केरळची भूमी ही निसर्गाने मुक्तहस्ताने सौंदर्याची उधळण केलेली ‘देवभूमी’ म्हणून ओळखली जात असली तरी या भूमीत गेल्या काही दशकांपासून राजकीय हिंसाचाराने थैमान घातले असल्याने तेथील वातावरण रक्तरंजित झाले आहे. डाव्यांच्या राजकीय दहशतवादाला आणि जिहादींच्या धार्मिक दहशतवादाला राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि संघ परिवारातील विविध संघटना यांनी आव्हान दिल्याने तेथील लाल आणि जिहादी दहशतवादी अस्वस्थ झाले आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आज केरळमध्ये पाय घट्ट रोवून उभा आहे. जशास तसे उत्तर देण्याची तेथील कार्यकर्त्यांची मानसिकता तयार झाली असल्याने लाल जिहादी तत्त्वांच्या पायाखालची वाळू घसरू लागली आहे. त्यातच आता भारतीय जनता पक्षाने केरळमधील लाल जिहादी दहशतवादाविरुद्ध जनमत जागृत करण्यासाठी जी जनरक्षा यात्रा काढली, त्यामुळे या मंडळींचा पारा आणखी चढला आहे.
भारतीय जनता पक्षाने गेल्या ३ ऑक्टोबरपासून पय्यान्नूर, कन्नूर येथून जनरक्षा यात्रा सुरू केली. राजकीय हिंसाचारात बळी पडलेल्या कार्यकर्त्यांच्या बलिदानाचे स्मरण करून भाजप अध्यक्ष अमित शाह यांच्या उपस्थितीत आणि केरळ भाजप अध्यक्ष कुम्मानामराजशेखरन यांच्या नेतृत्वाखाली या जनरक्षा यात्रेस मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला. या यात्रेची सांगता आज, दि. १७ ऑक्टोबर रोजी तिरुवनंतपुरमयेथे होत आहे. त्या कार्यक्रमात भाजप अध्यक्ष अमित शाह यांच्यासह अनेक केंद्रीय नेतेमंडळी सहभागी होत आहेत. जनरक्षा यात्रा चालू झाल्यावर आणि त्या आधीही विरोधकांनी कोल्हेकुई करण्यास सुरुवात केली होती. केरळमधील सलोख्याचे वातावरण बिघडविण्याचा या यात्रेमागचा हेतू असल्याचे आरोप करण्यात आले. या भूमीत हिंदुत्ववादी विचारसरणी रुजणार नाही, असेही विचार व्यक्त करण्यात आले. पण, संघविचार गेल्या कित्येक काळापासून येथे ठामपणे रुजलेला आहे आणि लक्ष लक्ष कार्यकर्ते हा विचार सर्वदूर पसरविण्यासाठी कार्यरत आहेत, हे त्या पामरांच्या कधी लक्षात येणार? राष्ट्रासाठी सर्वस्व समर्पण करण्याचे बाळकडू मिळालेले हे कार्यकर्ते राजकीय हत्यांना थोडेच घाबरणार!
कन्नूर जिल्ह्यात गेल्या चार दशकापासून राजकीय हिंसाचार मोठ्या प्रमाणात होत आहे. संघ आणि संघ परिवारातील अनेकांच्या हत्या करण्यात आल्या आहेत. केरळमध्ये मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष १९६९ पासूनच अशा राजकीय हत्यांमध्ये गुंतला असला तरी मार्क्सवादी नेते पिनरई विजयन यांच्या नेतृत्वाखाली डाव्या आघाडीचे सरकार २५ मे २०१६ मध्ये सत्तेवर आल्यानंतर संघ, संघ परिवारातील कार्यकर्त्यांच्या हत्या मोठ्या प्रमाणात होत आहेत. विजयन सरकार सत्तेवर आल्यानंतर ज्या १४ राजकीय हत्या झाल्या, त्यातील १२ हत्या या संघ आणि संघ परिवाराशी संबंधित कार्यकर्त्यांच्या होत्या! या कार्यकर्त्यांची काय चूक होती? चूक एकच होती, ती म्हणजे प्रखर राष्ट्रवादाचा विचार केरळच्या भूमीत रुजविण्यासाठी ते सर्व समर्पित भावनेने कार्य करीत होते आणि लाल जिहादी दहशतवादाविरुद्ध शड्डू ठोकून उभे होते. फुटीर, राष्ट्रद्रोही शक्तींना हे सहन होणे शक्य नसल्याने त्यातून त्यांच्या हत्या झाल्या! मार्क्सवादी कार्यकर्त्यांनी संपूर्ण केरळ राज्यात असे हत्यासत्र चालवले असून त्यांचा बालेकिल्ला समजल्या जाणार्या कन्नूर जिल्ह्यात या राजकीय हिंसाचाराचे प्रमाण प्रचंड आहे. असे असूनही संघाचे कामत्या राज्यात फोफावतच आहे.
मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने भाजपने केरळमध्ये आणि देशाच्या विविध भागात काढण्यात येत असलेल्या जनरक्षा यात्रांचा धसका घेतला. राजधानी दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन ‘आम्ही कसे साळसूद आहोत,’ ‘आमच्या पक्षाचेच कार्यकर्ते राजकीय हिंसाचारात अधिक मारले गेले,’ हे आकडेवारीनिशी दाखविण्याचा त्यांनी केविलवाणा प्रयत्न केला. त्यांच्या या म्हणण्याची किती दखल घेतली गेली, हे तेच जाणोत!
केरळमध्ये एकीकडे मार्क्सवाद्यांचा राजकीय हिंसाचार आणि दुसरीकडे इस्लामी जिहादी दहशतवाद वाढत चालला आहे. या जिहादी तत्त्वांच्या राष्ट्रविरोधी कारवायांमध्ये पूर्वीपेक्षा जास्त वाढ झाली आहे. ‘लव्ह जिहाद’, खून, अमानुष हल्ले, फुटीर, राष्ट्रविरोधी शक्तींच्या कारवाया ही त्या राज्यातील नित्याचीच बाब झाली आहे. संघ, संघ परिवारातील अनेक कार्यकर्ते या जिहादी हल्ल्यात बळी पडलेले आहेत. इस्लामी दह्शतवाद्यांनी मे २०१३ मध्ये मराडू येथे आठ हिंदूंची दिवसाढवळ्या जी नृशंस हत्या केली होती, ती जनता विसरणे शक्य नाही. ‘लव्ह जिहाद’, ‘सायबर जिहाद’, ‘लँड जिहाद’ असे ‘जिहाद’चे विविध प्रकार केरळमध्ये चर्चिले जात आहेत. या जिहादी दहशतवाद्यांनी एका ख्रिस्ती प्राध्यापकाचा हात कलमकेला होता, हे वाचकांच्या स्मरणात असेलच. ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’ आणि अन्य धर्मांध संघटना केरळमधील वातावरण कलुषित करीत आहेत. ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’ने २०१२ मध्ये कासारगोड येथे लष्करी वेशात जे संचलन काढले होते, ज्या कवायती केल्या होत्या ते पाहून देशवासीयांच्या भुवया उंचावल्या गेल्या होत्या. केरळमध्ये लाल आणि हिरव्या जिहादी दहशतवादाविरुद्ध जनजागृती करण्यासाठी भाजपने जनरक्षा यात्रेचे आयोजन केले. जनजागृती हा हेतू त्यामागे होता, पण मार्क्सवादी मंडळीना त्यात राजकारण दिसले. या यात्रेदरम्यान झालेल्या एका पोटनिवडणुकीत मिळालेल्या यशाने मुख्यमंत्री विजयन हुरळून गेले आणि केरळची जनता भाजपच्या जनरक्षा यात्रेसारख्या गोष्टींना बळी पडत नसल्याचे मत व्यक्त केले. या पोटनिवडणुकीचा आणि जनरक्षा यात्रेचा काहीही संबंध नव्हता, पण केले आपले त्यांनी मत व्यक्त! भाजपच्या जनरक्षा यात्रेस सर्वत्र चांगला प्रतिसाद मिळाला. या यात्रेत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ सहभागी झाले होते. आपल्या भाषणात त्यांनी डाव्या आघाडीच्या राजकारणावर, जिहादी दहशतवादावर सडकून टीका केली. यात्रेत भाजपचे विविध केंद्रीय मंत्री, नेते विविध ठिकाणी सहभागी झाले होते. त्यांनी लाल जिहादी दहशतवादावर जोरदार प्रहार केले. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान, केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद, व्ही. के. सिंग, स्मृती इराणी यांनी यात्रेत सहभागी होऊन डाव्या आघाडीच्या राजवटीवर कोरडे ओढले. राज्यातील राजकीय हत्यांना मुख्यमंत्री विजयन जबाबदार असल्याने त्यांना पदावर राहण्याचा काहीएक अधिकार नाही, असे शिवराजसिंह चौहान म्हणाले. यात्रेतील अन्य एका सभेत बोलताना केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी, डाव्यांच्या हिंसाचारापुढे आम्ही मुळीच झुकणार नाही, असे स्पष्टपणे बजावले. भाजपच्या जनरक्षा यात्रेचा धसका घेतलेल्या मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने गेल्या ९ ऑक्टोबर रोजी देशव्यापी निषेध कार्यक्रमाचे आयोजन केले होते. त्याचे काय झाले हे किती देशवासीयांना कळले कोणास ठाऊक! भाजपच्या जनरक्षा यात्रेची आज सांगता होत आहे. या यात्रेमुळे केरळचे राजकारण ढवळून निघाले आहे. तसेच देशवासीयांनाही त्या राज्यात किती अनागोंदी कारभार आहे, देशविघातक शक्तींचा किती राजरोसपणे तेथे नंगानाच चालू आहे, याचे दर्शन झाले. केरळमधील दुर्जन शक्तींच्या विरुद्ध सज्जनशक्ती तेथे ठामपणे उभी असल्याची प्रचितीही या यात्रेच्या निमित्ताने सर्वांना आली.
No comments:
Post a Comment