देशच पोखरला आहे!मध्यस्थांमार्फत भ्रष्टाचार...गेल्या वर्षीच्या जानेवारी महिन्यात मंत्री, आयपीएस, आयएएस, लष्करी अधिकारी व राजकीय नेत्यांच्या कुलाबा येथील ‘आदर्श’ हाऊसिंग सोसायटीच्या घोटाळ्याप्रकरणी सीबीआयने १३ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला. त्यात माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना १३ वा आरोपी करण्यात आले आहे. कुलाबा येथील महसूल खात्याच्या मालकीच्या, परंतु संरक्षण खात्याच्या ताब्यात असलेल्या जमिनीवर निवासी इमारत बांधण्यासाठी मंत्री, आयएएस, आयपीएस व राजकीय पुढारी एकत्र आले. त्यांनी आदर्श सोसायटी तयार केली. त्यात कॉंग्रेसचे नेते व माजी आमदार कन्हैयालाल गिडवाणी यांनी पुढाकार घेतला होता. सोसायटीचे तेच सर्वेसर्वा हेाते. इमारत बांधणीची परवानगी लवकर मिळावी म्हणून त्यांनी सोसायटीचे सदस्य कारगील युद्धात भाग घेणारे लष्करी अधिकारी असल्याचेही अर्जात खोटेच नमूद केले होते. तोच उल्लेख सर्वांना महाग पडला. नियमांचे उल्लंघन व खोटे कागदपत्र सादर करून महागडे फ्लॅट सरकारकडून स्वस्त दरात मिळविल्याचे तपासात उघड झाले आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, सोसायटीचे प्रमुख प्रवर्तक कन्हैयालाल गिडवाणी आदी महत्त्वाच्या व्यक्ती अडचणीत आल्या. दरम्यान, आदर्शची फाईल गहाळ करण्याचा ठपका ठेवून सीबीआयने प्रथम नगरविकास खात्याचे कक्ष अधिकारी गुरुदत्त वाजपे, सहाय्यक नगर रचनाकार एन. एन. नार्वेकर, सचिवांचा लिपिक वामन राऊळ यांना अटक केली. याचा धसका कन्हैयालाल गिडवाणी यांनी घेतला. कधीतरी सीबीआय आपल्यावरही हात टाकणार या भीतीने गिडवाणी यांनी आपल्याविरुद्धचा तपास कमकुवत करण्यासाठी सीबीआयच्या तपास अधिकार्यांना मध्यस्थामार्फत मॅनेज करण्याचा प्रयत्न केला, परंतु तो त्यांच्यावर ‘बुमरँग’सारखा उलटला. जे. के. जगीयासी या इन्कम टॅक्स लॉयरला गिडवाणी व त्यांचा मुलगा कैलास यांनी सवा कोटी रुपयांची रोकड (सीबीआयच्या अधिकार्यांना देण्यासाठी) दिली होती. त्याच इन्कम टॅक्स लॉयरच्या घरी सीबीआयने अलिकडे छापा मारला. त्यावेळी गिडवाणी यांनी दिलेली रोकड त्या ठिकाणी आढळून आली तेव्हा सारा प्रकार उघडकीस आला. जे.के. या इन्कम टॅक्स लॉयरने एका प्रकरणात अडकलेल्या एअर इंडियाच्या अधिकार्याकडे सीबीआयच्या ससेमिर्यापासून वाचण्यासाठी ५० लाख रुपयांची लाच मागितली होती. इतकी मोठी रक्कम देऊ न शकलेल्या त्या अधिकार्याने जे.के.च्या विरोधात सीबीआयकडे तक्रार केली. त्यावेळी रचलेल्या सापळ्यात जे.के. सापडला. त्यातून गिडवाणी प्रकरण बाहेर आले. गिडवाणी करायला गेले एक आणि झाले भलतेच. सीबीआयने कन्हैयालाल, त्यांचा मुलगा कैलास व आदर्श घोटाळा प्रकरणात सीबीआयच्या वतीने न्यायालयात कामकाज पाहणारे वकील मंदार गोस्वामी अशा तीनजणांना आदर्श घोटाळ्यात, तर जे.के. यास एका एअर इंडियाच्या अधिकार्याकडे लाच मागितली या आरोपावरून अटक केली आहे. सीबीआय वकील मंदार गोस्वामी यांना गिडवाणी यांच्या वतीने जे.के.