कोरोनाचे जेमेतेम पन्नास रुग्ण आपल्याकडे आढळले आहेत. मात्र, वातावरण जगबुडीचे निर्माण झाले आहे. काही प्रश्न आपल्यासमोर उभे आहेत ज्याची एक 'राष्ट्र' म्हणून उत्तरे शोधावी लागतील.
आधी समाजमाध्यमांवरील चेष्टेचा आणि आता चिंतेचा विषय झालेल्या कोरोना व्हायरसने जगभरातल्या मानवी जीवनासमोर गंभीर प्रश्न निर्माण करून ठेवल्याचे चित्र आहे. आंतरराष्ट्रीय आणि मुंबई-दिल्लीचा शेअर बाजारही आता कोरोनासारख्या आजारामुळे कोसळू लागला आहे. आता आजारापर्यंत ही बाब मर्यादित राहिलेली नाही, तर अतर्क्य घटनाक्रमांसाठी कोरोना कारणीभूत ठरला आहे. 'ग्लोबल व्हिलेज'ची कल्पना कशी आभासी आहे, याचा प्रत्यय त्यामुळे यायला लागला आहे. कारण, प्रवेशबंदीची सुरुवात काही देशांनी सुरू केली आहे. तंत्रज्ञानाने जोडलेले जग कशाप्रकारे परस्परांकडे संशयाने पाहात आहे, हे आपल्याला दिसते. जागातिक व्यासपीठांवर एकत्र येणारे जागतिक नेते जागतिक शांतीची पोपटपंची करून नंतर एकमेकांशी कसे वागतात, हे आपण पाहिलेले आहे. दहशतवाद, दहशतवादाच्या आडून चालणारे तेलाचे राजकारण, 'ओबोर'सारखे महाकाय रस्त्यांचे प्रकल्प आणि त्यावर रेटारेटी करणाऱ्या महासत्ता आज कोरोनासारख्या आजारामुळे पुरेपूर हतबल झाल्या आहेत. नीट काळजी घेतली तर बरा होणारा हा आजार मानवी हस्तक्षेपांच्या कक्षेबाहेरच्या गोष्टी घडल्या तर जग कसे थरारून जाते, याचा वस्तुपाठ झाला आहे.
ज्या तंत्रज्ञानाच्या आधारावर चीन बाजारपेठांवर आपला अनभिषिक्त हक्क गाजवू पाहात असतो, ती खरेदी-विक्रीची संकेतस्थळे आज पैसे देऊन माल मागणाऱ्या ग्राहकांना साधा प्रतिसादही देण्याच्या स्थितीत नाहीत. ही गोष्ट केवळ चिनी संकेतस्थळांची नाही, पण कमी किमतीत पडते म्हणून चिनी कच्च्या मालाकडे पाहणाऱ्या मंडळींचे इमलेही आता धोक्याच्या स्थितीत आहेत. आण्यासाठी रुपयाकडे दुर्लक्ष करणाऱ्यांबाबत एक म्हण इंग्रजीत प्रचलित आहे. 'पॅरासिटेमॉल' हा भारतात मोठ्या प्रमाणावर औधषात वापरला जाणारा महत्त्वाचा घटक. भारतात पॅरासिटेमॉलचे उत्पादन अक्षरश: नगण्य आहे. आता मागणी असताना त्याची निर्मिती का नाही, असा प्रश्न आपल्याला पडू शकतो, पण जागतिकीकरणाच्या 'फॅशन परेड'मध्ये सामील होण्याच्या घाईत आपण थोड्या कमी भावात पडते म्हणून पॅरासिटेमॉॅल चीनवरून घेतो. आता कोरोनोसारख्या स्थितीत आपण आपली आरोग्य सुरक्षा कशी भीतीदायक स्थितीला आणून ठेवली आहे, याचा अंदाज आपल्याला येऊ शकतो. डाव्या विचारांनी जगासमोरचे प्रश्न सोडविले नसले तरी त्या प्रश्नांची जाण तरी निर्माण केली. भांडवलशाही प्रक्रिया या नफ्याच्या पलीकडे विचार करू शकत नसल्याने अशा स्थितीला तोंड देण्यापेक्षा यातही संधी शोधण्याचा शहाजोग सल्ला आपल्याला मिळू शकतो.
