Total Pageviews

Sunday, 22 October 2017

गोरगरीब जनतेचे जीवन कस्पटासमान झाले असे दिसते. म्हणूनच रेल्वे पुलावरची चेंगराचेंगरी असो, कर्जबाजारी शेतकऱयांच्या आत्महत्या, स्वाईन फ्लू वा अन्य रोगराईचे बळी असोत किंवा रोज होणारे अपघात, घात-पात असोत माणसांची उपलब्धता वाढल्यामुळे त्यांच्या जीवाची किंमत उरली नाही याचीच प्रचिती येते

सगाव तालुक्यातील मणेराजुरी गावाजवळ ऐन दिवाळीत झालेल्या भीषण अपघातात दहा जण ठार तर 22 जण जखमी झाले आणि सण-उत्सवाच्या आनंदात असणारे सर्वच हादरून गेले. अपघात होणे, त्यात जीवित, वित्तहानी होणे तसे नवे नाही, पण ऐन दिवाळीत गरीब-कष्टकरी मजूर हकनाक बळी जावेत ही सर्वांनाच दु:ख देणारी दुर्घंटना ठरली. या अपघाताची चौकशी होईल, जखमींना  आणि बळी गेलेल्या दुर्दैवी जीवांच्या नातेवाईकांना थोडीफार आर्थिक मदत दिली जाईल. पुन्हा सारे नेहमीप्रमाणे सुरू होईल. नव्हे सुरू झाले आहे. माणसांच्या जीवाची किंमत स्वस्त होते आहे याचेच हे निदर्शक आहे. वस्तुंची किंमत मागणी-पुरवठय़ावर ठरते. कांदा भरपूर पिकला तर दोन रू. किलो, कांदा पीक वाया गेले तर शंभर रु. किलो हे आपण अनुभवतो. पण, माणसाची किंमत तशी ठरवता येत नाही. अलीकडे जे प्रकार सुरू आहेत किंवा माणसांच्या जीवनाकडे ‘व्यवस्था’ म्हणून पाहण्याची जी संवेदना दिसते ती लक्षात घेता गोरगरीब जनतेचे जीवन कस्पटासमान झाले असे दिसते. म्हणूनच रेल्वे पुलावरची चेंगराचेंगरी असो, कर्जबाजारी शेतकऱयांच्या आत्महत्या, स्वाईन फ्लू वा अन्य रोगराईचे बळी असोत किंवा रोज होणारे अपघात, घात-पात असोत माणसांची उपलब्धता वाढल्यामुळे त्यांच्या जीवाची किंमत उरली नाही याचीच प्रचिती येते. एखादा जीव विमान अपघातात गेला तर त्याला मिळणारी भरपाई आणि तोच जीव एस.टी, रेल्वे किंवा वडाप अपघातात गेला तर त्याला मिळणारी भरपाई यातील तफावतही संतापजनक आहे. मुंबईत रेल्वे पुलावर फूल पडले की पूल पडला या संभ्रमातून झालेली चेंगराचेंगरी व मोठय़ा संख्येने गेलेले बळी क्लेशकारक आहेतच पण, यांना तातडीने दोन लाख मदत मिळते आणि शेतकरी किंवा मणेराजुरी फरशी ट्रक अपघातातील जखमींना वा मृतांच्या नातेवाईकांना मदतीची वाट पहावी लागते हे अधिक क्लेशकारक आहे. यात समाज म्हणून, प्रशासन म्हणून, कल्याणकारी राज्य म्हणून आपली संवेदनशीलता, न्यायबुद्धी उरली नाही याची प्रचिती येते. हे बळी एस. टी. संपाचे आहेत असे म्हटले जाते. वरवर पाहता तसे दिसतेही. एस.टी. कर्मचाऱयांनी ऐन दिवाळीत आपणास सातव्या वेतन आयोगाचा पगार मिळावा म्हणून एस.टीची चाके थांबवली आणि शासनाच्या नावाने मुंडन केले. काळी दिवाळी साजरी केली. ओघानेच प्रवाशांचे हाल झाले. त्यांची लूट झाली आणि ‘सरकार’ नावाची व्यवस्था यातून मार्ग काढू शकली नाही. दिवाळीत प्रवास करणाऱया अनेकांची अडवणूक झाली, खासगी आराम गाडय़ांनी नेहमीपेक्षा चौपट, पाचपट रक्कम घेऊन वाहतूक केली. वडापच्या गाडय़ानी तोच कित्ता गिरवला, एस.