कोणा-कोणाला खुपतोय भारताचा विकास? हेमंत महाजन Saturday, March 03, 2012 AT 03:00 AM (IST) Tags: hemant editorial भारताच्या हिताविरुद्ध परकी शक्तींच्या कारवाया सुरू आहेत. दहशतवादी, नक्षलवाद्यांपासून ते प्रकल्पांच्या विरोधातील आंदोलकांपर्यंत अनेकांना या शक्ती बाहेरून मदत करीत आहेत. त्यांचे लक्ष्य एकच आहे, ते म्हणजे भारताचा विकास रोखणे. तमिळनाडूतील अणुऊर्जा प्रकल्पाला विरोध करणाऱ्यांमध्ये सामील असलेल्या काही अमेरिकास्थित स्वयंसेवी संघटनांचा उल्लेख पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांनी नुकताच जाहीरपणे केला आणि एकूणच भारताच्या विकासाच्या विरोधात काम करणाऱ्या शक्तींची चर्चा सुरू झाली. ज्या अर्थी पंतप्रधानांनी हा आरोप केला, त्याअर्थी त्यांच्याकडे यासंबंधी ठोस पुरावे असणार. अशा संघटनांचे डावपेच हाणून पाडण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत व त्यासंदर्भात सावध राहिले पाहिजे. एनजीओ हेदेखील एक शस्त्र आहे आणि देशहिताच्या विरोधात ते वापरले जाते, हे यानिमित्ताने प्रकर्षाने समोर आले. दहशतवादाच्या रूपातील छुपे युद्ध तर सुरू आहेच, शिवाय प्रसिद्धिमाध्यमांचा उपयोग करून भारताविषयी बदनामी करण्याचेही षड्यंत्र आंतरराष्ट्रीय पातळीवर अस्तित्वात असल्याचे दिसून येते. काश्मीरसंदर्भात भारतीय लष्कराच्या भूमिकेविषयी अपप्रचार करण्यापासून ते बनावट नोटा भारतात घुसविण्यापर्यंत अनेक प्रकारचे उपद्व्याप सुरू असतात. या सर्वच कारवायांमागे एक सूत्र मात्र समान आहे, ते म्हणजे भारताच्या विकासाच्या वाटचालीत अडथळा निर्माण करणे. भारताच्या विकासप्रक्रियेत अप्रत्यक्ष मार्गांनी जसे अडथळे आणले जात आहेत, त्याचप्रमाणे थेट हिंसक कारवाया करूनही ते उद्दिष्ट साधण्याचा प्रयत्न होत आहे.नक्षलवादाचे उद्दिष्टदेखील भारताच्या विकासात अडथळा निर्माण करणे, हे आहे. ही देशात फोफावलेली चळवळ असली, तरी तिला खतपाणी घालण्याचे काम "आयएसआय' संघटना आणि इतर भारतविरोधी शक्तींनी केले आहे. "आरआयएम' (रिव्हॉल्युशनरी इंटरनॅशनल मूव्हमेंट) ही संघटना माओवादी गटांना मदत करते. हा अमेरिकेतील पायाभूत गट असून, तो वैचारिक अभियान चालवितो. हा गट डाव्या विचारसरणीचे "नस्ट्रीमिस्ट ग्रुप' हे संकेतस्थळ, सार्वजनिक प्रकाशने आणि साहित्य आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रकाशित करतो. भारतातील नक्षलवाद्यांनी फिलिपिन्सच्या "नस्ट्रीमिस्ट'बरोबर आणि त्यांच्याद्वारे आग्नेय आशियातील इतर गटांबरोबर संबंध वाढविले आहेत. जम्मू-काश्मीरमधील दहशतवादी कारवायांचे तेथील दहशतवादी गट व नक्षलवाद्यांचे प्रवक्ते नेहमीच समर्थन करीत असतात. 2001 मध्ये कोलकत्यातील अमेरिकी सेंटरवर हल्ला केलेल्या "लष्करे तैयबा'च्या दहशतवाद्याने झारखंडमधून पलायन करून रांचीत नक्षलवादी समर्थकाच्या घरी आसरा घेतला होता. अशा बाबींच्या बदल्यात स्फोटके व आधुनिक शस्त्रे वापरण्याचे प्रशिक्षण दहशतवादी नक्षलवाद्यांना देत असतात. नक्षलवादी व ईशान्येकडील बंडखोरांचे गट, उदा. "उल्फा', "एनएससीएन' आणि "पीएलए' यांची हातमिळवणी असल्याचा गुप्तहेर संघटनांचा अहवाल आहे. नेपाळमधील माओवाद्यांशी नक्षलवाद्यांचे असलेले संबंध धोकादायक आहेत.