Total Pageviews

Thursday, 16 February 2012

राज्यातील पोलिसांच्या कार्यक्षमतेत ढिलाई-ऐक्य समूह - भय इथले संपत नाही!
संपूर्ण राज्यातील पोलिसांच्या कार्यक्षमतेत ढिलाई आली असल्याचे मत सध्या सामाजिक कार्यकर्ते व्यक्त करत आहेत. सध्या गुन्ह्यांचे प्रमाण वाढले असून त्यांची उकल होण्याचे प्रमाण कमी होत आहे. अशा परिस्थितीत सर्वसामान्य जनतेचे जीवन सुरक्षित राहिलेले नाही. या साऱ्या प्रकारांची सरकारही पुरेशा गांभीर्याने दखल घेत नाही. या पार्श्वभूमीवर आता सर्वसामान्य नागरिकच स्वसंरक्षणासाठी जागोजागी सज्ज होत आहेत.सध्या महाराष्ट्रात पोलिसांची संख्या कमी आहे, का पोलीस अधिकाऱ्यांमध्ये कार्यक्षमता राहिलेली नाही, असा प्रश्न पडण्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. मुख्य म्हणजे या प्रश्नाचे उत्तर देणेही अवघड आहे. मात्र, एवढे खरे की, प्रत्येक जिल्ह्यात गुन्हेगारी वाढत आहे. गुन्हेगारांना राजकारणी मंडळींचा आधार मिळत आहे, हे उघड दिसत असूनही कोणी काही करू शकत नाही. आमच्या पक्षात गुन्हेगारांना स्थान दिले जाणार नाही असे नेतेमंडळी आवर्जून सांगत असले तरी प्रत्यक्षात परिस्थिती एकदम उलटी दिसते. त्यामुळे गुन्हेगारी प्रवृत्ती आणखी उफाळून वर येत आहे. या संदर्भात काही घटनांचा उल्लेख करावा लागेल. नाशिक शहरात गेल्या वर्ष-दीड वर्षांपासून दुचाक्या जाळण्याचे प्रकार वारंवार घडले आहेत. शिवाय ग्रामीण भागात शेतवस्तीवर दरोडे पडण्याचे प्रकारही वाढत आहेत. संतापजनक बाब म्हणजे हेे दरोडेखोर लूटमारी बरोबर स्त्रियांवर अत्याचारही करू लागले आहेत. शहरी भागात मंगळसूत्र, सोनसाखळी हिसकावून घेणारे चोरटे बिनधास्तपणे आपले कार्य पार पाडत आहेत. बॅंकेतून मोठी रक्कम घेऊन बाहेर पडणाऱ्या व्यक्तीचा पाठलाग करून तिला मारहाण करणे, पैशांची बॅग पळवणे असे गुन्हे करणारेही बिनधास्त झाले आहेत. प्रत्येक शहरात घरफोड्या, दरोडे सतत घडत आहेत. अशी गंभीर परिस्थिती असताना पोलीस काय करतात ते कळतच नाही. असे चित्र असताना फक्त वृत्तपत्रांनी पोलिसांच्या अकार्यक्षमतेवर रकाने भरून लिहिण्याने काही फरक पडेल असे दिसत नाही. केवळ जिल्ह्यांच्या शहरातच नव्हे तर पुणे, मुंबईसारख्या मोठ्या शहरातही पोलीस प्रभावीपणे काम करत नाहीत. त्यामुळे आता स्वतःचे रक्षण करण्यासाठी लोकांनीच रस्त्यावर उतरण्याची वेळ आली आहे. चोरट्यांची दहशत
