Total Pageviews

Sunday, 11 March 2012

अन्न फेकणारे गुन्हेगार का वाढताहेत? (उत्तम कांबळे) लग्नसमारंभ, मेजवान्या, दहाव्या-बाराव्यातलं भोजन किती वाया जात असेल, याची गणतीच करता येणार नाही. थाळी भरून लोक आपली प्रतिष्ठा, वैभव व्यक्त करीत असतात. लग्न यशस्वी झालं की नाही, हेच मुळात तेथे खपणाऱ्या किंवा खपवल्या जाणाऱ्या अन्नावरून ठरतं... लग्नातल्या ऐश्‍वर्याची व्याख्या, सभा-समारंभाच्या ऐश्‍वर्याची व्याख्या, अन्न किती वाया घालवलं, यावरून होत असेल, तर या देशाला गरीब कसं म्हणायचं? "अन्नाची मस्ती करणारा देश,' असंच म्हणायला हवं.
पुण्यातल्या एका हॉटेलात राइस प्लेटची ऑर्डर दिली. थोड्याच वेळात ताट आलं. मी वेटरला विनंती करीत म्हणालो, ""या ताटातील पनीर असलेले पदार्थ, बटाट्याची भाजी, श्रीखंडाची वाटी घेऊन जा. मला नकोय ते. मी खात नाही आणि मी हे पदार्थ खराब केलेले नाहीत. विनाकारण वाया घालवायला नको.''


