Total Pageviews

Wednesday 8 June 2011

EDITORIAL AIYKA

कॉंग्रेसचे "पोपट'
ऐक्य समूह
Tuesday, June 07, 2011 AT 10:29 PM (IST)
Tags: editorial

राजधानी दिल्लीतल्या रामलीला मैदानावर योगगुरु बाबा रामदेव यांनी सुरु केलेले भ्रष्टाचार विरोधी आंदोलन पोलिसी बळावर क्रूरपणे चिरडून टाकायच्या, केंद्र सरकारच्या राक्षसी कारवाईचे समर्थन करायसाठी सत्ताधारी कॉंग्रेस पक्षातल्या पोपटांना आता कंठ फुटला आहे. शनिवारी रात्री पाच हजार पोलिसांनी या मैदानावरच्या शामियान्यात घुसून, झोपलेल्या पन्नास हजारांच्यावर निरपराध योग शिबिरार्थींवर अचानक जोरदार हल्ला चढवला. रामलीला मैदानावर पोलिसांनी अक्षरश: हैदोस घातला. लहान मुले, महिला आणि वृध्दही त्यांच्या बेगुमान लाठीमारातून सुटली नाहीत. दिसेल त्याला ठोकून काढण्यात ते शूर पोलीस तीन तास गर्क होते. व्यासपीठावरच्या साधूंनाही त्यांनी चोपून काढले. शेकडो रक्तबंबाळ जखमींना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करायची साधी माणुसकीही त्यांनी दाखवली नाही. नि:शस्त्र असलेल्या शिबिरार्थींवर अश्रूधुराची शेकडो नळकांडी फोडून पोलिसांनी हजारोंना घायाळ केले. पोलिसांच्या तुडवातुडवीच्या, बडवाबडवीच्या आणि लोकांना ठोकून काढायच्या सरकारप्रणित हल्ल्यामुळे, माणुसकीचाही राजरोसपणे मुडदा पाडला गेला. लोकशाहीवर हल्ला चढवणाऱ्या या पोलिसांच्या आणि सरकारच्या क्रौर्याची गंभीर दखल सर्वोच्च न्यायालयाने स्वत:हून घेतली. सरकारने त्या काळ्या रात्री अशी कारवाई का केली? ती करणे आवश्यक होते काय? नि:शस्त्र लोकांना पोलिसांनी गुरासारखे का झोडपून काढले? मानवाधिकारावर हा हल्ला नाही काय? असा जाब न्यायालयाने दिल्ली आणि केंद्र सरकारला विचारला आहे. पोलिसांनी रामलीला मैदानावर केलेल्या जुलमी कारवाईचे प्रक्षेपणही उपग्रह वृत्तवाहिन्यांनी केल्यामुळे, कॉंग्रेस सरकारचा खरा मुखवटा देशवासियांना दिसला. या घटनेमुळे देशभर संतापाची लाट उसळली. सर्व विरोधी पक्षांच्या नेत्यांनी ही घटना घडवणाऱ्या केंद्र सरकारचा तीव्र निषेध केला. देशभर याच घटनेच्या निषेधार्थ उपोषणे झाली, निदर्शने झाली, पण सत्तेने माजलेल्या सरकारमधल्या काही नेत्यांना मात्र या घटनेमुळे आनंदाच्या उकळ्या फुटल्या आहेत. मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि कॉंग्रेसचे सरचिटणीस दिग्विजय सिंह हे तर, पोलिसांच्या कारवाईचे समर्थन करायसाठी उतावळे झाले होते. कॉंग्रेस पक्षाने कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया या घटनेवर व्यक्त करायच्या आधीच, हा गांधी घराण्याशी एकनिष्ठ असलेला पोपट, मिठू मिठू बोलायला लागला. पोलिसांनी योग शिबिरार्थींना बेदम चोपून काढले, हे योग्यच झाले, या असल्या लोकांना अशीच अद्दल घडवायला हवी, अशी गरळही त्यांनी ओकून टाकली. पुन्हा त्याच दिवशी संध्याकाळी बाबा रामदेव यांना ठग ठरवून ते मोकळे झाले. बाबा रामदेव यांच्या पतंजली योग विद्यापीठाची, त्यांनी जमवलेल्या हजारो कोटी रुपयांच्या निधीची चौकशी करावी, अशी मागणी आपण पक्षाकडे करीत असल्याचे अकलेचे तारेही त्यांनी तोडले. त्यांच्याच कॉंग्रेस पक्षाकडे केंद्राची सत्ता असतानाही, गेल्या सहा महिन्यांपासून ते रामदेव बाबांच्या निधीच्या चौकशीसाठी छाती बडवून घेत असले तरी, सरकार मात्र त्यांच्या भंपकबाजीला काही दाद देत नाही. पक्षाध्यक्षा सोनिया गांधी आणि सरचिटणीस राहुल गांंधी यांची खुषमस्करी करीत, मध्यप्रदेशच्या राजकारणातून हकालपट्टी झालेले दिग्विजय सिंह बेताल वक्तव्ये करुन, आपले राजकीय अस्तित्व टिकवायचा स्वार्थी धंदा करीत आहेत. त्यांना पक्षात काडीची किंमत नाहीच, पण तरीही हा पोपट पक्षश्रेष्ठींना खूष ठेवायसाठी चिथावणीखोर वक्तव्ये करीत देशभर भटकत असतो.  
