Total Pageviews

Monday, 30 March 2020

तिथल्या तिथे ठेचा अफवा-tarun bharat-


 ज्याच्या प्रकाशाने तारकाधिपती चंद्रही निस्तेज होतो, त्या सूर्याला ग्रहण लागले असता त्याच्यापुढे क्षुद्र काजवेही चमकू लागतात, अशा अर्थाची एक अन्योक्ती फार प्रसिद्ध आहे. सध्या कोरोनामुळे देशात आणि जगभरातही जे वातावरण तयार झाले आहे, लोक आशंकित आहेत, भयभीत आहेत, अतिशय हळवे झाले आहेत, अशा वेळी काही लोक या क्षुद्र काजव्यांसारखे अफवा पसरविण्याच्या कामात व्यग्र आहेत. एरवी साधारण परिस्थितीत या लोकांचे कुणी ऐकलेही नसते. परंतु, परिस्थिती असाधारण झाल्याचे पाहून ही मंडळी आपापल्या बिळातून बाहेर येतात आणि नको ते उद्योग सुरू करतात. त्यांना माहीत
असते की आजच्या वातावरणात आपण जे काही प्रसृत करू ते खपले जाईल. अशा लोकांपासून सर्वांनीच सावध असले पाहिजे.

हे अफवा पसरविणारे लोक कुठल्या जमातीचे आहेत, कुठल्या विचारधारेचे आहेत, त्यांचा अंतस्थ हेतू काय आहे, हे हुडकून काढणे कठीण नाही. सर्वप्रथम यांचा उद्देश हा असतो की, सर्वसामान्य जनतेत गोंधळ निर्माण व्हावा. अफरातफरी व्हावी. दुसरा उद्देश, सरकार व प्रशासन यांच्यावरील लोकांचा विश्वास उडावा. या दोन गोष्टी साध्य झाल्या की, मग देशात जो भडका उडेल, त्यावरून सरकारला दोष देण्यात हीच मंडळी पुढे येतात. आपण सर्वांनी या नतद्रष्ट लोकांच्या मनसुब्याला मातीत गाडले पाहिजे. या अफवा पसरविण्यात सोशल मीडियाचा फार मोठा हात आहे. त्यामुळे सोशल मीडियावरच रममाण होणार्‍यांनी, त्यांच्यापर्यंत आलेली कुठलीही अनधिकृत माहिती, फॉरवर्ड न करता, तिथल्या तिथे नष्ट केली पाहिजे. िंवचू दिसला की त्याची बातमी इतरांना सांगण्याआधी जसे आपण त्याला तिथल्या तिथे आणि ताबडतोब चिरडून टाकतो, अशी आपली कृती या अफवांच्या बाबतीत असली पाहिजे. देशाच्या भल्यासाठी हे फार महत्त्वाचे आहे.




अफवा पसरविणार्‍यांमध्ये जसे भारतातील काही लोक आहेत, तसे आंतरराष्ट्रीय स्तरावरही काही लोक, संस्था भलत्याच सक्रिय झालेल्या आहेत. त्यांचे दुखणे वेगळेच आहे. भारतासारखा 130 कोटी लोकसंख्येचा देश इतक्या शिस्तीत आणि शांतपणे कोरोनासारख्या महामारीला कसे काय तोंड देत आहे? हा त्यांना छळणारा प्रश्न आहे. कारण या मंडळींनी नेहमीच ‘वेस्ट इज बेस्ट’ (म्हणजे जे पश्चिमेकडचे तेच सर्वोत्कृष्ट) असे मानले आहे. आज त्यांनी जगभरात पसरविलेला हा भ्रम उद्ध्वस्त झाला आहे. ते काम कोरोना नामक एका विषाणूने केले आहे. कोरोना विषाणूचा धिंगाणा युरोप व अमेरिकेसारख्या देशांमध्ये प्रचंड प्रमाणात सुरू आहे. इटली, स्पेन, जर्मनी, अमेरिका, इंग्लंड या देशांना तर काय करावे हेच सुचेनासे झाले आहे. सार्वजनिक स्वच्छता, शिस्त, आरोग्य या बाबतीत या देशातील नागरिक अतिशय जागृत आणि जागरूक असतात असे आम्हाला सतत सांगण्यात आले आहे. मग असे काय घडले की, या देशांमध्ये कोरोनाचा प्रभाव िंचताजनक वाढत आहे? इटली- लोकसंख्या 6 कोटी. कोरोना बळी 7503. स्पेन-लोकसंख्या 4.67 कोटी. कोरोना बळी 3647. अमेरिका- लोकसंख्या 33 कोटी. कोरोना बळी 1036. इंग्लंड- लोकसंख्या 6.77 कोटी. कोरोना बळी 465. या पृष्ठभूमीवर 130 कोटी लोकसंख्या असलेल्या भारतात एवढे कमी बळी कसे? हे यांना सलत आहे. त्यातही भारताचे नेतृत्व नरेंद्र मोदींसारखा त्यांच्या दृष्टीने अतिशय तिरस्कृत व्यक्ती करत आहे. मोदींचे हे यश यांना पचत नाही असे दिसते आणि म्हणून हे आंतरराष्ट्रीय लोक भारताबाबत नाही नाही त्या अफवा पसरवित आहेत. त्यांनाही आपण ओळखले पाहिजे. या आंतरराष्ट्रीय ठगांचे काही चेलेचपाटे भारतातही आहेत. विशेषत: इंग्रजी मीडिया. ते यांची री ओढत असतात. परंतु, भारतातील सध्याचे वातावरण बघता, त्यांना उघडपणे अशा चिथावणीखोर बातम्या पेरता येत नाहीत म्हणून ही मंडळी अशा बातम्या शर्करावगुंठित रीतीने समाजासमोर, देशहिताचा आव आणत उघड करीत आहेत.

