चीनबरोबरील
संबंधांमध्ये १९६२च्या युद्धाचा सातत्याने उल्लेख करण्यात येतो. मात्र, त्यानंतर पाचच वर्षांनी नथू ला आणि चो ला येथे लष्कराने
चीनला धूळ चारली होती. ११ सप्टेंबर रोजी सुरू झालेला हा संघर्ष ऑक्टोबरच्या पहिल्या
आठवड्यात संपला होता. त्यानंतर चीनला तीन किलोमीटरपर्यंत माघार घ्यावी लागली होती.
या संघर्षाला ५० वर्षे पूर्ण झाली, त्यानिमित्त.
सिक्कीमच्या सीमेजवळ दोन महिन्यांपासून सुरू असणारा डोकलामचा वाद गेल्या महिन्यामध्ये निवळला. भारताच्या दृष्टीने राजनैतिक पातळीवरील हे एक महत्त्वाचे यश आहे, ही वस्तुस्थिती आहे. मात्र, या काळामध्ये चीनने १९६२च्या युद्धाचा उल्लेख करत भारताला डिवचण्याचा प्रयत्न केला. अगदी, १९६२चे युद्ध विसरू नका, अशा प्रकारच्या दर्पोक्ती चीनच्या मंत्र्यांपासून त्यांच्या प्रसारमाध्यमांपर्यंत सर्वांनी दिल्या. त्यावर, तत्कालीन संरक्षण मंत्री अरुण जेटली यांनीही ‘भारत हा १९६२चा उरला नाही, तर प्रत्येक आक्रमणाला त्याच पद्धतीने उत्तर देऊ,’ या शब्दांमध्ये प्रत्युत्तर दिले. केंद्र सरकारच्या संपूर्ण प्रकरणातील भूमिकेविषयी सर्वच स्तरातून कौतुक करण्यात आले. मात्र, चीनकडून जाणीवपूर्वक १९६२च्या युद्धाचा उल्लेख होत असताना, पाचच वर्षांनी १९६७मध्ये नथू ला आणि त्यानंतर चो ला येथील संघर्षामध्ये भारतीय लष्कराने चीनला धूळ चारली होती, त्याची आठवण करून देणे गरजेचे आहे. लष्कराच्या या शौर्याचा उल्लेख योग्य वेळी केला, तरच सातत्याने आक्रमणाची भाषा करणाऱ्या चीनला योग्य तो संदेश मिळू शकेल.
भारत आणि चीन यांच्यातील १९६२च्या युद्धाचा इतिहास सर्वज्ञात आहे. या युद्धामध्ये भारतीय सैन्य अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये लढले. मात्र, चीनच्या आक्रमणासमोर त्यांच्या शौर्याला मर्यादा आल्या. या युद्धातील पराभवाचे शल्य आजही भारतीयांच्या मनामध्ये आहे, ही वस्तुस्थिती आहे. किंबहुना, हे युद्धच भारताच्या लष्कर आणि परराष्ट्र धोरणाच्या दृष्टीने अतिशय निर्णायक ठरले. त्याचे प्रत्यंतर पुढील काळात येतच गेले. यामध्ये १९६७च्या सप्टेंबर आणि ऑक्टोबरमध्ये सिक्कीमच्या नथू ला आणि चो ला येथे झालेल्या संघर्षाचा आवर्जून उल्लेख करावा लागेल. त्यावेळी सिक्कीम हा भारताचा भाग नव्हता, तरीही त्याच्या संरक्षणाची जबाबदारी भारताची होती. ईशान्य भारताला जोडणाऱ्या ‘चिकन नेक’मुळे सिक्कीमचे भूराजकीय महत्त्व वादातीत आहे. यातूनच, चीनने १९६७मध्ये नथू ला भागामध्ये भारतीय लष्करावर दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला.