टी स्टँड समोर स्कूल बसेस, वडाप गाडय़ा, सहा सीटर रिक्षा, टेम्पो यातून प्रचंड दर आकारून जनावरासारखी वाहतूक सुरू होती. अगतिकता होती आणि लूट होत असल्याची जाणीव होत होती पण, अपरिहार्यता होती. राज्यकर्त्यांचे व मंत्री वगैरे कुणाचे आवाहन मानून संप मागे घेतला असे झाले नाही आणि लोकांची पर्यायी, रास्त दराची, नेटकी व्यवस्था प्रशासन करू शकले नाही. शेवटी कोर्टाचा आदेश झाला व संप मिटला आणि कोर्टाने संबंधितांचे कान पकडले, सरकारला ठरावीक मुदतीत पगारवाढीचे आदेश दिले. यातून यंत्रणेचे, नेतृत्वाचे अपयश अधोरेखित झाले. एस.टीची चाके थांबूनही दिवाळी साजरी झाली आणि एस. टी. कामगारांना विश्वास देईल असा नेता उरला नाही. पुढे आला नाही. एका अर्थी एकूण व्यवस्थेचाच बळी गेला. ओघानेच अशा भयंकर वेळी वेगवेगळय़ा दुर्घंटना होतात तसाच हा अपघात झाला आणि दिवाळीची अंघोळ करून गावाहून कामावर परतणाऱया कामगारांवर मृत्यूने घाव घातला. पहाटेच्या अंधारात हा लोड ट्रक उलटला आणि दहा मजूर जागीच ठार झाले. अंगावर फरशा पडल्याने व त्याखाली गाडले गेल्याने 22 जण जखमी झाले. स्थानिक पोलीस, प्रशासन यांनी मदत व बचावकार्याची तातडी केली. पण, घटना एवढी गंभीर आणि आघातकारी होती की कुणाच्याही अंगावर शहारे यावेत आणि दु:खाचा मोठा धक्का बसावा. संपामुळे हे झाले असे वाटत असले तरी ते सर्वथा खरे नाही, महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवर आणि अन्य भागात मोठय़ा प्रमाणात अवैध वाहतूक होत असते. वाळू-खडी-फरशी, अमली पदार्थ, गोवा मेड दारू अशी असंख्य उदाहरणे सांगता येतील. एस. टी. संप नसतानाही असे अपघात झाले आहेत. ही सारी संघटित गुन्हेगारी आहे. अलीकडे अवैध वाळू वाहतुकीवर कारवाई झाली. त्यातून या संघटित गुन्हेगारांचे जे चित्र समोर आले आहे ते ‘ना खाऊंगा ना खाने दुंगा’ या घोषणेनंतरही यंत्रणेत काय सुरू आहे यांचे दर्शन घडवणारे आहे. वाळू माफिया, मुरूममाफिया व त्यांची संघटित गुन्हेगारी व त्यांना वश महसूल-पोलीस व राजकीय यंत्रणा चक्राऊन सोडणारी आहे. फरशी वाहतूक करणारा हा ट्रक कसा होता, त्यात सारे नियमाप्रमाणे होते का? ड्रायव्हर प्रशिक्षित होता का असे असंख्य प्रश्न उपस्थित होणे साहजिक आहे. या दुर्घटनेनंतर यावर चर्चा होईल, एखादे परिपत्रक निघेल पण असे प्रकार थांबतील का? या प्रश्नाचे उत्तर दुर्दैवाने नकारार्थीचे मिळते आहे. या रोडवर लुटीची नवी यंत्रणा सुरू होईल. बाकी काही होणार नाही असे वास्तव खासगीत सांगितले जाते आहे. मृत झालेले सर्व मजूर बिदर, विजापूर, गुलबर्गा या भागातले आहेत. त्यांच्या कुटुंबीयावर जी दुर्दैवी वेळ आली आहे ती कोणत्याही शब्दांनी व भरपाईने भरून न येणारी आहे. आपण समाज म्हणून, सरकार म्हणून या सर्व अगतिकतेचा दुर्दैवी परिस्थितीचा गंभीर विचार केला पाहिजे. जीवित हानी होणार नाही अशी व्यवस्था उभारली पाहिजे. आपत्ती निवारण वगैरे आपल्याकडे समित्या आहेत. त्यासाठी मंत्री आहेत. पण, आपत्ती होऊ नये यासाठीचे प्रयत्न तोकडे आहेत. या अपघातानंतर या साऱयाचा गंभीर विचार झाला तर बरे होईल, असे अपघात पुन्हा घडणार नाहीत. लोकांचे बळी व लूट होणार नाही आणि एस. टी. कामगारांनाही कमी पगारात राबवले जाणार नाही, याची सरकार, समाज म्हणून काळजी घ्यावी लागेल.

No comments:

Post a Comment