Total Pageviews

Tuesday, 10 October 2017

रोजगार दिल्यास हातात दगड दिसणार नाहीत-

October 9, 2017
मच्छिंद्र ऐनापुरे<<
केंद्र सरकारकडून कश्मीर प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत हे नाकारून चालणार नाही, पण कश्मीरमधील नागरिकांना ज्याची आवश्यकता आहे तीच गोष्ट आपल्याकडून दिली जात नाही. त्यामुळे हिंदुस्थानकडून जे काही कश्मीर प्रश्नाच्या उकलीसाठी प्रयत्न सुरू आहेत ते व्यर्थ जात आहेत. सर्जिकल स्ट्राइक असो किंवा सैन्यांद्वारे आतंकमुक्त कश्मीरचा निर्णय असो अथवा एक-एक करून दहशतवाद्यांना टिपण्याचे प्रकार असोत ही कामे धाडसाची आहेत. मात्र या गोष्टी वेळच्या वेळी होण्याची गरज होती. तसे झाले असते तर आज कश्मिरी युवकांच्या हातात दगड दिसले नसते आणि ते सैनिकांवर फेकले गेले नसते. आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे हे सगळे प्रयत्न स्थायी स्वरूपाचे आहेत. कश्मिरी तरुणांच्या हातात दगड आणि त्यांचा आतंकवाद्यांशी वाढत चाललेला संबंध या समस्यांचे मूळ नष्ट करायचे असेल तर आपल्याला कश्मिरी युवकांना रोजगार देण्याची आवश्यकता आहे. या युवकांना दहशतवादी पैसा देऊनच भडकवत आहेत. त्यांना आपल्याकडे आकर्षित करीत आहेत. बेरोजगार तरुण आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी दगडफेक करून किंवा आतंकी कारवायांमध्ये भाग घेऊन आपल्या आर्थिक गरजा पूर्ण करीत आहेत. मीडियावाल्यांनी ज्या ज्या वेळेला दगडफेक करणाऱ्या कश्मिरी तरुणांशी संवाद साधला त्या त्या वेळेला ही मंडळी फक्त पैशांसाठी सर्व काही करीत आल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यांना ना स्वातंत्र्याचा अर्थ माहीत आहे किंवा ना त्यांना दगडफेकीमागचा उद्देश माहीत आहे. त्यांना फक्त यासाठी आपल्याला पैसा मिळतो हीच एक गोष्ट माहीत आहे.
केंद्र सरकारमधील अनेक खात्यांत हजारो पदे रिक्त आहेत. या रिक्त पदांमुळे देशात विकस्कळीतपणा आला आहे. अव्यवस्था निर्माण झाली आहे. लोकांची वेळेत कामे होत नाहीत. अपघात होत आहेत. या विविध स्तरांवरील कामांत सुसूत्रता येण्यासाठी नोकरभरती आवश्यक आहे. अलीकडेच जे रेल्वे अपघात झाले त्यानिमित्ताने रेल्वे विभागात लाखो पदांच्या जागा रिक्त पडल्या असल्याचे समोर आले आहे. रेल्वेची रूळ दुरुस्ती, देखभालीच्या कामांसाठी मनुष्यबळ उपलब्ध नसल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे रेल्वे खात्याला एकप्रकारची अवकळा आली आहे. अशीच अवस्था आपल्या लष्कराची आहे. सैन्य दलात तब्बल ५२ हजार पदे रिक्त आहेत. पोस्ट कार्यालयातही काही हजार पदे रिक्त आहेत. एफसीआय आणि दूरसंचार विभागातही अशीच अवस्था आहे. या जागा फक्त केंद्र सरकारच्या अखत्यारीत विविध विभागांत आहेत. राज्यांचा प्रश्न वेगळा आहे. जर केंद्र सरकारने मनात आणले आणि या रिक्त जागा भरताना कश्मिरी युवकांनाही योग्य प्रमाणात संधी दिली तर देश तोडण्याचा जो प्रयत्न पाकिस्तान किंवा दहशतवादी करीत आहेत त्याला आपोआपच आळा बसेल किंवा या तरुणांना त्यांच्या राज्यातच, म्हणजे जम्मू-कश्मीरमध्ये रोजगाराच्या, स्वयंरोजगाराच्या संधी केंद्राने उपलब्ध करून द्याव्यात. कश्मिरी तरुणांना रोजगार मिळाला तर ते जे पैशांसाठी देशात किंवा कश्मीरमध्ये आपल्या कृत्याने अशांतता निर्माण करीत आहेत, आपल्याच देशाचे आर्थिक, सामाजिक, भावनिक नुकसान करीत आहेत ते आपोआप थांबेल आणि लोकांना तत्पर आणि चांगल्या सुविधा उपलब्ध होतील. नोकरभरती करताना काही मापदंड लावता येईल, पण कश्मिरी तरुणांना रोजगार मिळवून देण्याची आवश्यकता आहे. कश्मीर अशांत असल्याने त्याचा परिणाम पर्यटनावरही होत आहे. कश्मीर आपल्या देशाचे नाक आहे. सृष्टीसौंदर्याने नटलेला प्रदेश आहे. तिथे पर्यटकांना सुरक्षा मिळाल्यास पर्यटन वाढणार आहे. शिवाय तिथल्या तरुणांना रोजगारही मिळणार आहे. कश्मिरी तरुणांच्या हाताला काम दिल्यावर त्यांच्या हातात दगड कसे येतील? प्रत्येकाला आपल्या पोटाची आग शमवायची आहे. ती आग चांगल्या कामातून, चित्त शांत ठेवून शमत असेल तर हे तरुण वाईट मार्गाला का लागतील?


No comments:

Post a Comment