वेटर म्हणाला, "सॉरी साहेब, थाळीतलं काही परत घेण्याची प्रथा नाहीय आमची.'' मी म्हणालो, "परत न्यायच्या खाद्याच्या बदल्यात मी दुसरं काही मागणार नाहीय.'' तो म्हणाला, "सॉरी सर, तुम्हाला जे हवं ते खा. नको असेल ते थाळीतच द्या सोडून.'' मी - अरे पण, वाया जाईल विनाकारण. तो - प्लीज, काळजी करू नका. तुम्हाला जे नकोय ते सोडून द्या. बिल वगैरे काही कमी होणार नाही. मी - "बिल कमी करा,' असा माझा आग्रह नाहीच आहे. तुला हवं असेल तर मी जादा पैसे देईन, नको असलेले खाद्यपदार्थ परत नेले म्हणून. वेटर ऐकायला तयार नव्हता. आमचा संवाद ऐकून काउंटरवरचा व्यवस्थापक पुढं येऊन थांबला. मी त्याला सर्व प्रकार सांगितला. तो नम्रपणे म्हणाला, ""साहेब, काय अडचण आहे तुमची?'' मी - अडचण काहीच नाहीय. "मला नको असलेले पदार्थ वाया घालविण्याऐवजी परत न्या,' एवढीच माझी विनंती आहे. तो - ठीक आहे, काय काय नकोय आपल्याला? मी एकेका वाटीकडे बोट करू लागलो. तो वाट्या उचलू लागला. साऱ्या वाट्या ताटाभोवतीच ठेवत तो म्हणाला, ""नाऊ ओके?'' मी म्हणालो, ""अहो, मी "या साऱ्या वाट्या परत न्या,' असं म्हणत होतो. तुम्ही तर त्या बाजूलाच ठेवल्यात.'' तो - ओके सर, पण आता तुम्हाला प्रॉब्लेम नाही ना? निवांत जेवण करा! एन्जॉय सर!
मी आणखी काही बोलू नये म्हणून की काय, वेटर गायब आणि व्यवस्थापकही गायब. मी जेवण उरकलं. हात धुण्यासाठी उठलो. टेबलाकडं येऊ लागलो, तर टेबल स्वच्छ करणारा वेटर एका मोठ्या टबमध्ये थाळी आणि तिच्याभोवती ठेवलेल्या वाट्या फेकू लागला. पाहता-पाहता त्यानं साऱ्याचा कचरा केला. तरीही मी म्हणालो, ""अरे, बाजूला ठेवलेल्या वाट्या चांगल्याच होत्या. मी हात लावलेल्या नव्हत्या. उगीच खराब केल्यास.''
तो नुसताच हसला आणि टब घेऊन निघाला. मी बिल दिलं. हॉटेलमधील सर्व टेबलांवर उगीचच नजर फिरवली. किती जण ताटातच भरलेल्या वाट्या सोडतील, खाद्यपदार्थ सोडतील, याचा विचार करू लागलो... नेहमीच असा विचार करतो... ताटात सोडलेलं आणि चांगलं अन्न गटारीत फेकलं जाताना मला खूप वाईट वाटतं... थाळीसाठी प्रसिद्ध असलेल्या हॉटेलात सुटे पदार्थ सहसा मिळत नाहीत आणि सुटे पदार्थ मिळण्याची सोय असलेल्या हॉटेलमध्ये थाळी सहसा मिळत नाही. थाळी मांडण्याची पद्धतही मोठी विलक्षण असते. कोणीतरी एक वेटर येतो. पटापट सात-आठ वाट्या थाळीत ठेवतो. निघून जातो. मग पदार्थ घेऊन उभे राहणाऱ्या वेटरची फौजच येते. "अरे-अरे' म्हणेपर्यंत पदार्थ वाढून निघून जाते. "माझ्याकडं अमुक एक पदार्थ आहे, वाढू की नको,' असं सहसा कोणी विचारत नाही. प्रत्येक जण आपापलं काम करून निघून जातो. थाळीत अनेक वेळा नको असणारे, खाण्यासाठी प्रतिबंध असणारे पदार्थ पडून राहतात. आपोआपच ते गटारीतल्या खोक्‍यात आणि तेथून घंटागाडीत... नको असतानाही आग्रहानं पदार्थ वाढून घेणारे आणि तो वाया घालविणारे लोक काही कमी नाहीत!... कधी "पैसा वसूल' म्हणून; तर कधी मस्ती म्हणून पदार्थ सोडून जाणारे ग्राहकही असतात... कुणीतरी हिशेब केलाय, की एकचतुर्थांश भारत पोटभर जेवेल एवढं अन्न आपल्याकडं रोज वाया जातं. घरात वाया जाणारं अन्न वेगळं. सहलीच्या ठिकाणी वाया जाणारं वेगळं. पोरांच्या टिफिनमधून वाया जाणारं वेगळंच. अनेक जण बिसलरीची बाटली विकत घेतात. दोन-चार घोट पाणी पितात. उरलेली ठेवून जातात. त्यांच्या लक्षात येत असंल की नाही, माहीत नाही; पण बाटलीत पाणी शिल्लक राहत नाही, तर पैसेच शिल्लक असतात. लिटरभर पाण्याला जागेनुसार पंधरा ते तीस रुपये मोजत असतो आपण; पण असं पाणी शिल्लक ठेवण्यातही अनेकांची प्रतिष्ठा दडलेली असते. सरकार दर वर्षी संसदेत आकडेमोड करून सांगत असतं, की आपल्या देशात शुद्ध पाणी मिळाल्यानं अमुक लाख लोक मरतात. कुपोषणामुळं अमुक बालकं दगावतात. साठ टक्के बालकं अर्धपोटी; तर तीस टक्के बालकं जवळपास उपाशी असतात, अन्न नाही म्हणून...