रणझुंजार कॅप्टन अशोक करकरे भाग २ लेखकाच्या मनातून....सागरा प्राण तळमळला' स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या उत्कट देशभक्ती प्रेमात माझे मन रूतले, जेव्हा मी शालेय जीवनात या अमर ओळी ऐकल्या. नंतर देशाविषयी ज्या काही संकल्पना, विचार, कर्तव्य आहेत ती मनात अधिक खोलवर वयानुरूप ठसत गेली.वाचकांच्या दृष्टिकोनातून प्रस्तुत पुस्तकाचा मी लेखक आहे हे मान्य; परंतु मला वाटते, हे माझ्याकडून कुणीतरी लिहून घेतलंय. कुणी घेतले असे हे माहीत नाही; पण एवढे मात्र नक्की की कुठल्यातरी अज्ञात,अदृश्य शक्तीने माझ्यात शिरून जे अरुणदादांच्या संकल्पनेत होते, अगदी जसेच्या तसे वाचकांसमोर आणले.माझ्या ""सदैव वंदू दे!'' या राष्ट्रीय काव्यगीताचे प्रकाशन प्राचार्य सतीशचंद्र चिंदरकर यांच्या परिचयामुळे, त्यांच्याच अध्यक्षतेखाली कॅप्टन अरुण करकरे यांच्या हस्ते झाले.माझी साहित्य लेखसंपदा, शैक्षणिक कार्य, पुरस्कार-पारितोषिके शिक्षणादी प्रकाशित विविधांगी साहित्य बघितल्यावर त्यांच्या मनाने मला हेरले असावे. त्यांनी मला घरी बोलावले. दत्त प्रकाशनच्या प्रकाशिका सौ. उषा रसाळ आणि मी त्यांच्या निवासस्थानी पोहचलो. चहापानानंतर त्यांनी आपल्या लहान भावाची म्हणजे कॅप्टन अशोकची शौर्यगाथा कथन केली. ""मला वाटते, आपण ही कहाणी शब्दबद्ध करावी. तुम्ही ते करू शकता. तुमची देशभक्ती, सेवा-निष्ठा त्यासाठी केलेला प्रयत्न आणि लेखन शैली तुमच्या पुस्तकातून माझ्या मनाला भिडली. बोला, Yes किंवा No''.एका कॅप्टनने दिलेली ही देशसेवेची संधी मी कशी सोडेन? क्षणाचाही विलंब न लावता मी म्हणालो, ''Yes I will do it.'' लेखनास आवश्यक त्या बाबी पुरवा.''मला वाटते, मी बोलताना ते माझा चेहरा वाचत असावे. मी तत्काळ होकार दिला, तेव्हा मी मात्र त्यांच्या चेहऱ्यावरील भाव न्याहाळत होतो-बघत होतो-वाचत होतो. अरुणदादांच्या चेहऱ्यावर विजयानंद दिसला खरा, परंतु त्याचवेळी त्यांचे डोळे भरून आल्याचे मी पाहिले आणि पुढे अनेकदा...पुस्तक लेखनाचा श्रीगणेशा झाला पण माहिती, पुराव्यांचा खजिना कुठे होता? इंदौरच्या घरातून, शीलाताई, शशी-कल्पना, अशोकची पत्नी, मुलगी अर्चना, जावई, अशोकचे बॉस खांडेकर व मिसेस खांडेकर, ब्रिगेडियर हेमंत महाजन, अशोकच्या मित्रपरिवाराच्या आठवणींच्या गंधकोशातून एकेक किस्सा, प्रसंग, पत्रे, आठवणी, फोटो इत्यादी माहिती गोळा करताना अरुणदादांच्या नाकी नऊ आले. सरड्याची धाव कुंपणापर्यंत, तशी माझी धाव त्यांच्यापर्यंत! असो, माझी लेखणी थांबली नाही हे विशेष.