Total Pageviews

Saturday, 21 October 2017

देशसेवेचे व्रत पूर्व सीमा विकास प्रतिष्ठान-भय्याजी काणे हे संघ प्रचारक देशसेवेचे व्रत घेवून भारतभर फिरले. हजारो घरांमध्ये शिक्षणाची, भारतीयत्वाची, देशप्रेमाची ज्योत पेटवली- विवेक मराठी 04-Oct-2017



 शंकर दिनकर उर्फ भय्याजी काणे हे संघ प्रचारक देशसेवेचे व्रत घेवून भारतभर फिरले.  हजारो घरांमध्ये शिक्षणाची, भारतीयत्वाची, देशप्रेमाची ज्योत पेटवली. ईशान्य भारतातील शेकडो मुलांचे ते पालक पिता होते. सध्या पूर्व सीमा विकास प्रतिष्ठानच्या तिन्ही शाळा विनाअनुदानित आहेत. वसतिगृहात राहून शिक्षण घेणाऱ्या एका विद्यार्थ्याचा  वार्षिक खर्च वीस हजार रुपये आहे. अनिवासी विद्यार्थ्याचा वार्षिक खर्च दहा हजार रुपये आहे. प्रतिष्ठानच्या विकासात भर घालण्यासाठी लोकांनी आर्थिक मदत करून हातभार लावणे आवश्यक आहे.
 पूर्वांचल - कला, संस्कृती वैभवाने संपन्न, वनसंपत्तीचे व खनिजसंपत्तीचे वरदान मिळालेला असा पूर्वांचल भारताचा अविभाज्य भाग आहे. पूर्वांचलात  अरुणाचल प्रदेश, नागालँड, मणिपूर, मिझोराम, त्रिपुरा, मेघालय, आसाम आणि सिक्कीम या आठ राज्यांचा समावेश होतो. 150हून अधिक जनजाती, त्यांच्या जवळजवळ तितक्याच भाषा, विशिष्ट चेहरेपट्टी, दळणवळणाची अपुरी साधने, पायाभूत सुविधांचा अभाव या आणि काही राजकीय कारणांमुळे हा भूभाग बाकी भारतापासून काहीसा अलिप्त राहिला. बांगला देश, भूतान, म्यानमार व चीनचा कब्जा असलेला तिबेट या चार आंतरराष्ट्रीय सीमा या भागाला जोडून आहेत. त्यामुळे दक्षिण-पूर्व आशियावर नजर ठेवण्याकरिता, तेथे आपले वर्चस्व प्रस्थापित करण्याकरिता हे सर्वोत्तम असे मोक्याचे ठिकाण आहे, हे इंग्रजांनी कधीच ओळखले होते. याच कारणासाठी चीनही हा भूभाग आपल्या घशात घालण्यासाठी प्रयत्न करतो आहे.
जीवविविधतेने समृध्द असा हा प्रदेश भारताला स्वातंत्र्य दिल्यानंतरही या ना त्या प्रकारे आपल्या ताब्यात राहावा, अशा व्यवस्था ब्रिटिशांनी लावल्या. प्रार्थनास्थळे व शिक्षण संस्था यांद्वारे धर्मांतराच्या माध्यमातून येथील समाजाची स्वत:ची ओळख, संस्कृती नष्ट करून, त्यांना जाणीवपूर्वक भारतापासून वेगळे ठेवून उठाव करवावयाचे, वातावरण धुमसत ठेवायचे आणि त्यांना भारतापासून तोडायचे; काही सुविधा दिल्यासारखे करून, त्यांचा स्वार्थासाठी पुरेपूर उपयोग करून घ्यायचा अशी ही योजना होती. आहेही. उल्फा, NSCN-IM असे अनेक गट अशा फुटीरतावादी शिकवणीमुळे निर्माण होऊ  लागले. चीनसारखी राष्ट्रे त्यांना कधी छुपेपणाने तर कधी उघडपणे मदत करू लागली. पूर्वांचलात तस्करी आणि तिरस्काराची बीजे फोफावू लागली. भाषेची अडचण, दळणवळणाच्या साधनांचा अभाव, अपुरी शिक्षण साधने, शासनाचे दुर्लक्ष, भ्रष्टाचार, बेरोजगारी तसेच सामान्य भारतीयांचे या भागाविषयीचे अज्ञान अशा कारणांमुळे हा समाज मुख्य भारतीय प्रवाहात येऊ शकला नाही.  