या संदर्भात मुंबईतील उदाहरण लक्षात घेण्यासारखे आहे. मुंबईतील भांडुप या उपनगरी भागातील लोक दररोज रात्री अकरा वाजल्यापासून पहाटे पाच वाजेपर्यंत हातात काठ्या, शस्त्रे घेऊन गस्त घालत आहेत. ही अगदी आताची परिस्थिती आहे. चड्डी-बनियन घालून, तोंडावर कपडा बांधून दरोडेखोर कोणाच्याही घरात केव्हाही घुसतात आणि घरातील मंडळींना मारून-झोडून हाती लागेल तेवढे घेऊन जातात. असा अनुभव अगोदर पनवेल भागात आणि आता भांडुप भागातील नागरिकांनाही आला आहे. चड्डी-बनियनमधील हे टोळीवाले कधी येतील याचा नेम नाही. पनवेल भागात अलीकडेच या टोळीवाल्यांनी तीन खून केले आणि अनेक दरोडे घातले. या संदर्भात पोलिसांमध्ये तक्रार केल्यानंतर फिर्याद घेतली जाते आणि नंतर कोणी कधीही विचारले तर "पोलीस तपास सुरू आहे' असे ठराविक छापाचे उत्तर मिळते. त्यात कधीही बदल होत नाही आणि तपासही होऊन दरोडेखोरांना अटक करण्यात आली असेही होत नाही. या कारणांमुळे भांडुपमधील मध्यमवर्गीयांनी आता स्वत: पुढाकार घेत स्वसंरक्षणासाठी रात्रीची गस्त सुरू केली आहे. नागरिकांची ही गस्त रात्री अकरा वाजता सुरू होते. यात जवळपास एक हजार लोक घराबाहेर येतात आणि 100-50 च्या तुकड्या करून काठ्या, शस्त्रांनिशी इकडून-तिकडे, तिकडून इकडे फिरत राहतात.अशा परिस्थितीत कधी जवळच्या भागात चोर आले असे कोणाकडून कळताच रक्षकांचे जत्थे तिकडे धावतात. त्यावेळी संशयास्पद स्थितीत एक-दोघे दिसले तर त्यांना ठोकून काढले जाते. भांडुपमधील गाढवनाका, गावदेवी, टेंभीपाडा, पाईपलाईन रोड या वस्तीतील लोक गस्त घालण्यासाठी रात्रभर जागे असतात. भांडुप-पनवेल प्रमाणेच डोंबिवलीतही दरोड्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामागे ही चड्डी-बनियनवाली टोळीच आहे, असे सांगितले जाते.पोलिसांवर अविश्वास
खरे तर मुंबईसारख्या शहरातील उपनगरांमध्ये नागरिकांना अशा पध्दतीने रात्रीचा पहारा द्यावा लागावा, हे कशाचे द्योतक आहे, याचा विचार व्हायला हवा. मुंबई पोलिसांची कार्यक्षमता राहिलेली नाही किंबहुना जनतेचा पोलिसांवर विश्वासच राहिलेला नाही, हे त्याचे उत्तर आहे. परिस्थिती इतकी गंभीर बनली असल्याने आता त्यात गृहमंत्र्यांनीच लक्ष घालायला हवे. एकट्या भांडुपमधील नागरिकांच्या संरक्षणाचा हा विषय नाही. नागपूर, नाशिक, कोल्हापूर, औरंगाबाद, पुणे या शहरांप्रमाणेच इतर जिल्ह्यांमध्येही चोऱ्या-दरोडे आणि हिंसाचाराचे प्रकार वाढत आहेत. पोलीस आपल्याला पकडू शकत नाहीत आणि पकडले तरी काहीही करू शकत नाहीत, असा प्रचंड आत्मविश्वास चोर आणि दरोडेखोरांमध्ये निर्माण झाल्याचे संतापजनक चित्र पहायला मिळते. पांढरपेशी गुन्हेगार चटकन सापडू शकतात. भुरट्या चोऱ्या करणारेही सापडू शकतात. पण हे दरोडेखोर सापडत नाहीत, हेच तर खरे शल्य आहे. याबाबत नागरिकांना किंवा स्थानिक लोकप्रतिनिधींनी पोलिसांना जाब विचारला असता तर "असे घडले नाही', एवढे सांगून पोलीस मोकळे होतात. त्यातही त्यांना गुन्हेगारांविषयी थोडी तपशिलाने माहिती सांगितली तर "पुरावा द्या.... पुरावा द्या....' असे उलट उत्तर असते. या साऱ्या प्रकाराने एकट्या भांडुप, पनवेलमधील लोकांचाच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातील शहरी, ग्रामीण जनतेचा पोलिसांवरील विश्वास उडाला असून ती अत्यंत चिंताजनक बाब आहे.