विश्वास ठेवा अगर ठेवू नका; लेखनाला थांबा मिळाला तो फक्त एकदाच. सतरा ते एकोणीस ऑक्टोबर या तीन दिवसात माझ्याकडून एक शब्द अथवा वाक्य किंवा वाचन काहीही झाले नाही. रात्री उशिरा दादांनी फोन करून दुसऱ्या दिवशी भेटण्यास सांगितले. घरी गेल्यानंतर अरुणदादा मला म्हणाले, ""रसाळ, डॅडी रात्री 8.15ला अनंतात विलीन झाले.'' मग मला कळले की दोन-तीन दिवस मी का अस्वस्थ होतो? लेखन का थांबले होते? के. बी. करकरे हा समग्रलेख लिहायला घेतला होता.या पुस्तकाचा लेखक जरी मी असलो तरी खरे शिल्पकार अरुणदादा आहेत. त्यांनी पुस्तकातील सर्व इंग्रजी पत्रांचा अनुवाद करून दिला. ब्रिगेडियर हेमंत महाजन यांनी दिलेल्या इंडो-पाक वॉर-1971, इंग्रजी लेख, संग्रहीत कविता दिल्या त्याबद्दल त्यांचे मन:पुर्वक आभार.पुस्तकातील घटनांचा क्रम लावणे, तपासून देणे, दुरुस्त्या अरूणदादांनी सुचविल्या. मी त्यांना त्रास दिला परंतु हे काम त्यांच्याशिवाय दुसरे कोणीच करू शकत नव्हते.मी मात्र हे पुस्तक अधिकाधिक सुंदर, आकर्षक, वेगळ्या धाटणीचे कसे होईल आणि वाचकांच्या हृदयापर्यंत कसे पोहचेल, याचाच विचार करीत असे. एकेक लेख पूर्ण करून हातावेगळा करण्यापूर्वी त्याचे अरुणदादा व ईश्वरी वहिनींच्यासमोर वाचन-दुरूस्ती झाल्यानंतरच टाईप सेटिंगसाठी देत असे.पुस्तकातील लेखनाला जिवंतपणा यावा म्हणून त्यांनी मला अशोकचं इंदौरमधील घर पाहण्यास पाठवून उत्तम व्यवस्था केली. इंदौरमध्ये गेल्यानंतर अशोकचे वडील वय वर्षे 105 यांचा आशीर्वाद घेतला. त्यांच्या कलाने त्याच्या स्मरणात असलेल्या अशोकच्या बालपणातील आठवणी, तरुणाईतील मौज-मस्ती, लग्न आणि लग्नानंतरच्या आठवणी, युद्धातील प्रसंग, स्वत:चे जीवनकार्य, पोस्टींग इ. अनेक प्रसंग शीलाताईने काढून घेतले, त्याचे मी टिपण केले. शशीदादा आणि कल्पनाताईंनी सांभाळून ठेवलेला अल्बम, शेल आणि इतर बक्षिस-पारितोषिके दाखविली.पुणे व्हिजिटची जबाबदारी स्वत: अरुणदादांनी घेतली. पुण्यातील कॅप्टन अशोकचे बॉस कर्नल खांडेकर व मिसेस खांडेकर, ब्रिगेडियर हेमंत महाजन, शीलाताईचे घर, वॉर मेमोरियल इत्यादी ठिकाणी अरुणदादा मला स्वत: घेऊन गेले. माहिती, फोटो, पुस्तके गोळा करून दिली. तुरळला मात्र मी त्यांच्या वडिलांनी कथन केलेल्या माहितीनुसार शोध घेत-घेत तुरळचा झालो. हे पुस्तक कुणासाठी? असा प्रश्न मला अनेकांनी विचारला. प्रस्तुत पुस्तक करकरे घराण्याचा दस्तऐवज तर आहेच पण केवळ अशोकचे अशोकसाठी लिहिलेले नसून या देशाच्या सीमेवर धारातीर्थी पडलेल्या, शहीद झालेल्या, वीरगती मिळालेल्या जवानांसाठी, त्यांच्या कुटुंबीयांसाठी, समस्त भारतीयांसाठी, निवृत्त सेनाधिकारी, सैनिक पदाधिकारी आणि विशेषत: तरुण-तरुणींसाठी लिहिलेले आहे.