स्वातंत्र्योत्तर काळात काही समाजसेवी, राष्ट्रवादी संघटनांना या गोष्टीची जाणीव प्रकर्षाने होऊ  लागली. ज्याप्रमाणे पाकव्याप्त काश्मीर प्रश्न, फुटीरतावाद, काश्मिरी पंडितांची हकालपट्टी असे अनेक प्रश्न आज काश्मीरला, संपूर्ण भारताला सतावत आहेत, तसेच या राष्ट्रीय विचारांच्या संस्थांच्या कार्याअभावी ईशान्य भारतातील मूलनिवासींनाही अशाच परिस्थितीला सामोरे जावे लागले असते. अर्थात भारतीय लष्कराचाही या कामात मोठा वाटा आहेच. सीमावर्ती प्रदेशातील जनतेमध्ये विश्वास आणि सौहार्दाचे वातावरण निर्माण करणे हे शिक्षण, रोजगार, सांस्कृतिक आदान-प्रदानानेच शक्य आहे. म्हणून मग सेवाभावी संस्थांद्वारे त्या समाजाशी जोडून घ्यायचे त्यांचे प्रश्न सोडवायचे व शिक्षित करून त्यांना त्यांच्या हक्कांची, त्यांच्या 'भारतीयत्वाची' जाणीव करून द्यायची यासाठी काम सुरू झाले. शेकडो देशभक्तांनी या कामात आपल्या आयुष्याची, वेळी आपल्या प्राणांचीही आहुती दिलेली आहे.
शंकर दिनकर उर्फ भय्याजी काणे या अशाच एका रा. स्व. संघाचे संस्कार लाभलेल्या, पण मळलेली वाट न चोखाळता दुर्दम्य इच्छाशक्तीच्या बळावर वेगळा मार्ग स्वीकारून, अनेक संकटांचा सामना करत ध्येयाप्रत पोहोचणाऱ्या अलौकिक माणसाची ही कहाणी आहे. देशसेवेचे व्रत घेतलेला हा शिक्षक भारतभर फिरला. शक्य होईल तिथे राष्ट्रवादी कामाचा विस्तार केला. संस्कारक्षम मनांना योग्य आकार दिला. हजारो घरांमध्ये शिक्षणाची, भारतीयत्वाची, देशप्रेमाची ज्योत पेटवली. ईशान्य भारतातील शेकडो मुलांचे ते पालक पिता होते.
ज्या काळात इंडिया, इंडियन असे शब्दोच्चारही मणिपूरमध्ये संकटाला आमंत्रण ठरू शकत होते, अशा काळात तेथील 'उखरूल' नावाच्या अतिदुर्गम जिल्ह्यात त्यांनी आपले काम सुरू केले. म्यानमारपासून केवळ 6 कि.मी. असलेल्या न्यू तुसॉम या सीमावर्ती जंगलांनी वेढलेल्या, मागास भागात त्यांनी शिक्षकाची नोकरी धरली. त्यांचे परमशिष्य जयवंतराव कोंडविलकर एक थरारक अनुभव सांगतात. 1972 साली, 12 वर्षांच्या छोटया जयवंतला बरोबर घेऊन भय्याजी उखरूलकडून चिंगजोरायकडे जायला निघाले होते. वाटेत काही स्थानिकांनी त्यांना घेरले. त्यांना वाटले, मुले पळवणाऱ्या टोळीतील हा कोणी भामटा आहे. म्हणून या दोघांना बांधून, ठार मारायची तयारी त्यांनी सुरू केली. भय्याजींनी त्यांना मणिपुरी भाषेतून परोपरीने समजावले की मी शिक्षक आहे आणि हा माझा विद्यार्थी आहे. पण ते काहीच ऐकून घेईनात. अशा परिस्थितीतही भय्याजी अतिशय शांत होते. ते त्यांना म्हणाले, ''आम्ही सकाळपासून खूप भुकेलेले आहोत. आम्हाला मारण्यापूर्वी काहीतरी खायला द्या.'' हे त्या मंडळींना पटले असावे. 'सुखदु:ख समेकृत्वा' या उक्तीप्रमाणे तशाच बांधलेल्या अवस्थेत भय्याजी आणि छोटा जयवंत जेवू लागले. जेवण होईपर्यंत भय्याजींच्या सुदैवाने त्यांना ओळखणारे एक मणिपुरी शिक्षक तिथे आले व भय्याजींची माहिती त्या लोकांना दिली. एक प्रतिष्ठित व्यक्ती यांना ओळखते म्हटल्यावर या जीवघेण्या प्रसंगातून त्यांची सुटका झाली.
