मोटार वाहन कायद्यातील नव्या सुधारणांमुळे पोलिसांना वाहतूक पोलिसांना चरण्यासाठी अधिक कुरण मिळणार
कायद्यातील नव्या सुधारणांमुळे वाहतूक पोलिसांची चांदीच चांदी होणार आहे
मोटार वाहन कायद्यातील नव्या सुधारणांमुळे पोलिसांना वाहतूक पोलिसांना चरण्यासाठी अधिक कुरण मिळणार
कायद्यातील नव्या सुधारणांमुळे वाहतूक पोलिसांची चांदीच चांदी होणार आहे अंमल कसा करणार?मोटार वाहन कायद्यातील काही कठोर सुधारणांना केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. जे लोक वाहतुकीचे नियम पाळणार नाहीत, त्यांच्याविरुद्ध कठोर कारवाईची तरतूद या सुधारणांमध्ये आहे. अपघाताच्या वाढत्या घटनांना आळा घालण्याच्या दृष्टीने सरकारने या सुधारणा केल्या आहेत. सर्वसामान्य नागरिकांनी वाहतुकीचे नियम पाळावे म्हणजे अपघाताच्या घटना कमी होतील, असा सरकारचा या सुधारणांमागचा हेतू आहे. यामुळे सरकारच्या उदात्त हेतूबद्दल शंका घेण्याचे कारण नाही. मोटरवाहन कायद्यातील या सुधारणांना केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी मिळाली असली, तरी याचे कायद्यात रूपांतर व्हायला काही वेळ लागणार आहे. कारण, यासंदर्भातील विधेयक संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात मांडले जाणार आहे. नव्या कायद्यामुळे वाहतुकीचे नियम मोडणार्यांसाठी सध्या असलेल्या दंडाच्या आणि शिक्षेच्या स्वरूपात आठ ते दहा पट वाढ होणार आहे.दरवर्षी रस्ते अपघातात भारतात जवळपास दीड लाख लोक मृत्युमुखी पडतात. रस्ते अपघातात मृत्युमुखी पडणार्यांचा हा आकडा थोडाथोडका नाही, तर अतिशय मोठा आहे. या अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये नेमके पुरुष किती, स्त्रिया किती, तरुण आणि लहान मुलं-मुली किती याचा तपशील या बातमीत नाही. मात्र, अपघातात कोणीही मृत्युमुखी पडला तरी एक संसार उद्ध्वस्त होतो. याचाच अर्थ दरवर्षी दीड लाख संसार उद्ध्वस्त होतात. ही आकडेवारी धक्कादायक आहे.कोणत्याही राष्ट्रीय महामार्गावरून कधीही प्रवास केला, तरी मार्गात एक दोन गाड्या अपघातग्रस्त झालेल्या दिसतात. बहुतांश अपघात वाहन चालवणार्यांनी वाहतुकीचे नियम न पाळल्यामुळेच होत असतात, हे कोणालाच नाकारता येत नाही. सर्वांनी वाहतुकीचे नियम पाळत वाहन चालवले, तर अपघाताचे प्रमाण अर्ध्यापेक्षा कमी झाल्याशिवाय राहणार नाही. अपघाताचे दुसरे आणि सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे दारू पिऊन गाड्या चालवणे हे आहे. तिसरे कारण आहे निर्धारित गतीपेक्षा जास्त वेगाने वाहन चालवणे. प्रामुख्याने अपघाताची ही तीन प्रमुख कारणे आहेत. त्यामुळे ही कारणे कमी कशी करता येतील, याचा विचार झाला पाहिजे. सध्या या तिन्ही कारणांसाठी असलेल्या शिक्षेत आणि दंडाच्या राशीत वाढ करण्याचा सरकारचा प्रस्ताव आहे. दारू पिऊन वाहन चालवण्याच्या गुन्ह्यात दोन वर्षांचा तुरुंगवास आणि पाच हजारांचा दंड वा दोन्ही शिक्षांची तरतूद आहे. एकच गुन्हा वारंवार करणार्यांच्या शिक्षेच्या स्वरूपातही वाढ करण्याची तरतूद या सुधारणांमध्ये आहे.शिक्षेच्या आणि दंडाच्या स्वरूपात वाढ केली, तर लोक वाहतुकीचे नियम पाळायला लागतील, अशी सरकारची अपेक्षा दिसते. ती काही प्रमाणात खरीही आहे. मात्र, तसे पूर्णत: खरे नाही. त्यामुळे सरकारने लोकांची मानसिकता बदलवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. दुर्दैवाने आपल्याकडे समस्येच्या मुळाशी जाण्यापेक्षा नेहमीच वरवरची मलमपट्टी करण्यातच सर्वांना रस असतो. एखादा गुन्हा करून आरोपीला शिक्षा करण्यापेक्षा तो गुन्हा करण्यासाठी प्रवृत्त होणार नाही, असे वातावरण तयार करण्यात आम्ही नेहमीच कमी पडतो.