ही एक शौर्यगाथा आहे. स्क्वॉड्रन लीडर के. बी. करकरे घराण्याची, उज्ज्वल परंपरा यात अधोरेखित आहे. या घराण्याला मोठा इतिहास आहे, परंपरा आहे. करकरे घराण्याची सेवा, देशभक्ती, देशसेवा, निष्ठा सर्वकाही देशासाठी अगदी निवृत्त सेवासुद्धा! हा किती मोठा त्याग आहे. तो नव्या तरुण पिढीसमोर ठेवावा; हा पुस्तक लिहिण्यामागचा मूळ उद्देश आहे. आर्मित अनेक सुखसुविधा व संधी उपलब्ध आहेत. त्याबाबत तरुणांनी माहिती मिळवावी व आस्थेने सेनादलाकडे वळावे आणि यातूनच शेकडो अशोक निर्माण व्हावेत त्यासाठीच हा खटाटोप.मला खात्री वाटते या पुस्तकातून हजारो तरुण-तरुणी प्रेरणा घेतील व देशसेवेला वाहून घ्यायचा विचार करतील.ज्यांनी देशासाठी देह ठेवला, संसार, बायको, मुला-बाळांचा विचार न करता केवळ भारतमातेच्या रक्षणाकरिता देह त्याग केला; हे ज्या पुस्तकात लिहिले गेले आहे, त्या पुस्तकाची किंमत काय असावी? देणगी मूल्य- फक्त पुस्तकाचे वाचन, वाचून झाल्यानंतर अभिप्राय कळवा. त्यानंतर ते स्वत:कडे न ठेवता दुसऱ्याला द्या. दुसऱ्याकडून तिसऱ्याला-चौथ्यालाआणि पुढे...पुढे... सरकवत ठेवा अशी आग्रहाची विनंती आहे. हे पुस्तक विक्रीसाठी नाही !वाचकांनी अभिप्राय कळवायला मात्र विसरू नका. उल्लेखनीय अभिप्राय पुढच्या आवृत्तीत छापला जाईल.पुस्तक लेखनाच्या पहिल्या वाचनाचे श्रेय पत्नी सौ. उषा रसाळ, कन्या मेधा, मुलगा गणेश आणि सौ. मनिषा घेवडे यांना देतो. श्रीस्वामी समर्थांच्याकृपेने लिखाण निर्विघ्नपणे पूर्ण झाले.अशोकची कौटुंबिक माहिती देण्यामध्ये डॅडीपासून ते अरुण-ईश्वरी, शशी-कल्पनाताई, शीलाताई यांच्यासह मिसेस खांडेकर आणि ब्रिगेडियर हेमंत महाजन, लेफ्टनंट कर्नल संजय गोखले, सौ. अर्चना गोखले या सर्वांचे मोलाचे साहाय्य व मार्गदर्शन झाले.पुस्तक प्रकाशनासाठी अरुणदादा, शकुंतला मुळ्ये, कव्हर पेज व टाईपसेटींग राकेश पेडणेकर, प्रिंटर्स यांनी प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष मदत केली, त्या सर्वांना मी ॠणी आहे.शेवटी वाचकांसह भारत मातेच्या रक्षणार्थ धारातीर्थी पडलेल्या ज्ञात-अज्ञात सर्व शहिदांना, जवानांना... सैनिकांच्या वीरत्त्वाला, कार्यकर्तृत्वाला, शौर्याला कोटी-कोटी सलाम !जयहिंद! जय भारत!!
THIS BOOK IS DEDICATED TO
THE GALLANT OFFICERS & MEN OF
THE INDIAN ARMED FORCES
WHO LAID DOWN THEIR LIVES IN THE
SERVICE OF THE NATION.
MAY THEIR SOULS REST IN PEACE
IN THE GALLERY OF THE BRAVEST OF
THE BRAVE"
No comments:
Post a Comment