आता या मंडळींना कोरोनाचा भारतातील प्रसार कसा थांबेल आणि भारतात एकही नवा रुग्ण बळी जाणार नाही, याची िंचता नाही. त्यांना आता िंचता आहे, कोरोनाचा प्रार्दुभाव ओसरल्यानंतर भारताची अर्थव्यवस्था कशी राहील, याची. त्यावरूनच यांची झोप उडाली आहे. ज्यांचे हातावर पोट आहे, अशांची आजकाल फारच िंचता या लोकांना पडली आहे. भारत सरकार तसेच सर्व राज्यांतील सरकारे विविध उपाययोजना करीत आहेत. विविध सेवाभावी संस्था पुढे सरसावल्या आहेत. कुठे काही न्यून लक्षात येताच, प्रशासकीय यंत्रणा तत्परतेने तिथे पोहचत आहे. सर्व काही एका शिस्तीत, सुरळीत सुरू आहे. परंतु, हे यांना बघवत नाही, असे दिसते. यांचा पोटशूळ उमळला आहे. सर्वसामान्यांनी या लोकांकडे नेहमीप्रमाणेच दुर्लक्ष केले पाहिजे. आपल्या भारताचे सुदैव म्हटले पाहिजे की, या अतिशय संकटाच्या काळात आपल्याला नरेंद्र मोदींसारखे कठोर पण करुणामय नेतृत्व लाभले आहे. इतर कुठले दुसरे राजकीय नेतृत्व असते तर काय हाल झाले असते, याची कल्पनाही करवत नाही.

नेतृत्व नालायक असेल तर काय होऊ शकते, याचे उदाहरण आपला शेजारी पाकिस्तानने जगासमोर ठेवले आहे. तिथे काय सुरू आहे, तिथल्याच लोकांना कळेनासे झाले आहे. देशाचे नेतृत्व पंतप्रधान इम्रान खान करत आहे की, राज्याचे मुख्यमंत्री की, लष्कर? असा प्रश्न लोक विचारू लागले आहेत. पंतप्रधान इम्रान खान संपूर्ण देशात लॉकडाऊन लावण्याच्या विरोधात आहे. त्यांचे म्हणणे आहे की, पाकिस्तानात 25 टक्के लोक गरिबीरेषेखाली आहेत. लॉकडाऊन केले तर त्यांचे पोट कसे भरेल? त्यांच्या उदरनिर्वाहाची सोय करण्याइतपत आपल्या देशाची स्थितीच नाही. असे इकडे पंतप्रधान म्हणत असताना, पंजाब आणि िंसध प्रांतात तिथल्या मुख्यमंत्र्यांनी लॉकडाऊन घोषितही करून टाकले. लोकांचे म्हणणे आहे की, हे लष्कराच्या निर्देशावरून करण्यात आले. इम्रान खान म्हणतात की मीडियाच्या दबावाखाली येऊन तिथल्या मुख्यमंत्र्यांनी हा निर्णय घेतला. लोक सैरभैर आहेत. पंतप्रधान इम्रान खान लोकांना अमेरिका, इटली, इंग्लंड, स्पेनची उदाहरणे देत आहेत. तिथल्या इतकी गंभीर परिस्थिती अजून पाकिस्तानात आलेली नाही म्हणून स्वत:ची पाठ थोपटून घेत आहेत.

No comments:

Post a Comment