या संघर्षाची सुरुवात ऑगस्ट १९६७मध्ये झाली. त्यावेळी नथू ला येथील संरक्षणाची जबाबदारी १८ राजपूत रेजिमेंटच्या तुकडीकडून ‘२ ग्रेनेडियर’कडे सोपविण्यात आली होती. ही जबाबदारी स्वीकारल्यानंतर, लगेचच या तुकडीकडून सीमेवर तारेचे कुंपण बांधण्यात येत होते आणि चीनने त्याला आक्षेप घेतला. लष्कराच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कोणत्याही परिस्थितीमध्ये काम सुरूच ठेवण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे, चीनचा जळफळाट वाढत गेला. अखेरीस, २३ ऑगस्ट रोजी चीनचे ७५ सैनिक सीमेजवळ आले आणि दोन्ही लष्कर आमनेसामने आले. एक तासाच्या तणावानंतरही फारसे काही घडले नाही. मात्र, हा तणाव कमी होणार नव्हता. त्यानंतर काही दिवसांत गस्तीवर असणाऱ्या भारतीय पथकावर चिनी तुकडीने हल्ला केला. यामध्ये भारतीय तुकडीला धक्काबुक्की केली. हा तणाव वाढत असतानाही, कोणत्याही परिस्थितीमध्ये कुंपणाचे काम सुरूच ठेवायचे, असे आदेश वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिले होते. यामध्ये पाच सप्टेंबर रोजी कुंपणाच्या कामाला सुरुवात केली. त्यावर चीनची तुकडी आली आणि त्यांनी लष्कराला मागे रेटण्याचा प्रयत्न केला. दोन्ही लष्कर समोरासमोर येत आल्यानंतरही, भारतीय लष्करासमोर डाळ शिजत नसल्याचे चिनी सैनिकांच्या लक्षात आले. त्यावर त्यांनी दगडफेक करत पळ काढला.
यानंतर ११ सप्टेंबर रोजी या तणावातून संघर्षाला सुरुवात झाली. प्रत्यक्ष कुंपणाजवळ दोन्ही बाजूचे अधिकारी समोरासमोर आले आणि अचानक चीनकडून गोळीबार करण्यात आला. यामध्ये लेफ्टनंट कर्नल राय सिंह यांना गोळी लागली. तुकडीच्या प्रमुखालाच गोळी लागल्यामुळे भारतीय सैनिक आक्रमक झाले. दोन्हीकडून गोळीबाराला सुरुवात झाली. चिनी लष्कर बंकरमध्ये होते, तर भारतीयांसमोर आसरा घेण्यासाठीही जागाही नव्हती. त्यातच, कुंपणाचे काम करणाऱ्या अन्य कर्मचाऱ्यांचीही जबाबदारी होती. या सुरुवातीच्या आक्रमणात भारताचे नुकसान झाले. चीनचे आक्रमण रोखण्याचा एकच उपाय म्हणून मेजर हरभजन आणि कॅप्टन डगर यांनी अन्य जवानांबरोबर चिनी बंकरवर हल्ला केला. थेट संगिनींचा वापर करत, त्यांनी अनेक चिनी सैन्यांना ठार मारले. यामध्ये या दोन्ही अधिकाऱ्यांना वीरमरण आले. हा सुरू झालेला संघर्ष पुढील चार दिवस सुरू होता. भौगोलिक परिस्थिती भारताच्या बाजूने असल्यामुळे, लष्कराने तोफांचा वापर केला. सेबू ला येथील सामरिकदृष्ट्या महत्त्वाची स्थिती भारताला फायदेशीर ठरली. त्यामुळे, चीनचे मोठे नुकसान झाले आणि चार दिवसांमध्येच माघार घ्यावी लागली. या संघर्षामध्ये सुमारे ७० भारतीय अधिकारी-जवान शहीद झाले, तर चीनचे ३०० सैनिक ठार झाले. हा आकडा चारशेपर्यंत असल्याचे सांगण्यात येते.
भारतीय लष्कराकडून झालेला हा प्रतिकार चीनसाठी आश्चर्यकारक होता. त्यामुळेच, चीनने एक ऑक्टोबर रोजी चो ला परिसरामध्ये आक्रमण करण्याचा प्रयत्न केला. मात्र, या ठिकाणीही भारतीय लष्कर सज्ज होते आणि या आक्रमणाला चोख प्रत्युत्तर दिले. विशेष म्हणजे, या ठिकाणी चीनला सुरुवातीलाच रोखण्यात आले आणि अपेक्षेच्या दुप्पट तीव्रतेने प्रतिकार झाला. या संघर्षाविषयी फारशी माहिती किंवा आकडेवारी उपलब्ध होत नाही. तरीही, हा संघर्ष दोनच दिवस सुरू होता आणि त्यानंतर १० ऑक्टोबर रोजी चीनचे लष्कर या सीमेपासून तीन किलोमीटर दूरपर्यंत माघारी गेले, यामध्येच भारतीय लष्कराचे यश लक्षात येऊ शकते.