वाहतुकीचे सिग्नल तोडणे, वाहन चालवताना मोबाईलवर बोलणे, हेल्मेट न घालता वाहन चालवणे, दारू पिऊन वाहन चालवणे, वेगमर्यादेचे उल्लंघन करणे, सीट बेल्ट न बांधणे आदी गुन्ह्यांसाठी असलेल्या शिक्षेत वाढ केली जाणार आहे. मोटारवाहन कायद्यात सुधारणा करण्यामागचा केंद्र सरकारचा हेतू स्तुत्य असला, तरी याची अंमलबजावणी सरकार प्रामाणिकपणे आणि पूर्ण ताकदीने करू शकेल का तेवढी यंत्रणा आणि मानसिक तयारी सरकारची आहे का ? हे प्रश्नच आहेतच. कारण आपल्याकडे कायदे अनेक असले तरी त्या कायद्यात वाटांपेक्षा पळवाटाच जास्त आहेत, ज्याचा फायदा नेहमीच आरोपींना मिळत असतो. अपघात होण्याची अनेक कारणे आपण वर दिली असली, तरी अनेक वेळा अपघात हे खराब रस्त्यांमुळेही होतात. अनेक ठिकाणी रस्त्यात मोठमोठे खड्डेे असतात. कधी तर रस्त्यात खड्डा आहे की खड्ड्यात रस्ता आहे, हे शोधणेही कठीण जाते. अशा रस्त्यावर अपघात झाला, तर त्याचा ठपका कोणावर ठेवायचा. असे रस्ते दुरुस्त करण्याची सरकारची तयारी आहे का ? रस्त्यावर एकही खड्डा राहणार नाही, याची काळजी सरकार घेईल का ? वाहतुकीचे सर्व नियम पाळूनही अपघात झाला, तर त्याची जबाबदारी कोणाची राहील ? याचीही उत्तरे सरकारने द्यायला हवीत. अनेक वेळा समोरची व्यक्ती वा वाहनचालक सर्व नियम पाळून वाहन चालवत असतो. मात्र, समोरच्या वाहनचालकाच्या चुकीमुळे अपघात होतो, तेव्हा त्यात जबाबदार कोणाला धरायचे ?मोटार वाहन कायद्यातील नव्या सुधारणांमुळे पोलिसांना विशेषत: वाहतूक पोलिसांना चरण्यासाठी अधिक कुरण मिळणार आहे. वाहतूक नियंत्रित करण्याची आणि अपघात टाळण्याची जबाबदारी वाहतूक पोलिसांची असते. मात्र, या जबाबदारीचाच त्यांना विसर पडला की काय असे वाटते. वाहनचालकांकडून फक्त पैसे वसूल करणेच आपली जबाबदारी आहे, असे या पोलिसांना वाटू लागले आहे. त्यामुळे कोणत्याही चौकात वा रस्त्यावर वाहतूक पोलिसांची नजर बकरा शोधत असते. पन्नास वा शंभर रुपये मिळाले की ते खुष होतात. वाहतुकीच्या नियमांचा भंग करणार्यांना पकडून त्यांच्याविरुद्ध कागदोपत्री कारवाई करण्यापेक्षा पन्नास-शंभर रुपये वसूल करणे वाहतूक पोलिसांसाठी सोयीचे असते. त्यामुळे मोटार वाहन कायद्यातील नव्या सुधारणांमुळे वाहतूक पोलिसांची चांदीच चांदी होणार आहे.ज्याप्रमाणे वाहनचालकांनी वाहतुकीचे नियम पाळले, तर अपघातांची संख्या अर्ध्यावर येणार आहे, त्याचप्रमाणे वाहतूक पोलिसांनी रस्त्यावर उभे राहून पैसे खाण्यापेक्षा वाहतूक नियंत्रणाचे, तसेच मोटार वाहन कायद्यातील नव्याच नाही, तर जुन्या तरतुदींचेही प्रामाणिकपणे पालन केले, तर अपघातांची आणि पर्यायाने अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या निश्चितच कमी होणार आहे. पण हे आपल्या देशात शक्य होईल का ?रस्ते अपघातातील मृतांची संख्या कमी व्हावी, असे प्रामाणिकपणे वाटत असेल, तर वाहतूक पोलिसांमार्फत दारू पिऊन वाहन चालवणार्या चालकाची रस्त्यात वाहन थांबवून तपासणी केली गेली पाहिजे आणि तो दारू पिऊन वाहन चालवत आहे, हे आढळले, तर त्याला वाहन चालवण्यास प्रतिबंध केला पाहिजे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे महामार्गावर असलेली सर्व दारूची दुकाने आणि बीयर बार बंद केले पाहिजेत. म्हणजे मार्गात वाहनचालकांना पिण्यासाठी दारूच मिळणार नाही. ज्या धाब्यातून लपूनछपून दारू दिली जाते, त्याचे परवाने रद्द केले पाहिजे. पण सरकार हे करणार नाही. कारण सरकार आणि पोलिसांचाही यात स्वार्थ दडला आहे. वाहतुकीचे नियम मोडणार्यांवर कठोर कारवाईसाठी ज्याप्रमाणे सरकारने मोटार वाहन कायद्यात सुधारणा केली, त्याचप्रमाणे या कायद्याचा लाभ घेत फक्त पैशाची वसुली करणार्या वाहतूक पोलिसांवरही कडक कारवाई करण्यासाठी एखादा नवा कायदा आणला पाहिजे. तरच यामागचा सरकारचा हेतू प्रामाणिक आहे, हे दिसून येईल. अन्यथा सरकारच्या अन्य कायद्यांची आणि त्यातील सुधारणांची जशी स्थिती झाली, तशी स्थिती मोटार वाहन कायद्यातील नव्या सुधारणांचीही झाल्याशिवाय राहणार नाही. सर्वसामान्य जनतेचा या नव्या सुधारणांना विरोध असण्याचे कारण नाही. मात्र, याचा उपयोग चोर सोडून संन्याशाला फाशी देण्यासाठी केला जाऊ नये, अशी अपेक्षा आहे. संन्याशाला सोडून द्या, चोराला शिक्षा करा, पण आपल्याकडे नेमके याच्या उलट होते?
No comments:
Post a Comment