Total Pageviews

Wednesday 8 June 2011

POSING AS POLICE -POLITICIANS

जय महाराष्ट्र! मी शिवसेना आमदार विनोद घोसाळकर यांचा पी.ए. बोलतोय. साहेबांनी एक कार्यक्रम आयोजित केला आहे. त्या कार्यक्रमासाठी आपणाकडून एक लाख रुपये देणगी हवी आहे,’ असे गोड बोलून एका कांदिवलीच्या व्यापार्‍याकडून ५० हजारांचा पहिला हप्ता स्वीकारताना शिवसेनेचे दहिसरचे धडाडीचे नगरसेवक भालचंद्र म्हात्रे यांनी भाईंदर पूर्व बालाजी अपार्टमेंटमध्ये राहणार्‍या सिद्धेश सुधाकर सावंत (३२) या सराईत भामट्याला गेल्या आठवड्यात दहिसर पोलिसांच्या ताब्यात दिले आणि त्याची सारी कुंडली बाहेर काढली. हा भामटा इतका हुशार होता की आपण रंगेहाथ पकडले जाऊ नये म्हणून त्याने त्याच्याकडे नोकरी मागण्यासाठी गेलेल्या व एका हॉटेलमध्ये वेटरचे काम करणार्‍या तरुणाला पैसे घेण्यासाठी पुढे पाठविले होते. परंतु हा सारा प्रकार पोलिसांच्या लक्षात आल्यावर त्यांनी सिद्धेश सावंतच्या मुसक्या बांधल्या. भालचंद्र म्हात्रे यांनी त्या व्यापार्‍याचे धाडस वाढविले नसते तर सिद्धेश सावंत लवकर पकडला गेला नसता, इतकी तो खंडणी मागताना काळजी घेत होता. त्यामुळेच त्याने यापूर्वी शेकडेा व्यापार्‍यांकडून शिवसेना व अन्य पक्षांच्या नेत्यांच्या नावाने लाखो रुपये खंडणी उकळली असल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. कोणत्याही पक्षाच्या नेत्याचे नाव सांगितले की कोणताही व्यापारी देणगी देण्यासाठी सहसा नकार देत नाही. मागणी केली की तो व्यापारी, उद्योजक कोणत्याही राजकीय नेत्याकडे कोणतीही खातरजमा न करता मागणी करणार्‍या कथित कार्यकर्त्यांच्या अथवा पीएच्या हातावर फूल ना फुलाची पाकळी तरी टेकवतातच. विनोद घोसाळकरांचे नाव सांगणार्‍या सिद्धेश सावंतचे त्या दिवशी बॅडलक होते. ज्याच्याकडे वर्गणी मागितली तो व्यापारी घोसाळकर व भालचंद्र म्हात्रेंच्या ओळखीचा निघाला आणि त्याचे पितळ उघड पडले. परंतु असे फारच क्वचित घडते. राजकीय नेत्यांच्या विशेषत: शिवसेना व नेत्यांच्या नावाने वर्गणी गोळा करणार्‍या बोगस टोळ्या आज मुंबईच्या दक्षिण विभागात मोठ्या प्रमाणात सक्रिय आहेत. बोगस लेटर व वर्गणीची पुस्तके छापून या टोळ्या व्यापार्‍यांकडून वर्गणी गोळा करतात याचा कुणालाच थांगपत्ता नसतो. मध्यंतरी दक्षिण मुंबईतून एका टोळीला अटक करण्यात आली होती. त्यानंतर आता उत्तर-पश्‍चिम मुंबईत सिद्धेश सावंत हा पकडला गेला असून त्याचे अन्य साथीदार कोण कोण आहेत याचा पोलीस शोध घेत आहेत.
‘दुनिया झुकती है, झुकानेवाला चाहिए!’ त्यामुळेच आज मुंबईत सर्वत्र तोतयांचा सुळसुळाट दिसून येत आहे. पोलिसांच्या नावाने तर खुलेआम रस्त्यात महिलांना व बाहेरगावाहून आलेल्यांना लुटण्यात येते. ‘अहो अंगावर दागिने कसले घालून फिरताय, पुढे दंगल सुरू आहे. अंगावरील दागिने काढून पिशवीत ठेवा!’ किंवा अन्य वेगवेगळी कारणे सांगून महिलांना पिशवीत दागिने ठेवण्यास सांगायचे आणि हातचलाखी करून त्यांचे दोन-चार तोळ्यांचे दागिने लांबवायचे अशी कार्यपद्धती असलेले तोतये पोलीस आज पदोपदी दिसत आहेत. पोलीस म्हटल्यावर लगेच विश्‍वास ठेवला जातो. त्यामुळे सर्वत्र दरोड्याचे प्रमाण वाढले आहे. रेल्वे व फलाटावर तोतये पोलीसच अधिक फिरत असतात. त्यामुळे आता रोज रेल्वेतर्फे निवेदन केले जाते, ‘साध्या वेषातील पोलिसांवर विश्‍वास ठेवू नये. गणवेशधारी पोलिसांनाच तपासणी करू द्या’ असे जाहीरपणे सांगितले जात आहे. पत्रकार असल्याचे भासवून व आपल्या वाहनावर ‘प्रेस’चे स्टिकर लावून फिरणार्‍या ‘ब्लॅकमेकर’नीसुद्धा सर्वत्र धुमाकूळ घातला आहे. प्रेसच्या नावाखाली बरेचजण खंडणीच वसुली करीत असतात. ज्यांचे हात दगडाखाली आहेत, जे गैरधंदे करतात ते लोक असे ‘प्रेस’ लावून फिरणार्‍या लंगोटी पत्रक छापणार्‍यांना कमालीचे घाबरतात आणि त्यांची हवी ती मागणी पूर्ण करतात. त्यामुळे या ब्लॅकमेलरची पत्रकार म्हणून सर्वत्र अधिक ओळख आहे. श्रमिक पत्रकार कुणाच्या खिजगणतीतही नसतात. आज या ब्लॅकमेलर, तोतया पत्रकारांनाच अधिक सन्मानाने सर्वत्र वागविले जातेे. आता तर मुंबईत आपल्या मोटारीला लाल दिवा लावून फिरणारेही वाढले आहेत. आयपीएस अधिकारी व मंत्री असल्याचे भासवून आपला रुबाब दाखवीत आहेत. कायद्याला व पोलिसांना न घाबरणार्‍या प्रवृत्ती वाढत आहेत हेच यावरून दिसून येत आहे.
- प्रभाकर पवार

No comments:

Post a Comment