Total Pageviews

Monday, 2 October 2017

सैनिकाच्या घरापर्यंत दहशतवादी येऊन पोहोचणे म्हणजे देशाचा संरक्षणकर्ताच धोक्यात असल्याचे लक्षात येते

सैनिकाच्या घरापर्यंत दहशतवादी येऊन पोहोचणे म्हणजे देशाचा संरक्षणकर्ताच धोक्यात असल्याचे लक्षात येते. या धोक्याने उग्र रूप धारण करण्यापूर्वीच संरक्षण मंत्रालयाने आपली तत्परता दाखवली पाहिजे. दहशतवाद्यांना सैनिकांच्या जागत्या पहाऱ्यामुळे कश्मीरमध्ये त्यांचे मनसुबे यशस्वी करण्यात अडचणी येत असतात. त्यामुळे त्यांच्यावरच हल्ले केले जात आहेत. विशेषतः कश्मीरचे निवासी असणाऱ्या सैनिकांनी सावध असणे अत्यावश्यक असल्याचे त्यांच्यावरील हल्ल्यांच्या घटना सांगून जातात. दहशतवादी पाळत ठेवून सैनिकांचा घात करू लागले आहेत. त्यामुळे संरक्षण मंत्रालयाने विचार केला पाहिजे,
दहशतवाद्यांनी एका बीएसएफ जवानाच्या घरात घुसून त्याची हत्या केल्याची धक्कादायक घटना उत्तर कश्मीरमधील बांदिपोरा जिह्यात घडली आहे. हल्ल्यात हुतात्मा झालेल्या सैनिकाचे नाव रमीझ अहमद पारे (३०) असे आहे. रमीझ याचं घर हाजीनमधील पारे मोहल्ल्यात असून दहशतवाद्यांनी नियोजनबद्धपणे रमीझ यांच्यावर हल्ला केला. दहशतवाद्यांनी घरात घुसून अंदाधुंद गोळीबार केला. त्यात रमीझ यांचा जागीच मृत्यू झाला तर रमीझचे वडील, भाऊ आणि चुलती या हल्ल्यात गंभीररीत्या जखमी झाले आहेत. रमीझ राजस्थानात सेवा बजावत होते आणि सध्या ते सुट्टीवर आले होते.
राष्ट्रीय प्रबोधिनी अकादमीमधून सहा महिन्यांपूर्वी सैन्यात अधिकारी म्हणून नियुक्त झालेला २३ वर्षीय युवक नातेवाईकांच्या विवाहासाठी सुट्टीवर घरी आला होता. त्यास शस्त्रांचा धाक दाखवून विवाहघरातून दहशतवादी घेऊन गेले. त्या युवा अधिकाऱ्याचा गोळ्यांनी छिन्नविच्छिन्न केलेला देह दुसऱ्या दिवशी सकाळी तेथील परिसरामध्ये सापडला. त्यानंतर पुन्हा सैनिकाच्याच विषयी पण वेगळ्या प्रकारची घटना कश्मीरमध्ये घडली आहे.
हिंदुस्थानी सैन्याने मागील काही महिन्यांपासून कश्मीरमध्ये दहशतवाद्यांचे उच्चाटन करण्याची मोहीम अधिक तीव्र केली आहे आणि त्यास उत्तम यशही मिळत आहे. या दरम्यान काही बडय़ा दहशतवादी संघटनांच्या दहशतवाद्यांचा नायनाट करण्यात सैनिकांना मिळालेले यश नक्कीच प्रशंसनीय आहे. सैनिकांना मिळत असलेले हे यश म्हणजे दहशतवादी संघटनांच्या नाकावर टिच्चून पाय देत दहशतवाद्यांची कोंडी करणे आहे. त्यामुळे चवताळून उठलेले दहशतवादी आपला मोर्चा सैन्यामध्ये सेवेत असणाऱ्या कश्मीरचे निवासी असलेल्या सैनिकांकडे वळवत असल्याचे सूतोवाच बीएसएफ जवानाच्या घरात घुसून केलेल्या हत्येच्या घटनेतून होते. दहशतवाद्यांच्या या नीतीकडे अधिक बारकाईने लक्ष देणे आवश्यक आहे. कश्मीरमधील राष्ट्रद्रोही सैनिकांवर दगडफेक तर करतातच, तर आता दहशतवादी सैनिकांना व त्यांच्या कुटुंबीयांना घरात घुसून लक्ष्य करत आहेत. सैन्याचे मनोबल खच्ची करण्याचा हा डाव उधळून लावला पाहिजे.