जग हे 'खेडे' असले तरी यातली प्रत्येक खेडूत 'स्वत:चा' म्हणून काही पक्का असा निकष ठरवूनच खेड्यात खेळायला उतरला आहे. भारतालाही स्वत:चे हितसंबंध जपून निश्चित करून या लढाईत उतरावे लागेल. किमान खर्चात निर्मिती ही चीनची क्षमता आहे. अर्थकारणावर पकड ही अमेरिकेची मक्तेदारी; मग भारताची खासियत काय, हा प्रश्न आपल्याला पडू शकतो. तर त्या प्रश्नाचे उत्तर 'भारतीय मनुष्यबळ' असे सापडते. जगभरात पसरलेले भारतीय मनुष्यबळ आणि खुद्द भारताच्या आर्थिक चलनवलनाच्या संचलनात महत्त्वाची भूमिका बजावणारे हे मनुष्यबळ आजारांनी ग्रस्त होणार असेल तर यामुळे तुटणारी पुढची चक्रे गंभीर आहेत. दहशतवादी हल्ले जोरात होते, तेव्हा रस्त्यावरून जाणाऱ्या गाड्या तपासा, लोकांच्या बॅग उचकटून पाहा, असे उद्योग जोरात होते. त्यात काही चुकीचेही नव्हते. पण, त्यामुळे पुढे होणारे किती दहशतवादी हल्ले थांबले, हा अनुत्तरित प्रश्न आहे. आज कोरोना झाल्याबरोबर नागरिकांनी कसे वागावे, याचे वीट आणणारे वर्ग जळीस्थळी सुरू झाले आहेत. साध्या कॉलरट्यूनही खोकण्यापासून सुरू होतात. आता ज्याला फोन केला, तो आजारी आहे की ही त्यांची कॉलरट्यून आहे हेच समजत नाही.
ही अघोषित आणीबाणी कुठल्याही नियोजित कटाचा वगैरे भाग नाही, यात कुठल्याही परकीय शक्तीचा हात वगैरे तर मुळीच नाही. जो तो आपापल्या परीने उत्तरे शोधण्याचा प्रयत्न करीत आहे आणि त्यातून हे मजेशीर प्रकार घडत आहेत. जर्मनीची पन्नास टक्के जनता कोरोेनाग्रस्त असण्याची कबुली त्यांच्या चॅन्सलर अँजेला मर्केल यांनी दिली आहे. भारतात अद्याप हा आकडा जेमतेम पन्नासच्या आसपास आहे. मात्र, हाहाकार जगबुडीच्या दिशेने आपण चालल्यासारखा सुरू आहे. आरोग्यविषयक धोरणांची हेळसांड ही तर आपली खासियत. स्वच्छता, आजारांच्या बाबतीत घेण्याची काळजी या सगळ्यांच्या बाबतीत आपल्याकडे कमालीची अनास्था आहे. आता मुद्दा असा की, या बदलत्या स्थितीत आपण कसा विचार करणार? भविष्यात असा काही प्रश्न उभा राहिला, तर ही स्थिती कशी हाताळणार? 'जग हे खेडे होेते आहे,' या गोंडस शीर्षकाखाली भारतात अनेक गोष्टींची भरती होत आहे. थोड्याफार किमतीच्या फरकाने ज्या गोष्टी आपण भारतात निर्माण करू शकतो, त्यांची निर्मिती त्या प्राधान्याने केली पाहिजे. किंचित जास्त किंमत मोजावी लागली तरी राष्ट्रीय हित लक्षात घेऊन आकडेमोडीपेक्षा अर्थशास्त्राचा विचार केला पाहिजे. आज जी स्थिती पॅरासिटेमॉलच्या बाबतीत आहे, तीच स्थिती धातू खनिजांच्या बाबतीत आहे. तंत्रज्ञानासाठी लागणाऱ्या अनेक धातूघटकांचा पुरवठा आज चीनकडून होत असतो. हळूहळू यात पोलादाचा समावेशही होऊ लागला आहे. केवळ व्यापारावर आपण तग धरून राहू शकत नाही. स्वत:ची म्हणून रोखठोक उत्पादनेही आपल्याला किमान आपल्या सुरक्षित भविष्यासाठी निर्माण करावी लागतील. भारत म्हणून जागतिक अवकाशात आपले बालेकिल्ले कोणते, याचाही प्रथम प्राधान्याने विचार करावा लागेल. या साऱ्या अपेक्षा केवळ सरकार पूर्ण करू शकत नाही. 'स्वयंपूर्तता' हा नागारिकांच्या स्वभावविशेषाचा भाग होत नाही, तोपर्यंत त्याचे परिणाम आपल्याला पाहायला मिळणार नाहीत
No comments:
Post a Comment