भारताच्या विश्वासार्हतेचे
द्योतक ‘बुलेट ट्रेन!’
October 2, – विलास
सावजी
या ट्रेनला एक परिवहनाचे साधन एवढेच म्हणून न बघता या व्यवहारातून निर्माण झालेली भावनिकता अतिशय महत्त्वाची आहे. म्हणजेच भौतिकतेमुळे जे सुख किंवा समाधान मिळते त्यापेक्षा अनेक पटीने मानवी जीवनाच्या सर्वच क्षेत्रांना स्पर्श करणारी अशी ही घटना किंवा करार किंवा दोन्ही देशातील जवळीक निर्माण करणारा हा प्रसंग आहे असे आपणास खालील विवेचनावरून लक्षात येईल.
जपानची भौगोलिक रचना
जपान हा देश बेटांचा एक समूह आहे. यामध्ये चार मोठ्या बेटांचा समावेश होतो. १. होनशु २. हॉकीडोयो ३. शिकोयु, ४. कुश्शू याशिवाय सहा हजार छोट्या छोट्या बेटांचा जपान या देशात समावेश होतो. टोकियो ही जपानची राजधानी असून, लोकसंख्या १२ कोटी ७७ लाख २८ हजार आहे. येथील धर्म शितो व बुद्ध हे दोन मुख्य असून मुस्लिम व ख्रिश्चनांची संख्या नगण्य आहे.
अर्थव्यवस्था
आर्थिक संपन्नतेचा येथे अभाव आहे. सतत होणोर भूकंप, ज्वालामुखी, सुनामी यामुळे येथील १०० येन म्हणजे भारताचे ६० रुपये अशी स्थिती आहे. भारताचा रुपया हा जपानच्या येनपेक्षा जास्त किमतीचा मानला जातो. एवढा विरोधाभास असूनही जी.डी.पी.च्या तुलनेत जपानची अर्थव्यवस्था जगात दुसर्या क्रमांकावर आहे. या सर्वांसाठी काही महत्त्वाच्या बाबी जाणून घेतल्या पाहिजेत. महत्त्वाची बाब अशी की, यांची राष्ट्रीयता. हे यांचे भांडवल यांना फार मोठी शक्ती मिळवून देत असते. त्यामुळे अन्य कोणत्याही शक्तीपेक्षा राष्ट्रीयता व टेक्नॉलॉजी ही एवढी स्वयंपूर्ण व विश्वासार्ह आहे की, आज तेथील बुलेट ट्रेनला ५० वर्षे झालीत तरीही एकही अपघात या आगगाडीचा झाला नाही ही बाब टेक्नॉलॉजीच्या सर्वोच्च बिंदूवर पोहोचविणारी अशीच आहे.
मानव साधनसामुग्री जपानमध्ये एवढी समृद्ध आहे की, तेथील वस्तू या सर्व जगाला हव्या हव्या अशाच वाटत असतात. वस्तूकडून ज्या अपेक्षा असतात त्या वापरणार्याला परिपूर्ण मिळवून देणे हे जपानच्या उत्पादनाचे वैशिष्ट्य आहे.
जीक (जे.आय.सी.ए.) बँक : जीक या जपानमधील अर्थपुरवठा करणार्या संस्थेने भारतातील बुलेट ट्रेनला अर्थसाहाय्य करण्याचे ठरले आहे. (जॅपनीज इंटरनॅशनल को-ऑपरेशन एजन्सीज) असे या संस्थेचे नाव असून, या संस्थेने आतापर्यंत १५० देशांना विविध कामांसाठी कर्ज दिले आहे. याच्या कर्जामध्ये मुख्यत: कन्स्ट्रक्शनसारख्या स्थायी स्वरूपाच्या सामानांनाच ही संस्था खास करून कर्ज देत असते. साधारणात: एकंदर कर्जापैकी ३० टक्के कर्ज याच कामांना ही कंपनी देत असते, ज्यामुळे रोजगारनिर्मिती फार मोठ्या प्रमाणावर होत असते. २००७-०८ पासून दीड लाख कोटी रुपये सॉफ्ट लोन या कंपनीने आतापर्यंत दिले आहे. (सॉफ्ट लोन म्हणजे ज्याच्या व्याजाचा दर हा ०.१० पासून ते १.४ टक्क्यापर्यंत असतो.)
बुलेट ट्रेनशिवाय अन्य मेट्रो व रस्ते वाहतुकीसाठी ७३ कोटी रुपयांचेही काही वेगळे करार भारताने जपानशी केले आहे. बुलेट ट्रेनसाठी लागणार्या मोठ्या प्रमाणावरील वस्तू या भारतातच बनविल्या जातील व ट्रेनच्या कामासाठी वापरल्या जातील. परिणामत: रोजगाराला प्रचंड चालना मिळून साधारणत: प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष स्वरूपातील ३०,००० रोजगार मिळतील. मेक इन इंडिया ही जी मोदी सरकारची घोषणा आहे तिचे स्पष्ट उदाहरण म्हणून बुलेट ट्रेन ओळखली जाईल.
कर्ज या विषयातील सर्वात अभिमानाची गोष्ट अशी की, या कंपनीने सर्वात जास्त कर्ज हे भारताला दिले आहे. ही बाब भारतावरील जपानच्या विश्वासार्हतेचे सगळ्यात मोठे द्योतक मानले जाते.
बुलेट ट्रेन नुकसानकारक नाही
भाक्रा नांगल हे धरण जेव्हा पंडित जवाहरलाल नेहरूंच्या काळात बांधले जात होते तेव्हा प्रचंड प्रमाणावर सिमेंट या धरणासाठी वापरण्यात आले होते. तेव्हा टीकाकार म्हणत होते हे धरण बांधले नसते तर भारतातील सर्व रस्ते सिमेंटचे करता आले असते व काही सिमेंट उरलेही असते. खरोखरीच ही बाब आम माणसाच्या दृष्टीने अतिशय योग्य व विचार करावयास लावणारी नव्हे काय? याच संदर्भात आजच्या सरकारवर टीका केली जाते की, १ लाख कोटी रुपयांची बुलेट ट्रेन न बनवता एवढेच रुपये रेल्वे खात्याने खर्च केले असते तर आज रेल्वेचे चित्र आमूलाग्र बदललेले असते व सर्व भारतभर रेल्वेचे जाळे जे वाहतुकीसाठी अत्यंत स्वस्त असून टिकावू स्वरूपाचे आहे ते निर्माण करता आले असते.
टीकाकारांचे म्हणणे धरणाबाबत व ट्रेनबाबत अगदी वरवर पाहता कोणालाही सहज पटण्यासारखे असेच वाटते, पण आर्थिक, राजकीय व सामाजिक दृष्टिकोनातून या विषयाकडे पाहिल्यास बुलेट ट्रेनचा हा निर्णय सर्वार्थाने अतिशय यथायोग्य असून, सर्वांच्या कामाचा असाच आहे, हे खालील विश्लेषणातून जाणवेल.
२०१७ पासून या ट्रेनचे काम सुरू होईल. पाच वर्षांत काम पूर्ण होणे अपेक्षित आहे. म्हणजेच २०२२ पर्यंत हे काम पूर्ण होऊन ट्रेनचे उत्पन्न सुरू होईल असा अंदाज आहे. यानंतर १५ वर्षांनी म्हणजेच २०३७ पासून कर्जाची परतफेड सुरू होईल. या कर्जावरील व्याजदर हा अतिशय कमी म्हणजे ०.१ टक्के आहे. याचाच अर्थ असा की, १० लाख रुपये व्याजासह हप्ते २०३५ पासून फेडावयाचे आहेत. अर्थतज्ज्ञांचे मत असे आहे की, आर्थिकदृष्ट्या हा सौदा अतिशय फायद्याचा असून यामध्ये जपानचेही हित जोपासले गेले आहे. बुलेट ट्रेन या व्यवसायात जपान आज गेली ५० वर्षांपासून कार्य करीत आहे. त्यामुळे या सर्वांमध्ये जपान अतिशय कुशलतेने ट्रेनची निर्मिती करू शकेल.
दुसरे असे की, राजकीयदृष्ट्या भारताला जपानसारखा मित्र मिळणे. जपानशी जवळीक साधण्याची संधी मिळणे ही बाब अतिशय द्रष्टेपणाचे लक्षण असणारी आहे. याचा परिणामही आपणास लगेच दिसला व तो म्हणजे चीन, पाकिस्तान व आपल्या अन्य हितशत्रूंना या कराराचा फार मोठा धसका बसला आहे. या देशांना हे जाणवू लागले की, जपान व भारत जवळ येणे हे राजकीय दृष्टीने अतिशय अयोग्य असून, त्यांच्या प्रगतीला यामुळे खीळ पडेल, असेही असल्याची राजकीय पंडितांमध्ये चर्चा आहे.
ट्रेनची रचना
ही ट्रेन अतिशय अत्याधुनिक अशी असेल. यात मानवी चुकांना कोठेही वाव नाही. परिणामत: अपघातमुक्त असे या ट्रेनचे स्वरूप राहून ताशी वेग ३२० राहील. ५०८ किलोमीटरचे मुंबई-अहमदाबाद हे अंतर कापण्यास ही ट्रेन फक्त ३ तास घेईल असे या ट्रेनचे स्वरूप राहील.
आज भारतातील रेल्वेची परिस्थिती अतिशय चिंताजनक आहे. भविष्यात अनेक रेल्वे ट्रॅक्स बदलावे लागणार आहे. या ट्रेनच्या निमित्ताने रेल्वेच्या युगात एक नवीन प्रसादचिन्ह निर्माण झाले आहे, असे म्हटल्यास वावगे होणार नाही. रेल्वे क्रांती असेही काही जाणकारांनी या बुलेट ट्रेनचे वर्णन केले आहे. एका वृत्तपत्र संपादकाने या बाबत लिहिताना म्हटले आहे की, परिवहनाच्या इतिहासात हा एक नवा दिशादर्शक असा प्रकल्प असणार आहे. जेव्हा एखादी मोठी गोष्ट किंवा नावीन्यपूर्ण बाब अस्तित्वात येते तेव्हा त्याचे परिणाम फार दूरगामी असे होतात.
दोन्ही देशांचे आर्थिक अथवा कोणत्याही प्रकारचे संबंध असण्याबाबत एक चर्चा अशीही आहे की, जपानला सध्या उत्तर कोरियापासून फार मोठा धोका आहे. एवढा धोका आहे की, अडीच कोटी लोकसंख्या असणारा हा छोटा देश जपानसारख्या अत्यंत प्रभावी देशाला समुद्रात बुडवून टाकण्याच्या प्रयत्नात आहे व या अशा भयंकर संकटापासून आपणास प्रबळ आधार असावयास पाहिजे व असा प्रभावी साथीदार फक्त भारताच्याच रूपाने आपणास मिळू शकतो अशी सुप्त इच्छासुद्धा जपानने पूर्ण करून घेतली आहे. असो. एकंदरीत जागतिक स्तरावर अत्यंत प्रभावी अशी ही घटना होय एवढे निश्चित.
No comments:
Post a Comment