हुजरेगिरीचा कळस
बाबा रामदेव यांनी उपोषण करु नये, यासाठी उपोषणापूर्वी चार दिवस त्यांच्याशी चर्चा करणाऱ्या, कपिल सिब्बल यांनीही झालेली कारवाई अत्यंत योग्य असल्याचे समर्थनही करुन टाकले. हेच सिब्बल बाबा रामदेव यांना भेटायसाठी विमानतळावर गेले होते. हा बाबा भोंदू असल्याचा साक्षात्कार त्यांना, बाबा रामदेव यांनी बेमुदत उपोषण सुरु करायचा निर्धार जाहीर केल्यावर झाला. त्याआधी बाबा रामदेव यांच्याबद्दल हेच सिब्बल काही एक बोलत नव्हते. बाबा रामदेव यांना भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पाठबळ असल्याचा सवंग आरोपही त्यांनी करुन टाकला. याच सिब्बल यांनी बाबा रामदेव यांना चर्चेच्या घोळात अडकवून, काळ्या पैशाबद्दल त्यांनी केलेली मागणी केंद्र सरकारने मान्य केल्याचे सांगूनही तसे लेखी द्यायला नकार दिला. बाबा रामदेव यांचे सहकारी बालकृष्ण यांच्याकडून मात्र त्यांनी सरकारला हवे तसे लिहून घेतले. हा सरळसरळ विश्वासघात होता. तरीही त्यांनी बाबा रामदेव यांच्यावरच विश्वासघाताचा आरोप केला. सिब्बल हे या बोटावरची थुंकी त्या बोटावर करण्यात तरबेज असलेले आणि भ्रष्टाचाऱ्यांना निष्कलंक असल्याचे जाहीर प्रशस्तीपत्र देणारे नेते आहेत. याच सिब्बल यांनी 1 लाख 70 हजार कोटी रुपयांचा टू-जी स्पेक्ट्रम घोटाळा करणाऱ्या माजी दूरसंचार मंत्री ए. राजा यांनी काहीही बेकायदेशीर केले नसल्याचा दावा केला होता. सर्वोच्च न्यायालयात वकिली करणाऱ्या सिब्बल यांचा हा बचाव काही सर्वोच्च न्यायालयाने मान्य केला नाही. ए. राजा आणि त्यांचे साथीदार सध्या तिहारच्या तुरुंगात डांबले गेले आहेत. याच सिब्बल यांनी केंद्रीय सतर्कता आयोगाच्या आयुक्तपदी पी. जे. थॉमस यांच्या झालेल्या नियुक्तीचेही समर्थन केले होते. पण त्या थॉमस यांचीही सर्वोच्च न्यायालयाने हकालपट्टी करुन टाकली. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्याशी त्यांनीच लोकपाल विधेयकाच्या मसुदा समितीच्या प्रस्तावाबाबत प्रदीर्घ चर्चा केली होती. हजारे यांची भ्रष्टाचार विरोधी कायदा कडक असावा, ही मागणी राष्ट्रीय हिताची असल्याचेही त्यांनी जाहीरपणे सांगितले होते. आता मात्र तेच सिब्बल हजारे यांनाच तोंड सांभाळून बोला, सहन करणार नाही, अशा धमक्या द्यायला लागले आहेत. सिब्बल यांच्यावर विश्वास ठेवावा, असा हा नेता नाही. पण तरीही कॉंग्रेस सरकारचे आपणच प्रवक्ते असल्याच्या थाटात, ते भाजप, संघ आणि विरोधकांवर बेलगाम आरोप करण्यात आघाडीवर असतात. कॉंग्रेसचे प्रवक्ते जनार्दन द्विवेदी यांनी पत्रकार परिषदेतच, योग शिबिरावर झालेल्या राक्षसी हल्ल्याचे निर्लज्जपणे समर्थन करीत, रामदेव बाबांच्या आंदोलनामागे संघ-भारतीय जनता पक्षच असल्याचा तथाकथित गौप्यस्फोटही केला. योग शिबिरावरचा क्रूर हल्ला म्हणजे भारतीय लोकशाहीला कलंक असल्याची सामान्य जनतेची भावना असतानाही, कॉंग्रेसच्या या पोपटांना ते मान्य नाही. पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग आणि केंद्रीय अर्थमंत्री प्रणव मुखर्जी यांनीही पोलिसांची ही कारवाई दुर्दैवी असल्याची खंत व्यक्त करुनही, त्यांच्याच पक्षातल्या या मदांध आणि सत्तांध झालेल्या नेत्यांना मात्र, या हाणामारीचे कौतुक वाटते. हे असले पोपटच कॉंग्रेस पक्षाला खड्ड्यात घालतील, हे नक्की

No comments:

Post a Comment