भाकरीचा तुकडा मिळाल्यानं अमुक लाख पोरं गुन्हेगार बनतात. आपल्या देशात रोज आठ-दहा रुपयांत लाखो लोक भाकरीसाठी लढाई करीत असतात. अजूनही कितीतरी हकीकती सांगता येतील. आपण वाया जाणारं अन्न जरी वाचवू शकलो, तरी अनेक प्राण वाचवल्यासारखं होईल... "चिपको आंदोलना'चे नेते सुंदरलाल बहुगुणा एकदा म्हणाले होते, "जे लोक विनाकारण आणि मस्ती म्हणून अन्न वाया घालवतात, ते भुकेल्या माणसाच्या तोंडातला घास किंवा त्याची जगण्याची संधीच ओरबाडून घेत असतात... गरज नसताना ते हे करीत असतात.'
लग्नसमारंभ, मेजवान्या, दहाव्या-बाराव्यातलं भोजन किती वाया जात असेल, याची गणतीच करता येणार नाही. थाळी भरून लोक आपली प्रतिष्ठा, वैभव व्यक्त करीत असतात. लग्न यशस्वी झालं की नाही, हेच मुळात तेथे खपणाऱ्या किंवा खपवल्या जाणाऱ्या अन्नावरून ठरतं. लग्नातले कारभारी टिऱ्या बडवून सांगतात, की आमच्या लग्नात आणखी दोन पंगती बसतील एवढं जेवण उरलं होतं.. लग्नातल्या ऐश्‍वर्याची व्याख्या, सभा-समारंभाच्या ऐश्‍वर्याची व्याख्या, अन्न किती वाया घालवलं, यावरून होत असेल, तर या देशाला गरीब कसं म्हणायचं? "अन्नाची मस्ती करणारा देश,' असंच म्हणायला हवं.
काही जण हॉटेलमध्ये जेवल्यानंतर शिल्लक राहणारं अन्न पार्सलमधून नेतात, ही चांगली गोष्ट आहे; पण प्रवासात हेही शक्‍य नसतं. ते ठेवण्याची, गरम करण्याची सोय नसते. काही जण घरातल्या कुत्र्यासाठी म्हणून पार्सल नेतात, हीसुद्धा चांगलीच गोष्ट म्हणावी लागेल. कुणाच्या तरी तोंडात ते पडतं. कुणाच्या तरी उपयोगी पडतं. अन्नाकडं आपण खासगी मालमत्ता म्हणून पाहत असतो. "आपण कमावतो. आपण मिळवतो. खाऊ नाही तर फेकून देऊ,' असं बोलणारेही काही कमी नाहीत; पण, अन्न ही एकाच वेळी खासगी मालमत्ता असते, तशी राष्ट्रीय मालमत्ताही असते. लालबहादूर शास्त्री पंतप्रधान असताना, म्हणजे 1965 मध्ये, त्यांनी भोजनावळी, मेजवान्यांवर मर्यादा आणल्या होत्या. आता असे शास्त्री नाहीत; तर कात्री आहेत. पुढाऱ्यांच्या पोरांची लग्नं आणि मेजवान्या पाहाव्यात. डोंगराएवढा खर्च होतो. खर्च जेवढा वाढंल, अन्न जेवढं वाया जाईल, तेवढा पुढारी भारी! पुढाऱ्याबरोबरच वरच्या वर्गातल्या लोकांचंही बघा. अन्न वाया घालविण्यानेच की काय, वरच्या वर्गात जाता येतं, असा अनेकांचा भ्रम झालाय. उच्चभ्रूंच्या वसाहतींमध्ये कचरा गोळा करणाऱ्या घंटागाड्यांत कधी तरी डोकवावं. अन्नाला लोळवणारा कचरा दिसंल... विनोबा म्हणायचे आणि गांधीजी म्हणायचे, "अन्नाची नासाडी म्हणजे नैतिक, सामाजिक आणि राजकीय गुन्हा असतो. कोणातरी भुकेल्याचं जगणंच तो नाकारत असतो.'
चंगळवादी आयुष्य जगणाऱ्यांपैकी कुणालाही असे सुविचार ऐकण्याची गरज नाही... त्यांच्याकडं वेळही नाही.. चल रहा है। खाऊन खाऊन अजीर्ण होणारा आणि "अन्न फेकण्यात इज्जत असते,' असं मानणारा एक समाज आणि नजूबाईंच्या एका पुस्तकात लिहिल्याप्रमाणे, पावसाळ्यात वारुळं खोदून लाल मुंग्या मारून त्या शिजवून खाणारा एक समाज... याला तर आपण विविधता म्हणत नाही ना?

No comments:

Post a Comment