चीनकडून १९६२मध्ये झालेल्या पराभवाचे ओझे उतरविण्यासाठी हे यश महत्त्वाचे आहेच. त्याही पेक्षा ‘चीन हा अजेय नाही, हेच यातून दिसून येते. आपण त्यांच्याविरोधात निश्चयाने लढलो, तर त्यांना आपण सहज हरवू शकतो, हेच नथू ला आणि चो ला येथील संघर्षातून सिद्ध होते,’ असे एका लष्करी अधिकाऱ्याने सांगितले. १९६२च्या युद्धामध्ये भारतीय सैन्याकडे पुरेसे कपडे, शस्त्रास्त्रे नव्हती. अरुणाचल प्रदेशातील हवामानाशी जुळवून घेण्याचेही आव्हान मोठे होते. त्या तुलनेमध्ये पुढील पाच वर्षांमध्ये शस्त्रास्त्र पुरवठा व अन्य गोष्टींमध्ये सुधारणा झाली होती, ही गोष्ट महत्त्वाची ठरली. लष्कराच्या मनोधैर्याच्या दृष्टीनेही या यशाला विशेष महत्त्व असल्याचे मानण्यात येते. पाकिस्तानबरोबरील १९६५च्या युद्धामध्ये विजय मिळाला असला, तरीही हा निर्णायक विजय नव्हता. तसेच, ताश्कंदच्या करारामध्ये जिंकलेला भाग पाकिस्तानला परत द्यावा लागला होता. त्या तुलनेमध्ये १९६७मध्ये चीनला निर्णायकपणे मागे रेटल्यामुळे सैनिकांमध्ये आत्मविश्वास निर्माण होत होता, याकडे लक्ष वेधण्यात येते.
डोकलाममध्ये घुसखोरी करत, हा भूभाग बळकावण्याचा चीनचा प्रयत्न आहेच. त्यामुळे, ईशान्य भारताला मुख्य भूभागाशी जोडणारे ‘चिकन नेक’ चीनच्या पल्ल्यामध्ये येऊ शकते. त्याबरोबरच, आम्ही तुमच्यावर दबाव आणू शकतो, हेच चीन भारताला दाखवून देऊ पाहात होता. त्या तुलनेमध्ये भारतीय प्रतिक्रिया शांत, मात्र खंबीर होती, याकडे लक्ष वेधण्यात येते. हीच गोष्ट १९६२नंतर वेगवेगळ्या टप्प्यांवर झाली आहे. १९६७मधील चीनचा पराभव, चीनच्या विरोधानंतरही सिक्कीम हा भारताचा भाग होणे, अरुणाचल प्रदेशाला राज्याचा दर्जा देणे, यामध्ये भारताने चीनचा दबाव जुमानत नसल्याचे सिद्ध केले आहे, ही गोष्ट अधोरेखित करण्यात येते. मुळात डोकलाम किंवा कोणताही आंतरराष्ट्रीय वाद हा लष्करी ताकदीबरोबरच मानसिक दृष्टीनेही लढावा लागत असतो. त्यामुळेच, डोकलाम वेळी चीनने त्यांच्या माध्यमातून भारतावर आगपाखड
करताना, भारतीय ताकद तकलादू असल्याचे दाखवून देण्याचा प्रयत्न केला होता. चीनची माध्यमे प्रथमच एखाद्या आंतरराष्ट्रीय मुद्द्यावर उतावीळ झाल्याची प्रतिक्रियाही अनेक देशांनी व्यक्त केली होती. मात्र, अशा चर्चेच्या प्रसंगी चीन १९६२च्या युद्धाचेच पान उलटत असताना, १९६७च्या संघर्षात कापलेले नाकही चीनला दाखवून देण्याची गरज आहे
No comments:
Post a Comment