ने २५ लाख रुपये दिले होते, परंतु गोस्वामी यांनाही सीबीआयने सोडले नाही. आता तर आदर्श घोटाळ्याप्रकरणी सीबीआयने आदर्शचे सेक्रेटरी आर. सी. ठाकूर, नगरविकास खात्याचे उपसचिव पी. व्ही. देशमुख, निवृत्त ब्रिगेडियर एम. एम. वांछू आदींना अटक करून राज्यकर्त्यांना जबरदस्त हादरा दिला आहे. सीबीआयने १३ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. म्हणजे तेराही आरोपी जेलमध्ये जाण्याची चिन्हे दिसत आहेत. गेल्या वर्षीच्या फेब्रुवारी महिन्यात केंद्रीय दूरसंचारमंत्री ए. राजा, अण्णा द्रमुकच्या खासदार कनिमोझी, कॉंग्रेसचे खासदार सुरेश कलमाडी आदी महत्त्वाच्या व्यक्ती भ्रष्टाचारप्रकरणी जेलमध्ये गेल्या. गेल्या वर्षी भ्रष्टाचाराच्या प्रकरणाने कधी नव्हे तो आपला देश गाजला. या वर्षीही केंद्र व राज्यातल्या सर्वच सभागृहांत भ्रष्टाचार या मुद्यानेच आपला देश गाजणार असे दिसून येत आहे.जे.के. या इन्कम टॅक्स लॉयरने सीबीआय अधिकार्यांना लाच देण्यासाठी गिडवाणी यांच्याकडून सवा कोटी रुपये घेतले. त्यातील सीबीआयच्या गोस्वामी या वकिलाला २५ लाख रुपये दिले म्हणजे आज भ्रष्टाचार सर्वत्र आहे. तो कधी संपेल असे वाटत नाही. जो पकडा वो चोर. जिथे माणसे आहेत तिथे भ्रष्टाचार हा आहेच. गेल्या वर्षी समाजसेवक अणा हजारे यांनी भ्रष्टाचाराच्या विरोधात सारा देश ढवळून काढला, परंतु भ्रष्टाचार काही कमी झाला नाही. उलट मंत्री, खासदार, आमदार, जज, पोलीस अधिकारी, पालिका उपायुक्त, इन्कम टॅक्स कमिशनर आदी महत्त्वाच्या व्यक्ती लाचप्रकरणी गेल्या वर्षी जेलमध्ये गेल्या. आता तर आदर्श घोटाळ्याप्रकरणी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, मुंबईचे माजी पालिका आयुक्त व केंद्रीय मंत्री जेलमध्ये जाण्याची वेळ आली आहे. भ्रष्टाचार हा कितीही चोरून, लपवून मध्यस्थांमार्फत केला तरी तो कधीतरी उघडकीस येतोच. बरेच पोलीस अथवा शासकीय अधिकारी मध्यस्थामार्फत सौदेबाजी करतात. निवृत्त आयपीएस अधिकारी राहुल गोपाळ हे कडक शिस्तीचे व प्रामाणिक अधिकारी म्हणून महाराष्ट्र पोलीस दलात ओळखले जायचे. तेही त्यांच्या एका जवळच्या ऍस्ट्रोलॉयजर या ‘कलेक्टर’ने त्यांच्यासाठी जमविलेल्या व त्यांच्याकडे स्वाधीन केलेल्या पैशामुळे अडकले. ऍण्टी करप्शनने टाकलेल्या धाडीत त्यांच्या मोटारीत बेहिशेेबी रक्कम आढळून आली. ती कुठून आणली हे काही गोपाळ यांना सांगता न आल्याने राज्य पोलिसांच्या गृहनिर्माण मंडळाच्या संचालक पदावर (डीजी) कार्यरत असणार्या राहुल गोपाळ यांना ऍण्टी करप्शनने अटक केली. विशेष म्हणजे अटक करण्यापूर्वी काही महिने अगोदर गोपाळ अतिरिक्त पोलीस महासंचालक म्हणून ऍण्टी करप्शनमध्येच कार्यरत होते, परंतु त्यांच्या ऍस्ट्रोलॉयजरने तोंड उघडल्यावर व त्यांना पकडल्यावर राहुल गोपाळ निरुत्तर झाले. कन्हैयालाल गिडवाणी यांचा मध्यस्थ जे.के. सीबीआयच्या जाळ्यात सापडला. उद्या आणखी कोण सापडेल हे सांगता येत नाही. गेल्या वर्षी शालेय शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा यांच्याच पीएला नाशिकच्या एका शाळेच्या संचालकाकडून मंत्रालयात लाच घेताना अटक करण्यात आली होती. आता बोला? म्हणजे सारा देशच भ्रष्टाचाराने पोखरला आहे.- प्रभाकर पवार
No comments:
Post a Comment