भारत आणि भारतीयांविषयी असणारी द्वेषाची भावना कमी व्हावी, ही कोंडी फुटावी यासाठी भय्याजी सतत प्रयत्नशील होते. ते तेथील स्थानिकांशी, मिलिटरीच्या लोकांशी, IAS अधिकाऱ्यांशी बोलत. या साऱ्या विचारमंथनातून एक गोष्ट स्पष्ट होत होती की, ही परिस्थिती निवळावी यासाठी इथल्या लोकांनी भारत दर्शन करायला पाहिजे. तिथली परिस्थिती, भारतीयांचे प्रेम त्यांना स्वत:ला अनुभवता आले पाहिजे. नाहीतर आत्ता आहे त्याच मानसिकतेत ते जगत राहतील, त्यांच्या भारतद्वेषाची पाळेमुळे आणखी खोल रुतत राहतील. परंतु हे व्हावे कसे? यासाठी भय्याजींना एक युक्ती सुचली. मणिपूर, नागालँडमधील छोटया मुलांना ईशान्येतर भारतात नेऊन त्यांच्यावर 'भारतीयत्वाचे संस्कार' केले, तर भविष्यात मोठा फरक पडू शकेल हे त्यांना स्पष्टपणे दिसत होते. झाले, विचार पक्का झाला. त्याप्रमाणे ते तिथल्या मुलांच्या पालकांशी बोलणे करू लागले. पण त्या लोकांना हे काही पचेना. ते पालक भय्याजींना म्हणू लागले की तुमचे सगळे बोलणे पटते, पण तुमच्यावर विश्वास कसा ठेवायचा? यावर उपाय म्हणून तुमचा जयवंत इथे आमच्या गावात ठेवा आणि आमची मुले शिक्षणासाठी महाराष्ट्रात न्या. भय्याजींनी हे लगेच मान्य केले. संभाजीराजांच्या, गुरू गोविंदसिंगांच्या गोष्टी सांगून त्यांनी जयवंतचेही मन तयार केले. सर्वप्रथम त्यांनी 12 मुले आपल्याबरोबर आणली. हळूहळू करत अशी 300हूनही अधिक मुले त्यांनी येथे आणून स्वत:च्या पायावर उभी केली. आजच्या घडीला हे कार्य करणाऱ्या जनकल्याण समितीची 8 वसतिगृहे महाराष्ट्रात आहेत. तिथे 115 मुले व मुली शिक्षण घेत आहेत. मेघालय, नागालँड, मणिपूर येथील ख्रिश्चन तसेच स्वधर्म पाळणारी अशी ही मुले आहेत.                                                    
'पूर्व सीमा विकास प्रतिष्ठान'चे काम प्रामुख्याने मणिपूर भागात चालते. येथील मैदानी भागात वैष्णवपंथी समाज राहतो. परंतु वैष्णव असले, तरी ईशान्येतर भारतीयांशी ते फटकूनच वागतात. कारण आम्ही मूळचे मंगोलियन वंशाचे आहोत व इथे येऊन आम्ही वैष्णव झालो, अशी भावना त्यांच्या मनात रुजवली गेली आहे. अशा अनेक सामाजिक, आर्थिक, राजकीय, धार्मिक, छोटया-मोठया संकटांशी इथला समाज जवळजवळ गेली 200 वर्षे झुंजत आहे, याची भय्याजींना जाणीव होती. अशा या सर्वांगसुंदर परंतु संकटांनी घेरलेल्या प्रदेशाला आज आपल्या मदतीची नितांत गरज आहे आणि अपेक्षाही.



आपण कोणती मदत करू शकतो?