कश्मीरमधील युवकांनी सैन्यात दाखल होऊ नये आणि झाल्यास त्याचे परिणाम काय होतात हेही दाखवून दिले जात आहे. जगाच्या पाठीवर अशा घटना कोणत्या देशामध्ये घडत असल्याचे ऐकिवात, वाचनामध्ये नाही. दहशतवाद्यांची हिंदुस्थानविरुद्धची लढाई एका वेगळ्या टप्प्यावर आली आहे. त्यासाठी ते नवीन क्लृप्त्या लढवून आपण कुठपर्यंत पोचू शकतो हे लक्षात आणून देत आहेत. कसेही करून सैनिकांना आपल्या धाकाखाली ठेवण्याचा त्यांचा आटापिटा सुरू आहे. सैनिकांच्या केसालाही धक्का लागल्यास काय होऊ शकते हे पाकिस्तानच्या भाडोत्री दहशतवाद्यांना दाखवून द्यायलाच पाहिजे. सैनिकांच्या दिशेने येणारी त्यांची प्रत्येक चाल उधळवून लावत त्यांना कंठस्नान घातले पाहिजे. दहशवाद्यांना शोधण्यासाठी सैनिक सातत्याने मोहिमा आखत असतात. या ठिकाणी दहशतवाद्यांनी सैनिकांविरुद्ध नियोजनबद्धपणे मोहीम आखून भ्याड हल्ले केले आहेत.
 सैनिकाच्या घरापर्यंत दहशतवादी येऊन पोचणे म्हणजे देशाचा संरक्षणकर्ताच धोक्यात असल्याचे लक्षात येते. या सूत्राने उग्र रूप धारण करण्यापूर्वीच याविषयी संरक्षण मंत्रालयाने आपली तत्परता दाखवली पाहिजे. दहशतवाद्यांना सैनिकांच्या जागत्या पहाऱ्यामुळे कश्मीरमध्ये त्यांचे मनसुबे यशस्वी करण्यात अडचणी येत असतात. त्यामुळे त्यांच्यावरच हल्ले केले जात आहेत. विशेषतः कश्मीरचे निवासी असणाऱ्या सैनिकांनी सावध असणे अत्यावश्यक असल्याचे त्यांच्यावरील हल्ल्यांच्या घटना सांगून जातात. दहशतवादी पाळत ठेवून सैनिकांचा घात करू लागले आहेत. त्यामुळे कश्मीरच्या सैनिकांनी सुट्टीवर असतानाही शस्त्रसज्ज कसे राहता येईल याचा संरक्षण मंत्रालयाने विचार केला पाहिजे, अशी स्थिती आहे. शत्रू फक्त सीमेवर नसून त्याने सीमा ओलांडून धुमाकूळ घालण्यास केव्हाच आरंभ केला आहे. धुमाकूळ घालण्याच्या पद्धती निराळ्या आहेत. कधी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी सैनिकांच्या वाहनांचा ताफा जात असताना अंदाधुंध गोळीबार करणे, रस्त्यामध्ये भूसुरुंग लावणे तर आता सैनिकांच्या घरापर्यंत पोचण्यापर्यंत त्यांची मजल पोचली आहे. सैनिकांसोबत पोलिसांवरही कश्मीरमध्ये हल्ले सुरूच असतात. काही महिन्यांपूर्वी एका प्रार्थनास्थळाबाहेर सुरक्षेस तैनात असलेल्या पोलिसाशी स्थानिक नागरिकांनी हुज्जत घालून त्याला केलेल्या अमानुष मारहाणीत त्याचा मृत्यू झाला होता.
शत्रूवर आक्रमण करण्यासाठी हिंदुस्थानला इस्रायल या देशाची युद्धनीती वापरण्यास पर्याय नाही. म्हणूनच तर इस्लामी राष्ट्रांनी वेढलेला तो देश आपल्या आक्रमकतेच्या बळावर त्या ठिकाणी स्वतःचे वेगळेपण टिकवून आहे. हिंदुस्थानात मात्र दहशतवाद्यांविरुद्ध लढताना सैनिक हुतात्मा होत आहेत, घरी सुट्टीवर पोचल्यावरही दहशतवादी सैनिकांचे प्राण घेत आहेत. सैनिकांची ही असुरक्षितता प्रकर्षाने लक्ष वेधते. दुसरे सूत्र असे की, पोलीस, सैनिकांच्या निवासी संकुलांवरही दहशतवाद्यांचे लक्ष असते. त्यांनी निवासी संकुलात घुसण्याचा अनेकदा प्रयत्न केला आहे आणि ते कायमच त्यांच्या निशाण्यावर असतात.
प्राणांची बाजी लावून सैनिक देशाचे रक्षण करत असतात. यात दुमत नाही. अपवाद फक्त सैनिकांच्या शौर्यावर शंका घेणाऱ्यांचा आहे. कारण चांगल्या गोष्टीची निंदा करून वाचाळपणा करणे हेच त्यांच्या दृष्टीने शौर्य असते. म्हणूनच तर सैनिकांच्या घरापर्यंत पोचलेल्या दहशतवादाविषयी बोलण्यासाठी त्यांची वाचाच बसली आहे. सैनिकांसारखा त्याग यांना कधीच जमणार नाही. जे त्यागी व्यक्तीस नाव ठेवू शकतात त्यांच्या दृष्टीने दहशतवादीच त्यांचे ‘हीरो’ समजायचे का? सैनिकांचेच रक्षण कोण करणार अशी वेळ येऊ घातली आहे का, असा प्रश्न पडावा असे सैनिकांच्याच विषयीचे दोन प्रसंग संरक्षण मंत्रालयाकडे जनतेला अपेक्षित असे उत्तर मागत आहेत.

No comments:

Post a Comment