Total Pageviews

Monday 9 April 2012

फू बाई फू!पाकिस्तानचे राज्यकर्ते हिंदुस्थानात यायचे म्हटले की, दिल्लीश्‍वरांना नुसत्या गुदगुल्या होतात

हाफीजच्या मुसक्या आवळा असे मनमोहन सिंग यांनी ठणकावून सांगितले तरी हा सर्व प्रकार म्हणजे ‘फू बाई फू’मधील विनोदच म्हणावा लागेल.

फू बाई फू!
पाकिस्तानचे राज्यकर्ते हिंदुस्थानात यायचे म्हटले की, दिल्लीश्‍वरांना नुसत्या गुदगुल्या होतात. आमच्या दादा कोंडके यांच्या भाषेत सांगायचे तर बोट लावीन तेथे गुदगुल्या. पाकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष असिफ अली झरदारी यांच्या एक दिवसाच्या भेटीने सध्याच्या दिल्लीश्‍वरांना नुसत्या आनंदाच्या उकळ्याच फुटल्या आहेत. झरदारी आले आणि गेले. त्यामुळे विशेष काय झाले? यापूर्वी असे अनेक पाकी राज्यकर्ते दिल्ली व आग्य्राात मेजवान्या झोडून गेले, पण ते खाल्ल्या मिठास जागले काय? आताही म्हणे पंतप्रधान मनमोहन सिंग व झरदारी यांनी बंद खोलीत चर्चा केली. दोघांचे एकमेकांना हात मिळविताना-हसताना वगैरेचे फोटो प्रसिद्ध झाले आहेत. मनमोहन सिंग यांचा एक किंचित हसरा फोटो यानिमित्ताने प्रसिद्ध झाला, हे एवढेच काय ते या भेटीचे फलित आहे. बहुधा मनमोहन सिंग यांच्या चेहर्‍यावर हसू उमटले ते याच विचाराने की, ‘पहा, आपण दोघे लोकांना कसे मूर्ख बनवीत आहोत ते. खरं तर आपल्या दोघांच्या हातात काहीच नाही. तरीही दोघे एकमेकांचे हात हातात घेऊन ‘फोटू’साठी हलवीत आहोत!’ आणि हा विचार खराच आहे. पाकिस्तानात झरदारी हे राष्ट्राध्यक्ष असले तरी हिंदुस्थानशी संबंध सुधारायचे की नाहीत हे ठरविणारे तिकडे दुसरेच कोणीतरी आहेत. त्यांचे ते आयएसआय, लष्कर व धर्मांध अतिरेकी संघटनाच पाकिस्तान चालवीत आहेत व त्यांचीच धोरणे झरदारी राबवीत आहेत. मनमोहन सिंगांच्या बाबतीतही तेच आहे. मेणाचा निर्जीव पुतळा असल्यासारखेच ते खुर्चीवर बसले आहेत. डोळ्यांची पापणीही हलत नाही, चेहर्‍यावर बसलेली माशीही ते उडवत नाहीत. इतक्या निर्विकारपणे कारभार चालला आहे. अशा या आमच्या ‘निर्जीव’ पंतप्रधानांनी म्हणे पाकिस्तानच्या औटघटकेच्या राष्ट्राध्यक्षांना सडकून सांगितले की, ‘आधी हाफीजवर कारवाई करा, मगच दोन देशांतील मैत्रीसंबंधांवर चर्चा करा!’ मनमोहन सिंग यांनी ‘ठणकावले’ अशी जी त्यांच्या प्रसिद्धीप्रमुखांनी पुडी सोडली, तो सर्व विनोदच म्हणायला हवा. हा जो कोणी हाफीज सईद आहे तो मुंबईवरील २६/११च्या दहशतवादी हल्ल्यातील आरोपी आहे व त्याच्या अटकेसाठी अमेरिकेने ५० कोटींचे इनाम लावले आहे. मात्र हाफीज पाकिस्तानात बसून अमेरिकेला धमक्या देत आहे व अमेरिका म्हणते, हाफीजविरुद्ध काडीमात्रही पुरावा नसल्याने त्याच्यावर कारवाई करता येणार नाही. त्यामुळे हाफीजच्या मुसक्या आवळा असे मनमोहन सिंग यांनी कितीही ठणकावून सांगितले तरी हा सर्व प्रकार म्हणजे ‘फू बाई फू’मधील विनोदच म्हणावा लागेल. आमच्या मनात प्रश्‍न आहे तो इतकाच की, हिंदुस्थानवर हल्ला करणार्‍या हाफीजचे काय करायचे ते नंतर पाहू. पण काय हो मनमोहनजी, त्या अफजल गुरूला फासावर कधी लटकावताय ते जरा सांगा. तिकडे तो कसाबही शिरकुर्मा - बिर्याणीवर तावातावाने ताव मारीत आहे. आधी तुमच्या ताब्यातील दहशतवाद्यांच्या मुसक्या बांधा, त्यांच्या गळ्याभोवती फास आवळा व जगाला तुमचा कठोरपणा दाखवून द्या. तो हाफीज काय किंवा त्याआधीचा अजहर मसूद काय, दाऊद काय, छोटा शकील, टायगर मेमन काय हे सर्व अतिरेकी हिंदुस्थानचे गुन्हेगार असले तरी पाकड्यांचे सरकारी मेहमान आहेत व हिंदुस्थानने वारंवार याचना करूनही यापैकी एकाच्याही मुसक्या आवळण्याचे सोडाच, पण त्यांचा बालही बाका झालेला नाही. त्यामुळे मनमोहन - झरदारी भेट फार गांभीर्याने घेण्याची गरज नसून झरदारी यांनी दिल्लीतील मेजवानीवर ताव मारला व असाच ताव मारण्याचे झरदारींचे आमंत्रण मनमोहन यांनी स्वीकारले आहे. ‘फू बाई फू’चा हा कार्यक्रम यापुढेही सुरूच राहणार आहे

No comments:

Post a Comment