शत्रूंचा प्रभाव कमी करायचा असेल, तर सर्वसामान्य भारतीयांनीच या भागात अधिकाधिक मित्र जोडणे आवश्यक आहे. ईशान्य भारत अजूनही पर्यटनदृष्टया फारसा प्रचलित अथवा लोकप्रिय  नसलेला प्रदेश आहे. तेथे आपण सहली काढू शकता. येताना छोटे छोटे कार्यक्रम ठरवून येऊ शकता. लहान मुलांची व्यक्तिमत्त्व विकास  शिबिरे, भाषा, गणित, विज्ञानातील गमतीजमती, महिलांसाठी विविध माहितीपर शिबिरे, तरुणांसाठी व्यवसाय मार्गदर्शन शिबिरे इत्यादी अनेक कार्यक्रम आहेत. अशा अनेक प्रकारच्या तज्ज्ञ  लोकांची येथे गरज आहे. तसेच वैद्यकीय क्षेत्रातील लोकांनाही आम्ही मेडिकल कॅम्पस घेण्यासाठी येथे आमंत्रण देऊ इच्छितो. प्रतिष्ठानतर्फे येथे अन्यही काही उपक्रम चालतात. वृक्षतोड थांबवून येथील शेतीचा विकास करण्याच्या दृष्टीने पर्यावरणप्रेमींची व कृषितज्ज्ञांचीही आवश्यकता आहे. साक्षरता मोहीम, स्वयंरोजगार प्रशिक्षण वर्ग असे उपक्रमही चालूच असतात.
'पूर्वांचल सीमा विकास प्रतिष्ठान'च्या वतीने आता मणिपूर येथे तीन शाळा चालवल्या जातात. 300हूनही अधिक मुले येथे लौकिक शिक्षणाबरोबरच, राष्ट्रीयत्वाचेही शिक्षण घेत आहेत. तिन्ही शाळांमधून दहावीपर्यंतच्या शिक्षणाची व्यवस्था करण्याच्या दृष्टीने प्रयत्न चालू आहेत. या शाळांना चांगल्या शिक्षकांची खूप गरज आहे. शिक्षण पूर्ण झाल्यावर लगेच नोकरी करण्याऐवजी 1 ते 2 वर्षे आमच्या शाळांत आपण द्यावी, असे आवाहन प्रतिष्ठानने तरुणांना केले आहे. मातृसत्ताक पध्दतीमुळे महिलांच्या दृष्टीने हा प्रदेश खूप सुरक्षित आहे. त्यामुळे तरुणींना, तसेच निवृत्त जीवन जगणाऱ्या ध्येयवादी विचारवंतांनाही आम्ही या लेखाद्वारे असेच आवाहन करतो आहोत. विविध दस्तऐवजांच्या लिखाणासाठी आणि वेगवेगळया प्रकारच्या मुलाखती घेऊ शकणाऱ्यांची इथे बरीच मदत होईल. निरनिराळया उत्सवांच्या फोटो व शूटिंगच्या निमित्ताने आपण येऊ शकता.
इतक्या मोठया संस्था चालवणे हे समाजाकडून होणाऱ्या आर्थिक मदतीशिवाय तर शक्यच नसते. म्हणूनच आर्थिकदृष्टया सक्षम नागरिकही या राष्ट्रकार्यासाठी सढळ हस्ते मदत करतील असा आम्हाला विश्वास वाटतो. प्रतिष्ठानच्या तिन्ही शाळा विनाअनुदानित आहेत. वसतिगृहात राहून शिक्षण घेणाऱ्या एका विद्यार्थ्याचा  वार्षिक खर्च वीस हजार रुपये आहे. अनिवासी विद्यार्थ्याचा वार्षिक खर्च दहा हजार रुपये आहे. या विद्यार्थी दत्तक योजनेबरोबरच संस्थेला इमारत उभारणी, वाचनालय, प्रयोगशाळा, संस्थेचा वार्षिक उत्सव, व्यवसाय मार्गदर्शन, शैक्षणिक तसेच आरोग्य विषयक शिबिरे, सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्प, शालेय साहित्य आणि वर्गातील फर्निचर व्यवस्था, क्रीडा साहित्य आदींसाठी निधीची आवश्यकता आहे.
(सर्व छायाचित्रे मनोज मेहता, डोंबिवली यांच्या सौजन्याने)
  8779682592
संपर्क :- 
पूर्व सीमा विकास प्रतिष्ठान, जयवंत कोंडविलकर.
मोबाइल- ९६१९७२०२१२. 
संस्थेसाठी मदतीचे धनादेश ‘पूर्व सीमा विकास प्रतिष्ठान' या नावाने काढावेत

No comments:

Post a Comment