सरकारने कोणकोणती कामे करावीत हे सांगणे वेगळे; पण सरकारने नागरिकांचे संरक्षण करावे, हे मात्र प्रत्येकजण म्हणतो. अलीकडे मोठ्या शहरांमध्ये महिलांच्या छेडछाडीचे प्रमाण वाढले आहे. शिवाय अपहरणाचे प्रकार घडत आहेत. उच्चभ्रू वस्तीत एकट्या राहणाऱ्या वृद्ध जोडप्यांचे खून पाडले जात आहेत. अर्ध्या रात्री जरुरीच्या कामासाठी बाहेर पडलेल्या नागरिकांना चाकूचा धाक दाखवून लुटले जाते. या काल्पनिक गोष्टी नाहीत, याची गृहमंत्र्यांनी, पोलीस महासंचालकांनी तसेच मोठ्या शहरातील पोलीस आयुक्तांनी गंभीरपणे दखल घेतली पाहिजे, अशी जनतेची मागणी आहे.गुन्हेगारी वाढली.... लक्ष कोणी द्यावे?राज्यातल्या मोठ्या शहरांमध्ये आणि जिल्ह्याच्या ठिकाणीच नव्हे तर ग्रामीण भागातही चोऱ्यामाऱ्या, दरोडे, खून, बलात्कार, अपहरण, पैशांचे अपहार यांसारखे गुन्हे वाढत चालले आहेत. मुंबई-पुण्यासारख्या शहरांचा विचार केला तर पोलीस आयुक्त, पोलीस महानिरीक्षक या दर्जाचे अधिकारी केवळ बढतीच्या पदावर जाण्यासाठी धडपडत असतात. पोलीस अधीक्षक, पोलीस निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक आणि पोलीस कर्मचारी यांच्यावर कोणाचाही वचक राहिलेला नाही. एकेकाळी मुंबई शहराचे पोलीस आयुक्तालय स्कॉटलंड यार्डच्या बरोबरीचे काम करणारे मानले जात होते. आता ती तुलना करण्यासारखी परिस्थिती राहिलेली नाही. दरोडे आणि दरोडेखोरांचे प्रकार वेगवेगळे असतात. गेल्या दहा-पंधरा वर्षांमध्ये चड्डी-बनियन पोशाखात येणाऱ्या टोळ्यांचे दरोडे घालण्याचे प्रकार अनेक ठिकाणी वाढले आहेत. एकच टोळी संपूर्ण राज्यात हिंडत नाही; पण अनेक ठिकाणी चड्डी-बनियनवाले दरोडेखोर गुन्हे करतात, असे अनुभवास आलेे आहे. सर्वसामान्य नागरिकांचे जीवन सुरक्षित असायला हवे आणि याची जबाबदारी सरकारच्या गृहखात्यावर, पोलीस खात्यावर आहे; पण नेमके काय होते ते कळत नाही. खरे-खोटे काहीही असेल; पण पोलीस अलीकडच्या काळात अवैध धंदेवाल्यांकडून हप्ते घेण्यात मश्गुल असतात, या आरोपाची शहानिशा सरकारने जरा बारकाईने करायला हवी. याचबरोबर पोलिसांच्या कामाचे, गुन्हे रोखण्यात आलेल्या यशाचे ऑडिट करायला हवे. ठराविक भागात पोलीस अधिक कार्यक्षम किंवा अपयशी का ठरतात, याचा तपशिलाने धांडोळा घ्यायला हवा.

No comments:

Post a Comment