भारत व नेपाळमधील माओवाद्यांमध्ये सहकार्याचा आणि साधनांची देवाणघेवाणीचा "करार' झाल्याचे सिद्ध झाले आहे. "लिबरेशन टायगर्स ऑफ तमीळ ईलम'ला (एलटीटीई) श्रीलंकेने युद्धात पराभूत केले. पण त्यातून वाचलेले "एलटीटीई'चे बंडखोर पैशांसाठी घातपाती कारवाया घडवून आणू शकतात. त्यांच्याकडे शस्त्रे आणि दारूगोळा आहे. पैसे खर्च करण्याची क्षमता आणि "एलटीटीई'च्या तज्ज्ञांसाठी पैसे मोजण्याची तयारी, यामुळे नक्षलवाद्यांकडे बॉम्ब आणि आधुनिक शस्त्रास्त्रे याआधीही आढळून आली आहेत. भारतीय जलक्षेत्रात "एलटीटीई' घुसखोरी करीत असल्याचा इशारा गुप्तहेर संघटनांनी आंध्र प्रदेश, तमिळनाडू, छत्तीसगड आणि ओरिसा या राज्यांना दिला आहे. बंदी असलेल्या "स्टुडंट इस्लामिक मूव्हमेंट ऑफ इंडिया' (सिमी) बरोबरही माओवाद्यांनी संबंध प्रस्थापित केले असून, आपला पाया दक्षिण भारतात रोवण्यासाठी ते प्रयत्नशील आहेत. अलीकडेच दोन्ही संघटनांच्या नेत्यांनी बंगळूर आणि हैदराबादमध्ये बैठका घेतल्या व दक्षिण भारतात संयुक्तपणे पायाउभारणी करण्याचे ठरविले. भारतातील मुस्लिमांच्या कथित छळाविरुद्ध माओवादी आवाज उठवीत असतात. बंदी येण्याआधी "सिमी'ची पाळेमुळे केरळमध्ये घट्ट होती आणि तेथेच त्यांचा माओवाद्यांशी संबंध पहिल्यांदा दिसून आला. भारताला अस्थिर करण्याचा हेतू माओवाद्यांची मदत घेतल्यास सफल होऊ शकतो, याची "सिमी'ला कल्पना आहे. माओवाद्यांनी "तैयबा'च्या अतिरेक्यांना पश्चिम बंगालमध्ये शिरकाव करण्यासाठी मदत केली. आसाम व पश्चिम बंगालपुरतीच "तैयबा' मर्यादित नाही, ही चिंतेची बाब आहे. त्यांनी अशाच गटांबरोबर हातमिळवणी करून झारखंड, उत्तर प्रदेश, केरळ, मध्य प्रदेश व महाराष्ट्रातही शिरकाव केला आहे. "तैयबा'ला समुद्रमार्गे मदत मिळत असल्याने पूर्वेकडील समुद्रकिनाऱ्यांवरील सुरक्षा महत्त्वाची आहे. "तैयबा' व "हुजी'ची मुख्य सूत्रे बांगलादेशातून हलतात. त्यामुळे बांगलादेशच्या सीमेवरील सीमा सुरक्षा दलाने तेथून होणारी घुसखोरी पूर्णपणे थांबविली पाहिजे. प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष अशा दोन्ही प्रकारच्या कारवाया हाणून पाडण्यासाठी सरकारने आणि साऱ्या देशानेच सर्वंकष उपाययोजना हाती घेतल्या पाहिजेत. (लेखक निवृत्त ब्रिगेडियर आहेत.) | |
SPREAD MESSAGE OF INDIAN NATIONAL SECURITY TO AS MANY INDIANS AS POSSIBLE. LET US FREE INDIA OF CORRUPTION BY SPREADING THE MESSAGE TO AS MANY PEOPLE.MANY OF THE ARTICLES HAVE BEEN RECEIVED AS FORWARDED MAIL FROM VARIOUS FRIENDS . SHOULD SOME FACTS BE NOT CORRECT , YOU ARE REQUESTED TO PUT IT IN REMARKS BELOW THE ARTICLE. THIS WILL ENSURE A MORE BALANCED PERSPECTIVE OF THE SUBJECT DISCUSSED.
Total Pageviews
Friday, 2 March 2012
BRIG MAHAJAN ARTICLE SAKAL
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment