघार घेण्यासाठी अमेरिकेतूनच दबाव येण्यास सुरुवात झाली आहे. तो दबाव ट्रम्प किती प्रमाणात घेतात की संपूर्णपणे दबाव झुगारून लावतात हे बघावे लागेल.
अमेरिकेने व्यापारयुद्ध छेडण्यामागे अजून एक कारण सांगितले जात आहे ते म्हणजे नजीकच्या भविष्यात येऊ घातलेले दूरसंचार क्षेत्रातील ‘5जी’ तंत्रज्ञान. या तंत्रज्ञानाने मोठी क्रांती अपेक्षित असून अमेरिकन कंपन्या आणि चिनी कंपन्या हुवेई आणि झेडटीई या तंत्रज्ञानाच्या प्रसारासाठी सज्ज झाल्या आहेत. या तंत्रज्ञानाने सुमारे 12 ट्रिलियन डॉलर्स किमतीच्या जागतिक बाजाराचे ( हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर एकत्र धरून) दरवाजे उघडले जाणार आहेत. 5जीमुळे इंटरनेटचा वेग अफाट वाढणार आहे. या तंत्रज्ञानाचा कृत्रिम बुद्धिमत्ता (आर्टिफिशिअल इंटेलिजन्स), चालकविरहित गाडय़ा, इंटरनेट ऑफ थिंग्स यामध्ये वापर होणार असून अमेरिकेला चीनकडून या बाजारावर ताबा मिळवण्यापासून रोखायचे असल्याचे सांगितले जाते. या व्यापारयुद्धामुळे जागतिक अर्थकारण ढवळून निघणार आहे. अमेरिकन काँग्रेस हे व्यापारयुद्ध थांबविण्याबद्दल पूर्णपणे हतबल आहे की काय अशी लोकांना शंका येते आहे. शेवटी अमेरिकन ग्राहकांना जास्त खर्च करून वस्तू विकत घ्याव्या लागतील आणि ते याला कितपत तयार होतील हे येणाऱ्या काळात दिसून येईल½
No comments:
Post a Comment